-
CENTRES
Progammes & Centres
Location
पीएलएआरएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप असल्याने, अध्यक्ष शी यांनी पीएलएआरएफच्या नेतृत्वात बदल केल्याने सरकारच्या सत्तेच्या पदानुक्रमात घसरण झाली आहे.
‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ अंतर्गत सर्व काही आलबेल नाही, असे दिसते आहे आणि हा संसर्ग सत्तेच्या सर्व स्तरांमध्ये फैलावत आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे केंद्रीय लष्करी आयोग (सीएमसी) या लष्करी प्राधिकरणाचेही प्रमुख असून त्यांनी पीपल्स लिबरेशन आर्मी रॉकेट फोर्स (पीएलएआरएफ)ची पुनर्रचना केली आहे. देशाचे अण्वस्त्र शस्त्रागार या दलाच्या अधिपत्याखाली येते.
चीनच्या नौदलाचे माजी उपकमांडर वाँग हुबिन यांची ‘पीएलएआरएफ’च्या प्रमुखपदावर नियुक्ती करण्यात आली आहे, तर शु शिंग यांची ‘सदर्न थिएटर कमांड’मधून ‘पीएलएआरएफ’च्या नव्या राजकीय अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. एखाद्या विशिष्ट संस्थेवर पक्षाचे राजकीय नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी या पदाअंतर्गत येत असते. शु शिंग यांची शु झाँग्बॉ यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली असून झाँग्बॉ यांची २०२० मध्ये जनरलपदावर बढती करण्यात आली होती.
‘पीएलएआरएफ’चे नेतृत्व यापूर्वी माजी कमांडर जनरल ली युचाव यांनी केले होते आणि झांग झेंझाँग आणि लू गाँगबिन हे त्या वेळी उपकमांडर होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवून चौकशी झाली होती. ली युचाव हे सेंट्रल कमिटीचे सदस्य होते आणि नॅशनल पीपल्स काँग्रेसचे उपप्रमुख असल्याने पक्षाच्या सत्तेच्या उतरंडीत त्यांचे स्थान बळकट झाले होते. लष्कराच्या एखाद्या महत्त्वाच्या शाखेत बाहेरच्या व्यक्तीची पदोन्नती, राजकीय नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्यांच्या जागी अन्य कोणाची नियुक्ती करणे आणि माजी नेत्याची चौकशी सुरू करणे हे अत्यंत वेगळे आणि खोलवर असलेल्या अस्वस्थतेचे प्रतिनिधित्व करणारे आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) स्थापनादिनाच्या आधी ही घडामोड झाली. माजी परराष्ट्रमंत्री छिन गांग यांचे बेपत्ता होणे व त्यांना बडतर्फ करणे आणि ‘शाँगननहाय’ या चीनच्या उच्चभ्रू नेत्यांच्या वसाहतीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या खात्याचे प्रमुख जनरल वाँग शाजून यांचा रहस्यमय मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पुनर्रचनेला महत्त्व प्राप्त झाल्याचे मानले जाते.
चीनच्या अर्थव्यवस्थेत लक्षणीयरीत्या मंदी आली आहे आणि सोळा ते चोवीस या वयोगटातील बेरोजगारीचा दर २१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तियानमेन स्क्वेअर येथे झालेल्या हत्याकांडाला कारणीभूत ठरलेल्या अनेक कारणांपैकी एक कारण बेरोजगारी हे होते. त्या वेळी म्हणजे १९८० च्या उत्तरार्धात चीनमधील तरुणांनी कम्युनिस्ट पार्टीला आव्हान दिले होते. शी जिनपिंग यांच्या शून्य कोव्हिड-१९ धोरणाविरोधात गेल्या वर्षी चीनमधील अनेक शहरांमध्ये निदर्शनेही झाली होती. कठीण आर्थिक परिस्थितीसमोर उभ्या असलेल्या ‘धोक्यांचे व जोखमी’चे विश्लेषण सत्तेवरील वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात येते.
या पार्श्वभूमीवर, पुन्हा एकदा सर्व काही सुरळीत करण्यासाठी एक प्रयत्न करण्यात आला आहे. अलीकडेच शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) वरिष्ठ अधिकाऱ्यांना बीजिंग येथे बोलावले होते. त्या वेळी त्यांनी सैन्यावर पक्षाची चांगली पकड असण्याची गरज अधोरेखित केली. अलीकडील काही वर्षांत ‘पीएलए’कडून अधिक निष्ठेची गरज असल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भर दिला आहे. लष्कर शास्त्र अकादमीतील अभ्यासक जिआंग टिजून यांच्या म्हणण्यानुसार, ‘सीपीसी’ने सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचा आदर्श समोर ठेवला आहे. मात्र, राजकीय शिक्षण बासनात गुंडाळून ठेवल्याने सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाने आपल्या लष्करावरील पकड गमावली आणि त्याचा परिणाम होऊन पक्षाचे पतन झाले, असे शी यांचे मत आहे, असे टिजून सांगतात. याशिवाय रशियातील राजकीय-लष्करी उच्चभ्रूंविरोधात वॅग्नर ग्रुपच्या यिव्हगीनी प्रिगोझीन यांनी पुकारलेला बंड हेही शी जिनपिंग यांनी निष्ठेसंबंधातील नव्याने केलेल्या आवाहनाचे कारण असावे.
1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात तियानमेन स्क्वेअर हत्याकांडाच्या कारणांपैकी बेरोजगारी हे एक कारण होते.
शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील राजवटीत झालेल्या अधिकाऱ्यांच्या या नाट्यमय बदलांचा ‘पीएलएआरएफ’च्या नेतृत्वावर परिणाम होऊन त्याचा दलाच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो का? चीनच्या रॉकेटसंबंधातील दलांमध्ये आणि आण्विक शस्त्रास्त्रांवर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘पीएलएआरएफ’मध्ये या बदलांचा क्षमतेच्या दृष्टीने कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. नुकत्याच झालेल्या पुनर्रचनेआधी ‘पीएलएआरएफ’च्या क्षमतांमध्ये लक्षणीय बदल झाले होते आणि होत आहेत. मात्र, चीनच्या रॉकेट आणि अणू क्षेत्रात नुकत्याच झालेल्या बदलांचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता फारच कमी आहे. उच्च स्तरावर होत असलेल्या भ्रष्टाचाराने ‘पीएलएआरएफ’ची व चीनच्या लष्कराची मोठी हानी झाली असेलही; परंतु त्याच्या ताकदीवर आणि आण्विक क्षमतेवर त्याचा परिणाम झालेला नाही.
सन २०१६ मध्ये आरंभ झाल्यापासून आणि त्या पाठोपाठ अध्यक्ष शी जिनपिंग यांनी ‘पीएलएआरएफ’मध्ये मोठी सुधारणा करण्यास सुरुवात केल्यापासून चीनच्या क्षेपणास्त्र व आण्विक क्षेत्राच्या आधुनिकीकरणात गुणात्मक व संख्यात्मक दोन्ही प्रकाराने नाट्यमय वाढ आणि परिवर्तन झाले आहे. गुणवत्तेच्या बाबतीत पाहिले, तर पीएलएआरएफ सैन्याच्या आण्विक विभागात ‘पीएलएआरएफ’च्या डाँगफेंग (डीएफ)-४१ या सर्वांत प्रगत इंटरकॉन्टिनेन्टल बॅलेस्टिक मिसाइल (आयसीबीएम) वर बसवता येऊ शकणाऱ्या तीन मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल रींट्राय व्हेइकल्स (एमआयआरव्ही)चा समावेश आहे. याशिवाय चीनच्या वेगाने वृद्धी होणाऱ्या शस्त्रांस्त्रांसाठी रशियाच्या सरकारी अखत्यारितील रोसाटोम या अणू कंपनीने मदत केली आहे. ही कंपनी चीनच्या फास्ट ब्रीडर अणुभट्ट्यांना (एफबीआर) युरेनियमचा पुरवठा करीत आहे. त्याचा चीनला प्लुटोनियमआधारित विखंडनीय घटक पदार्थ उत्पादित करण्यासाठी लाभ होईल. प्लुटोनियम हा अण्वस्त्र तयार करण्यासाठी सर्वसामान्यपणे पसंतीचा विखंडनीय घटक पदार्थ आहे.
नवीनतम पुनर्गठनपूर्वी पीएलएआरएफच्या क्षमतांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले होते आणि ते होत होते आणि अलीकडील बदलांमुळे चिनी रॉकेट आणि अणुऊर्जेच्या सुधारणेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.
संख्यात्मकदृष्ट्या पाहिले, तर २०३० पर्यंत चीनच्या अण्वस्त्रांच्या साठ्यात सध्याच्या ४०० अस्त्रांपासून एक हजार अस्त्रांपर्यंत वाढ होईल; तसेच २०३५ पर्यंत ५०० अस्त्रांची अतिरिक्त वाढ होऊन ही संख्या १५०० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे, पीआरसीच्या रोड-मोबाइल ‘आयसीबीएम’च्या क्षमतांमध्ये वाढ करण्याव्यतिरिक्त ‘पीआरसी’च्या अस्त्राच्या क्षमतांचा लक्षणीय विस्तार होत आहे. पीएलएआरएफ चीनच्या वायव्य भागात सुमारे ३०० आयसीबीएम हवाबंद कोठार बांधण्याची तयारी करीत आहे. या बदलांबरोबरच ‘पीएलएआरएफ’ने जुनी डीएफ-२१ ए क्षेपणास्त्रे ताफ्यातून बाहेर काढली असून डीएफ-२१ सी ही क्षेपणास्त्रेही हटवली आहेत. या दोन्ही क्षेपणास्त्रांच्या जागी डीएफ-१७ आणि डीएफ-२६ ही नवी कोरी क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. त्यामुळे ‘पीएलएआरएफ’ला मध्यम पल्ल्याची आणि मध्यवर्ती पल्ल्याची क्षेपणास्त्रे मिळाली आहेत. अन्य क्षेत्रांच्या तुलनेत ‘पीएलएआरएफ’मधील बदलांची गती धीमी असली, तरी डीएफ-३१ ए क्षेपणास्त्रांची जागा डीएफ-३१एजी या प्रकारच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी घेतली आहे.
चीनची क्षेपणास्त्रे आणि आण्विक दले यांतील आधुनिकता ही संपूर्णपणे शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील ‘पीआरसी’चे कार्य आहे. त्या अंतर्गत जिनपिंग यांनी ‘पीएलएआरएफ’च्या क्षमतांसाठी मोठ्या प्रमाणात स्रोतांची मदत देऊ केली आहे. हे बदल आधीच्या सुधारणेपूर्वी अंमलात आणले आहेत. अशा प्रकारे, ‘पीएलआरएफ’च्या नेतृत्वातील बदलामुळे चीनच्या सज्जतेवर आणि क्षेपणास्त्र व अणू क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. एकूणात, या नव्या घडामोडींबद्दल भारतासह चीनच्या विरोधकांनी फार गंभीर विचार करण्याची आवश्यकता नाही.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Kartik Bommakanti is a Senior Fellow with the Strategic Studies Programme. Kartik specialises in space military issues and his research is primarily centred on the ...
Read More +Kalpit A Mankikar is a Fellow with Strategic Studies programme and is based out of ORFs Delhi centre. His research focusses on China specifically looking ...
Read More +