Published on Jul 31, 2021 Commentaries 0 Hours ago
कोरोनाचा फेरा टाळण्यासाठी: पुढील लाट टाळण्यासाठी मुंबई सज्ज आहे का?

मुंबईसारख्या अवाढव्य महानगराची आरोग्यसेवा व्यवस्था ही मुख्यत्वाने बृहन्मुंबई महानगर पालिका आणि त्यासोबत शहरातील खासगी रुग्णालयांमार्फत सांभाळली जाते. कोविड १९ महामारीच्या काळात या संकटाचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी शहरातील या आरोग्य यंत्रणेत अनेक बदल झाले आणि नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ती सज्ज करण्यात आली.

मुंबईतील पहिली कोविड केस मार्च २०२० मध्ये नोंदवली गेली. २०२० च्या सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये सर्वाधिक केसेस नोंदवण्यात आल्या होत्या. तर, जानेवारी २०२१ मध्ये रुग्णसंख्या काहीशी कमी झाल्याचे चित्र होते. कोरोनाची दुसरी लाट मार्च २०२१ मध्ये सुरू झाली, तर एप्रिल मध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आली. आधीच्या महामारीच्या अनुभवावरून, मुंबईतील ‘सेरो’ सर्वेक्षणाच्या आधारे आणि जगातील इतर उदाहरणांचा विचार करता कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी शस्त्र आहे. असे असले तरी १८ वर्षावरील फक्त २५.५ टक्के मुंबईकरांचे पूर्ण लसीकरण झाले आहे तर ४७ टक्के मुंबईकरांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे (७ जुलै २०२१ पर्यंतच्या नोंदीवरून).

ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन (ओआरएफ) मुंबईच्या ‘टर्निंग द टाईड : इज मुंबई रेडी फॉर द नेक्स्ट वेव्ह?’ या अहवालामध्ये मुंबई शहरातील कोविड १९ महामारीच्या काळात व्यवस्थापनामधील गुंतागुंतीचा मागोवा घेण्यात आला आहे. या अहवालामध्ये गेल्या दोन लाटांमधील अडथळे पार करताना तसेच सद्यस्थितीतील नव्या कल्पनांमधून धडा घेत तिसर्‍या लाटेला सामोरे जाताना मुंबईचा या संपूर्ण परिस्थितीत प्रतिसाद कसा असेल ते मांडण्यात आले आहे.

या अहवालामध्ये पहिल्या आणि दुसर्‍या लाटेतील ऑक्सिजनचा साठा, औषधांचा पुरवठा आणि लसीकरण यांच्याशी संबंधित घटकांमधून मिळालेल्या धड्यांचा खोलात अभ्यास करण्यात आला आहे. तसेच यामध्ये स्थलांतरित मजूर, स्मशानभूमी व दफनभूमीत काम करणारे कर्मचारी आणि आशा सेविका यांसारख्या दुर्लक्षित घटकांना या महामारीचा मोठा फटका बसला आहे, त्यांचाही विचार करण्यात आला आहे.

यासोबतच तंत्रज्ञान, त्यांच्याशी निगडीत अडथळे, महामारीसारख्या संकटाचा सामना करण्यासाठी बृहन्मुंबई मजबूत करण्याची गरज यांसारख्या कोविड १९ व्यवस्थापनातील महत्त्वपूर्ण बाबींचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. तसेच जगामध्ये ही महामारी कशी यशस्वीपणे हाताळली गेली, त्यासंदर्भातील काही उदाहरणांचाही विचार करण्यात आला आहे.

‘टर्निंग द टाईड’ च्या माध्यमातून सद्यस्थितीत महामारीचा सामना करण्यासाठी उपलब्ध असलेल्या अधिकाधिक संशोधनावर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या विश्लेषणासाठी २० हून अधिक सरकारे, वैद्यकीय कर्मचारी, माध्यम तंत्रज्ञ यांच्याशी चर्चा करण्यात आली. तर विविध माध्यमांचे अहवाल आणि सरकारशी झालेल्या चर्चांचा आधार घेण्यात आला आहे. महामारीच्या काळातील व्यवस्थापनामध्ये आरोग्य कर्मचार्‍यांसाठी मार्गदर्शक ठरलेल्या ‘प्रिन्सिपलस ऑफ मेडिकल मॅनेजमेंट ऑफ कोविड १९ – द एमसीजीएम एक्सपिरियंस’ या अहवालाचा आधार घेण्यात आला आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Sayli UdasMankikar

Sayli UdasMankikar

Sayli UdasMankikar was a Senior Fellow with the ORF's political economy programme. She works on issues related to sustainable urbanisation with special focus on urban ...

Read More +