Author : Jyotsna Jha

Published on Jun 17, 2020 Commentaries 0 Hours ago

शिक्षणावर केला जाणारा खर्च असतो, ती गुंतवणूक नसते, अशी आपल्या समाजाची मानसिकता आहे. ऑनलाइन शिक्षण स्वीकारण्यासाठी ही मानसिकता बदलणे अत्यंत आवश्यक आहे.

ऑनलाइन शिक्षण ही भविष्यवेधी गुंतवणूकच!

Source Image: wired.com

रेल्वेची तिकिटे बुक करण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्यापेक्षा आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून बुकिंग करणे, वाणसामान ॲमेझॉन-फ्लिपकार्टसारख्या ऑनलाइन दुकानातून मागवणे, दूरवरच्या नातेवाईकांशी व्हिडिओकॉलच्या माध्यमातून बोलणे, मनीऑर्डरच्या ऐवजी गुगल-पे यूपीआय भीमसारख्या पोर्टलचा वापर करणे, हवामानाचा अंदाज घरबसल्या घेणे… याची आता आपल्याला सवय होऊ लागली आहे. या सगळ्यांमधला समान धागा म्हणजे तंत्रज्ञानाने पुसून टाकलेल्या भौगोलिक सीमारेषा व स्पर्धात्मक किमतीला वस्तू उपलब्ध करून देण्याची  अस्तित्वात आणलेली नवी व्यवस्था होय. आता या सर्व ऑनलाइन गोष्टींमध्ये शिकणेही आता डिजिटल होऊ लागले आहे. शिक्षणाची ही नवी व्यवस्था अद्यापही अंगवळणी पडलेली नसली, तरी ती आता अपरिहार्य आहे. त्यामुळे तिच्याबद्दल सर्वच बाजूने विचार व्हायला हवा.

शिक्षणाचा खराखुरा खर्च

इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सुखसोयी आणि चैनीच्या वस्तू दागदागिने, घरगुती वापराची यंत्रे याबरोबर शिक्षण हे अत्यंत खर्चिक असे माध्यम ठरते. आपण शैक्षणिक बाबींवर केला जाणारा खर्च नियमितपणे नोंदवत नाही. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग-मशीन हे अमुक हजार रुपयांना घेतले व इतके वर्ष वापरले आता नवीन घ्यायला हरकत नाही हे गणित कसे मांडले जाते? तसे शिक्षणाचे मांडण्याची पद्धत आपल्या नाही. इयत्ता पहिलीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत साधारण पंधरा ते सतरा वर्षे एखाद्या व्यक्तीचा शैक्षणिक प्रवास सुरू असतो. त्यामध्ये शैक्षणिक साहित्य, संगणक, अभ्यासक्रमाची फी, क्लासेस, प्रवास खर्च, विविध सॉफ्टवेअर यांचा खर्च विचारात घेतला तर शिक्षण हे खासगी खर्चातील महागडे क्षेत्र ठरेल.

नव्वदीनंतरच्या काळात खासगीकरण हळूहळू समाजात रुळायला लागल्यावर शिक्षणक्षेत्र आणि खासगीकरण याचा सहसंबंध हळूहळू दृढ व्हायला लागला. अस्तित्वात असलेल्या सरकारी शाळा आणि नव्याने उदयास आलेल्या खासगी संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळा महाविद्यालये यांच्या नव्या लाटेत बदलते तंत्रज्ञान मोलाचे ठरले. तांत्रिक बदल आत्मसात करून सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपण जी भरारी घेतली ती डोळ्यासमोर आहे. आता शैक्षणिक क्षेत्रातील नवे स्थित्यंतर येऊ घातले आहे, ते म्हणजे ऑनलाइन शिक्षण.

ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय?

व्हिडिओ कॉन्फरन्स सारखे लाईव्ह लेक्चरद्वारे ऐकणे म्हणजेच ऑनलाइन शिक्षण असा गैरसमज करून घेण्याचे प्रथम आपण थांबवले पाहिजे. गेल्या महिन्याभरात शहरी भागातील काही शाळांमधून महाविद्यालयांमधून Zoom व तत्सम माध्यमातून ऑनलाइन तासिका भरवण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे हेच ऑनलाइन शिक्षण हा काही जणांचा गैरसमज झालेला आहे. ऑनलाइन शिक्षण याचा सोपा अर्थ तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला  घरबसल्या शैक्षणिक सोयी-सुविधा मिळणे. शैक्षणिक संस्थेत न जाता प्रवेशापासून डिग्रीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपण इंटरनेट या माध्यमातून मिळवू शकतो.

यात पुढील बाबींचा समावेश होतो

  • प्रवेश प्रक्रिया डिजिटल असणे
  • पुस्तके व शैक्षणिक साहित्य इलेक्ट्रॉनिक (फक्त पीडीएफ नव्हे) स्वरूपात मिळणे.
  • विषय शिकवताना ज्या संकल्पना महत्त्वाच्या असतात त्यांचे सहा ते सात मिनिटाचे छोटे व्हिडिओ युट्युब सारख्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचविणे.
  • ई-पुस्तके वाचण्यासाठीचे सॉफ्टवेअर तयार करणे.
  • छापील पुस्तकांच्या डिजिटल आवृत्त्या तयार करणे.
  • जसे प्रत्यक्ष वर्ग भरतात, तसे ऑनलाइन माध्यमातून वर्ग भरवणे.
  • E-content वाचून किंवा बघून विद्यार्थ्यांना ज्या शंका उत्पन्न होतात त्याचे निराकरण करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थी यांच्यात थेट सुसंवाद घडवून आणणे.
  • सत्राच्या शेवटी ऑनलाईन माध्यमातून परीक्षा घेणे.
  • त्या परीक्षेसाठीचे प्रश्न कसे असतील त्याची उत्तरे विद्यार्थ्यांनी कशी लिहिणे अपेक्षित आहे त्याचे मूल्यमापन कसे केले जाईल याविषयी आराखडा बनवणे.
  • परीक्षा आराखड्यानुसार त्या परीक्षा प्रत्यक्ष ऑनलाईन घेण्यासाठी पोर्टल सॉफ्टवेअर तयार करणे.
  • एकाच वेळी परीक्षा घेता येतील अशा प्रकारची वेळापत्रकाची आखणी करणे.
  • ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी जे गॅजेट लागतात उदाहरणार्थ डेस्कटॉप, कॉम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन, चांगल्या दर्जाचे हेडफोन, वेगवान इंटरनेट याची रास्त दरात उपलब्धता असणे.

ऑनलाइन शिक्षण घेण्याला असलेल्या मर्यादा ज्या अभ्यासक्रमात असतात तेथे ऑनलाइनची सक्ती न करणे व व फक्त संकल्पना समजणे पुरताच ऑनलाईनचा आग्रह धरणे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणूनच ऑनलाइन शिक्षण प्रत्यक्षात आणता पुढील बाबींचा विचार आधी करायला हवा.

भारतातील तंत्रज्ञानाचा विकास व सद्यस्थिती

सॅम पित्रोदा यांच्या नेतृत्वाखाली कुशल व अकुशल भारतीयांनी कमालीची मेहनत घेऊन संदेशवहन जाळे पहिल्यांदा अस्तित्वात आणले. १९८५ नंतर माहिती तंत्रज्ञान हा एक नवीन उद्योग अस्तित्वात येऊ शकतो, याची पहिल्यांदा आपल्याला जाणीव झाली. स्वर्गीय राजीव गांधी पंतप्रधान असताना माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला नवे संधींचे आभाळ खुणावू लागले. भारतात संगणक आणण्यासाठी किती बौद्धिक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागला हे आपल्या कल्पनेपलीकडचे आहे.

हे समजून घेण्यासाठी दोन उदाहरणे घेऊया. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ या कंपनीने ‘लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (LIC) या सरकारी कंपनीसाठी विकत घेतलेले, पण राजकारण, कामगार संघटनांचे हितसंबंध आणि दूरदृष्टीचा अभाव यामुळे धूळ खात पडलेले संगणक विकत घेतले आणि आपला व्यवसाय वाढवला. (संदर्भ :टाटायन, लेखक गिरीश कुबेर) पुढे जाऊन या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीने  माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपले नाव मोठे केले.

दुसरे उदाहरण इन्फोसिसचे. इन्फोसिस टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीला संगणकासाठीचे सुटे भाग आयात करण्यासाठी सरकारी पातळीवर इतके खेटे घालावे लागले की, तेवढ्यात एक नवा संगणकच अमेरिकेत शोधला असता! (संदर्भ: इमॅजिनिंग इंडिया, लेखक नंदन निलेकणी) अशी आपली नोकरशाही होती आणि याच भारतात आज लाखो सॉफ्टवेअर इंजिनिअर्स भारतीय आणि परदेशी कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.

आजच्या ऑनलाईन शिक्षणाच्या विषयाशी या गोष्टींचा संबंध काय? असा प्रश्न वाचक म्हणून तुम्हाला पडणे हे स्वाभाविक आहे. पण, यातून इतकच सूचित करायचे आहे की, एखादा नवीन प्रयोग येऊ घातलेला असतो तेव्हा त्यात जितक्या अडचणी येतात तितकाच तो प्रयोग अत्यंत यशस्वी ठरतो. हा इतिहास आहे! ऑनलाइन शिक्षण हे त्याच मार्गाने जाईल असे वाटते.

ऑनलाइन शिक्षण आणि नकारात्मक मनोवृत्ती

भारतात फक्त निम्म्या घरातच इंटरनेट आहे, सर्व विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप स्मार्टफोन असेलच असे नाही, मग ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात करण्याची आता गरज आहे का?  असा प्रश्न निश्चितपणे विचारला जाईल. ऑनलाइन शिक्षण घेताना विद्यार्थी लक्ष देऊन शिकतील का? आणि तसे नसेल तर कशाला हवे ऑनलाइन शिक्षण?  अर्थव्यवस्था नाजूक स्थितीत असताना लोकांकडे जगायला पैसे नाहीत आणि कशाला हवे ऑनलाइन शिक्षण?

अशा सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी वरील दोन कंपन्यांची उदाहरणे मुद्दाम दिली आहेत.

शिक्षणासाठी केलेला खर्च, हा खर्च की गुंतवणूक?

आपल्याकडे कनिष्ठ मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय अशा विविध वर्गातील लोकांचा शिक्षण क्षेत्रातील खर्चाचा दृष्टिकोन व्यापक नाही. आपल्या मुलाला/मुलीला शाळेत प्रवेश दिल्यापासून ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत फक्त सुखसोयी द्यायच्या नसतात, तर शैक्षणिक वातावरण सुद्धा निर्माण करायचे असते. संगणकावर फक्त गेम खेळले जातात, आपल्याला कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटीला अॅडमिशन घ्यायची आहे का? मग कशाला हवाय लॅपटॉप? इंटरनेटवर कोणाला शिक्षण मिळते काय? अशा प्रकारचे विचार पालक वर्गामध्ये घाऊक प्रमाणात पसरले आहेत. आपण विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लावू शकलो नाही, त्यांच्यामध्ये अभ्यासू दृष्टिकोन निर्माण करू शकलो नाही याची खंत कमी, पण तंत्रज्ञानच मुलांना भरकटत नेते हा दृष्टिकोन ठाम! अशी धारणा असलेल्या समाजाला ऑनलाइन शिक्षण समजायला थोडा वेळ लागेल.

शिक्षणावरील खर्च आणि मनोवृत्ती

वार्षिक स्नेहसंमेलने, वाढदिवस, मित्रपरिवाराबरोबर सहलीला जाणे, महिन्यातून एखाद दुसऱ्या वेळेला हॉटेलमध्ये जेवायला जाणे, विविध सणाच्या निमित्ताने कपडेलत्ते, गृहोपयोगी वस्तू यांची खरेदी करणे, लग्नकार्यासाठी सोने खरेदी करून ठेवणे, यात काहीही गैर नाही, असे मानणारा समाज दर महिन्याला पाचशे रुपये वेगवान इंटरनेटसाठी खर्च करायला सहजासहजी तयार नसतो. आपल्या मुलाला वाढदिवसाला टू व्हीलर द्यायच्या ऐवजी एखादा दर्जेदार लॅपटॉप का देत नाही? कारण शिक्षण क्षेत्रात केला जाणारा खर्च असतो ही गुंतवणूक नसते ही समाजाची मानसिकता आहे.

शिक्षणाचा उद्देश चहूबाजूंनी मिळणारे ज्ञान आत्मसात करणे व त्यातून आपले उत्तम व्यक्तिमत्व घडवणे आहे, हा आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा जेवढा वापर होऊ शकतो, तेवढा अन्य कशाचाही होऊ शकत नाही. यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी पालक वर्गाचे प्रबोधन करण्याची नितांत आवश्यकता आहे. वाढदिवसाचे बक्षीस म्हणून कॉमर्सला असलेल्या मुलाला त्याचे नातेवाईक Tally या कोर्सची फी आम्ही भरतो अशी ऑफर का देत नाहीत?

ऑनलाइन शिक्षणातील तांत्रिक अडचणी

मागच्या तीन महिन्यांपासून घरी बसल्यामुळे व भविष्यात बाहेर पडणे तितकेसे सुरक्षित नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय समोर आला व त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाची गरज भागवण्यासाठी असलेल्या आवश्यक असलेल्या साधनांची मागणी सुद्धा वाढली. उत्तम दर्जाचे इंटरनेट उपलब्ध नाही, मोबाईल फोनवर सतत लेक्चर ऐकल्यामुळे व पाहिल्यामुळे डोळ्यांना व कानांना त्रास होतो. या आणि अशा अनेक अडचणी अगदी शंभर टक्के आहेत. पण त्या कायमस्वरूपी टिकणाऱ्या नाहीत. व्यवस्थित नियोजन केल्यास तीन महिन्यांमध्ये यातील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने नक्कीच सकारात्मक पावले उचलली जाऊ शकतात.

ऑनलाईन शिक्षण आणि दूरस्थ शिक्षण

भारताचा बराच ग्रामीण भाग भौगोलिकदृष्ट्या दुर्गम आहेच, पण शैक्षणिक सुविधांच्या दृष्टीनेसुद्धा वंचित आहे.  सरसकटपणे नाही तरीसुद्धा अत्यंत सुमार दर्जाचे शिक्षक, भ्रष्ट पद्धतीने चालवलेल्या शिक्षण संस्था किंवा दर्जेदार शिक्षणाचा अभाव यामुळेच विद्यार्थी शहराकडे आकर्षित होतात. ऑनलाईन माध्यमातून जे विषय प्रयोगशाळेत शिकवायचे असतात त्यांचा अपवाद वगळता, ऐकून व पाहून शिकायचे विषय नक्कीच परिणामकारकरित्या शिकवले जातात. एखादी जागा विकत अथवा भाड्याने घेऊन वर्ग भरण्यापेक्षा हे शिक्षण स्वस्त असल्याने सर्व प्रकारच्या आर्थिक स्तरातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळू शकतो.

विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी महाराष्ट्राच्या विविध भागातून पुण्या-मुंबईसारख्या शहरात येतात. विविध खाजगी संस्थांमध्ये शिकून वाचनालय आणि त्या माध्यमातून होणारी सोय यासाठी अगदी कॉट बेसिसवर राहतात. ऑनलाईन शिक्षणाच्या योग्य अंमलबजावणीने थेट प्रसारणाच्या माध्यमातून विद्यार्थी घरबसल्या शिक्षण घेऊ शकतात. हे दोन माध्यमाद्वारे होऊ शकते. आधीच रेकॉर्ड केलेली व्हिडिओची बँक विद्यार्थ्यांना मदत करू शकते व जसे प्रत्यक्ष वर्गात शिक्षक शिकवतात त्याच प्रमाणे ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेणे शक्य आहे. Google Meet, Zoom, Cisco Webex, Microsoft Teams अशी सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. दरमहा फक्त दोन हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत एकावेळी शंभर विद्यार्थीलाईव्ह लेक्चर ऐकू शकतील अशी सोय यामध्ये आहे.  उत्तम शिकवू शकणारे शिक्षक याद्वारे आपला व्यवसाय वाढवू शकतात व विद्यार्थ्यांनासुद्धा याचा फायदा होईल.

मुंबईसारख्या महानगरांमध्ये विद्यार्थी रोज दीड ते दोन तासफक्त प्रवास करतात व कॉलेजला येतात. प्राध्यापकांची ऑडिओ अथवा विडिओ माध्यमातील लेक्चर्स विद्यार्थ्यांच्या मोबाईल फोनवर असतील तर ट्रेनमधील प्रवासात जसे चित्रपट पाहिले जातात, बसायला जागा मिळाली तर पुस्तके वाचली जातात त्याच प्रमाणे अभ्यास करणे सुद्धा शक्य आहे.

डिजिटल कंटेंट कसा निर्माण करायचा ?

आज तिशी-चाळीशीत असलेल्या महाराष्ट्रातील तरुणांना बालचित्रवाणी आठवते का? दूरदर्शनच्या माध्यमातून सोप्या भाषेत कन्टेन्ट पोहोचवण्याचा तो एक उत्तम प्रयत्न होता. महाराष्ट्राच्या विविध शाळांमधील खरोखरच चांगलं शिकवू शकणारे व व तंत्रज्ञान स्नेही असलेले शिक्षक निवडून त्यांची व्हिडिओ लेक्चरची मालिका बनवता येऊ शकते. आठवड्याचे सात दिवस सलग टेलिव्हिजनवर मालिका असतात, त्याचे शूटिंग अहोरात्र केले जाऊ शकते, तर पंचवीस मिनिटाचेएक लेक्चर अशी प्रत्येक विषयाची लेक्चर विविध जिल्ह्यातील शिक्षकांकडून रेकॉर्ड करून घेणे अजिबात अशक्य नाही.

फक्त कागदी घोडे नाचवण्याचे शैक्षणिक प्रकार केले जातात त्याऐवजी असे प्रयोग करणे अशक्य नाही. प्रमुख जिल्ह्याच्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करण्याची उपलब्धता असलेले स्टुडिओ निश्चितच उपलब्ध आहेत. सर्व विषयांचा अभ्यासक्रम शिक्षकांच्या गटांना विभागून दिला तर सगळ्या डिजिटल कन्टेन्ट फक्त एक महिन्याच्या आत निश्चितच तयार होऊ शकतो पंधरा लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्याच्या उत्तरपत्रिका तपासून तीन महिन्यात आपण निकाल जाहीर करतो, मग हे काम तसे सोपेच म्हणायला हवे.

शासन सहभाग, आर्थिक गुंतवणूक आणि डिजिटल शिक्षण

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा टॅब वापरणे सोयीस्कर नाही. ज्यांचे पालक नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर असतात त्यांच्याबाबतीत या शैक्षणिक साधनांचा दुरुपयोग होणार नाही ना? अशी भीती व्यक्त केली जाते ही पूर्णपणे सत्य आहे. यावर उत्तम उपाय म्हणजे जसे विद्यार्थी कार्टून, मराठी मालिका, खेळ टीव्हीवर बघतात त्याप्रमाणे त्यांनी वेळापत्रकानुसार शिक्षण घ्यायचे. यासाठी लागणारी सर्व भांडवली गुंतवणूक ही शासनानेच करायला हवी. शिक्षण संस्थांच्या गळ्यात जबाबदारी टाकून आपण मोकळे होऊ ही मनोवृत्ती चालणार नाही.

दहावीपर्यंत किमान शिक्षण शासकीय पातळीवर दिले गेलेच पाहिजे, ही भूमिका असण्यात काहीच हरकत नाही. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दिवसाचे तीन तास वेगवेगळ्या इयत्ता साठी असे डिजिटल लेक्चरचे उपक्रम राबवण्यात कोणतीही अडचण नसावी व सरकारी वाहिन्या पैसे न देता उपलब्ध असतात त्यामुळे शिकणाऱ्याच्या दृष्टीने हे खर्चिक सुद्धा नाही.

डिजिटल शिक्षण सर्वांसाठी !

सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही माध्यमातून शिक्षण घेणे तसे कठीणच आहे. दारिद्ररेषेखालील विद्यार्थ्यांची स्थिती पाहता, त्यांची सामाजिक पार्श्वभूमी पाहता सरसकट समाजातील सर्व थरातील विद्यार्थी ऑनलाईन माध्यमाकडे वळतील असे निश्चितच होणार नाही. पण सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार नाही म्हणून जे लाभ घेऊ इच्छितात, त्यांनाही त्यापासून वंचित ठेवणे हा दुर्दैवी हट्ट धरणे अजिबात योग्य नाही.

तंत्रवैज्ञानिक बदल आगामी काळात अजूनच प्रभावी असतील आणि जग ज्या पद्धतीने बदलत आहे त्या स्पर्धेत भारताला उतरायचे असेल तर शिक्षणात गुंतवणूक करणे हा एकमेव उपाय आहे. शासकीय पातळीवर व वैयक्तिक पातळीवर यासाठी अधिकाधिक प्रयत्न झाले तरच शिक्षणाचे चांगभले होईल!

(कौस्तुभ जोशी हे मागील दहा वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ते अर्थशास्त्राचे अभ्यासक आणि वित्तीय नियोजनकार आहेत.)

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.