Published on Dec 14, 2019 Commentaries 0 Hours ago

महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य हातून गेल्यामुळे भाजप जखमी वाघाप्रमाणे सरकारवर कधीही 'चाल' करू शकते. राजकारणातील हा ‘माइंड गेम’ समजून घ्यायला हवा.

महाराष्ट्रातील ‘माइंड गेम’

महाराष्ट्रातील चार प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चारी बाजूंनी सुरू असलेल्या खेचाखेचीचा शेवट एकदाचा झाला आहे. १९८० च्या दशकातील बॉलिवूडच्या एखाद्या मसाला चित्रपटालाही लाजवेल, असे ते चित्र होते. प्रदीर्घ काळापासूनच्या घनिष्ठ मित्रांमध्ये आलेला कडवटपणा, अनेक वर्षांच्या राजकीय शत्रुत्वाचे मैत्रीत झालेले रूपांतर, इथंपासून कुणाच्याही ध्यानीमनी नसताना भल्या पहाटे घडून आलेला शपथसोहळा…

या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राला आजवरचा सर्वात अल्पकालीन मुख्यमंत्री देऊन गेल्या. महाराष्ट्र विधानसभेच्या १४ व्या निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्यक्षात घडलेले हे महानाट्य खरंतर चित्रपटाच्या पडद्यावर साकारणेही कठीण जावे असे आहे. अंतर्विरोधाने भरलेल्या महाविकास आघाडीचे नेते म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकरणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ठाम विरोधक असल्याची स्वत:ची प्रतिमा निर्माण करणे ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला अभूतपूर्व कलाटणी देणारी घटना आहे. शिवाय, ती सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडची आहे. असे असले तरी या संपूर्ण नाट्यामध्ये प्रतिमानिर्मिती आणि व्यवस्थापनाचा जो खेळ रंगला, तो नेमका कोणी जिंकला, याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे.

मीडिया आणि माईंड गेम

‘जो मीडियाला ताब्यात ठेवतो, तोच मेंदू ताब्यात ठेवतो…’ असं जीम मॉरिसन याने म्हटलेय. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केल्यापासूनच भारतीय जनता पक्षाने हा विचार एखादे महत्त्वाचे तत्त्व म्हणून अंगिकारला होता. निकालानंतर मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून युतीला तडे गेले. शिवसेनेशी मतभेद तीव्र झाल्यानंतर भाजपने सुरुवातीला ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली होती. प्रतिमा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून जाणकारांनी भाजपच्या या भूमिकेचे ‘तात्विक’ म्हणून स्वागत केले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यासाठी केंद्र सरकारने गुप्तपणे प्रशासकीय कामकाजाच्या नियमावलीतील नियम १२ चा आधार घेतला. केंद्र सरकारचा हा निर्णय भाजपच्या अंगलट आला.

भाजपच्या या खेळीचा शिवसेना आणि राष्ट्रवादीला सुरुवातीला धक्का बसला खरा, पण हीच खेळी महाविकास आघाडीच्या एकत्रिकरणाच्या प्रक्रियेला गती देणारी ठरली. ‘भाजप हटाव’ हे एकमेव उद्दिष्ट ठेवून काँग्रेसही मोठ्या आनंदाने महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाली. या सर्वांनी एकजुटीनं भाजपवर हल्ले चढवायला सुरुवात केली आणि मीडियाचा संपूर्ण झोत स्वत:कडे वळवून घेतला. परिणामी त्यांची बाजू जोरकसपणे जनतेपुढे गेली. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवेसेनेने महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद किंवा फूट असल्याच्या चर्चेचे तातडीने खंडन केले.

भाजपने राज्यघटनेची पायमल्ली केल्याचे आरोप तिन्ही पक्षांनी सुरू केले. सत्ताधाऱ्यांच्या कटकारस्थानांचे बळी ठरल्याचे भासवून त्यांनी भाजपवर यथेच्छ हल्ले सुरू केले. भाजपचे अनेक समर्थकही ‘जे झाले ते चुकीचे झाले’ असे आडूनआडून बोलू लागले. शिवसेनेने क्षणाचाही विलंब न लावता सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन पुन्हा एकदा मीडियाचा झोत स्वत:कडे खेचून आणला. भाजपच्या मास्टरस्ट्रोकमुळे त्यांच्या गोटात पसरलेला आनंद ओसरण्याआधीच आपली मध्यरात्रीची खेळी उलटल्याचे त्यांच्या ध्यानी आले. महाविकास आघाडीनं मीडिया आणि एकूणच राजकीय अवकाश व्यापल्याचे भाजपला कळून चुकले.

प्रतिमा व्यवस्थापनाचे ‘पवार स्कूल’

भाजपने रात्रीच्या अंधारात खेळलेल्या खेळाचा प्रभाव इतका मोठा होता की, ज्या दिवशी सकाळी सर्व वृत्तपत्रांमध्ये उद्धव ठाकरे हे पुढील मुख्यमंत्री म्हणून झळकत होते, त्या दिवशी सर्व वृत्तवाहिन्यांचे पडदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याने व्यापले होते. वर्तमानपत्रे स्टॉलवर पोहोचण्याआधीच इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये फडणवीस-पवार शपथविधीच्या निमित्ताने अमित शहा यांच्या राजकीय मास्टरस्ट्रोकची पारायणे सुरू झाली होती.

भारतीय राजकारणातील सध्याचे निर्विवाद चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहा यांच्या खेळीने माध्यमे पुरती भारावून गेली होती. मात्र, त्यानंतरच्या अवघ्या २४ तासांच्या आतच शरद पवारांच्या जादुई आपत्ती व्यवस्थापन क्षमतेची भुरळ पडून याच मीडियाने चर्चेचा लंबक पूर्णपणे उलटा फिरवला होता. शरद पवारांनी सर्व सूत्रे स्वत: हातात घेतली. अजित पवारांच्या कृतीशी आपला अजिबात संबंध नसल्याचे त्यांनी जाहीर केले. शरद पवारांच्या पाठिशी असलेल्या महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी मीडियातील मुलाखती, निवदेने आणि सोशल मीडियातील संदेशांच्या माध्यमातून ही भूमिका अधिकाधिक अधोरेखित केली.

अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार पुन्हा येतील याची पूर्ण तजवीज स्वत: शरद पवार यांनी केली. पुतण्याला एकाकी पाडले. त्यामुळे अजितदादांना पुन्हा आपल्या पक्षाकडे येण्याशिवाय पर्यायच उरला नाही. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचं बळ आपल्याच मागे आहे, याची खात्री पटल्यानंतर पवार यांनी मीडियासमोर आणखी एक सोहळा घडवून आणला. या सोहळ्यात महाविकास आघाडीचे नेते आणि १६२ आमदारांनी महाआघाडीसोबत असल्याची शपथ घेतली. शक्तिप्रदर्शनाचा हा शो नेमका २६ नोव्हेंबरच्या संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर घेऊन त्याला एक वेगळे परिमाण दिले गेले.

अनेक घोटाळ्यांशी नाव जोडल्या गेलेल्या अजित पवार यांना आपल्यासोबत घेऊन आणि त्यांना थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देऊन नैतिक बळ गमावून बसलेला भाजप स्वत:च्याच सापळ्यात अलगद सापडला. वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया आणि राजकीय पंडितांनी शरद पवारांच्या राजकीय चातुर्याचे कौतुक करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात पवार हे कसे अजिंक्य योद्धे आहेत, ही त्यांची प्रतिमा पुन्हा ठसवली जाऊ लागली. बदललेल्या राजकारणामुळे सरकारचा रिमोट कंट्रोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वरून पवारांचं निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर सरकल्याचं चित्रही निर्माण झाले.

थोडक्यात काय तर, वाघाला त्याच्या स्वत:च्याच गुहेत माणसाळावले गेले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भाजपकडून सत्ता खेचून घेऊन पवारांनी अमित शहा यांना धोबीपछाड दिलीच, शिवाय, राजकीय आकलनक्षमतेच्या बाबतीत आपणच कसे राजे आहोत, हेही त्यांनी दाखवून दिले.

चिंतातूर आघाडी

महाविकास आघाडीचे सरकार आता बहुमताने सत्तेत आले आहे. भिन्न विचारधारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या आघाडीमध्ये अधूनमधून वादळे उठत राहणार हे स्पष्ट आहे. या वादळात सरकारची बोट स्थिर राखणे हे या आघाडीपुढचे मोठं आव्हान आहे. शिवाय, एकमेकांना सांभाळून घेताना, प्रसंगी कुरवाळताना तिन्ही पक्षांच्या या सरकारने किमान समान कार्यक्रमाचे वचन पूर्ण करण्यावरही लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, सरकारी खात्यांमधील रिक्त जागा भरणे आणि धर्मनिरपेक्षता शाबूत राखणे ही आश्वासने पाळावी लागणार आहेत. याचबरोबर महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी यांच्याकडेही सरकारला लक्ष द्यावे लागणार आहे.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या प्रशासकीय कौशल्याची कसोटी लागणार आहे. त्याचबरोबर, त्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांशी उत्तम संबंधही ठेवावे लागणार आहेत. सरकारमध्ये विचारधारांची सरमिसळ आहे. असे असलं तरी महाविकास आघाडीचं सरकार राजकीयदृष्ट्या टिकावू आहे, हे जनमनावर ठसविण्यासाठी आघाडीच्या नेतृत्वाला अत्यंत समजूतदारपणे काम करावे लागणार आहे. आघाडीच्या सहकाऱ्यांसोबतच जनतेची नस ओळखून निर्णय घ्यावे लागणार आहेत.

मुख्यमंत्रिपदी आल्यानंतर घेतलेल्या काही धाडसी व लोकप्रिय निर्णयांमुळं तूर्त तरी उद्धव ठाकरे यांना मीडियाने उचलून धरलं आहे. मात्र, पुढील काळात महाविकास आघाडी आणि त्यांच्या सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर मीडियाचं बारीक लक्ष राहणार आहे. फडणवीसांच्या आक्रमक विरोधाचाही सामना करावा लागणार आहे. कृषि क्षेत्रातील हालाखी, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, रोजगार निर्मिती, पायाभूत सेवासुविधांचा विकास, जलसंधारण, पर्यावरण आणि गृहनिर्माण क्षेत्रातील समस्यांवर तोडगा काढणे हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी दमछाक करणारे ठरणार आहे.

आघाडीतील तात्विक व वैचारिक तडे सांधतानाच लोकांपुढे एक व्हिजन ठेवणे आणि रचनात्मक व सातत्यपूर्ण निर्णय घेऊन किमान समान कार्यक्रमाची पूर्ती होत असल्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण करणे, हे उद्धव यांच्या समोरचं दुसरे मोठे आव्हान असेल.

२०२४ ची नांदी

भाजपला साथ देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ऑफर आपण धुडकावून लावल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. खासदार कन्या सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद देण्याची मोदींची ऑफरही फेटाळल्याचे त्यांनी मुलाखतीत सांगितले. शरद पवार हे नाव आता इतिहासजमा झालेय, असा प्रचार देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये करत होते. त्यांच्यावरही पवार यांनी शरसंधान केले.

राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपण मोदी आणि भाजपचे कडवे विरोधक असल्याचेच पवार यांनी या निमित्ताने जनमानसावर ठसवले आहे. २०२४ मध्ये शक्तिशाली भाजपविरोधात काँग्रेससह प्रादेशिक पक्षांना स्वत:च्या मागे उभं करण्याची क्षमता आपल्यात असल्याचंही पवारांनी दाखवून दिलं आहे. महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून पवारांनी विश्वसनीय अशा तिसऱ्या आघाडीची पायाभरणी केली आहे. ही आघाडी भाजपच्या वेगाने विस्तारणाऱ्या प्रभावाला तगडे आव्हान देणारी ठरू शकते. खुद्द पवार यांच्याच म्हणण्यानुसार, महाविकास आघाडीची निर्मिती हे राजकारणातील नव्या समीकरणांसाठी एक उत्तम उदाहरण ठरू शकते. देशाच्या इतर राज्यांतही ही समीकरणे  प्रत्यक्षात येऊ शकतात.

निष्कर्ष

राजकारणात एका रात्रीत कधीही प्रतिमा निर्माण होत नाहीत. सातत्य आणि चिकाटीमुळे ती तयार होत असते. देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांना खिंडीत गाठण्याचा हमखास प्रयत्न करणार. त्यांच्या नेतृत्वाखालील मजबूत विरोधी पक्षाच्या हल्ल्यांचा सामना करतानाच स्वत:ची प्रतिमा जपण्याचें आव्हान महाविकास आघाडीपुढे असेल. भारतीय जनता पक्ष हा माध्यम व्यवस्थापन व प्रतिमा निर्मिती करण्यात पटाईत आहे. आपणच कसे हिंदुत्वाचे एकमेव रक्षक आहोत आणि शिवसेनेने सत्तेच्या हव्यासापायी आपला कसा विश्वासघात केला, हा समज पसरवण्याचा भाजप सतत प्रयत्न करत राहणार. अहंकार दुखावलेल्या मोदी-शहा जोडीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य हातून गेल्यामुळे एखाद्या जखमी वाघाप्रमाणे ते कधीही ‘चाल’ करून येऊ शकतात. प्रतिमा व्यवस्थापनाच्या सध्याच्या खेळात महाराष्ट्राच्या धावफलकावर सध्या महाआघाडीची सरशी आहे. ती पुढेही तशीच राहील की पुन्हा धावफलक बदलेल हे येणारा काळच सांगेल. पण, खेळ मात्र जोरात सुरू झाला आहे हे नक्की.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.