Author : Vikram Sood

Originally Published December 5 2018 Published on Jul 25, 2023 Commentaries 0 Hours ago

कर्तारपूर गुरुद्वाऱ्याकडे जाणारा कॉरिडॉर हा भारत-पाक मैत्रीचा नवा रस्ता ठरणार की पुन्हा एकदा नव्या कारस्थानाची सुरुवात ठरणार?

कर्तारपूर कॉरिडॉरची दुसरी बाजू
कर्तारपूर कॉरिडॉरची दुसरी बाजू

शीख समुदायाचे पहिले गुरू नानकदेव यांची समाधी आजच्या पाकिस्तानमध्ये येते. भारतीय सीमेपासून ते साधारणतः साडेचार किलोमीटर अंतरावर आहे. भारतीय शीख बांधवर सीमेवरून दुर्बिणीद्वारे या पवित्र स्थानाचे दर्शन घेतात. आता हे तीर्थक्षेत्र भारतीय भाविकांसाठी खुले होणार आहे. कर्तारपूर गुरुद्वाऱ्याकडे जाणारा कॉरिडॉर हा भारत-पाक मैत्रीचा नवा रस्ता ठरणार की पुन्हा एकदा नव्या कारस्थानाची सुरुवात ठरणार? हा नवा प्रश्न आता विचारला जात आहे.

पाकिस्तानने या कर्तारपूर कॉरिडॉरची घोषणा केली त्याच्या आसपासच्या घटना समजून घ्यायला हव्यात. जम्मू आणि काश्मीरमध्ये या काळात सात ठिकाणी अतिरेक्यांशी चकमकी झाल्या आहेत. दहा अतिरेकी हल्ले झाले आहेत आणि एक स्नायपर हल्ला झाला आहे. सुरक्षाबळाच्या जवानांनी या सगळ्या घटनांमध्ये एकूण २३ अतिरेक्यांना कंठस्नान घातले आहे. त्यापैकी एक अतिरेकी होता लश्कर ए तोएबाचा नावेद जाट, ज्याने पत्रकार शुजात बुखारी यांना मारले होते.

या सगळ्या धामधुमीमध्येच एका बाजूला नॉर्वेच्या भूतपूर्व पंतप्रधानांनी श्रीनगरला जाऊन हुरियतच्या प्रतिनिधिमंडळाची भेट घेतली आणि नंतर ते इस्लामाबादला रवाना झाले. बहुतेक कोणतातरी संदेश त्यांनी सोबत नेलाय. याच सुमारास मुंबईवरच्या २००८ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा स्मृतीदिन आला. त्या संध्याकाळी झालेली भाषणे हवेत विरून गेलीही नसतील, तेवढ्यातच सगळ्यांच्या नजरा वेधून घेतल्या त्या कर्तारपेर साहिब कॉरिडोरच्या बातमीने.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तर काही आठवड्यांपूर्वीच कर्तारपूर साहिब कॉरिडोरचे सूतोवाच केले होते. परंतु भारताकडून त्याला थंड प्रतिसाद होता. नंतर अगदी अचानक भारत सरकारने घोषणा केली की, २६ नोव्हेंबरला या मार्गिकेचा कोनशिला समारंभ भारतीय सीमेत केला जाईल आणि पाकिस्तान सरकार २८ नोव्हेंबरला त्यांच्या सीमेच्या आत या कामाचा शुभारंभ करेल. तेव्हा मात्र विविध प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांमधल्या संपादकीय लेख विविधांगाने हा विषय मांडू लागले. पाकिस्तान सरकारचे हे नवे धोरण कसे आहे, याची भूतकाळ विसरून चर्चा होऊ लागली.

गुरु नानकदेव यांच्या वास्तव्याने पवित्र झालेले हे धार्मिक स्थळ शीख बांधवांसाठी खुले होणार असल्याने, पाक सरकारला शीख धर्मियांबद्दल किती प्रेम आहे याचे गोडवे गाणाराही एक सूर या चर्चेमध्ये होता. मात्र हे विसरून चालणार नाही की, त्याचवेळी खालिस्तानी नेता गोपाल सिंह चावला यालाही उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलावून पाक सरकारने खालिस्तान आंदोलनासोबतची आपली जवळीकही दाखवून दिली. दुसरीकडे लाहोरमध्ये बसून पाकिस्तानी सरकारच्या वरदहस्ताने, अतिरेकी कारवायांना राजरोसपणे खतपाणी घालणाऱ्या हाफिस सईदबद्दल हे सरकार काहीच बोलत नाही.

काही तासांच्या काळामध्ये पाक सरकारने पंजाब आणि सर्वदूर पसरलेल्या सगळ्या शीख समाजामध्ये आपली अशी एक प्रतिमा निर्माण केली की, आम्ही किती दिलदार आणि मोकळ्या मनोवृत्तीचे आहोत. पण त्यासोबतच त्यांनी भारत सरकार आणि खालिस्तानी आंदोलकांना हेही सांगितले की, आम्ही खलिस्तानी आंदोलनाला समर्थन देत आहोत.

नवज्योतसिंह सिद्धू यांनी या संपूर्ण कार्यक्रमात अगदी मानाची जागा पटकावली होती, पण भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून गेलेले दोन्ही मंत्री मात्र यात कुठेही ठळकपणे दिसत नव्हते.

आपली या प्रकरणातली भूमिका इतकी संभ्रमात टाकणारी होती की ती आपल्यालाच नुकसानकारक ठरू शकते. या सगळ्या धामधुमीत आपण २६ नोव्हेंबरचा अतिरेकी हल्ला विसरलो आणि त्यात बळी गेलेल्या नागरिकांचे आणि पोलिसांचे बलिदानही. पोलिस हवालदार तुकारम ओंबळे यांनी जिवाची पर्वा न करता कसाबला जिवंत धरले नसते आणि तो अतिरेकी आपल्याला मृतावस्थेतच हाती लागला असता तर या हल्ल्यामागचा पाकिस्तानी हात कधीही उजेडात आले नसते. त्याचप्रमाणे काश्मीरमध्ये अतिरेक्यांना खुले आव्हान देत लढा देताना शहीद झालेल्या लान्स नाईक नजीर अहमद वानी यांच्या बलिदानाचाही आज आपल्याला विसर पडलेला आहे.

तरी देखील नवज्योतसिंह सिद्धू पाकिस्तानात जातात आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह त्याबद्दल घोर नाराजी व्यक्त करत म्हणतात की, “हा सिद्धूंचा व्यक्तिगत दौरा आहे’. त्यांचे हे शब्द खूप काही सांगून जातात. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना, या सगळ्यातून पुढे काय वाढून येणार आहे आणि त्याचा पंजाब आणि भारतात कसा दुष्परिणाम होऊ शकतो याची काळजी वाटते आहे असे दिसते. कारण की अनेक खालिस्तान समर्थक अतिरेक्यांना पाकिस्तानने आपल्याकडे आश्रय दिला आहे, हे उघड सत्य आहे.

अगदी काही दिवसांपूर्वीच अमृतसर मध्ये खालिस्तान्यांनी एक अतिरेकी हल्ला केला होता. ज्यात तीनजणांचा नाहक बळी गेला आहे. अमरिंदर सिह यांनी अशीही भीती व्यक्त केली आहे की, काश्मिरी अतिरेकी आता जम्मू काश्मीर मार्गे पंजाबमध्ये पाय पसरू लागले आहेत. ज्या पाकिस्तानच्या सैन्याने आतापर्यंत हजारो भारतीयांना मृत्युमुखात लोटले आहे त्या पाकिस्तानी सैन्याच्या प्रमुखांची गळाभेट सिद्धूंनी घ्यावी याबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री चांगलेच चिडलेले आहेत.

ही अशी परिस्थिती असून देखील हा सगळा कार्यक्रम घडून आला, भाषणे केली गेली आणि आता कर्तारपूर साहिब गुरुद्वारा ते डेरा बाबा नानक अशा या मार्गिकेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पूर्ण देखिल झाला.

पण या सगळ्यातून साध्य काय होणार आहे?

गेली कित्येक वर्षांचा भारत-पाक संबंधांमधला अनुभव सांगतो की नेहमी अनपेक्षित असलेल्या गोष्टीच इथे घडत असतात आणि पाकिस्तानचे हृदयपरिवर्तन होण्याची सुतराम शक्यता नाही. किंबहुना यातून पाकिस्तानचे खरे रंग उघडकीस यावे आणि भारतविरोधी अतिरेकी विचारधारांना त्यांनी कसा पाठिंबा दिला आहे याचे पुरावे आपणहूनच समोर याव्यात, यासाठी तर ही रणनिती आखली गेली नसेल ना? दोन देशांमध्ये या साऱ्यामधून काहीतरी कुटनितीक हेतू असल्याचे मात्र निश्चितच जाणवते. पण भारतातले विद्यमान सरकार आणि देशाच्या सुरक्षेचा विचार करणारी दिल्लीतली अधिकारी मंडळींनी हा विचार निश्चितच केला असेल. या बाबतीत दोघांच्या भूमिका एका सुरातल्या नाहीत हे मात्र नक्की. हे सहज आहे की मुद्दाम चाललेला खेळ आहे, हे कळत नाही. या साऱ्या गोंधळात आपली या बाबतीतली भूमिका काय असावी?

नाही तर हे सगळे शेक्सपिअरच्या नाटकातसारखे एखादे विनोदी उपकथानक असेल की ज्याने भारत – पाकिस्तानच्या प्रदीर्घकाळ पर्यंत चालत आलेल्या भयंकर नाटकाचा थोड्या वेळासाठी विसर पडेल. अर्थात् कपिल शर्मा शो मधल्या कामाचा अनुभव असलेले सिद्धू या उपकथानकात विदूषकाची भूमिका तर वठवत नाहीयेत ना?

एकूण काय तर हा सगळा मामला धोक्याचा तर आहेच आणि अर्थहीनही. आजपर्यंतच्या पाकिस्तानच्या कारवायांपासून धडा न घेतल्यामुळे याही वेळी त्याने अतिशय काळजीपूर्वक टाकलेल्या जाळ्यात भारत अडकू नये याची भिती मात्र या घटनाक्रमात नक्कीच आहे. तरीही आपण आशा करूयात की, आपण या साऱ्या शक्यता पडताळून हा डाव खेळायचे ठरविले असेल.

पाकिस्तानच्या मूळ संकल्पनेचा गाभा सुद्धा आपण पुन्हा आठवला पाहिजे. हा देश इस्लामच्या नावाखाली निर्माण करण्यात आला, आणि नंतर तिथली इस्लामी कट्टरता पुढे इतकी शिगेला पोहोचली आहे की आता ती तिथल्या लोकांच्या मानगुटीवरच स्वार झाली आहे. त्याचप्रमाणे या देशाचा दुसरा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे भारताशी असलेले हाडवैर. पाकिस्तानी नेतेमंडळींना आपले वर्चस्व टिकवून ठेवण्याकरता तिथल्या लोकांना सतत हे स्वप्न दाखवावे लागते की, एक ना एक दिवस आपण भारताला जिंकून घेऊ. आपण भारतीयांनी या देशाशी संबंध ठेवताना कोणतीही भाबडी सकारात्मक भूमिका ठेवून चालणार नाही आणि उगीच कोणत्या भ्रमातही राहून चालणार नाही.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Vikram Sood

Vikram Sood

Vikram Sood is Advisor at Observer Research Foundation. Mr. Sood is the former head of the Research and Analysis Wing (R&AW) — India’s foreign intelligence agency. ...

Read More +