Author : Shoba Suri

Published on Mar 05, 2021 Commentaries 0 Hours ago

कोविड १९ लशीची माहिती देतानाच त्यासोबत संतुलित आणि चौरस आहाराचे नियमित सेवन करण्याबाबतचे फायदे लोकांच्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या लसीसोबत योग्य जीवशैलीही हवी

कोविड १९ महामारीमुळे स्वतःला आणि परिवाराला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या रोगांपासून सुरक्षित आणि निरोगी ठेवणे हे एक प्रकारचे आव्हान ठरत आहे. त्यामुळेच सर्वत्र अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे. सध्या संपूर्ण देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लशीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी धोरणकर्त्यांनी पुढाकार घेतला तर याचा सामान्य माणसाला फायदा होणार आहे. वेगवेगळ्या अभ्यासांतून हे निष्पन्न झाले आहे की, पौष्टिक आहाराच्या सेवनामुळे लसीची परिणामकारकता वाढण्यास मदत होते तसेच तिच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.

हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग यांसारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता क्षीण असते. काही अभ्यासांतून असे निदर्शनास आले आहे की, अशा व्याधींनी ग्रस्त असलेले रुग्ण कोविड १९ला बळी पडण्याची शक्यता जास्त असते. लठ्ठ व्यक्तींवर लसीचा होणारा परिणाम आणि कार्यक्षमता याबाबत एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अशा व्यक्तींचे शरीर लसीला कमी प्रतिसाद देते. कोविड १९ महामारीच्या काळात कुपोषण आणि लठ्ठपणा यामुळे मृत्युदरात वाढ दिसून आली आहे. परिणामी पुढील काळात नव्या लसीचा प्रभावीपणा कमी होण्याची शक्यता आहे. नोव्हेल करोना व्हायरस जनुकीयदृष्ट्या सार्स-कोव्हशी साम्य दाखवतो. करोना विषाणू हा तुलनेने नवीन आहे आणि याच्याविरुद्ध कोणतीच नैसर्गिक प्रतिकारशक्ती नाही ही सद्यस्थिती आहे.

सध्या लोकांच्या जीवनशैलीत बदल झालेला आहे. या बदलासोबत अल्ट्रा प्रोसेस्ड आहार घेण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. याचा थेट परिणाम म्हणून लोकांना लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाबासारख्या व्याधी जडत आहेत. जगभरात या व्याधींमुळे होणार्‍या मृत्युचे प्रमाण ७०% इतके नोंदवले गेले आहे. महामारीच्या काळात जगातील विविध देशांमध्ये आरोग्य व्यवस्थांवर आलेल्या ताणामुळे या मुद्दयाकडे काहीसे दुर्लक्ष झाले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत १६३ देशांच्या आरोग्य यंत्रणांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात असे दिसून आले की कोविड १९ महामारीच्या काळात सर्वेक्षण झालेल्या ७५% देशांमध्ये असंसर्गजन्य आजारांसाठी दिल्या जाणार्‍या आरोग्य सेवांवर दूरगामी परिणाम झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात वाहतूकीच्या सोयींची व मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण आणि रूग्णांच्या संख्येत अचानक झालेली वाढ अशी काही कारणे या सर्वेक्षणात नोंदवली गेली. यासोबतच असंतुलित आहार, अल्कोहोलचे सेवन, व्यायाम व इतर शारीरिक हालचालींचा अभाव यानेही असंसर्गजन्य व्याधी असलेल्यांना मोठा धोका आहे.

काही दिवसांपूर्वीच ओहायओ यूनिव्हर्सिटीत लसीबाबतच्या अभ्यासाचा आढावा घेण्यात आला. यात असे दिसून आले की मानसिक ताण, डिप्रेशन आणि चुकीच्या सवयींमुळे लसीची परिणामकारकता आणि कार्यक्षमता यांच्यावर नकारात्मक परिणाम होतो. याचा थेट फटका ज्येष्ठ नागरिकांना बसणार आहे. संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की योग्य मानसिक आणि शारीरिक सवयींमुळे लसीची कार्यक्षमता वाढते आणि त्याचे दुष्परिणाम कमी होण्यासही मदत होते.     

आकृती १ : रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी लसीच्या प्रतिसादावर परिणाम करणारे घटक

स्त्रोत : झिम्मरमन पी, कर्टीस एन, २०१९, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी लसीच्या प्रतिसादावर परिणाम करणारे घटक, Clin Microbiol Rev 32:e00084-18.

वरील आकृतीत लसीपासून मिळणार्‍या रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम करणारे घटक दिले आहेत. ह्या उपरोक्त संतुलित व पौष्टिक आहार हा घटकही अत्यंत महत्वाचा आहे. प्रा. श्रीनाथ रेड्डी यांच्या मते लसीमुळे फक्त प्रतिजैविक उत्तेजन (अॅंटीजेनीक स्टीम्युलस) प्राप्त होऊ शकते. त्याला आपले शरीर कसा प्रतिसाद देते हे आपण घेत असलेल्या आहारावर अवलंबून आहे व हे परिणाम व्यक्ती सापेक्ष बदलत जातात.

संतुलित व पौष्टिक आहारमुळे रोगप्रतिकारक शक्ती बळकट होण्यास मदत होते. याविरुद्ध जर योग्य आहार घेतला नाही तर त्याचे थेट परिणाम रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होण्यावर होतात आणि परिणामी ती व्यक्ती कोणत्याही रोगाला सहज बळी पडू शकते. शरीरातील पोषणमूल्यांची कमतरता दूर केल्यास रोगप्रतिकारक शक्ती बळकट करता येऊ शकते.

काही विशिष्ट जीवनसत्व तसेच झिंक, लोह, सेलेनियम आणि कॉपर यांसारखे घटक शरीरासाठी आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहेत. सूक्ष्म पोषणमूल्यां संबंधीच्या (मायक्रो न्यूट्रीयंट्स) अभ्यासात असे दिसून आले आहे की क आणि ड जीवनसत्वामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि संसर्गाचा धोका कमी होतो. म्हणजेच पौष्टिक आणि संतुलित आहाराचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक क्षमता बळकट होते व रोगजंतुंना सशक्तपणे सामोरे जाता येते.

तुमचे अन्न जर तुम्ही औषध म्हणून खाल्ले नाहीत, तर तुम्हाला औषध अन्न म्हणून खावे लागेल, अशा आशयाचे हिप्पोक्रेटसचे वाक्य आहे. संतुलित व पौष्टिक आहार तसेच रोगांचा प्रादुर्भाव याचा थेट परिणाम शरीरातील पोषणमूल्यांवर होतो. म्हणजेच एखादा माणूस जर आजारी असेल तर त्याची भूक मंदावते आणि त्यामुळे शरीराचे कुपोषण होऊ शकते. कुपोषणाने क्षीण झालेल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमताही क्षीण होते. कुपोषणामुळे शरीरावर दूरगामी परिणाम दिसून येतातच पण त्यासोबत लसीला शरीर देत असलेल्या प्रतिसादावरही दूरगामी परिणाम होतात. म्हणजेच संतुलित आणि पौष्टिक आहारामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढीस मदत होते.

गेल्या वर्षभरात कोविडने जगभरात थैमान घातलेले आहे. आज एक वर्षाने सर्व जग यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. दूरचा विचार करताना कोविडमुळे उद्भवणार्‍या समस्या टाळण्यासाठी पोषणमूल्याने युक्त असलेल्या अन्नाचे  सेवन करणे गरजेचे आहे. अभ्यासाअंती असे दिसून आले आहे की ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या आहारात फळे, पालेभाज्या,फळभाज्या तसेच ई जीवनसत्त्वाचा अंतर्भाव असतो त्यांचे शरीर लसीला अधिक परिणामकारक प्रतिसाद देते. झाडांमध्ये निसर्गतःच निर्माण होणारी ‘पॉलीफेनॉल्स’ ही डाएटरी अॅंटीआक्सिडंट म्हणून काम करतात. या पॉलीफेनॉल्सचे दीर्घकालीन सेवन हृदयरोगापासून संरक्षण करते.

दुसर्‍या एका अभ्यासात झिंक आणि सेलेनिअम यांच्या गुणधर्माचा आणि कोविडशी लढण्यासाठीच्या उपयुक्ततेचा अभ्यास झाला आहे. तसेच एका अभ्यासात असे दिसून आले आहे की ज्या व्यक्तींच्या शरीरात ड जीवनसत्त्वाची कमतरता असते त्या व्यक्तींमध्ये श्वसनाचे विकार अधिक बळावतात. ह्या विकारांमुळे होणारा धोका टाळण्यासाठी ड जीवनसत्त्वाचे सेवन करणे गरजेचे आहे.

रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आणि जीवनशैली सुधारण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर्स आणि तज्ञ मंडळी देतात. कोविड १९ लस, तिची कार्यक्षमता आणि प्रभाव यांची माहिती देतानाच त्यासोबत संतुलित आणि चौरस आहाराचे नियमित सेवन करण्याबाबत समुपदेशन करून त्याचे फायदे लोकांच्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Shoba Suri

Shoba Suri

Dr. Shoba Suri is a Senior Fellow with ORFs Health Initiative. Shoba is a nutritionist with experience in community and clinical research. She has worked on nutrition, ...

Read More +