Author : Abhijit Singh

Published on Apr 26, 2019 Commentaries 0 Hours ago

श्रीलंकेतील बॉम्बहल्ल्यानंतर भारतीय उपखंडावर पुन्हा एकदा दहशतवादाचा अंधार दाटला आहे. या हल्ल्यासंदर्भात विश्लेषण करणारा अभिजीत सिंग यांचा लेख.

श्रीलंकेतील बॉम्बहल्ला: अंधःकाराची चाहूल

श्रीलंकेमध्ये रविवारी २० एप्रिल २०१९ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. देशात इस्टर साजरा होत असताना तीन चर्च आणि तितक्याच हॉटेलांमध्ये अगदी पूर्वनियोजित पद्धतीने झालेला हा हल्ला मोठा आणि विध्वंसक होता. या हल्ल्यात सुमारे ३५९ जणांना जीव गमवावा लागला असून, शेकडो जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्याचे स्वरुप लक्षात घेतले तर मोठा विध्वंस घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांनी अगदी सुनियोजीत पद्धतीने या हल्ल्याची योजना आखला होता असे दिसून येते. या हल्ल्यांमागे तामिळ विद्रोही गटांचा किंवा इस्लामिक स्टेट (दायेश) शी संबंधित कट्टरवाद्यांचा हात असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

आपल्या देशातल्या विविध भागांमधले जे लोक श्रीलंकेतल्या बॉम्ब हल्ल्याच्या दुर्दैवी घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत, त्या प्रत्येकाला २००८ च्या २६ नोव्हेंबरला मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ल्याची आठवण झाल्यावाचून राहणार नाही. त्यादिवशी मुंबईत एकामागोमाग एक असे बॉम्बस्फोट आणि बेछूट गोळीबाराच्या स्वरुपात १२ पूर्वनियोजित हल्ले झाले होते. मुंबईतील एक कॅफे, ताज महाल पॅलेस हॉटेल, ऑबेरॉय ट्रायडेंट हॉटेल, ज्यु नागरिकांची घरे असलेल्या परिसरातील चाबड हाऊस इथे हे हल्ले करण्यात आले होते. हे हल्ले पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने घडवून आणले होते. मात्र त्यावेळी रविवारी श्रीलंकेत ज्या प्रकारे बॉम्बस्फोट झाले तसे ते त्यावेळी मुंबईत झाले नव्हते, तर गोळीबार झाला होता.

यासंदर्भात आतापर्यंत जे अहवाल आले आहेत, त्यानुसार हल्लेखोरांनी नेगोम्बो मधील सेंट सेबॅस्टियन चर्च, कोलंबो मधील सेंट अँथनी हे धार्मिस्थळ, आणि बॅट्टीकालोआ इथल्या झिऑन चर्चला लक्ष केले. हल्ल्यानंतर जीवितहानीबाबत आलेल्या सुरुवातीच्या अंदाजानुसार सुमारे कोलंबोत ४५ हून अधिक, बॅट्टीकालोआत २५ तर नेगोम्बो इथे ६७ जण मृत्युमुखी पडल्याचे सांगितले जाते.(आता हा एकूण आकडा ३५९ पर्यंत गेल्याचे वृत्त आहे). कोलंबोमधील सिनॅमन ग्रँड, शांग्रीला आणि किंग्जबरी या तीन प्रमुख हॉटेलवर हल्ला झाला. महत्वाचे म्हणजे ही तिन्ही हॉटेले महत्वाच्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांलगतच होती.

दरम्यान कोलंबोमधील ज्या हॉटेलांमध्ये बॉम्बहल्ले झाले त्या हॉटेलांच्या अगदीच जवळ असलेले भारताचे उच्चायुक्तालय आणि चर्चवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशारा, कोलंबोच्या पोलीस प्रमुखांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच दिला होता अशी माहितीही उघड झाली आहे. मात्र त्यानंतर जे काही घडले आहे त्यावरून आपल्या सल्लागारांनी दिलेले सल्ले गांभीर्याने घेण्यासारखे नाहीत, असाच विचार श्रीलंकेतल्या संबंधित अधिकारीवर्गाने केल्याचे दिसून येते. स्थानिक इस्लामिक समूहाकडून धोका असल्याचा इशारा पोलीस प्रमुखांनी दिला असतानाही, प्रत्यक्षात इस्टरच्या दिवशी मात्र सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली असल्याचे दिसूनच आले नाही.

आता जे काही घडले आहे, त्यावरून स्वाभाविकपणे हा हल्ला कोणी केला असावा..? हाच प्रश्न प्रत्येकाच्या अगदी तीव्रतेने पडला आहे… किमान आतापर्यंततरी कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारलेली नसल्यामुळे या हल्ल्यांमागे तामीळ विद्रोही गटांचा किंवा इस्लामिक स्टेट (दायेश) शी संबंधीत कट्टरवाद्यांचा हात असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तज्ज्ञांच्या मते अशाप्रकारचे सुरक्षेला आव्हान ठरू शकतील असे कठीण वाटणारे हल्ले, अनेक ठिकाणी सुनियोजीत पद्धतीने घडवून आणण्याची क्षमता इस्लामिक स्टेट्सकडेच असल्यामुळेच त्यांच्यावरच त्यांच्यावरच या हल्ल्याचा संशय व्यक्त होत आहे.

या हल्ल्याचे स्वरुप लक्षात घेतले तर आत्मघातकी हल्ल्यासाठी नेमकेपणाने श्रीमंती असलेला परिसर निवडण्यात आला होता, शिवाय बौद्ध धर्मीयांच्या परिसरातील ख्रिश्चनांच्या प्रार्थना स्थळांना लक्ष करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न यातून दिसतो. यावरून या हल्ल्यामध्ये इस्लामिक स्टेट्सचा सहभाग असल्याच्या शक्येतेला अधिकच बळ मिळते. मात्र याबाबत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे घाईचे ठरू शकते. अर्थात या हल्ल्याच्या घटनेची तपशीलवार चौकशी झाल्यानंतरच हल्ल्याला खऱ्या अर्थाने कोण कारणीभूत आहे हे कळू शकेल.

या हल्ल्यामुळे स्थानिक सुरक्षिततेवरही मोठा प्रभाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारताने गेल्या काही काळापासून दक्षिण आशियायी देशांमध्ये इस्लामिक स्टेट्सचा प्रभाव वाढत असल्याचा धोका वारंवार बोलून दाखवला आहे. भारताच्या शेजारील देशांवर इस्लामिक स्टेट्सचा प्रभाव तितका मोठा नाही असे भारताच्या गुप्तचर यंत्रणेचे मत आहे. मात्र बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसारखे देश मात्र आयसीसच्या सावलीत वावरत असून, त्याच्या खाणाखूणा या देशांमध्ये रुजल्या असल्याचेही दिसून येते. दक्षिण आशियातील दहशतवाद्यांबाबत कडक धोरण न अवलंबणाऱ्या देशांमध्ये दहशतवादाची पाळेमुळे विस्तारत आहेत. त्यामुळे भारतातही भितीयुक्त वातावरण निर्माण होणे स्वाभाविकच आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.