Author : Nilesh Bane

Published on May 01, 2020 Commentaries 0 Hours ago

कोरोनानंतर माणसाच्या आयुष्याची दिशा जशी बदलणार आहे, तसाच भाषाव्यवहारही बदलणार आहे. या बदलाची तयारी ज्या भाषा करतील त्याच भविष्यात टिकणार आहेत.

कोरोनानंतरचे जग आणि मराठी

भाषेसारख्या गोष्टीचा आणि तो देखील मराठीसारख्या स्थानिक भाषेचा कोरोनाशी काय संबंध? असा प्रश्न लेखाचे शीर्षक वाचल्यावर कोणाच्या मनात येऊ शकतो. त्यासाठी लेखाच्या सुरुवातीलाच याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. कोरोनानंतरचे जग वेगळे असणार आहे, हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. जगभरातील कंपन्या आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांनी या नव्या जगाचा अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. माणसामाणसातील नात्यांपासून, देशादेशांमध्ये असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंत अनेक समीकरणे कोरोनानंतरच्या जगात हळहळू बदलत जातील, असे संकेत मिळू लागले आहे. त्याबद्दल सर्वत्र लिहिले जाऊ लागले आहे. या सगळ्या बदलत्या जगाचा व्यवहार ज्या भाषेत चालणार, त्या भाषेबद्दलचा विचारही म्हणूनच महत्त्वाचा ठरतो.

हे अधिक स्पष्ट व्हावे यासाठी आपण एक सोप्यात सोपे उदाहरण घेऊ. ‘वर्क फ्रॉम होम’ हा कोरोनामुळे दिसलेला प्रमुख दृश्य बदल आहे. आजवर कधीही केले गेले नाही, अशी घरून काम करण्याची वेळ आज अनेकांवर आली आहे. पण, हा बदल तात्पुरता नसून, आता हीच कार्यपद्धती कायमची करता येईल का, याचा जागतिक पातळीवर विचार होतो आहे. टीसीएस (टाटा कन्सलटन्सी सर्विस) सारख्या कंपन्यांनी २०२५ पर्यंत आपली ७५ टक्के कर्मचारी घरून कसे काम करतील, या दिशेने कामही सुरू केले. जगभरात हे होत आहे. अनेक शाळा-महाविद्यालयांनी ‘लर्न फ्रॉम होम’ सारख्या घोषणा करत शिक्षणही ऑनलाइन करायला सुरुवात केली आहे.

याचाच अर्थ माणसे अधिकाधिक वेळ घरी राहणार आहेत. घरी असलेली माणसे घरातील लोकांशी प्रत्यक्ष आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जगाशी अप्रत्यक्षरित्या संवाद साधणार आहेत. त्यांच्या या घरातील आणि जागतिक संवादाची भाषा कदाचित वेगवेगळ्या असू शकतील. ‘मातृभाषा या स्वयंपाकघरात बोलण्याच्या भाषा उरतील’ असे भाष्य ज्येष्ठ कानडी लेखक शिवराम कारंथ म्हणत असत. पण त्यांचे हे भाष्य अशा संदर्भात प्रत्यक्षात येईल याची कदाचित त्यांनाही कल्पना करता आली नसेल. त्यामुळे माणसाच्या आयुष्याची दिशा जशी बदलणार आहे, तसाच हा भाषाव्यवहारही बदलणार आहे, याची तयारी सर्वांना करावी लागेल. किंबहुना ज्या भाषा ही तयारी करतील त्याच टिकतील, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

समजा, जर भविष्यातील शाळांमधील वर्गामध्ये शिकविले जाणारे शिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने होऊ लागले. त्यासाठी विविध प्रकारचे ऑनलाइन साहित्य निर्माण करावे लागेल. फक्त पाठ्यपुस्तके पीडीएफ करून हे काम होणार नाही. त्यासाठी डिजिटल माध्यमांसाठी मातृभाषेतील मजकूर (कंटेट) तयार करावा लागेल. तो मजकूर फक्त शब्दस्वरूपात नसेल, तर तो मल्टिमीडिया, खेळ (गेम्स) या स्वरूपात असेल. हा मजकूर जी भाषा तयार करू शकेल, तीच या ऑनलाइन माध्यमात लोकप्रिय ठरेल. जी लोकप्रिय ठरेल तिच्यातून आपल्या मुलांना शिकविण्याचा कल वाढेल. म्हणूनच मराठीसारख्या भाषांनी या नव्या माध्यमांपासून लांब न पळता, या माध्यमाच्या गरजा समजून त्या दिशेने काम करायला हवे.

आजवर मराठी भाषेच्या आणि एकंदरीतच भारतीय भाषांच्या भवितव्याविषयी प्रचंड लेखन झाले आहे. काय करायला हवे, याबद्दल भाषणे, परिसंवाद आणि वाद-विवादही झाले आहेत. पण आता या पलिकडे जाऊन भाषेचे माध्यम बळकट करण्यासाठी काम करावे लागणार आहे. फक्त मराठी शाळा, मराठी पुस्तके यापलिकडे जाऊन भाषा ही सर्वांगीण आयुष्यातील संवादाचे माध्यम आहे. ते अधिकाधिक समर्थ कसे करता येईल, त्या दिशेने पावले उचलायला हवीत. प्रामुख्याने सरकार म्हणून राज्य सरकारांची ती जबाबदारी मोठी आहे. पण त्याच बरोबर विविध संस्था आणि वैयक्तिक पातळीवर तुम्ही आम्ही या सर्वांनी आपापला वाटा उचलायला हवा. हे काम करण्यासाठी आपल्या आसपास नक्की काय बदलते आहे, हे आधी समजून घ्यायला हवे.

कोरोनाकाळात काय बदलते आहे?

कोरोनासारख्या साथी याआधीही या जगाने पाहिल्या आहेत. पण कोरोनाची साथ वेगळी आणि अधिक विश्वव्यापी ठरली याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे दळणवळणाचा वेग (Speed of Mobility) आणि माहितीच्या प्रसारणाचा वेग (Speed of Information). हे दोन्ही वेग आजवरच्या मानवी इतिहासातील सर्वोच पातळीवर आहेत. या दोन्ही वेगात आणखी बदल होणार आहेत. पण आता ते ज्या पातळीवर आहेत. त्यात भाषा म्हणून काय करायला हवे, या अनुषंगाने सातत्याने विचार आणि कृती व्हायला हवी.

पहिल्यांदा आपण दळवळणाबद्दल समजून घेऊ. आज आपण एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी दहा वर्षांपूर्वी जेवढा वेळ लागत होता, त्यापेक्षा कमी वेळात आपण त्या ठिकाणी पोहचू शकत आहोत. त्यामुळेच चीनवरून संपूर्ण जगभर हा रोग पसरायला काही महिन्यांचाच काळ लागला. हा रोग एवढा पसरला की, जगाला टाळे लावून बंद करावे लागले. आजवरच्या ज्ञात इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. जर दळणवळणाचा हा वेग नसता, तर हा रोग एवढा पसरलाच नसता. म्हणूनच हा रोग रोखण्यासाठी पहिल्यांदा दळवळण बंद करण्यात आले. माणसांनी एका विशिष्ट भागाच्या बाहेर पडू नये, म्हणून अख्ख्या जगात माणसांना एका ठरावीक जागेत स्थानबद्ध करण्यात आले.

आता हे भौतिक दळणवळण थंडावले, पण डिजिटल दळणवळण म्हणजे माहितीचा वेग प्रचंड वाढला. कोरोनाचा प्रसार होण्यापूर्वीही तो वाढलेलाच होता. पण कोरोनाकाळात तो त्याच्या शिखरावर पोहचला आहे. तो आणखीही वाढणार आहे. कोरोनानंतर भौतिक दळणवळण पुन्हा सुरू होईल. पण त्यासोबत माहितीचा वेगही वेगवेगळ्या स्वरूपात व्यक्त होत जाईल. आजपर्यत ‘तेल’ हे जगाचे चलन होते, पण भविष्यात तेलासोबच डेटा’ हे देखील जगाचे नवे चलन असणार आहे. भौतिक दळणवणासाठी ‘तेल’ आणि डिजिटल दळणवळण म्हणजे माहितीच्या वेगासाठी ‘डेटा’ हे सूत्र मानवी व्यवहाराचा आधार ठरणार आहे.

जर ‘डेटा’ हे नवे चलन असणार आहे, तर ते सामान्यांच्या भाषेत जेव्हा प्रकट होईल तेव्हा ते फक्त इंग्रजी किंवा मँडरिनमध्ये नसेल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या अनेक कंपन्या आज ‘लोकलायझेशन’वर मोठी गुंतवणूक करत आहेत. बॅकएंडच्या तंत्रज्ञानाची भाषा वेगळी आणि फ्रंटएंडची म्हणजे दृश्यभाषा वेगळी असे हे गणित आहे. मराठीतही हे काम होत आहे. जगभर विखुरलेलेले तज्ज्ञ या लोकलायझेशन म्हणजेच स्थानिकीकरणाच्या प्रक्रियेत काम करत आहेत. या सर्व कामावर लक्ष ठेवून तिला योग्य ती दिशा देण्याचे काम पालक म्हणून महाराष्ट्र सरकारचे आहे. सरकारसोबत भाषाविषयक संस्थांनी मिळून हे काम केल्यास ते अधिक सोपे आणि सार्थक ठरेल.

भाषेचे माध्यम आणि माध्यमाची भाषा

भाषा हे संवादाचे माध्यम असते, अशी भाषेची सर्वसामान्य व्याख्या आहे. पण हा संवाद कोणाकोणात होतो आहे, हे समजून घेतल्याशिवाय भाषेची प्रक्रिया पूर्ण होत नाही. उदाहरणार्थ दोन व्यक्तिंमधला संवाद वेगळा, दोन कुटुंबामधला संवाद वेगळा, दोन भिन्न भाषकांमधला संवाद वेगळा आणि विविध समूहांमधला संवाद वेगळा. अशा विविध प्रकारच्या संवादासाठी विभिन्न भाषा वापरल्या जातात. या भाषांमध्ये परस्पर देवाणघेवाण असते, ती असायलाच हवी. भाषा जिवंत असल्याचे ते महत्त्वाचे लक्षण आहे. पण भाषेचे राजकारण त्यात आले की भाषेच्या हट्टाग्रही शुद्धीची मागणी होते आणि अस्मिता टोकदार बनतात. हे टाळण्यासाठी खुल्या, मोकळ्या भाषक वातावरणाची गरज असते आणि ते राखणे ही सरकार नावाच्या व्यवस्थेची प्राथमिक जबाबदारी आहे.

जर असे वातावरण मोकळे ठेवता आले तरच ऑक्सफर्डसारख्या संस्था तगून राहतात. तेथे दरवर्षी नवनवे शब्द स्वीकारले जातात. त्यांना मान्यता मिळते, पण त्याचा दूराग्रह मात्र होत नाही. हे शब्द त्या भाषेत नैसर्गिकरित्या कसे मिसळतील, याची पूर्णपणे मोकळीक दिली जाते. भाषा ही दूराग्रहाने लादण्याची गोष्ट नाही, पण तिच्यात होणाऱ्या बदलांचा सातत्याने अभ्यास करून ते समाजापर्यंत पोहचविण्यासाठी या संस्था मोलाचे काम करतात. अशा संस्था उभारण्याऐवजी आपण साहित्य संमेलनासारखे सोहळे करण्यातच धन्यता मानतो. ते यापुढच्या काळात तरी थांबायला हवे.

जसे भाषाचे माध्यम म्हणून स्थान जपणे आवश्यक आहे, तसेच त्यासाठी नव्या माध्यमाची नवी भाषाही समजून घ्यावी लागेल. जशी दोन भाषांमध्ये देवाणघेवाण हवी तशीच भिन्न माध्यमांमध्येही देवाणघेवाण होत असते. कोरोनानंतरच्या काळात आपला डिजिटल माध्यमांमधला संवाद वाढणार आहे. त्यामुळे आजवर फक्त बोली, लेखी किंवा ध्वनी-दृश्य माध्यमांपुरतीच वापरली गेलेली ही भाषा डिजिटल माध्यमांसाठीही तयार करावी लागणार आहे. भाषासंस्कृतीनुसार नवे इमोजी करणे, नवे लघुशब्द (शॉर्टफॉर्म्स) रूढ करणे आदी गोष्टी आपण किरकोळ  समजतो. पण नव्या माध्यमाची भाषा म्हणून त्यावर काम होणे आत्यंतिक महत्त्वाचे आहे.

भाषेच्या प्रयोगशाळा (लँगवेज लॅब) उभारायला हव्यात

ओरिसा येथील कलिंगा विद्यापीठात एक अभिनव प्रयोग राबविला जातो. ओरिसातील विविध आदिवासी जमातीतील मुले जेव्हा कलिंगा विद्यापीठात शिकायला येतात, तेव्हा त्यांना त्यांच्या स्थानिक भाषेतून ओडियामध्ये आणि पुढे ओडियामधून इंग्रजीमध्ये शिकणे सोपे जावे. तसेच या साऱ्या प्रक्रियेत त्यांच्या तिन्ही भाषा समृद्ध व्हाव्यात यासाठी कलिंगा विद्यापीठामध्ये भाषेची प्रयोगशाळा (लँगवेज लॅब) सुरू करण्यात आली आहे.

यात वेगवेगळ्या स्तरावरील भाषांमधील संवाद समजावा, त्यात समृद्धता यावी यासाठी विविध प्रयोग केले जातात. त्यात अगदी शालेय स्तरापासून ते महाविद्यालयीन स्तरापर्यंतच्या विविध संकल्पनांचा विचार होतो. माहितीफलकापासून संगणकापर्यंत काय काय प्रकाराने भाषा एक माध्यम म्हणून प्रभावी करता येईल, या दिशेने तिथे प्रयत्न होत आहे. हा प्रयोग सर्वच भारतीय भाषांमध्ये व्हायला हवा.

उदाहरणच द्यायचे तर, आज सर्वत्र विडिओचा जमाना आहे. पण भारतीय भाषांमध्ये सबटायटल, डबिंगसारख्या गोष्टी करायच्या म्हटल्या तरी आधारभूत संस्था किंवा साधने नाहीत. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून हे सारे उभे करता येईल. भाषाभाषांमधील संवाद यातून सोपा होईल. लोकलायझेशन खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहचेल. आज सारे जग नव्या डिजिटलयाझेशनच्या दिशेने जात असताना, आपण यात मागे पडून चालणार नाही. डिजिटल पेमेंट, ऑनलाइन बँकिंगसारख्या अर्थव्यवहारातही किमान भारतीय भाषांचे स्थान दृढ करणे अत्यंत आवश्यक आहे.

हा डिजिटल कंटेट शाळांसाठी लागणार आहे, बँकासाठी लागणार आहे एवढेच काय तर उद्या वाणसामान आणि भाजी विकणाऱ्या मोबाइल अॅपसाठीही लागणार आहे. याच्या शक्यता अनंत आहेत, पण त्या करण्यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळ आपल्याकडे नाही. ते मनुष्यबळ घडविणाऱ्या संस्था नाहीत. या संस्थांना पाठबळ देणारी धोरणे नाहीत आणि अशी दूरगामी धोरणे बनविणारे सरकार आपल्याकडे नाही. त्यामुळे सरकारने आता तरी जागे व्हावे आणि अशी धोरणांच्या दिशेने आपली पावले उचलावीत.

काय करता येईल?

खरं तर हा विषय कितीही सविस्तर लिहिला तरी पूर्ण होणार नाही. मोजक्या शब्दात सांगायचे तर, कोरोनानंतरच्या काळात माणसाचे जगणे वेगळे असणार आहे. त्याचा व्यवहार बदलणार आहे, तसेच त्याचा भाषाव्यवहारही बदलेल. या बदलत्या भाषाव्यवहारासाठी आपली भाषा सज्ज असायला हवी. त्यासाठी काही ठोस कृतीपावले पुढीलप्रमाणे असू शकतील. या विषयाच्या जाणकारांनी ही यादी आणखी वाढवली तर चांगलेच होईल.

डिजिटल कंटेट- सकस डिजिटल कंटेट उभा करणे. हे काम आज वैयक्तिकरित्या किंवा व्यावसायिकरित्या होतच आहे. पण यापलिकडे जाऊन एक भाषा म्हणून भाषेसंदर्भातील विविध संकल्पना, भाषा ज्या संस्कृतीचा भाग आहे त्या गोष्टी अशा अनेक पद्धतीचा बहुभाषक समूहांनाही कळेल असा डिजिटल मजकूर तयार करावा लागेल.

नवे शब्द रूढ करणे- नवे शब्द रूढ करण्याचे काम माध्यमे आणि समाजमाध्यमे करत असतात. पण त्यावर लक्ष देऊन त्याच्या योग्ययोग्यतेची चर्चा व्हायला हवी. शब्दकोष, व्यृत्पत्तीकोश, संकल्पनाकोश अशी कोशनिर्मिती सातत्याने, सकसतेने आणि डिजिटली व्हायला हवी. इंग्रजी किंवा अन्य भाषेतील शब्द स्वीकारायचा असेल तरी तो मोकळेपणाने स्वीकारायला हवा. (आज हा लेख लिहितानाही अशा अनेक शब्दांचा वापर अटळ झाला आहे. ते खुल्या दिलाने स्वीकारले पाहिजे.)

डिजिटल रिसोर्सेस हवेत- आज विकिपीडियासारख्या मराठी मुक्तकोशामध्ये काही नवे घडताना दिसत नाही. तसेच असलेले मराठी डिजिटल कोश नव्या संकल्पना स्वीकारताना दिसत नाही. सारी प्रक्रिया खुंटल्यासारखी झाली आहे. तिला नव्याने गती द्यावी लागेल.

भाषा शिकण्याचे मल्टिमीडिया कोर्सेस हवेत – मराठी आणि मराठीच्या सर्व बोलीभाषा शिकण्यासाठी किंवा त्यातील मजा अनुभवण्यासाठी फार काही उपलब्ध नाही. ते डिजिटल जगात उभे राहायला हवे. या भाषा शिकण्यासाठी ‘कोर्सेरा’सारखे डिजिटल प्लॅटफॉर्म उभे करता येतील का, याचा विचार व्हायला हवा.

ई-मराठी शाळा हव्यात- आज चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या महाष्ट्रात, पानिपतपासून-तंजावरपर्यंतच्या बृहन्महाराष्ट्रात, एवढेच नव्हे तर न्यूयॉर्कपासून सिडनीपर्यंतच्या अनेकांना मराठी शिकण्याची आणि मराठीतून शिकण्याची इच्छा आहे. त्यासाठी ई-मराठी शाळा उभाराव्या लागतील. त्यात मजा करत करत मराठी भाषा शिकता येईल का, यासाठी नवनवे प्रयोग करावे लागतील.

नवनव्या फाँटसाठी प्रोत्साहन हवे- आज मराठी युनिकोड लोकप्रिय झाले असले, तरी त्यात नवनवे फाँट उपलब्ध नाहीत. अद्यापही प्रकाशन व्यवसायात युनिकोडचा वापर होत नाही. हे सारे असेच चालू राहिले तर मराठीचा डिजिटल वेग मंदावेल.

सोशल मीडियावरील नव्या संकल्पना- सोशल मीडियावर माहितीच्या संकलनासाठी नवनव्या संकल्पना वापरल्या जातात. उदाहरणार्थ हॅशटॅग, ट्रेण्ड वगैरे वगैरे. या अशा संकल्पनांचा उपयोग करून मराठीत नवनवी माहिती संकलन व्हायला हवे. त्यासाठी संस्थात्मक योजना आखल्या जाणे गरजेचे आहे.

डेटा उभा करणे- सर्वात महत्त्वाचे म्हणजे या नव्या जगाचे चलन असणारा मराठी डेटा उभा करणे. विविध माध्यमे समृद्ध करून आणि त्याद्वारे विविध संकल्पना राबवून मराठी डेटा उभा करणे, हे सर्वात महत्त्वाचे काम असणार आहे. जेवढा उत्तम, सकस आणि समृद्ध डेटा आपण तयार करू तेवढीच आपली भाषा उद्याचे आव्हाने पेलायला समर्थ होणार आहे.

खरं तर यातील अनेक गोष्टी कोरोनापूर्वीच्या काळातही आवश्यक होत्या. पण याकडे आजवर दूर्लक्ष झाले, पण आता तातडीने विचार व्हायला हवा. कारण कोरोनानंतरच्या काळात माहितीचा वेग आणखीच वाढणार आहे आणि लोकांची जीवनशैलीही बदलणार आहे. त्या दिशेने आत्ताच विचार आणि कृती व्हायला हवी. किमान मराठी भाषेचा टिळा लावून सत्तेत बसलेल्या सरकारने तरी मराठीच्या या तातडीच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.