Author : Amit Thadani

Published on Apr 14, 2021 Commentaries 0 Hours ago

कोव्हिड-१९ साथरोगाला हातपाय पसरून दोन वर्ष पूर्ण होत आली आहेत. या साथीचे स्वरूप इतिहासात घडून गेलेल्या आधीच्या साथरोगांपेक्षा वेगळे नाही.

कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेचे काय होणार?

कोविड-१९ या साथरोगाचे पहिले काही रुग्ण २०१९ च्या अखेरीस नोंदले गेले. या साथरोगाचा २०२० मध्ये जगभरात अत्यंत वेगाने फैलाव झाला. आता तो २०२१ च्या पहिल्या अर्ध्या वर्षांत व्यापला आहे. आजवर साथरोगाचे २८ लाखांपेक्षाही अधिक बळी नोंदले गेले आहेत. साथरोगाचा इतिहास पाहिला, तर विशेषतः लाटांच्या उत्पत्तीच्या बाबतीत कोव्हिड-१९ मध्ये समानता दिसून येते. भूतकाळात डोकावून पाहिले तर दिसते की, आजवर आलेल्या तीव्र साथरोगांनी बराच काळ ठाण मांडले होते.

> सन १६५ मध्ये आलेल्या अँटोनाइन प्लेगने रोमन साम्राज्य उद्ध्वस्त केले. रोमचे सम्राट मार्कस ऑरेलियस यांचाही या साथरोगाने बळी घेतला. ही साथ इसवीसन १८० पर्यंत कायम राहिली.

> न्यूमोनियासारखा ‘ब्लॅक डेथ’ हा प्लेगही सन १३४७ ते सन १३५० या काळात म्हणजे चार वर्षे राहिला. हा साथरोगही बाधित भागात बराच काळ राहिला आणि या साथरोगाने पुढच्या टप्प्यात जाण्याआधी स्थानिक लोकांना उद्ध्व्स्त केले.

> सन १८३१ ते १८३७ या काळात आलेल्या एन्फ्लुएन्झाच्या साथीने युरोपला १८३१, १८३३ आणि १८३७ या तीन टप्प्यांत फटका दिला.

> सन १८८९ मध्ये आलेला रशियन फ्ल्यूचा काळ सुमारे दोन वर्षांचा होता. या काळात ३ लाख ६० हजार लोकांचा बळी गेला.

> याच काळात म्हणजे १८८९ मधील एन्फ्लुएन्झाच्या साथीने पाच वर्षे ठाण मांडले होते. या काळात ब्रिटनमधील एक लाखांपेक्षाही अधिक नागरिक मृत्युमुखी पडले.

> सन १९१८ मध्ये आलेला स्पॅनिश फ्ल्यू एन्फ्ल्युएन्झा हा इतिहासातील सर्वांत विनाशकारी साथरोग होता. मार्च १९१८ ते नोव्हेंबर १९१९ या दरम्यानच्या काळात त्याच्या तीन लाटा आल्या आणि त्यात ५ कोटी नागरिकांनी आपला जीव गमावला. संशोधकांच्या दोन स्वतंत्र गटांनी या साथरोगाचा पहिला उद्रेक १९१७ मध्ये झाल्याचे नोंदवला होता.

साथरोगाचे टप्पे

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) प्रसिद्ध केलेल्या या तक्त्यामधून साथरोगाचे नैसर्गिक स्वरूप स्पष्ट होते. आपण कोव्हिड-१९ च्या पाचव्या-सहाव्या टप्प्यात आहोत. जगभरात रुग्णसंख्या वाढत आहे. बहुसंख्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार साथरोगोत्तर काळात कोव्हिड-१९ हा हंगामी आजार असेल.

साथरोगांच्या लाटांचे कारण

साथरोगाच्या फैलावावर नियंत्रण आणि उद्रेक या दोन्ही गोष्टींची काही कारणे आहेत. ‘दैहाय एट अल’च्या प्रस्तावानुसार, १९१८ मध्ये आलेल्या एन्फ्लुएन्झाच्या तीन लाटांचे एक मॉडेल तयार केले आहे.

> शाळा सुरू होणे आणि बंद करणे.
> उद्रेकाच्या काळात हवामानात बदल.
> उद्रेकाच्या काळात नागरिकांची बदललेली वर्तणूक.

‘किसलेर एट अल’कडून सार्स कोव्ह-२ च्या साथरोगोत्तर फैलावास जबाबदार असलेले काही घटक सांगण्यात आले आहेत.

> फैलावामध्ये हंगामी स्वरूपात बदलाची तीव्रता.
> प्रतिकारशक्तीचा काळ
> सार्स-कोव्ह २ आणि अन्य कोरोना विषाणू या दोहोंमुळे निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीची तीव्रता.
> नियंत्रणासाठी उपाययोजनांची कठोरता आणि वेळ.

विषाणूच्या उत्परिवर्तनामुळे पुन्हा उद्रेक होऊ शकतो. अशा वेळी अगदी ज्यांना संसर्ग होऊन गेला आहे, त्यांनाही पुन्हा संसर्ग होऊ शकतो. सार्स-कोव्ह २ या विषाणूमध्ये लक्षणीय प्रमाणात उत्परिवर्तन दिसून आले असून, अधिक वेगवान संसर्ग करणाऱ्या विषाणूचे काही प्रकारही आढळून आले आहेत. भारतात २० टक्के नवे रुग्ण हे दुहेरी उत्परिवर्तनाच्या प्रकारातील आहेत. ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रकारांचा भारतात फारसा धोका निर्माण झाला नाही.

रुग्णसंख्या वाढणे किंवा कमी होणे ही या सर्व घटकांमधील गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. अन्य काही वैशिष्ट्येही लक्षात आली आहेत. उदाहरणार्थ, १९१८ मधील अभ्यासातून दिसून आले, की साथरोगाने प्रथम गरिबांना फटका दिला आणि नंतर श्रीमंतांना. कोव्हिड-१९ साथरोगासंबंधातही मुंबईसारख्या शहरात हेच चित्र दिसून आले. पहिल्या लाटेत झोपडपट्ट्यांमध्ये संसर्ग फैलावला आणि दुसऱ्या लाटेत विशेषत्वाने उच्च वर्गात बाधेचे प्रमाण वाढले.

इतिहासापासून धडे

साथरोगावर नियंत्रण आणण्याच्या पारंपरिक पद्धतींमध्येही बदल झालेला नाही. त्या बहुसंख्य देशांमध्ये सारख्याच आहेत.

-विलगीकरण आणि संसर्ग झालेल्या व्यक्तींवर उपचार.
-विलगीकरण करून साथीला अटकाव.
-व्यक्तिगत सुरक्षा.
-योग्य संवाद आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहितीचा प्रसार.

या घटकांपैकी कोणत्याही एक किंवा अधिक घटकांची सुयोग्य अंमलबजावणी केली गेली नाही, तर परिस्थितीवरील नियंत्रण सुटून जाईल. या आघाडीवर काही प्रमाणात अपयश आले आहे. याचाच परिणाम म्हणून भारत दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात सापडला आहे. बहुसंख्य रुग्ण जरी महाराष्ट्रातीलच असले, तरी अन्य राज्यांमध्येही रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून येत आहे.

साथरोगासंबंधीच्या कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी देशभर अद्याप सुरू आहे आणि बहुतांश राज्यांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे; परंतु हे निर्बंध सातत्याने, बेफिकीरपणे आणि जाहीररीत्या धुडावून लावण्यात येत आहेत. केंद्र सरकारचे शोधन पथक महाराष्ट्रात आले असता, सध्याच्या दुसऱ्या लाटेची कारणे सामान्यतः ‘साथरोगाची भीती संपल्याने, साथरोगामुळे थकवा निर्माण झाल्यामुळे अयोग्य वर्तणुकीमुळे, चुकारपणामुळे आणि वेगाने संसर्ग होणाऱ्या विषाणूच्या प्रकारामुळे दुसरी लाट आली आहे. याशिवाय नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका, लग्नाचा हंगाम; तसेच शाळांना सुरुवात आणि सार्वजनिक वाहतुकीदरम्यान होणारी गर्दी आदी गोष्टी याला कारणीभूत आहेत,’ असे निरीक्षण या समितीने नोंदवले.

थोडक्यात, साथरोग व्यवस्थापनासंबंधीचे प्रत्येक तत्त्व वाऱ्यावर सोडले आहे, असे दिसून येते.

साथरोगाचा फैलाव वाढत असतानाही भव्य राजकीय प्रचारसभा घेतल्या जात असल्याने राजकीय नेतेही याला जबाबदार आहेत. महाराष्ट्रात चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यात पंचायत निवडणुकांसाठी राज्यभर जोरदार प्रचार सुरू होता. त्यानंतर लगेचच राज्यात कोव्हिड-१९ चा उद्रेक झाला. पश्चिम बंगालमध्येही विविध राजकीय पक्षांनी मोठमोठ्या प्रचारसभा घेतल्या. त्यानंतर संसर्गाचा खूप मोठ्या प्रमाणात फैलाव झालेला दिसून आला.

आसाममध्ये संसर्गात मोठी वाढ दिसून आली नाही. याचे कारण कदाचित जेव्हा प्रचारसभा सुरू होत्या तेव्हा सक्रिय रुग्णांची संख्या केवळ ५१५ होती. कारण काहीही असले, तरी खूप मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येताना दिसत होते. एवढेच नव्हे, तर अनेकांनी तोंडावर मास्कही बांधलेले नव्हते. मोठ्या प्रचारसभा टीव्हीवरही दिसत होत्या. १९१८ मध्ये एन्फ्लुएन्झाची साथ सुरू असताना फिलाडेल्फियामध्ये भव्य संचलन करण्यात आले होते. त्या वेळी झालेल्या रुग्णवाढीपासून आपण धडा घेतलेला नाही, असे लक्षात येते.

पंजाब, बिहार आणि महाराष्ट्र यांसारख्या काही राज्यांमध्ये तथाकथित ‘लग्नाच्या हंगामा’मुळे संसर्गात वेगाने वाढ झाल्याचे आढळून आले. अशा कार्यक्रमांमध्ये साथरोगाच्या काळात शेकडो लोक मास्क न घालता आणि सुरक्षित वावराचे नियम न पाळता वातानुकूलित हॉलमध्ये एकत्र कोंबले जातात. हे म्हणजे विनाशालाच आमंत्रण देणे असते. याच्या उलट, लग्नाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच उत्तर प्रदेश सरकारने अनेक बचावात्मक उपाययोजना केल्या आणि त्यामुळेच तेथील नागरिकांना तुलनेने फारसा धक्का बसला नाही; तसेच राज्यातील सर्व संबंधित तुलनेने अधिक सजग होते आणि रुग्णांचे विलगीकरण व एकांत याबाबतीत आणि संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यातही अधिक कठोर वर्तन करण्यात येत होते.

महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतूक अत्यंत गर्दीची असते. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या वेळा वाढवणे आणि वाहतुकीसाठी साह्यकारी वेगळी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे; परंतु बसेस आणि ट्रेनची संख्या वाढवण्याऐवजी राज्य सरकारने काही अगम्य कारणामुळे वाहतुकीच्या वेळाच काही तास अलीकडे आणल्या. त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. हीच चूक पुन्हा पुन्हा होत राहिली. सुरुवातीला लोकल ट्रेन बंद ठेवल्या आणि बसवर वाहतुकीचा भार वाढवला. नंतर सर्वसामान्य माणसांसाठी सार्वजनिक वाहतुकीच्या दिवसभरातील वेळा काही तासांनी कमी केल्या. काही राज्यांमध्ये शाळा सुरू केल्याने काही भागांमध्ये साथरोगाचा उद्रेक दिसून आला.

साथरोगाच्या सुरुवातीच्या काळात नागरिकांशी योग्य संवाद साधण्यात आला आणि माहितीही देण्यात आली. नंतरच्या काळात मात्र, तेही कमी पडले. रुग्णसंख्येत घट झाल्याने भारतात कोव्हिडची दुसरी लाट येणारच नाही आणि आपण ‘हर्ड इम्युनिटी’च्या जवळ आलो आहोत, असा दावा करणारे लेख प्रसिद्ध होऊ लागले. केंद्र सरकारकडून देण्यात येत असलेल्या संदेशांमधूनही आपण कोव्हिड-१९वर विजय मिळवला आहे, असे सूचित केले जात होते. या सगळ्याचा नागरिकांवर परिणाम झाला असल्याचे दिसत आहे. १९१८ मधील साथरोगादरम्यानच्या काळात प्रसारमाध्यमांमधून करण्यात आलेले एकतर्फी वार्तांकन हे साथरोगावर नियंत्रण आणण्यात आलेल्या अपयशाचे एक प्रमुख प्रमुख कारण होते.

काही तज्ज्ञांनीही भारताने ‘हर्ड इम्युनिटी’ मिळवली आहे, असा अकाली दावा केला. आत्मविश्वास दुणावल्यामुळे साथरोग नियंत्रणाच्या कामात ढिसाळपणा आल्याचे काही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनीही कबुल केले. सगळ्यांत कळस म्हणजे, महाराष्ट्रात रुग्णांसाठी खाटा कमी पडत असल्याने परिस्थिती गंभीर होत चालली असतानाही याचे गांभीर्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केवळ एका खाटेसाठी रुग्णांना काही तास वाट पाहावी लागत असताना आणि बहुतेक सर्वच मोठ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्रतीक्षा यादी असताना मुंबईचे महापालिका आयुक्त मात्र, उपचारांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध आहेत, असे भडक दावे करीत आहेत.

साथरोग संपविण्यासाठी

व्यापक स्तरावर लसीकरण करणे, हाच साथरोग संपवण्यासाठीचा सर्वांत सुरक्षित आणि जबाबदार पर्याय आहे. यामध्ये मृत्यूही रोखता येतात. आजवरच्या काही प्रसंगांमधील अनुभवांवरून लस हा पर्याय होऊ शकतो आणि त्याचा उपयोगही होऊ शकतो, असे दिसून आले आहे. सन १९५७ मध्ये आलेल्या एशियन फ्ल्यू साथरोगालाही लसीकरणातूनच अटकाव करण्यात आला होता. ईबोलाचा उद्रेक रोखण्यातही स्थानिक स्तरावर लसीकरण मोहीम राबवून यश मिळवता आले.

देशातील बहुसंख्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली असून या अतिधोकादायक गटात कोव्हिडमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण जवळजवळ शून्यावर येऊन पोहोचले आहे. त्यामुळे बहुतेक सर्वच राज्य सरकारांचे लक्ष्य आता सर्व नागरिकांचे युद्धपातळीवर लसीकरण करून घेणे हे आहे. अतिधोकादायक गटातील नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात येत असल्यामुळे कोव्हिडमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. यामुळेच अन्य लशींची निर्मिती आणि जास्तीतजास्त डोस लशींचे उत्पादन करणे गरजेचे आहे.

लशीची परिणामकारकता सुमारे ८० टक्के असल्याने लस घेतल्यानंतरही काहींना संसर्ग होऊ शकतो; परंतु लस घेतल्यावर मृत्यू होण्याची शक्यता अत्यंत नगण्य आहे. इस्रायलमधील ६० टक्के नागरिकांनी लशीचा किमान पहिला डोस घेतल्यामुळे तेथील जनजीवन साथरोगापूर्वीच्या काळासारखेच मूळपदावर येत आहे. मात्र, इस्रायलमध्ये अतिदक्षता विभागात ३ टक्क्यांपेक्षाही कमी रुग्ण दाखल असताना आपल्याकडे मात्र ७५ टक्क्यांपेक्षाही कमी रुग्णांनी अद्याप एक डोसही घेतलेला नाही, हे दुःखदायक आहे.

आजवरच्या आकडेवारीनुसार, लस घेतल्यावर संबंधित व्यक्तीला उत्परिवर्तन झालेल्या विषाणूच्या अन्य प्रकारापासूनही संरक्षण मिळू शकते. याची परिणामकारकता कमी-जास्त असू शकते. मात्र, कोव्हिडमुळे होणारे मृत्यू रोखल्यानंतर या विषाणूची परिणामकारकता केवळ ऋतूबदलावेळी झालेल्या सर्दी-खोकल्याएवढीच शिल्लक राहू शकते. हेच आपले उद्दिष्ट असायला हवे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.