Author : Deepak Sinha

Published on Jan 27, 2020 Commentaries 0 Hours ago

पश्चिम आशिया सतत अस्थिर राहणे हे अमेरिकेच्या हिताचे आहे. वेगाने वाढत जाणाऱ्या चीनवर कुरघोडी करण्यासाठी अमेरिकेला ते हवे आहे.

अमेरिकेच्या बंदुकीचा नेम चीनकडे

‘इतिहास नेहमी स्वत:ची पुनरावृत्ती करतो. प्रथम शोकांतिका म्हणून आणि दुसऱ्यांदा थट्टेच्या स्वरूपात…’ असे कार्ल मार्क्सने एके ठिकाणी लिहिलेय. मात्र, अशा घटनांमध्ये बऱ्याचदा शोकांतिका आणि हास्यास्पद गोष्टींची बेमालूम सरमिसळ झालेली असते. इराण आणि अमेरिकेमधील संघर्षनाट्य अगदी तसेच आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारवाया पाहून ‘गनफाइट अॅट द ओके कोरल’ या हॉलिवूडच्या ब्लॉकबस्टर सिनेमाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. फरक इतकाच की पश्चिम आशिया म्हणजे काही पश्चिम अमेरिका नाही आणि ट्रम्प हे मार्शल याट अर्प तर नक्कीच नाहीत.

इराणी जनरल व युद्धनायक कासिम सुलेमानी हे इराकच्या अधिकृत दौऱ्यावर असताना अमेरिकेने त्यांना लक्ष्य करून हल्ला केला व त्यांची हत्या केली. आपल्या या कृत्याचे समर्थन करण्यासाठी ट्रम्प हे अनेक प्रकारे युक्तिवाद करत असले तरी, अमेरिकेच्या या कारवाईनं सार्वभौमता, नैतिकता, सभ्यतेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कुठलाही विचारी वा सुसंस्कृत समाज अमेरिकेच्या या कृत्याचं कधीही समर्थन करू शकणार नाही. हे कृत्य म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याची सरळसरळ पायमल्ली करून केलेली घुसखोरी आहे. युद्धाच्या नियमानुसार हा गुन्हाच आहे. अमेरिका किंवा इराणमध्ये कुठल्याही प्रकारचे युद्ध सुरू नसताना केलेला हा प्रकार म्हणजे अधिकच भयंकर गुन्हा आहे. यातून अमेरिकेचा खरा चेहरा उघड झाला आहे. गेल्या अनेक दशकांपासून जागतिक पातळीवर अमेरिका कशी दादागिरी करते, ते या निमित्ताने पुन्हा एकदा जगापुढे आले आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हल्ल्याची वेळ आणि त्याबाबत पुढे करण्यात आलेल्या तर्कामुळे ट्रम्प यांच्या हेतूविषयी गंभीर शंका व्यक्त होत आहे. सुलेमानी मारले गेल्यानंतर अमेरिकी दूतावासावर उघड उघड हल्ले होत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. खरंतर सुलेमानी हे कुणी रणनीतीकार नव्हते. त्यामुळे त्यांना संपवल्याने इराणने हाती घेतलेले लष्करी कार्यक्रम थांबण्याची शक्यता अगदीच कमी आहे. इराकमध्ये अविचारी आणि निरर्थक हल्ले करण्याचे आदेश देण्यामागे ट्रम्प यांचे वेगळेच मनसुबे असावेत, असे बोलले जात आहे.

ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग आणला जात आहे. त्यावरून देशाचे लक्ष वळवितानाच आपण किती मजबूत आणि निर्णयक्षम नेते आहोत, हे भासवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. मात्र, जनरल सुलेमानी यांच्या हत्येमुळे इराणची अपरिमित हानी झाली आहे, हे विसरता कामा नये. विशेषत: इराणच्या गनिमी काव्याच्या युद्धक्षमतेवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. ही क्षमता पुन्हा मिळवण्यासाठी त्यांना बराच काळ लागणार आहे.

अमेरिकेचीसुलेमानी यांना संपवण्याची कृती पूर्णपणे व्यवहारी आणि ऱ्हस्व दृष्टीचे निदर्शक असली तरी अमेरिकेच्या ‘डीप स्टेट’ या दीर्घकालीन रणनीतीशी मेळ खाणारी आहे. चीनवर कुरघोडी करणे ही सध्या अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाची गरज आहे. गेल्या दोन दशकांपासून अमेरिका हा जगातला एक आघाडीचा तेल उत्पादक देश बनला आहे. सौदी अरेबियापेक्षाही जास्त तेल अमेरिका निर्यात करून लागला आहे. तेव्हापासून अमेरिकेच्या पश्चिम आशियाविषयक दृष्टिकोनात अत्यंत महत्त्वाचा बदल झाला आहे.

मागील मार्च महिन्यात एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन (ईआयए) नं प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, अमेरिकेने आयातीपेक्षा जास्त कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादने निर्यात केली आहेत. जागतिक पातळीवरील ऑइल कन्सलटन्सी फर्म ‘रिस्टॅड एनर्जी’चे वरिष्ठ भागीदार पेर मॅगनस नॅसवीन यांच्या म्हणण्यानुसार, तेलाची बाजारपेठ सध्या अमेरिकेतील कच्च्या तेलांच्या अल्पकालीन साठ्याने अगोदरच व्यापलेली आहे. मात्र, व्यापक पातळीवरचे चित्र वेगळीच कथा सांगते. वाढता नफा मिळवून देणारे शेल उत्पादन (Shale Production) आणि पेट्रोलसाठीच्या जगाच्या भयंकर भुकेमुळे पुढील काही वर्षात तेलाच्या बाजारपेठेत अमेरिकेचे वर्चस्व मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

याचा सरळ अर्थ असा आहे की, अमेरिकेच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने पश्चिम आशिया आता पूर्वीइतका महत्त्वाचा राहिलेला नाही. एकेकाळी अमेरिकेची अर्थव्यवस्था याच प्रदेशातील तेलावर अवलंबून होती. आता ते चित्र पुरते बदलले आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे पश्चिम आशियातील धोरणही बदलले आहे. आता हा प्रदेश सतत अस्थिर राहणे, तिथे तणाव वाढत राहणे हे अमेरिकेच्या हिताचे आहे. चीनवर कुरघोडी करण्यासाठी अमेरिकेला ते हवेच आहे. वेगानं वाढत जाणारी चीनची अर्थव्यवस्था पश्चिम आशियातील तेलावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. चीनला पश्चिम आशियातील अस्थिरतेची झळ बसावी हाच अमेरिकेचा उद्देश आहे.

यामुळेच अमेरिकेला आता पश्चिम आशियात मोठ्या संख्येने सैनिक ठेवण्याची गरज उरलेली नाही. दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अमेरिका सौदी अरेबिया आणि इस्रायल यांचा कधीही वापर करू शकते. अमेरिकेच्या माघारीनंतर निर्माण होणारी पोकळी भरून काढण्यासाठी रशिया बरेच प्रयत्न करत आहे. मात्र, रशियाची अर्थव्यवस्था अमेरिकेच्या तुलनेत पाचपटीने लहान आहे. त्यामुळे अंगापेक्षा भोंगा मोठा होऊ नये, याची काळजी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना घ्यावी लागणार आहे.

अमेरिका-इराणमधील सध्याच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीमुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे, असे म्हणणे घाईचे ठरेल. मात्र, दोन्ही देशांमधील सध्याची शांतता फार काळ टिकणार नाही, हे सांगायला कुणा तज्ज्ञाची गरज नाही. परिस्थिती निवळण्याआधी अधिक बिघडेल, अशीच शक्यता जास्त आहे. मध्य आशियातून नव्हे, पण इराकमधून अमेरिकेला हुसकावून लावण्यासाठी इराणने त्याच्या छुप्या युद्सामग्रीचा वापर केल्यास येत्या काही महिन्यांत वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. तणाव वाढल्यास तो हाताबाहेर जाणं अटळ आहे आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. कल्पनाही करता येणार नाही असा फटका संपूर्ण जगाला बसणार आहे.

या पार्श्वभूमीवर जगाच्या इतिहासात घडून गेलेल्या एका काळ्या अध्यायाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ऑस्ट्रियाचा युवराज आर्कड्यूक फ्रान्झ फर्डिनांड आणि त्याच्या १९ वर्षीय पत्नीची गॅवरिलो प्रिन्सिप नावाच्या सर्बियन दहशतवाद्यानं हत्या केली होती. ही घटना जरी दूरवरच्या साराजेवो इथं घडली असली तरी त्यामुळे भडकलेल्या आगीने संपूर्ण जगाला कवेत घेतले आणि पुढची तब्बल चार वर्षे जगभरातील कोट्यवधी लोकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. जगाच्या इतिहासातील त्या शोकांतिकेची पुनरावृत्ती झाल्यास ते खरोखरच दुर्दैव ठरेल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.