युद्धाच्या वेगवान व बदलत्या स्वरूपामुळे एक नवी संकल्पना उदयास आली आहे. ती म्हणजे, ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर.’ युद्ध जिंकण्यासाठी मानवी मेंदूला वश करून घेणे केंद्रस्थानी ठेवणे, ही या युद्धप्रकारामागची रणनीती आहे. या प्रकाराचा उपयोग प्रामुख्याने चीन-तैवान शत्रुत्वाच्या संदर्भाने केलेला आढळतो. गेल्या काही दशकांमध्ये चीनने आपली रणनीती बदलून ती प्रभाव आधारित मोहिमा आखण्याकडे वळवली आहे. याचे कारण, हे की तैवानवर तातडीने लष्करी आक्रमण करणे महागात पडू शकेल, याची जाणीव चीनला झाली आहे. या लेखात चीनचे ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’ आणि चीनकडून ते त्याच्या शत्रूंविरोधात विशेषतः तैवानविरोधात कसे खेळले जात आहे, याचा विचार केला आहे.
कॉग्निटिव्ह वॉरफेअर
‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’मध्ये प्रमुख्याने मानवी मनावर लक्ष्य केंद्रित केले जाते. त्यात वेगवेगळी तंत्रे वापरून मानवी मन वश केले जाते, म्हणजे आपल्याला अनुकूल असे वळवले जाते. या खेळात दोन प्रमुख खेळाडू असतात : हल्ले करणारे सूत्रधार आणि लक्ष्य झालेले नागरिक. या युद्धात मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘कृत्रिम प्रज्ञे’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. चीनमधील सहाव्या शतकातील लष्करी रणनीतीकार सन त्झु याने त्या काळात ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’ या संकल्पनेची मांडणी केलेली आढळते. ‘लढा न देता शत्रूचा प्रतिकार मोडून काढणे,’ अशी त्याची या युद्धाची संकल्पना होती. या प्रकारात युद्ध जिंकण्यासाठी प्रत्यक्ष रणभूमीवर जाऊन युद्ध न करता मानवी मनाच्या संज्ञानात्मक (कॉग्निटिव्ह) प्रक्रियांना लक्ष्य केले जाते. या संकल्पनेने सध्या ‘चायनीज पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या (पीएलए) वरिष्ठ अधिकाऱ्यांना आकर्षून घेतले आहे.
चीनमधील सहाव्या शतकातील लष्करी रणनीतीकार सन त्झु यांनी त्या काळात संज्ञानात्मक युद्ध या संकल्पनेची मांडणी केलेली आढळते. ‘लढा न देता शत्रूचा प्रतिकार मोडून काढणे,’ अशी त्याची या युद्धाची संकल्पना होती.
पीएलए आणि कॉग्निटिव्ह वॉरफेअर
‘पीएलए’ने २००३ मध्ये आपल्या ‘राजकीय कृती मार्गदर्शक तत्त्वां’मध्ये सुधारणा करून ‘तीन युद्ध प्रकार’ हे नवे धोरण जाहीर केले. हे तीन युद्धप्रकार म्हणजे : प्रसारमाध्यमे किंवा जनमत युद्ध, मनोवैज्ञानिक युद्ध आणि कायदेशीर युद्ध. हे तिन्ही प्रकार ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’शी थेट जोडलेले होते. जनमत युद्धप्रकाराचा भर हा विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जनमत आपल्याकडे वळवण्यावर असतो. या उलट मनोवैज्ञानिक युद्धाचा उद्देश हा नियोजनबद्ध धोरण आखून भय निर्माण करणे आणि भावना उत्तेजित करणे, हा असतो. ‘पीएलए’ने माहितीयुद्धाच्या धोरणावर आधारित तयार केलेल्या अहवालात ‘बौद्धिकतेचा वापर केलेले युद्ध’ या संकल्पनेवर भर दिला आहे.
‘पीएलए’चे अधिकृत वृत्तपत्र ‘पीएलए डेली’च्या वृत्तानुसार, परिधान करण्यायोग्य तंत्रज्ञान हे मानसिक मदत यंत्रणा म्हणून चीनकडून विकसित केले जात आहे. या माध्यमातून प्रत्यक्ष युद्धात येणाऱ्या मानसिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सैनिकांना सक्षम बनवले जाते. या अंतर्गत अनेक सैनिकांना ‘स्मार्ट सेन्सर ब्रेसलेट’ देण्यात आली असून ही ब्रेसलेट या सैनिकांच्या सहवासात येणाऱ्या सर्वांच्याच चेहऱ्यांची माहिती गोळा करते. या माहितीतून संबंधिताच्या त्या वेळच्या मानसिक स्थितीचा वेध घेता येतो. त्यानंतर प्रतिक्रिया देण्यासाठी या माहितीवर काम केले जाते आणि तिचे मूल्यांकनही केले जाते. त्यामुळेच सैनिकांच्या मानसिक आरोग्याच्या महत्त्वाची आणि कॉग्निटिव्ह क्षमतांची ‘पीएलए’ला जाणीव आहे. हेच घटक या युद्धप्रकारातील विजयाचा पाया मानले जातात.
चीनचे तैवानविरोधी धोरण समजून घेताना
चीनचा तैवानकडे पाहण्याचा कॉग्निटिव्ह दृष्टिकोन केवळ एका विभागाचा नाही, तर सरकारच्या विविध विभागांचा आणि चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या संस्थांचा समन्वित दृष्टिकोन आहे. तैवानमध्ये अंतर्गत फूट अधिक रूंद करणे, हा त्यांचा हेतू आहे. खोटी माहिती ऑनलाइन आणि प्रसारमाध्यमांमधून पसरवण्याचा या मोहिमांमध्ये समावेश आहे; तसेच शत्रूवर पाळत ठेवण्याच्या उद्देशाने तैनात केलेल्या सैनिकांच्या माध्यमातून धमकावणेही यातच समाविष्ट होते.
तैवानमध्ये अंतर्गत जनमतही विभागलेले आहे. काहींना तैवान-चीन एकत्रीकरण व्हावे, असे वाटते, तर काहींना तैवान कायम स्वतंत्र देश राहावा, असे वाटते.
विसाव्या शतकातील चीनमधील अनुत्तरित यादवीतून निर्माण झालेला चीन आणि तैवानदरम्यानचा तणाव हा अत्यंत खोलवर रुजलेला प्रश्न आहे. या तणावाने १९४९ मध्ये ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’चा जन्म झाला. ‘वन चायना’ धोरणांतर्गत चीन सरकार हे एकमेव कायदेशीर सरकार असा उल्लेख करताना तैवान हा आपला ‘विश्वासघातकी’ प्रांत असल्याच्या मुद्द्यावर चीनकडून भर दिला जात असतो. मात्र, स्वतःचे लष्करी व राज्यघटना यांच्यासह लोकशाही संस्था असलेले तैवान हे एक स्वतंत्र प्रशासन असलेले राष्ट्र म्हणून विकसित झाले. तैवानमध्ये अंतर्गत जनमतही विभागलेले आहे. काहींना तैवान-चीन एकत्रीकरण व्हावे, असे वाटते, तर काहींना तैवान कायम स्वतंत्र देश राहावा, असे वाटते.
याच संदर्भाने चीनने तैवानच्या विरोधात ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’ची रणनीती आखली. अलीकडील काळात या रणनीतीत प्रमुख्याने चार घटकांचा समावेश होतो.
· तैवानमधील लक्ष्यांवर सायबर हल्ले: अमेरिकेच्या प्रवक्त्या नॅन्सी पेलोसे यांनी २०२२ च्या ऑगस्ट महिन्यात तैवानला भेट दिली. त्या वेळी चीनने तैवानच्या कम्प्युटर नेटवर्क व वेबसाइट्सवर अनेकदा सायबर हल्ले केले. त्यातील एक घटना म्हणजे, ‘७-इलेवन’ या साखळी दुकानांची डिजिटल चिन्हे हॅक करण्यात आली आणि त्यावर ‘युद्धखोर पेलोसे, तैवानमधून चालत्या व्हा’ असा संदेश प्रसारित करण्यात आला. हे हल्ले तैवानी नागरिकांच्या मनावर नियंत्रण आणण्यासाठी आणि त्यांना घाबरवण्यासाठी करण्यात आले होते.
· तैवानमधील जनमत आपल्याला हवे तसे वळवण्यासाठी समूह माध्यमे आणि ‘डीपफेक’सह अन्य साधनांचा वापर करून खोटी माहिती पसरवणे: तैवानने चीनच्या ‘टिकटॉक’सारख्या समूह माध्यम व्यासपीठावर बंदी घातलेली नाही, ही प्रमुख समस्या आहे. चीन या व्यासपीठाच्या माध्यमातून चीनला अनुकूल असलेले संदेश पसरवत असल्याने तैवानसाठी हा गंभीर धोका आहे. त्याचप्रमाणे चीनकडून बनावट व्हिडीओ पसरवण्यासाठी डीपफेकसारख्या कृत्रिम प्रज्ञेच्या साधनांचाही वापर केला जात आहे. काही व्हिडीओ तर तैवानच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणारे असून काही व्हिडीओ तैवानी सरकारविषयी तैवानी नागरिकांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत.
· प्रत्यक्ष कारवाई न करता लष्कराकडून धमकावणे: उदाहरणार्थ, चीनने लष्करी सरावाचा एक भाग म्हणून २०२२ च्या उन्हाळ्यात ‘पीएलए’ने शंभरपेक्षा अधिक लढाऊ विमाने क्विमॉय बेटावर पाठवली आणि तैवानची नाकाबंदी केली. या धमकावण्याच्या प्रकाराला ‘द ग्रे झोन’ असे तज्ज्ञांनी संबोधले आहे.
· ‘मृदू सत्ते’चा (सॉफ्ट पावर) वापर: तैवानमधील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक व सामाजिक-सांस्कृतिक लाभ मिळवून देण्यासाठी चीनने देवाण-घेवाण कार्यक्रमांचा वापर केला. उदाहरणार्थ, तैवानमधून चीनमध्ये येणाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा किंवा भरघोस सवलत देऊ केली. चीनमधील जुन्या व संशोधन क्षेत्रातील आघाडीच्या अत्यंत प्रसिद्ध पेकिंग विद्यापीठात तैवानी विद्यार्थ्यांना अतिरिक्त जागाही चीनकडून देऊ करण्यात आल्या. चीनच्या प्रगतीविषयक मते बदलवण्यासाठी, चीनविषयीचे आकर्षण कायम राखण्यासाठी आणि चीनचा प्रभाव मान्य करण्याचा मार्ग मोकळा ठेवण्यासाठी तैवानमधील व्यावसायीकांना चीनमध्ये वावरण्यास प्रोत्साहन देणे हे चीनचे उद्दिष्ट आहे.
तैवानचा प्रतिकार
चीनच्या ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’चा प्रतिकार म्हणून तैवानने प्रथम खोट्या माहितीला पायबंद घालण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. अगदी अलीकडे म्हणजे १८ जानेवारी रोजी तैवानने पहिले ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’ संशोधन केंद्र स्थापन केले. स्थानिक प्रसारमाध्यमांमधील वृत्तांनुसार, या केंद्राचे तीन विभाग आहेत : माहितीचे संकलन व संशोधन, तैवानला लक्ष्य करून करण्यात येत असलेल्या ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’चे विश्लेषण आणि खोट्या बातम्यांना पायबंद घालण्यासाठी सज्जता. बनावट ऑनलाइन अकाउंट व बातम्या यांविषयी लोकांमध्ये जागृती करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. सायबर तज्ज्ञांच्या साह्याने बनावट अकाउंट कायमस्वरूपी बंद करण्यासाठी साततत्याने देखरेख करणे, हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे. नवे केंद्र हे न्याय मंत्रालयाच्या तपास विभागातील स्रोत व व्यावसायीक कौशल्य केंद्रात विलीन झाले आहे. तैवानमधील केंद्रीय निवडणूक आयोगाने टिकटॉकसमवेत संवाद सुरू केला असून तैवानमधील शिक्षणासंबंधातील खोट्या व्हिडीओंची माहिती निदर्शनास आणून दिली आहे.
तैवान चीनच्या ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’ला चांगल्या प्रकारे प्रतिकार करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर या युद्धाच्या भारतावरील परिणामांचाही विचार करायला हवा. सध्याचे भू-राजकीय स्पर्धात्मक वातावरण आणि हिमालयाच्या छायेतील सीमावादाचा तणाव पाहता चीन भारताच्या बाबतीतही अशाच प्रकारची खेळी खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही. उदाहरणार्थ, लडाखसारख्या भागात सीमावादासंबंधातील दृष्टिकोनात बदल करणे किंवा स्थानिक नागरिकांच्या मतांवर प्रभाव टाकून कथनांवर नियंत्रण आणणे यांसारखे ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’ अवलंबले जाऊ शकते. २०२० मधील गलवान खोऱ्याच्या संघर्षाबद्दल दिशाभूल करणारी माहिती पसरवून भारतीय जवानांची वाईट प्रतिमा उभी करण्यासाठी चीनकडून ट्विटरचा वापर केला जात आहे. त्यामुळे भारतविरोधी प्रचाराचा हेतू साध्य करण्यासाठी चीनकडून अवलंबण्यात येणाऱ्या ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’च्या रणनीतीविरोधात एकत्र येऊन मुकाबला करण्यासाठी भारतीय धोरणकर्त्यांनी सदैव दक्ष राहायला हवे.
भैरबी कश्यप डेका हे ‘ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशन’मध्ये रिसर्च इंटर्न होत्या.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.