नुकत्याच फ्रान्समध्ये घडलेल्या या दहशतवादी घटनांमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. १६ ऑक्टोबर रोजी, सॅम्युएल पॅटी या शिक्षकाची एका १८ वर्षाच्या चेचन निर्वासिताने शिरच्छेद करून हत्या केली. पॅटी यांनी ‘मुक्त भाष्य’ या विषयवार बोलताना आपल्या विद्यार्थ्यांना प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र वर्गात दाखवले आणि यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या ते निघून जाऊ शकतात असेही सांगितले. या गोष्टीचा राग त्या १८ वर्षीय तरुणाला आला. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी नुकत्याच फ्रान्समध्ये आलेल्या एका ट्युनिशियाच्या स्थलांतरिताने नाईस येथील चर्चमध्ये तीन जणांचा चाकूने भोसकून खून केला.
पॅटी यांच्या स्मृतिसभेत राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पॅटी हे “स्वातंत्र्य आणि तर्क” यांचे प्रतीक बनतील असे विधान केले आणि फ्रेंच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुसार “आम्ही व्यंगचित्रे सोडून देणार नाही” असे स्पष्ट केले. या वक्तव्यावर टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि मलेशियाचे नेते महाथीर बिन मोहम्मद यांच्या जळजळीत प्रतिसादामुळे इतर देशातील मुस्लिम जनताही पेटून उठली.
“मॅक्रॉन यांना मानसिक आरोग्य तपासणीची आवश्यकता आहे” असे विधान एर्दोगान यांनी केले आणि फ्रान्सच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी केली. याचा निषेध म्हणून फ्रान्सने त्या देशातील आपल्या राजदूतांना परत बोलावले. लिबियातील सैनिकी हस्तक्षेप, ग्रीसविरुद्ध पूर्व भूमध्य भागातील तणाव आणि अर्मेनियाविरुद्ध अझरबैजानला पाठिंबा देणे, यामुळे टर्कीच्या सैन्यामध्ये वाढणारा मतभेद हे एर्दोगान यांच्या वाढत्या द्वेषाचे कारण आहे.
जर फ्रान्स हा स्वतःला लोकशाही, उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष मुल्ल्यांचा प्रणेता समजत असेल तर एर्दोगान (जे २००३ पासून सत्तेत आहेत आणि २०२८ पर्यंत सत्तेत राहतील अशी तरतूद घटनात्मक फेरफार करून त्यांनी करून घेतली आहे) यांच्या नेतृत्वाखालील टर्की देश १९३० मध्ये अतातुर्क यांनी केलेले सुधार पुसून टाकून आपली इस्लामी भूमिका स्वीकारून निओ-ऑटोमन अवतारात प्रवेश करत आहे.
पाकिस्तानातील देशांतर्गत राष्ट्रीय अशांततेचा सामना करणाऱ्या इम्रान खान यांनीही मॅक्रॉन यांनी “कोट्यवधी मुस्लिमांच्या भावना दुखावून त्यांना भडकवल्याबद्दल” ट्विट्सचा भडीमार केला. पाकिस्तान संसदेने पॅरिसहून राजदूताला परत बोलावण्याचा ठराव संमत केला, परंतु नव्याने नियुक्त केलेला राजदूत फ्रान्सला पोहचलेलाच नाही हे त्यांच्या ध्यानात आले. “भूतकाळातील हत्याकांडासाठी लाखो फ्रेंच लोकांना ठार मारण्याचा अधिकार मुस्लिमांना आहे” असे ट्विट महाथीर मोहम्मद यांनी केले होते ते आक्षेपार्ह्य असल्याने ट्विटरने काढून टाकले. इथे उपरोध असा दिसून येतो की, चीनमध्ये लाखो उयघूर मुस्लिमांना विनाकारण तुरुंगात टाकण्यात येते त्याबद्दल यांच्यापैकी एकानेही एक शब्दानेही विरोध दर्शविलेला नाही.
इतर यूरोपीय देशांनी एकता दर्शवली. जर्मनी, युनाइटेड किंग्डम, इटली आणि नेदरलँड्स यांनी विधाने देऊन भक्कम पाठिंबा दर्शविला. दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाने मॅक्रॉन यांच्यावर होणाऱ्या वैयक्तिक हल्ल्यांचा आणि पॅटी यांच्यावर झालेल्या “पाशवी दहशतवादी हल्ल्यांचा” निषेध व्यक्त करणारे निवेदन प्रसिद्ध केले. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला पॅरिस मध्ये मुसलमान समाजातील कट्टरपंथीकरणावर चर्चेसाठी दाखल झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सला आपला पाठिंबा दर्शवत दहशतवादी कृत्यांचा निषेध केला.
धर्म आणि राज्य वेगळे करणाऱ्या धर्मनिरपेक्षतेच्या मूल्याला १९०५ साली कायदेशीर मान्यता मिळाली. २००४ सालच्या कायद्यानुसार सार्वजनिक संस्थांमध्ये प्रसिद्ध धार्मिक चिन्ह प्रदर्शित करण्यास मनाई करण्यात आली. यामुळे मुस्लिमांच्या हिजाबवर बंदी आली तसेच कॅथॉलिकांना मोठे क्रॉस आणि यहुद्यांना यार्मुकल (स्कल-कॅप) घालणे सुद्धा वर्ज्य झाले. नागरी राष्ट्रवादाला चालना देण्यासाठी श्रद्धा आणि त्याचे प्रदर्शन घरापुरते मर्यादित ठेवण्यास लोकांना सांगण्यात आले.
फ्रान्समध्ये एकूण ६० लाख मुस्लिम आहेत, यूरोपमधील मुस्लिमांची सर्वाधिक लोकसंख्या फ्रान्समध्येच आहे. काही समुदायातील वाढत्या कट्टरतावादाबद्दल फ्रान्स जाणून आहे. या महिन्याच्या सुरुवातीस, २ ऑक्टोबर रोजी मॅक्रॉन यांनी आपल्या भाषणात मुस्लिम फुटीरतावादी जोखमीबद्दल सावधतेचा इशारा दिला आणि ते रोखण्यासाठी नवीन कायदा आणला जाईल असे विधान केले. यामध्ये सामाजिक आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उपाय योजना, मशिदी आणि मदरशांना मिळणाऱ्या अर्थसाहाय्यावर आणि पसरवल्या जाणाऱ्या सूचनांवर कडक नियंत्रणे, तसेच सांस्कृतिक आणि क्रीडा संघटनांची देखरेख याचा समावेश आहे. इस्लाम संकटात आहे आणि त्यासाठी स्वतःचा “ज्ञान प्रसार” आवश्यक आहे या सूचनेला फ्रान्समध्ये मिश्रित प्रतिसाद मिळाला.
फ्रान्ससाठी हे आव्हान सोपे नाही. शिक्षण, कठोर परिश्रम आणि फ्रेंच कायदे आणि रितीरिवाजांचे पालन यामुळे जीवनशैलीत सुधारणा होते या विचाराला नजीकच्या काळात आव्हान देण्यात आले आहे. कोविड-१९ मुळे ही परिस्थिती ठळक झाली आहे. फ्रान्समधील मुस्लिमांच्या नुकत्याच झालेल्या जनमत सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, ६०% लोकांना असे वाटते की अभिव्यक्ती स्वातंत्र्यात व्यंगात्मक विनोदाचा समावेश असावा. परंतु त्याच सर्वेक्षणातून असे समोर आले की, ७५ टक्क्यांहून अधिक लोकांना असे वाटते की प्रेषित मोहम्मद यांच्या व्यंगचित्राचा स्वीकारार्ह विनोद म्हणून समावेश होऊ नये.
मॅक्रॉन यांची संभाव्य प्रतिस्पर्धी मरीन ले पेन २०२२ च्या निवडणुकीत या दरीचा आपल्या लोकसत्तावादी, राष्ट्रवादी आणि युरोपीय संघविरोधी मुद्द्यांच्या आधारावर फायदा उचलेल. मॅक्रॉन यांनी आपल्या विधिमंडळात सादर केलेल्या नवीन कायद्याच्या मदतीने ती दरी कमी करण्याची आवश्यकता आहे.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.