Author : Nilesh Bane

Published on Aug 31, 2021 Commentaries 0 Hours ago

महिना उलटल्यावर नेहमीप्रमाणे आता चिपळूणच्या पूराचा विसर पडला आहे. पण आपण हा पूर विसरलो तर, भविष्यात आपलेही घर बुडू शकते.

चिपळूणचा पूर विसरू नका…

गेल्या महिन्यात चिपळूणात पूर आला आणि सगळ्या महाराष्ट्राला रडू कोसळले. टीव्ही, पेपर, फेसबूक, व्हॉट्सअप या सगळ्यावर चिपळूणबद्दलच्या बातम्यांचाही पूर आला होता. प्रत्येक ठिकाणहून चिपळूणसाठी मदतीचा ओघ वाहू लागला. पण, आता महिना उलटून गेल्यावर नेहमीप्रमाणे आपल्याला चिपळूणचा विसर पडला आहे. नैसर्गिक आपत्तींबद्दल आपले नेहमीच असे होते. पण आज चिपळूण बुडाले, तसे उद्या आपलेही शहर, गाव बुडू शकते याचे भान प्रत्येकाने राखायला हवे. त्यासाठी राज्यकर्ते, धोरणकर्ते यांना सतत आठवण करून देणे, हे अत्यंत आवश्यक आहे.

चिपळूण हे दोन-पावणेदोन लाख लोकवस्तीचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर आहे. या शहरातील औद्योगिक वसाहतीतून आणि बाजारपेठांमधून कोट्यवधींची उलाढाल होते. असे शहर जेव्हा पाण्याखाली जाते तेव्हा फक्त ते शहरापुरते मर्यादीत नसते. आपण फक्त त्या पूराला शहरापुरते, एका विशिष्ट भागापुरते मर्यादीत ठेवून, तात्पुरत्या दिलाशावर समाधान मानतो. पण अशी संकटे ही भविष्यातील मोठ्या संकटाचे धोक्याचे इशारे आहेत, हे विसरून चालणार नाही.

आज जगभरात पर्यावरण बदलावर चर्चा सुरू आहेत. पर्यावरणात होणारे हे बदल माणसाच्या हव्यासामुळे होताहेत. त्यात जेवढा जागतिक घटकांचा भाग आहे, तेवढाच किंबहुना त्याहून अधिक भाग हा स्थानिक घटकांचा आहे. त्यामुळे अमेरिकेमुळे पर्यावरण बदल होतोय, असे म्हणून आपण हातावर हात ठेवून कसे चालेल? आपण आपल्या शहरांचे नक्की काय करून ठेवलंय, याचाही गांभीर्याने विचार करायला हवा.

कोकणात अतिवृष्टी ही काही फक्त यावर्षीची बाब नव्हे. कोकणाच्या भौगोलिक परिस्थितीमुळे काही गावांचा संपर्क तुटणे, हे सुद्धा अनेकदा घडले आहे. पण कोकणात गेल्या काही वर्षापासून येणारे पूर वेगळे आहेत. हे शहरी भागांमध्ये येणारे पूर, फक्त नैसर्गिक घटनांमुळे होणारे पूर नाहीत. विकासाच्या नावाखाली आपण जी काही शहरांची रचना केली आहे आणि एकंदरित आपल्या जीवनशैलीत बदल केले आहेत, त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे यावर्षी चिपळूणमध्ये पूर आला म्हणजे आता तो पुन्हा कधी येणार नाही, असे नाही. त्यामुळे सावधपणेच आपल्याला भविष्याची योजना आखावी लागणार आहे.

चिपळूणच्या पलिकडे जायला हवे

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे चिपळूण बुडाले की, प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे यावरून वाद रंगला. खरं तर वाद घालणे, हे आपल्याला नेहमीच आवडते. पण या वादातून फक्त अहवाल बाहेर पडतात. त्यातून प्रत्यक्षात काही फारसा फरक पडत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे आता तरी या वादावादीच्या पलिकडे जायला हवे. फक्त चिपळूणचा विचार करण्याऐवजी, एकंदरितच ‘शहररचना, पर्यावरणबदल आणि मानवी वर्तन’ या साऱ्याचा साकल्याने अभ्यास व्हायला हवा.

चिपळूणच्या पलिकडे विचार करायला म्हणजे चिपळूणचा विचार करायचा नाही, असे नाही. आता युद्धपातळीवर चिपळूणला मदत करणे हे प्राथमिकता असायलाच हवी. त्यातही आपत्ती व्यवस्थापनासोबतच लोकांना नक्की काय हवंय, यावर काम करायला हवे आहे. आज चिपळूणमधील माणसे स्वतःला सावरताहेत. पण, गढूळ पाणी, वैद्यकीय सुविधा, उपकरण दुरुस्ती, सरकारी कामांसाठी लागणारी कागदपत्रे या गोष्टींसाठी त्यांना जी मदत हवी आहे, ती त्यांना मिळताना दिसत नाही. बऱ्याचदा एखाद्या बातमीवरून लोकांचे लक्ष उडले की, मदतीचा प्रवाहही आटतो. म्हणूनच आज चिपळूणकरांना उभे करणे, हे अग्रक्रमाने करायलाच हवे.

चिपळूणकरांना सावरतानाच भविष्यातील संकटासाठी दीर्घकालीन नियोजन करण्यासाठी सर्वांनी परस्परातील वाद विसरून एकत्र यायला हवे. आता असे म्हणणे हे अनेकांना हास्यास्पद वाटेल. कारण, असे वाद विसरून एकत्र येणे आपल्याला शक्य नाही, असे त्यांचे म्हणणे असेल. त्यासाठी मग ते आजवर अनेकदा सांगून सरधोपट झालेली खेकड्यांची गोष्टही सांगतील. पण, आता या खेकड्यांनाही जर जगायचे असेल तर एकत्र यावेच लागेल. अन्यथा भविष्यकाळात चिपळूण हे कुठेही घडू शकते.

‘हायड्रोलॉजी’ गांभीर्याने समजून घ्यायला हवी

पाणी ही अशी गोष्ट आहे, जी साऱ्या पृथ्वीला कवेत घेऊन आहे. पाण्याने सोडलेल्या जमिनीच्या तुकड्यावर सारी मानवजात आज उभी आहे. भविष्यकाळात पर्यावरणाचा समतोल बिघडला तर हे पाणी आजची जमीन कधही गिळंकृत करू शकेल. एकीकडे मराठवाड्यासारखा दुष्काळ आणि दुसरीकडे कोकणासारख्या किनारपट्टीवर येणारी परिस्थिती या सगळ्याकडे पाहताना जलविज्ञानशास्त्र म्हणजेच ‘हायड्रोलॉजी’ या विषयाकडे आपण केलेले दुर्लक्ष सतत जाणवत राहते.

पाणी आणि पाण्याचे वर्तन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आपल्याकडे या विषयाला आणि विषयातील तज्ज्ञांना विश्वासात न घेता विकासाचे गणित बांधले जाते. त्यामुळेच नदीच्या पाण्याचा स्तर, पूराचे नियोजन, पाण्याचे व्यवस्थापन आणि धरणांचे विसर्ग या सगळ्याचे जे शास्त्र आहे, त्याकडे लक्ष न देता परवानग्या दिल्या जातात, नियम बनविले जातात. चिपळूणच्या बाबतीत सांगायचे तर, कोळकेवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग, चिपळूणचे भौगोलिक स्थान, पावसाचे प्रमाण या साऱ्याचा विचार न केल्याने आणि त्याबद्दल नागरिकांना पूर्वसूचना न दिल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे, सर्वांचे मत आहे.

पूरानंतर पाटबंधारे खात्याने दिलेल्या प्राथमिक अहवालात मात्र, सगळा दोष पावसाला देण्यात आला. पण चिपळूणमधील नागरिकांना हे मान्य नाही. चिपळूण येथील वकील ओवेस पेचकर यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. यात चिपळुणात आलेला महापूर हा मानवनिर्मित असून यास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या याचिकेतील म्हणण्यानुसार, २००५ मध्ये चिपळूण परिसरात ३०० मिलिमीटर पाऊस झाला. २०२१ मध्ये केवळ २०२ मिलिमीटर पाऊस चिपळूण परिसरात झाला. पण, कोळकेवाडी धरणातील विसर्गाची पूर्वसूचना न मिळाल्याने या वेळचा महापूर नुकसानकारक ठरला. २२ आणि २३ जुलै रोजी झालेल्या या पुराने प्रशासन यंत्रणेचे अपयश सामोरे आले.

आता या याचिकेतून चिपळूणला न्याय मिळेल, असे आपण समजू. पण एकंदरित शहरांचे दीर्घकालीन प्रश्न त्यातून सुटणार नाहीत. या प्रश्नाकंडे पाहण्यासाठी सरकारने जलतज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी आणि नागरी प्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधून एकात्मिक धोरण आखणे गरजेचे आहे. त्यासाठी अर्थातच परस्परांचे हितसंबंध आणि एकमेकांमधील वाद बाजूला सारून एकत्र यावे लागेल. पण हे केल्याशिवाय शहरांचे भविष्य वाचविणे अवघड आहे.

शहरांचा विकास म्हणजे फक्त नवी बांधकामे नव्हेत

बांधकाम व्यवसाय हा आज देशातील सर्वच शहरातील महत्तावाचा उद्योग आहे. प्रत्येक शहरात नवी बांधकामे उगवताना दिसताहेत. चिपळूणही त्याला अपवाद नाही. अनेकदा या बांधकामांना परवानग्या देताना शहराचा भूगोल, पर्यावरणाचे धोके आणि साधनांची उपलब्धता या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होते. या सगळ्याचा परिणाम या पूरासारख्या आपत्तीच्या वेळी ठळकपणे सामोरा येतो.

या सगळ्याबद्दल या आपत्तीदरम्यान तावातावाने बोलले जाते. पुन्हा काही दिवसांनी आपत्ती सरली की, ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती उद्भवते. ये दृष्टचक्र थांबायला हवे. बांधकाम व्यवसायाला कायमच वाईट नजरेने पाहता, ती आपली सर्वांची गरज आहे हे समजून घ्यायला हवे. पण नवीन बांधकाम करताना शहरातील भौगोलिकतेला आणि पर्यावरणाला दुय्यम स्थान मिळणार नाही, याची डोळ्यात तेल घालून दक्षता घ्यावी लागणार आहे.

सध्या सर्वत्र ‘पर्यावरणपुरक बांधकाम’ या संकल्पनेचा बोलबाला आहे. पण अद्यापही आपल्या शहरांमध्ये या संकल्पनेकडे कानाडोळाच केला जातो. अधिकाधिक आणि लवकरात लवकर आर्थिक लाभ मिळावा यासाठी खालपासून वरपर्यंत सर्वच पातळीवर तडजोडी केल्या जातात. या तडजोडींमुळे त्यावेळी सर्वांचाच फायदा झाल्याचे चित्र उभे राहिले, तर आपत्तीच्या वेळी या तडजोडींची मोठी किंमत मोजावी लागते.

चिपळूणच्या पुराने मानवी व्यवहारातील हा सारा दुटप्पीपण जगापुढे आणला आहे. याआधीही निसर्गाने आपल्याला त्याचे महत्व दाखवून दिले आहे. पण आपण माणसे सोयीने त्याकडे कायमच बघुनही न बघितल्यासारखे करतो आहोत. हे नाटक फार दिवस चालणार नाही. मुंबईसह अनेक शहरांना पूराचा धोका असल्याचे अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे माणसाने कुठे आणि कसे राहायचे याचा सर्वांनीच पुनर्विचार करावा लागणार आहे.

विचार करण्याची आणि त्याप्रमाणे कृती करण्याचे आपण जेवढे दिवस पुढे ढकलू, तेवढेच भविष्यातील संकट आपण जवळ ओढतो आहोत, हे सरकारपासून सामान्य नागरिकांपर्यंत, प्रत्येकानेच लक्षात ठेवायला हवे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.