Published on Dec 21, 2024 Commentaries 0 Hours ago

गुआंशी हा चीनच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. हे वैयक्तिक संबंध आणि सामायिक जबाबदाऱ्यांद्वारे परस्पर देवाणघेवाणीच्या तत्त्वावर आधारित आहे.

ड्रॅगनचे आलिंगन: आफ्रिकेत चीनची गुआंशी कूटनीती

Image Source: Getty

    आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुंतागुंतीच्या सत्तासंघर्षांमध्ये अनेकदा खूप जोखीम असते आणि समस्यांचे निराकरण करण्याचे मार्ग राजकीय वाटाघाटींनी भरलेले असतात. चीनसारख्या महत्वाकांक्षी शक्तीला प्रभाव निर्माण करण्याची आदिम इच्छा असते. त्यामुळे, चिनी कूटनीतीत प्रभाव टाकण्याची कला ही एक सूक्ष्म पण अनिवार्य साधन आहे. काही आंतरराष्ट्रीय संबंध तज्ञ या प्रभावाच्या शक्तीला "संरचनात्मक शक्ती" (स्ट्रक्चरल पॉवर) असेही संबोधतात.

    निश्चितच, प्रभावाची ताकद कोणत्याही नाजूक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. कोणताही देश सर्व संबंधित पक्षांमध्ये संवाद प्रस्थापित करून आपली मजबूत प्रतिमा निर्माण करतो तेव्हा सकारात्मक चर्चा घडवून आणण्यासाठीचा मार्ग तयार होतो. जरी आंतरराष्ट्रीय मध्यस्थ म्हणून अमेरिका सर्वात प्रभावी राहिली आहे, तरी चीन आपली आंतरराष्ट्रीय मध्यस्थीची भूमिका अधिक ठामपणे स्वीकारत आहे, जसे की सौदी-इराण किंवा नायजर-बेनिन वाद निवाड्याच्या वेळी दिसून आले.

    चीन जेव्हा पाश्चात्य नेतृत्वाखालील जागतिक व्यवस्थेला कधी पूरक तर कधी विरोधाभासी, पर्यायी जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे, तेव्हा त्याला विविध बहुपक्षीय संस्थांमध्ये आफ्रिकेची साथ आवश्यक आहे. ५५ देशांसह, आफ्रिका खरोखरच आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये आणि वाटाघाटींमध्ये एक मोठा गट आहे. त्यामुळे, बीजिंग आपल्याबाजूने जागतिक व्यवस्थेचा तोल वळवण्याच्या प्रयत्नात आफ्रिकेवर आपला प्रभाव वाढवण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करत आहे.

    चीन जेव्हा पाश्चात्य नेतृत्वाखालील जागतिक व्यवस्थेला कधी पूरक तर कधी विरोधाभासी, पर्यायी जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे, तेव्हा त्याला विविध बहुपक्षीय संस्थांमध्ये आफ्रिकेची साथ आवश्यक आहे.

    तथापि, पाश्चात्य आंतरराष्ट्रीय संबंध (IR) अभ्यासक केंद्र-परिघ किंवा वर्चस्ववादी-आव्हानकर्ता या द्वंदामध्ये अडकून आहेत. त्यांच्या विश्लेषणातील यूरोप केंद्रीत दृष्टिकोनामुळे ते आफ्रिकेत चीनच्या उदयाला व्यापकपणे समजून घेण्यात अयशस्वी ठरतात. खरं तर, व्यापार, आर्थिक मदत किंवा संसाधन स्वारस्य यासारख्या आर्थिक बाबींवर त्यांचा जास्त भर असल्याने, या नातेसंबंधातील सांस्कृतिक पाया तपासण्यात अडथळा येतो. हा लेख चीनच्या आफ्रिकेसाठीच्या दृष्टिकोनाचे मूल्यमापन संबंधात्मक दृष्टीकोनातून करण्याचा प्रयत्न करतो. सार्वभौमत्व, अराजकता आणि लोकशाही यांसारख्या पाश्चात्य-केंद्रित संकल्पनांच्या पलीकडे जाऊन, हा लेख पारंपरिक चिनी 'गुआंशी' संकल्पना आणि ती चीनच्या परराष्ट्र धोरणावर कसा प्रभाव टाकते हे सादर करतो. तसेच, लेख गुआंशी डिप्लोमसीच्या चौकटीत आफ्रिकेत राजकीय पार्टी स्कूल स्थापन करण्यामागील चीनच्या प्रेरणांचे मूल्यमापन करतो.

    गुआंशीची एक राजनैतिक साधन म्हणून व्याख्या काय?

    गुआंशी (關係) ही चिनी राजकारणाची एक विशिष्ट आणि वेगळी ओळख आहे. "संबंध" म्हणून त्याचा सरळ अनुवाद केला जातो, परंतु त्याचा अर्थ पारंपरिक पाश्चात्य व्याख्येपेक्षा अधिक गहन आहे. इंग्रजी शब्दकोशात त्याची नोंद तुलनेने अलीकडील घटना आहे. तथापि, ऐतिहासिकदृष्ट्या, तो चीनच्या राष्ट्रांमधील संबंधांचा एक पाया आहे, जिथे चिनी शासकांनी राजकारणाला व्यक्तिगत संबंधांचे विस्तार म्हणून पाहिले. प्रत्यक्षात, गुआंशी हा चिनी शब्द "आंतरराष्ट्रीय संबंध" (गुओजी गुआंशी) या चिनी शब्दाचा भाग आहे.

    गुआंशी चिनी संस्कृतीचा एक अभिन्न भाग आहे, जो व्यक्तिगत संबंधांद्वारे आणि आपसी कर्तव्यांद्वारे परस्परता या तत्त्वांवर आधारित आहे. प्राचीन चिनी समाजात उगम पावलेल्या गुआंशीमध्ये, ज्याला फायदा होतो तो व्यक्ती कर्तव्यबद्ध असतो की त्याने दुसऱ्या व्यक्तीला त्याचा उपकार परतावा, ज्यामुळे परस्पर संबंध सुरू रहावेत आणि त्याचेही उद्दिष्ट सफल व्हावे, ज्यामुळे दोघांचाही फायदाच होईल (लियांग च्वान ची मेई; 兩全其美). गुआंशीची संकल्पना ही परस्परांतील संबंधाच्या अवतीभवती फिरत राहते आणि ही दोन असमान भागीदारांमधील विषम संबंधांतील वैशिष्ट दर्शवते. दुसऱ्या शब्दांत, हा एकमेकांबद्दलच्या जबाबदाऱ्यांवर आधारित संबंधांमध्ये सुसंगती साधण्याचा एक मार्ग आहे.

    प्राचीन चिनी समाजात उगम पावलेल्या गुआंशीमध्ये, ज्याला फायदा होतो तो व्यक्ती कर्तव्यबद्ध असतो की त्याने दुसऱ्या व्यक्तीला त्याचा उपकार परतावा, ज्यामुळे परस्पर संबंध सुरू रहावेत आणि त्याचेही उद्दिष्ट सफल व्हावे, ज्यामुळे दोघांचाही फायदाच होईल (लियांग च्वान ची मेई; 兩全其美).

    अनेक आफ्रिकन देशांमध्ये अशाच राजकीय संरचना आहेत ज्या या गतीमान आणि संरक्षक ग्राहकांच्या संबंधांवर आधारित असतात. अशा परिस्थितींमध्ये विविध संस्था, नियम आणि कायदे सहसा दुय्यम भूमिका बजावतात. त्यामुळे, चीनचे प्रभावी प्रशासकीय मॉडेल व एकपक्षीय शासकत्व ज्यामध्ये पार्टी व सरकार हे एकच असते, धोरण राबवण्यासाठी तुकड्यात तुकड्यांतील अधिनायकवादी मॉडेल, मजबूत राजकीय क्षमता आणि वरपासुन खालीपर्यंत आर्थिक विकासाच्या रस्त्यावर चालणारे प्रशासन, विशेषत: अनेक आफ्रिकन सत्ताधारी पक्षांना आकर्षित करते.

    आफ्रिकेमध्ये राजकीय प्रभावासाठी चीनची ब्ल्यू प्रिंट

    स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून बीजिंगने आफ्रिकन नेत्यांमध्ये आपल्या शासकीय मॉडेलचा सक्रियपणे प्रचार केला आहे. चीनने अनेक आफ्रिकन स्वतंत्रता चळवळींना त्यांच्या उद्दिष्टांसाठी मदत केली आणि स्वातंत्र्यानंतर त्यांच्या अर्थव्यवस्थांचा विकास करण्यास आणि स्वतंत्र सरकार मजबूत करण्यास मदत केली. यामध्ये दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिकन नॅशनल काँग्रेस (ANC), नामिबियामधील SWAPO, अँगोलामधील MPLA, झिम्बाब्वेमधील Zanu-PF, आणि मोझांबिकमधील Frelimo यांचा समावेश आहे.

    तथापि, अलीकडच्या वर्षांत चीनने आफ्रिकन सत्ताधारी पक्षांवर आपला प्रभाव वाढवण्यासाठीचे प्रयत्न तीव्र केले आहेत. दरवर्षी, चीन शेकडो आफ्रिकन अधिकाऱ्यांना "अभ्यास दौऱ्यांसाठी" चीनला आमंत्रित करते. या दौऱ्यांमध्ये चिनी विद्यापीठांमधील व्याख्याने, विविध प्रांतांना प्रत्यक्ष अनुभवासाठी भेटी तसेच चिनी परंपरांविषयी संवेदनशीलता वाढवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असतो. खरं तर, अत्यंत वरिष्ठ स्तरावरील प्रतिनिधी वगळता, या अभ्यासक्रमांपैकी बहुतेक बीजिंगबाहेर, चिनी प्रांतांमध्ये आयोजित केले जातात.

    आफ्रिकेमध्ये चिनी गुआंशीचा अनुप्रयोग

    2021 मध्ये सेनेगलमधील डकार येथे आयोजित 8 व्या फोरम फॉर चाइना अफ्रीका को-ऑपरेशन (FOCAC), चिनी कम्युनिस्ट पक्षाने (CCP) एक श्वेतपत्र प्रकाशित केले, ज्यामध्ये 54 पैकी 51 देशांतील 110 राजकीय पक्षांसोबतच्या चीनच्या राजनैतिक संबंधांना मान्यता देण्यात आली. आता, CCP ने आफ्रिकेतील पक्ष आणि सरकारी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण वाढवले आहे, ज्याचा पुरावा म्हणजे राजकीय शाळांची स्थापना.

    चीन या स्वतंत्रता चळवळींसाठी दीर्घकाळापासून एक वैचारिक आणि लष्करी सहयोगी राहिला आहे आणि सध्या FLMSA चा एकमेव बाह्य भागीदार आहे. या गटाच्या नियमित बैठका होत असतात, आणि त्यांची शेवटची बैठक मार्च 2024 मध्ये झाली.

    2022 मध्ये, चीनने पूर्व आफ्रिकेतील देश टांझानियामध्ये आपली पहिली राजकीय प्रशिक्षण प्रशाला विकसित केली. जी टांझानियाच्या संस्थापक पिता व आदरणीय नेते म्वालिमु ज्युलियस न्येरेरे लीडरशिप स्कूल, नावाने ओळखली जाते, CCP च्या निधीतून सुमारे 40 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या खर्चाने उभारली गेली. वेळ न दवडता, फेब्रुवारी 2022 मध्ये या सुविधेत वर्ग सुरू झाले. दक्षिण आफ्रिका, मोझांबिक, अँगोला, नामिबिया, झिम्बाब्वे आणि टांझानिया येथील 120 राजकीय कार्यकर्त्यांनी या शाळेत प्रशिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे, या सहाही देशांनी स्वातंत्र्यानंतर त्यांची सत्ताधारी सरकारे बदल न करता टिकवून ठेवली आहेत, आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून या सहाही सत्ताधारी पक्षांचे चीनसोबत मजबूत ऐतिहासिक संबंध राहिले आहेत.

    याशिवाय, हे सहाही सत्ताधारी पक्ष दक्षिण आफ्रिकेतील फॉर्मर लिबरेशन मूवमेंट्स ऑफ सदर्न अफ्रीका (FLMSA) या आघाडीचे सदस्य आहेत, जी त्यांच्या परस्पर संबंधमध्ये ताळमेळ बसवत सत्ताधारी व्यवस्थेवरील भूस्थानिक प्रवाह आणि आव्हानांचे मूल्यमापन करते. चीन या स्वतंत्रता चळवळींसाठी दीर्घकाळापासून एक वैचारिक आणि लष्करी सहयोगी राहिला आहे आणि सध्या FLMSA चा एकमेव बाह्य भागीदार आहे. या गटाच्या नियमित बैठका होत असतात, आणि त्यांची शेवटची बैठक मार्च 2024 मध्ये झाली.

    न्येरेरे लीडरशिप स्कूलची स्थापना या सहा FLMSA पक्षांसाठी सामायिक प्रशिक्षण, शैक्षणिक संसाधने आणि अन्य सहकारी सुविधा उपलब्ध करून त्यांच्या रणनीती अधिक प्रभावीपणे विकसित करण्यासाठी एक चौकट प्रदान करून या रणनीतिक आघाडीला आणखी मजबूत करेल, आणि हे सर्व चिनी वैशिष्ट्यांसह असेल.

    आफ्रिकेमध्ये चीनच्या गुआंशीची प्रगती

    आफ्रिकेतील धोरणनिर्मितीवर प्रभाव टाकण्यासाठी चीनचे प्रयत्न फक्त नवीन इमारती बांधण्यापुरते मर्यादित नाहीत. चिनी कम्युनिस्ट पक्षाने (CCP) झिम्बाब्वेमधील ZANU-PF पार्टी स्कूल, ज्याला हर्बर्ट चिटेपो स्कूल ऑफ आयडियोलॉजी म्हणतात, याच्या नूतनीकरणासाठीही निधी दिला आहे.

    याशिवाय, CCP चे नॅशनल अकॅडमी ऑफ गव्हर्नन्स, जे CCP सेंट्रल पार्टी स्कूलचा बाह्य भाग म्हणून कार्य करते, यांनी अल्जीरिया, इथिओपिया, केनिया आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांतील गव्हर्नन्स अकॅडमीसोबत वर्षभर प्रशिक्षणसाठी भागीदारी स्थापित केल्या आहेत. 2018 पासून, चीनने आफ्रिकेतील सत्ताधारी पक्षांना राजकीय नेतृत्वाचे प्रशिक्षण दिले आहे. या प्रयत्नांमुळे आफ्रिकन राष्ट्रांच्या शासकीय संरचना घडवण्यात चीनचा वाढता रस दिसून येतो, विशेषतः CCP प्रमाणे एकसत्ताक आणि प्रभावी पक्ष मॉडेल दृढ करण्यावर भर दिला जातो. हा आफ्रिकेतील क्रांतिकारी पक्षांना सत्तेवर आपली कायमची पकड ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा एक मार्ग आहे.

    चीन आणि केनिया यांच्यातील 60 वर्षांच्या संबंधांचा उत्सव म्हणून या मुख्यालयाचे उद्घाटन होण्याचे ठरले आहे. या गुंतवणूकीमुळे निश्चितपणे चीनची सॉफ्ट पॉवर केनियामध्ये आणि संपूर्ण आफ्रिका खंडभर वाढवली जाईल.

    हल्लीच, केनियाच्या सत्ताधारी युनायटेड डेमोक्रॅटिक अलायन्सने नायरोबीत CCP लीडरशिप स्कुल बांधण्यात रस दर्शविला आहे. या स्कूलसोबतच, बीजिंग नायरोबीतल्या नव्या परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्यालय निर्माण करण्यासाठी आणि विकासासाठी वित्त पुरवठा करण्याची दाट शक्यता आहे. चीन आणि केनिया यांच्यातील 60 वर्षांच्या संबंधांचा उत्सव म्हणून या मुख्यालयाचे उद्घाटन होण्याचे ठरले आहे. या गुंतवणूकीमुळे निश्चितपणे चीनची सॉफ्ट पॉवर केनियामध्ये आणि संपूर्ण आफ्रिका खंडभर वाढवली जाईल. काही अहवालांनुसार, बुरुंडी, कांगो, इक्वेटोरियल गिनी, मोरोक्को आणि युगांडा यांसारख्या राजकीय पक्षांनी त्यांच्या देशांमध्ये अशा सुविधा विकसित करण्यामध्ये रस दर्शविला आहे.

    पुढील मार्ग

    जरी चीनने 1960 च्या दशकापासून आफ्रिकन राजकीय पक्षांच्या शाळा उभारल्या किंवा त्यांना पाठिंबा दिला असला, तरी न्येरेरे लीडरशिप स्कूल ही चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल पार्टी स्कूलच्या धर्तीवर उभारलेली पहिली शाळा होती. सीसीपीप्रमाणेच, या सहा सहभागी राजकीय पक्षांनी त्यांच्या देशांना स्वातंत्र्य मिळवून दिले. याशिवाय, त्यांनी वेगवेगळ्या प्रमाणात लोकशाही आणि घटनावादाला कमजोर करणाऱ्या प्रवृत्तींचे प्रदर्शन केले आहे.

    या देशांनी जरी अधिकृतरीत्या बहुपक्षीय राजकीय प्रणालींना पाठिंबा दर्शवला असला, तरी ते अनेकदा विरोधकांबद्दल अत्यंत असहिष्णू राहिले आहेत आणि विरोधी पक्षांना दडपण्यासाठी, मर्यादित करण्यासाठी किंवा अगदी नष्ट करण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला आहे. याशिवाय, फसवणुकीच्या निवडणुका, निवडणूक हिंसाचार आणि व्यापक भ्रष्टाचार यांसारख्या समस्या सामान्य बनल्या आहेत, ज्यामुळे लोकशाही संस्थांचे अध:पतन झाले आहे. विशेष म्हणजे, स्वातंत्र्य मिळाल्यापासून या सहा देशांपैकी एकाही देशात सत्ताधारी पक्षाचा बदल झाला नाही.

    सीसीपीच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये मजबूत आणि केंद्रीकृत पक्ष प्रणालीच्या फायद्यांवर भर दिला जातो, ज्याला काही आफ्रिकन नेते सत्ता आणि स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी, बहुपक्षीय लोकशाहीच्या "गोंधळाशिवाय," अत्यावश्यक मानतात.

    एतिहासिक संबंध आणि तत्त्वज्ञानातील समानता लक्षात घेता, सीसीपीचा मॉडेल या देशांच्या राज्य कारभाराच्या शैलीस अनुरूप आहे. तथापि, सरकार बदलल्यास एखादा देश चीनी मॉडेलपासून दूर जाऊन तुलनेने उदारमतवादी पाश्चिमात्य लोकशाही मॉडेल स्वीकारण्याचा निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे, कोणत्याही मोठ्या राजकीय बदलाच्या परिस्थितीत आपले हित सुरक्षित ठेवण्यासाठी चीनला विविध आफ्रिकन देशांमधील विरोधी पक्षांना देखील पोषक बनवायचे आहे. या दृष्टिकोनातून, त्यांच्या गुआन्शी डिप्लोमसीचा भाग म्हणून चीनच्या राजकीय शाळा खूप प्रभावी ठरतील.

    गुआन्शी सामाजिक संबंधांच्या श्रेणीबद्ध चौकटीतून परस्पर जबाबदाऱ्यांवर भर देते. गुआन्शीच्या तत्वानुसार, शासक आणि प्रजेदरम्यानचे नाते राज्य आणि सरकारावर सत्ताधारी पक्षाच्या वर्चस्वाचा पाया रचते. ही संकल्पना अनेक आफ्रिकन देशांच्या नेतृत्वाशी सुसंगत आहे. सीसीपीच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये मजबूत आणि केंद्रीकृत पक्ष प्रणालीच्या फायद्यांवर भर दिला जातो, ज्याला काही आफ्रिकन नेते सत्ता आणि स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी, बहुपक्षीय लोकशाहीच्या "गोंधळाशिवाय," अत्यावश्यक मानतात.

    चीन आज जिथे आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काही दशकांपासून संयमाने काम केले आहे. प्रभाव टाकण्याच्या या दीर्घकालीन खेळाचे आणि त्यासोबत मिळणाऱ्या फळांचे चीनला चांगले आकलन आहे. आंतरराष्ट्रीय शक्तीच्या खेळात वेगाने उदयास येणे आणि चीन-केंद्रित जागतिक व्यवस्था तयार करण्याचे वेगवान प्रयत्न असले, तरीही चीनला कुठलीही घाई नाही. स्पष्टपणे, गुआन्शीला प्रोत्साहन देण्याचा चीनचा दीर्घकालीन खेळ आफ्रिकेत यशस्वी होत आहे.


    हा लेख मूळतः राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा संशोधन संस्थेत प्रकाशित करण्यात आला आहे.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

    Author

    Samir Bhattacharya

    Samir Bhattacharya

    Samir Bhattacharya is an Associate Fellow at ORF where he works on geopolitics with particular reference to Africa in the changing global order. He has a ...

    Read More +