Author : Nadine Bader

Published on Sep 18, 2020 Commentaries 0 Hours ago

आज मुंबई ढासळत चालली आहे. ही स्वप्नांची नगरी वेगाने झिजते आहे. हे शहर वेगवेगळ्या प्रकाराच्या तणावाखाली आहे. 'ब्रँड मुंबई' धोक्यात आहे.

…पण ‘ब्रँड मुंबई’ची काळजी कोणाला?

सध्या सर्वत्र चर्चा आहे ती ‘ब्रँड’ची. याला निमित्त घडले १३ सप्टेंबर रोजी शिवसेनेचे खासदार आणि सामना या मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘रोखठोक’ या सदराचे. (ज्यांनी हे सदर वाचले नसेल त्यांनी ते आवर्जून वाचावे.) या सदरामध्ये त्यांनी ‘ठाकरे ब्रँड’ आणि ‘पवार ब्रँड’ची गरज वगैरे का आहे, ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या सदराची सुरुवात त्यांनी ‘मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी कसा बदनामीचा घाट घातला गेला’ आहे त्याबद्दल लिहून केली आहे. शिवसेना आणि मुंबई हे नाते काही आजचे नाही. पण या सदराच्या निमित्ताने, एक मोठ्ठा प्रश्न मात्र सगळ्यांच्या चर्चेतून सुटला. तो म्हणजे… ‘ब्रँड मुंबई’ची काळजी नेमकी कोणाला आहे?

शहरांचे ब्रँड होतात म्हणजे काय?

ब्रँड म्हणजे काय? तर एखादी वस्तू, सेवा किंवा अशी कोणतीही गोष्ट जी इतर त्यासारख्या गोष्टीपासून वेगळी आहे, प्रतिष्ठित आहे आणि अर्थातच मोहक आहे. बर्गर अनेकजण विकतात पण ‘मॅकडोनाल्ड’ हा ब्रँड आहे. मोबाईलच्या अनेक कंपन्या आहेत पण ‘अॅपल’ हा ब्रँड आहे. शूज बनवणा-या कंपन्या भरमसाठ आहेत पण ‘नायके’ हा ब्रँड आहे. फोर्ड, मर्सिडीज, रे बॅन, ली कूपर हे आणि असे अनेक त्या त्या क्षेत्रातले ब्रँड आहेत. मार्केटिंगच्या या उत्तर आधुनिक जगात ब्रँड या कल्पनेचा मोठा विस्तार झालाय. आता स्वतःची एकही गाडी बसलेली ‘उबर’ ही टॅक्सी सर्व्हिसपण ब्रँड झालीय. पण, म्हणून आपण हे समजायला नको की ब्रँड ही काही आधुनिक गोष्ट आहे. ब्रँड ही कल्पना अगदी मध्ययुगीन किंवा त्याही आधी होती, फक्त ती आताच्या स्वरूपात नव्हती.

कॉंगोच्या राजाकडून पोर्तुगालचे व्यापारी सोने विकत घ्यायचे आणि मेसोपोटेमियाच्या सम्राटाला ते विकायचे. त्या सम्राटकडून पोर्तुगाल व्यापारी अरबी घोडे विकत घ्यायचे आणि मुघल सम्राटाला विकायचे. त्याबदल्यात इथून सुती कापड आणि मसाल्याचे पदार्थ घेऊन जात आणि रोम आणि पोर्तुगालच्या बाजारपेठांमध्ये विकत. या साखळीमध्ये सोने, अरबी घोडे, सुती कापड, मसाल्याचे पदार्थ हे तर ब्रँड होतेच, पण इतकं सगळे जग फिरून सगळीकडून उत्तम माल मिळवणारे आणि ग्राहकाला खात्रीशीर माल पुरवणारे पोर्तुगीज व्यापारी हेही एक ब्रँडच होते. म्हणूनच सुरतेत वखार लावणा-या पोर्तुगीजांना त्याहीआधी मुंबईत वखार लावता आली आणि त्या तेव्हाच्या मुंबईशी व्यापार सुरू करता आला. मुंबई ही ब्रँड म्हणून उदयाला यायला ही अशी सुरुवात झाली!

अनेकांच्या हे लक्षात येत नाही की, जशी एखादी वस्तू ब्रँड असते तसे एखादे शहरसुद्धा ब्रँड असते. मध्ययुगात आग्रा, बगदाद, रोम, कॉन्स्टंटिनोपल, अझरबैजान ही ब्रँड होती. हम्पी ब्रँड  होते. फत्तेपुर सिक्रीला असेच ब्रँड बनवावे ही अकबराची इच्छा होती. मुंबई हा ब्रँड उभा राहायला सुरुवात झाली, कारण युरोपचा आशियाशी कॉन्स्टंटिनोपलच्या मार्गाने असणारा व्यापार रोमन साम्राज्याच्या अस्तासोबत तुटला आणि युरोपला भारताशी व्यापार करायला नव्या मार्गाची गरज लागली. या नव्या मार्गात सुरुवातीला गवसलेला मलबार किनारा आग्रा, सुरत ह्या व्यापार केंद्रापासून दूर होता. सुरतमध्ये पटकन वाव मिळत नव्हता. तेव्हा गोवा आणि मुंबई ही तुलनेने सुरक्षित ठिकाणे होती आणि त्यातून इथे पोर्तुगीज आले.

कालांतराने पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना मुंबई सोयरिकीच्या निमित्ताने दिली. एकीकडे हे होत असताना इंग्लंड आणि जर्मनीमध्ये औद्योगिक क्रांती येत होती. एका अर्थाने युरोपच्या राजकारणात ब्रँड ब्रिटिश मोठा होत होता आणि ब्रिटिशांना हिंदुस्तानशी व्यापार करायला मुंबईची वखार उपयोगी पडत होती. औद्योगिक क्रांती झाल्यावर जगात पहिले कुठले शहर ब्रँड बनले असेल तर ते लंडन. तसेच, ब्रिटिशांनी त्यांच्या वसाहतीतील कुठले एक शहर ब्रँड म्हणून उभे केले असेल तर ते मुंबई!

कसा उभा केला मुंबई हा ब्रँड?

जगाच्या व्यापारात जसजसं ब्रिटनचे महत्त्व वाढू लागले तसतशी ब्रिटिशांनी आपल्या वसाहतींमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली. या काळात मुंबईतून ईस्ट इंडिया कंपनीमार्फत होणारा व्यापार हा इतर वसाहतींच्या कैकपट अधिक होता. त्यामुळे मुंबई हे आशियातील समुद्री व्यापाराचे मोठे केंद्र निर्माण करून त्यातून ब्रिटनच्या समृद्धीत भर घालता येऊ शकते, हे त्यांना जाणवले होते. म्हणूनच इथे ब्रिटिशांनी रेल्वे आणली. या रेल्वेचा उद्देश विदर्भ, माळवा इथला कापूस मुंबई बंदरात आणून इथून तो मँचेस्टरला न्यायचा हाच होता. इथले बंदर विकसित करायचे असेल तर त्यातले स्थानिक तज्ज्ञ लोक हाताशी धरले पाहिजे, एवढी ब्रिटिशांना समज होती. त्यांनी वाडिया, टाटा यांना जहाजबांधणी आणि दुरुस्तीमध्ये प्रोत्साहन दिले. वाडिया टिकले. दुसऱ्या बाजूला मुंबईत गिरणी सुरू झाल्या आणि हळूहळू व्यापार वाढू लागला.

जिथे व्यापार वाढत असतो, पर्यायाने वस्ती वाढत असते तिथे नागरी सुविधा पुरवल्या की, त्या भागाला स्थैर्य येते. ब्रिटिशांनी एतद्देशीयांमधल्या जाणकार मंडळींसोबत, नवशिक्षित लोकांसोबत एकत्र येऊन शाळा आणि महाविद्यालये काढली. मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. इथे हायकोर्ट आणले. ग्रंथालये उभ्या करायला सुरुवात केली. शहराचे वैचारिक आणि सांस्कृतिक जीवन कसे वृद्धिंगत होईल आणि चांगल्या जीवनमानाचा आशेने हिंदुस्थानभरातून लोकं कशी मुंबईकडे येतील याची सोय केली. अर्थातच हेही खरे आहे की, हे सगळे इंग्लंडला अधिकाधिक पैसा नेता येवा म्हणून सुरू होते. पण, या वासाहातीक सुधारणामध्ये शहराचा नियोजनबद्ध विकास होताच शिवाय त्यातून एक ओळखसुद्धा निर्माण होत होती.

नंतरच्या काळात आधुनिक शिक्षणाच्या जोरावर मुंबई आणि पुण्यातून विचारवंतांची फौज तयार झाली. अनेक जण लंडनमध्ये जाऊन वकिलीपासून आधुनिक विद्या शिकून परतले तेही मुंबईतच! कारण इथे त्यांच्या विद्वत्तेला, अभ्यासाला संधी होती, वातावरण होते. काँग्रेसची स्थापना, गिरण्या, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार चळवळ, फुलेंचा बहुजनवाद, टिळकांचा अंगार मुंबईत वाढला, फुलला त्याचे कारण या शहराची हळूहळू तशी बांधणी होत गेली होती.

दादाभाई नौरोजी ते न्यायमूर्ती रानडे इथे राहत होते. हिंदुस्थान या वसाहतीची आर्थिक राजधानी बनलेली मुंबई काळाच्या ओघात वैचारिक आणि चित्रपटक्षेत्राच्या उदयासोबत सांस्कृतिक राजधानी बनली. एक स्वयंभू सत्ताकेंद्र म्हणून उदयाला आली. त्या काळातल्या मुंबईत आजच्या बांगलादेश आणि पाकिस्तानातले लोक नशीब आजमावायला आलेले होतेच, कारण तेव्हा हे देश भारताचाच भाग होते. पण त्याहीपलीकडे इराण ते नव्याने वाढत चाललेल्या सिंगापूर आणि सोबत चीनमधून पण लोकं मुंबईत येऊन राहत होती.

मद्रास प्रांतातून आलेला एखादा मजूर असो किंवा पंजाबमधून आलेला छोटा व्यावसायिक, मंगलोरमधून आलेला अण्णा असो किंवा मध्य प्रांतातुन आलेला मजूर, या सगळ्यांना मुंबई जागा देत होती. सामावून घेत होती. त्यांच्या श्रमाला पैसा आणि प्रतिष्ठा, दोन्ही देत होती. ‘ये शहर आदमी को भूखा नहीं रखता’ ही मुंबईची ओळख बनली तो हाच काळ. आज म्हणजे २०२० पासून साधारण सव्वाशे वर्षं झाली, जेव्हा मुंबईला ही अशी ओळख मिळाली.

आजही या ओळखीच्या बाबतीत परिस्थिती फारशी बदललेली नाही. आजही देशभरातून शेकडो जण या शहरात नशीब कमवायला येतात. आपापल्या परीने कष्ट उपसतात. काही टिकतात. काही परत जातात. काही इथून आणखी पुढे कुठेतरी जातात. पण मुंबई त्यातल्या कुणालाही नाकारत नाही, फेकून देत नाही. ‘ब्रँड मुंबई’ आहे तो हा असा.

या सगळ्याला आणखी एक बाजू आहे, चिंता वाटावी अशी. मुंबईवर प्रेम करणा-या प्रत्येकाला अस्वस्थता वाटावी अशी. आणि ही बाजूच आज मुंबई ब्रँडसमोरचे सगळ्यात मोठे आव्हान आहे. काय आहे ही गोष्ट? आज मुंबई ढासळत चालली आहे. ही स्वप्नांची नगरी वेगाने झिजते आहे. हे शहर वेगवेगळ्या प्रकाराच्या तणावाखाली आहे. ‘ब्रँड मुंबई’ धोक्यात आहे. शिवसेना किंवा संजय राऊत सांगतात, त्याप्रमाणे कोणीतरी दिल्लीत मुंबईविरोधी कट करत आहेत आणि म्हणून मुंबई धोक्यात आहे असे नाही. तर मुंबईच्या पायाभूत सुविधा, इथल्या बहुतांशी लोकांचं राहणीमानच तणावग्रस्त झालेले आहे आणि म्हणून मुंबई धोक्यात आहे.

आज मुंबईची लोकसंख्या १ कोटी ७० लाखांच्या पुढे आहे. त्यातल्या जवळपास ४० टक्के लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही. जवळपास ३० टक्के लोकांकडे वैयक्तिक शौचालय नाही. ५५ टक्के लोकांकडे पक्के घर नाही. साधारण ७० टक्के लोकांना अत्यंत गर्दीच्या, चेंगराचेंगरीच्या अश्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागतो. जवळपास २५ टक्के लोकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ मिळत नाही. आणि जवळपास २० टक्के लोक हे पुनर्बांधणी करण्याची गरज आहे अश्या इमारतींमध्ये राहतात.

हि आकडेवारी काय सांगते? मुंबईकर आज तणावात आहे. हा तणाव त्याच्या राहण्याच्या ठिकाणी आहे आणि कामाच्या ठिकाणी जाताना आहे. हा तणाव पाण्यासाठी आहे आणि धान्यासाठी आहे. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे मुंबईकरांच्या जीवनमानाचा दर्जा घसरतो आहे. याला साधारण शिवसेना, मनसे, भाजप हे पक्ष आणि आजकाल अगदी काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा इतरही छोटे मोठे पक्ष एकच कारण सांगू लागलेत. मुंबईतली गर्दी. या शहरावर येऊन आदळणारे लोंढे या शहराच्या बकाल होत चाललेल्या अवस्थेला कारणीभूत आहेत असं सोपे उत्तर हे राजकीय पक्ष देतात. पण ते तितकंसे खरे नाही.

नियोजनाचा अभाव आणि दूरदृष्टी नसलेले नेतृत्व हा या शहराची मुख्य समस्या आहे. मी जेव्हा नेतृत्व म्हणतो तेव्हा ते प्रामुख्याने शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांना लागू होते. भाजप २०१७ फेब्रुवारीपर्यंत महापालिकेत सत्तेत होता. त्यामुळे तेही आज तितकेच जबाबदार आहेत. मागच्या तीस वर्षात मुंबईची अधोगती झाली. हे शहर ढासळत चाललंय. आणि या अध:पतनाला मुंबईचं सर्वपक्षीय राजकीय नेतृत्व आणि प्रामुख्याने शिवसेना भाजप जबाबदार आहे.

काय आहे या पक्षांचे मुंबईसाठी योगदान? मला अशी एक गोष्ट, एक योजना, एक इमारत, एक प्रकल्प दाखवा जो या दोघांच्या महापालिकेतल्या सत्तेच्या काळात उभा राहिला आणि ज्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली. आजही मुंबईसाठी जे पर्यटक येतात ते एकतर ब्रिटिशकाळात उभारलेल्या इमारती, कला दालने बघतात किंवा मग धारावी! हो, आज परदेशी पर्यटक धारावीची झोपडपट्टी बघायला जातो. तुम्ही कोरोना ओसरला आणि पर्यटन सुरू झालं की कधी धारावीमध्ये जाऊन बघा. तुम्हांला परदेशी पर्यटकांचे ग्रुप्स दिसतील.

निव्वळ नव्या इमारती आणि नवे प्रकल्पच नाहीत. मुंबईची आर्थिक आणि सांस्कृतिक पातळीवरही पीछेहाट होतेय. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक सर्रास बोललं जाते. मुंबई देशाला ७० टक्के टॅक्स देते आणि बदल्यात मात्र केंद्र काही देत नाही. यात पूर्ण सत्य सांगितलं जात नाही. आज मुंबईत देशातल्या बड्या उद्योगसमूहांची ऑफिसेस आहेत. त्यांचे देशभर कारखाने आहेत. आणि त्याचा एकत्रित टॅक्स ते मुंबईत भरतात. हे मुंबईचं उत्पन्न धरले जाते. मुंबई पारंपरिकरित्या आर्थिक सत्ता केंद्र राहिले म्हणून इथे उद्योगधंद्यांची ऑफिसेस आली. पण काळाच्या ओघात आता अनेक ऑफिसेस मुंबईच्या बाहेर जात आहेत.

कोणीतरी मुंबई विरोधक केंद्रात बसले आहेत आणि त्यांच्या प्रभावामुळे मोठे उद्योजक मुंबईतून बाहेर शिफ्ट होत आहेत हेसुद्धा पूर्णसत्य नाही. आज मोठ्या उद्योजकांपुढे काही सिरियस प्रश्न आहेत. मुंबईतल्या ढासळत्या पायाभूत सुविधांमुळे त्यांच्या कर्मचारी वर्गाचा ट्रॅव्हल टाईम प्रचंड वाढतोय. आज या उद्योजकांना त्यांची ऑफिसेस मुंबईत चालवणे जिकिरीचे होऊन बसले आहे आणि त्यातून ते हळूहळू शिफ्ट होत आहेत.

दुसऱ्या बाजूला या शहराचे वैचारिक वातावरण तर जवळपास रोडावले आहे. ‘मुंबई कलेक्टिव्ह’सारखा एखादा कार्यक्रम सोडला तर इथली वैचारिक देवाणघेवाण मंदावली आहे. तुम्ही दिल्लीत जाऊन बघा. तिथे इंडिया इंटरनॅशनल सेंटर, इंडिया कल्चरल सेंटर या आणि अश्या अनेक संस्थामध्ये काही ना काही कार्यक्रम सतत सुरू असतात. या अश्या कार्यक्रमांतून त्या त्या शहराला एक समृद्ध ओळख मिळते. आज मुंबईत असं कुठे दिसतं?

या सगळ्याचा परिणाम म्हणजे आज ‘मुंबई ब्रँड’ला उतरती कळा लागली आहे. कंगना राणावतचे बांधकाम अनधिकृत होते तर ते मुळात उभेच रहायला नको होते. आणि उभे राहिले तरी एव्हाना तोडले जायला हवे होते. या असल्या फिल्मी स्टंटमुळे शहराची ब्रँड व्हॅल्यू कमी होते, हे लक्षात ठेवायला हवे.

याच मुंबईत येऊन ब्रिटिशांच्या विरोधात चले जावचा नारा महात्मा गांधींनी दिला कारण त्यांना ठाऊक होतं की, जे मुंबईत उचलून धरले जाते ते हिंदुस्थानात उचलून धरले जाते. या देशातल्या प्रत्येक तालुक्यातला किमान एक जण तरी या शहरात वास्तव्याला आहे. असं य देशात दुसरे शहर नाही. या अर्थाने मुंबई हिंदुस्थान आहे! भारत आहे! इंडिया आहे!!

जेरंड डायमंड या जगप्रसिद्ध लेखकाचं एक अफलातून पुस्तक आहे. Collapse. जगातल्या अनेक संस्कृत्या कशा कोसळल्या आणि का कोसळल्या त्याबद्दल जेरंडने सखोल माहिती यात दिली आहे. ज्यांना ज्यांना मुंबई हा ब्रँड टिकावा, वाढावा असं वाटतं त्या प्रत्येकाने एकदातरी हे पुस्तक वाचले पाहिजे.

एकेकाळी या मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते स का पाटील. आज मुंबईत सक्रिय राजकरण करणाऱ्या किती नेतेमंडळींना स का पाटील यांची आजची पिढी कुठे असते आणि काय करते हे ठाऊक आहे? किती जणांना सांगता येईल हे? ब्रँडच होते ना ते एकेकाळी इथला! तेव्हा घराण्यांचे आणि नेतृत्वाचे ब्रँड तेव्हाच मोठे होतात जेव्हा ते जिथे राहतात तिथले ब्रँड मोठे असतात!! ठाकरे हा ब्रँड देशात तयार झाला कारण मुंबईत ते राहत होते. त्यामुळे ठाकरे ब्रँड टिकावा वाटत असेल तर मुंबई ब्रँड वाढला पाहिजे!

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.