Published on Dec 10, 2020 Commentaries 0 Hours ago

ऑक्टोबर २०२०मध्ये चीनच्या संरक्षणासंदर्भात आयोजित सर्व सदस्यीय परिषदेत, ‘बायझन’ हा शब्द वापरला गेला, ज्याचा अर्थ आहे- ‘युद्धासाठी सज्ज व्हा.

चीनी लष्कराची पुनर्मांडणी की युद्धसज्जता?

चीन-भारत सीमेवर सैन्याची जमवाजमव झाली असताना आणि तैवानबाबतच्या अडचणी समोर ठाकलेल्या असताना चीनमध्ये एक महत्त्वाची लष्करी घडामोड झाली आहे. चीनच्या सर्वोच्च सैन्य प्राधिकरणाने म्हणजेच सेंट्रल मिलिटरी कमिशनने (सीएमसी) जवळपास २० वर्षांनंतर पीपल्स लिबरेशन आर्मीसाठी (पीएलए) संयुक्त लढाऊ कार्यवाहीसंबंधीचे नवे नियम जारी केले आहेत. तसेच, राष्ट्रीय स्तरावरील सेवेतील भरतीचे व्यवस्थापन करण्यासाठी एक आंतर-मंत्रालयीन यंत्रणाही तयार करण्यात आली आहे.

चीनच्या लष्करी सज्जतेबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, सीएमसी देशाच्या लष्कराच्या रणनीतिची दिशा निश्चित करते. तसेच, ही नवी मार्गदर्शक तत्वे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या “सैन्य मजबूत करण्याच्या विचारांवर” आधारित आहेत. त्यामुळे चीन आपल्या लष्कराची पुनर्मांडणी करत असून, त्यातून ते जगाला काहीतरी सांगू पाहत आहेत, एवढे मात्र नक्की.

चीनच्या नव्या संरक्षण मंत्राद्वारे, ‘पीएलए’च्या संयुक्त लढाऊ कार्यवाहीसाठी वेगवेगळ्या स्तरांवरील विभागांच्या जबाबदाऱ्या सुस्पष्ट करण्यात आल्या आहेत. मागील महिन्याच्या सुरूवातीस अस्तित्त्वात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांद्वारे, ‘पीएलए’च्या संरचनात्मक सुधारणांना चालना मिळेल आणि वेगवेगळ्या सेवांची एकत्रितपणे कार्य करण्याची क्षमता वाढेल, अशी अपेक्षा आहे. संयुक्त लढाऊ कार्यवाहीसाठी नियोजन, रसद आणि जमवाजमव यांचे अत्याधुनिक एकत्रीकरण होणे आवश्यक आहे आणि या सर्वांचे- प्रत्येक सेवाशाखेसाठी उचित अशी एकात्मिक प्रक्रिया होणे गरजेचे आहे.

अगदी अलीकडे- ऑक्टोबरमध्ये गुआंग्डोंग प्रांताच्या चाओझोऊ येथील ‘पीएलए’ नौदल मुख्यालयातील नौसैनिकांच्या तुकडीला दिलेल्या भेटीदरम्यान, शी जिनपिंग यांनी ‘पीएलए’च्या संयुक्त कार्यवाहीविषयीच्या क्षमतेत सुधार करण्यावर सातत्याने भर दिला. तसेच, संरक्षणासंदर्भात ऑक्टोबर २०२०मध्ये आयोजित सर्व सदस्यीय परिषदेत, हा महत्त्वाचा मुद्दा होता. नवलाची बाब अशी की, या परिषदेत ‘बायझन’ हा शब्द वापरला गेला, ज्याचा अर्थ आहे- ‘युद्धासाठी सज्ज व्हा.

’धोरणविषयक बाबींवर विचार विनिमय करण्यासाठी सीसीपीच्या केंद्रीय समितीचे वार्षिक अधिवेशन असते. या सर्व सदस्यीय परिषदेत जाहीर करण्यात आलेल्या मुख्य ‘विकास विषयक लक्ष्यांपैकी’ एक आहे- ‘पीएलए’ला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर२०२७ पर्यंत आधुनिक सैन्याची उभारणी करणे. या परिषदेत ‘श्रीमंत देश आणि मजबूत सैन्य अशी एकात्मिक जाणीव करण्यासाठी राष्ट्रीय संरक्षणाचे आधुनिकीकरण’ सूचीबद्ध करण्यात आले. हाँगकाँगमधील लष्करी विश्लेषक सॉन्ग झोंगपिंग म्हणाले, “जगातील एक अग्रगण्य आधुनिक शक्ती म्हणून ‘पीएलए’ची उभारणी करणे, हे अमेरिकी सैन्याच्या तुल्यबळ असू शकणे, असा याचा अर्थ लावता येतो.”

शी जिनपिंग यांच्या कार्यकाळात, ‘पीएलए’च्या आधुनिकीकरणाअंतर्गत ‘हार्डवेअर’ आणि ‘सॉफ्टवेअर’ या दोन आघाड्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हार्डवेअर क्षमता वृद्धिंगत करण्याच्या कार्यक्रमांतर्गत, स्वदेशी बनावटीच्या सामग्रीचे उत्पादन करण्यावर विशेष भर दिला जात आहे. उदाहरणार्थ, पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स (‘पीएलएएएफ) आजमितीस त्यांच्या लढाऊ विमानांसाठी रशियन इंजिनांवर अवलंबून आहे, मात्र, भविष्यात हे चित्र बदलू शकते.

‘पीएलएएफ’च्या सैन्य वाहतुकीकरता वापरल्या जाणाऱ्या विमानांसाठी स्वदेशी बनावटीच्या इंजिनाची चाचणी घेतली जात आहे. जर या चाचण्या यशस्वी झाल्या, तर रशियन इंजिनांच्या जागी स्वदेशी बनावटीचे नमुने येऊ शकतील, ज्यात वाहतुकीकरता वापरण्यात येणाऱ्या विमानांच्या भार वाहून नेण्याच्या क्षमतेत सुधार करण्यात येईल. शेनयांग एरोइंजिन रिसर्च इन्स्टिट्यूटने नवीन डब्ल्यूएस-20 इंजिनाची रचना केली आहे. जुलै २०२० मध्ये, चीनने ‘जे-20बी स्टिल्ट फायटर’चे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केले आहे. या पाचव्या पिढीतील विमानांना रशियन इंजिन ऊर्जा पुरवणार असले, तरी चिनी नमुने विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

२०१८मध्ये पार पडलेल्या सीसीपीच्या तिसऱ्या सर्व सदस्यीय परिषदेत, ‘योग्य आकाराचे’ जवान आणि विविध सेवांमधील मनुष्यबळाची आवश्यकता समायोजित करून सैन्यबांधणीत प्राण फुंकण्याचा संकल्प करण्यात आला होता. चिनी कम्युनिस्ट पक्षाने वजनाने हलक्या मात्र अधिक सुसज्ज अशा लढाऊ विमान निर्मितीसाठी ‘पीएलए’च्या ‘सुधारित सॉफ्टवेअर’ला हिरवा कंदीलही दिला. शी जिनपिंग यांनी सप्टेंबर २०१५मध्ये ‘पीएलए’कडून सुमारे ३ लाख कर्मचाऱ्यांवर कारवाईची घोषणा केली.

सीएमसीच्या देखरेखीखाली ‘जॉइंट ऑपरेशन कमांड’ रचना आणि ‘थिएटर जॉइंट ऑपरेशन कमांड सिस्टम’ स्थापन करण्याचा संकल्प करण्यात आला. सीएमसीचे प्रमुख असलेल्या शी जिनपिंग यांनी घोषित केले की, सीएमसीच्या देखरेखीखाली लष्करी दलाची, नव्या युद्ध विभाग दलात पुनर्रचना करण्यात येईल. सेवेचे मुख्यालय प्रशासकीय साखळीच्या माध्यमातून विविध विभागांशी जोडले जातील. हे बदल २०२० पर्यंत लागू करण्यात येणार होते. ‘पीएलए’चा संपूर्ण कायापालट करण्याच्या प्रक्रियेत, त्यांचे चार मुख्य विभाग- जनरल पॉलिटिकल, जनरल लॉजिस्टिक, जनरल स्टाफ आणि जनरल आर्म्समेंट्स १५ ‘कार्यात्मक विभागांमध्ये’ मध्ये विलीन करण्यात आले.

कार्यभार हाती घेतल्यापासून, जिनपिंग यांच्या कारभाराची शैली ही ‘छोट्या आघाडीच्या गटांमध्ये’ शक्ती एकवटण्यावर केंद्रित आहे, या गटांचे ते वैयक्तिकरित्या प्रमुख आहेत. नव्या ‘सीएमसी अध्यक्ष जबाबदारी ’व्यवस्थेअंतर्गत, कामे सुस्पष्टपणे नमूद करण्यात आलेली आहेत. पुनर्रचित लढाई क्षेत्र दलाकडे युद्धे सुरू करण्याची जबाबदारी आहे आणि त्यांच्या सैन्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सेवांकडे आहे. मात्र, या दोन वैविध्यपूर्ण समांतर व्यवस्था सीएमसीला उत्तरदायी आहेत, ज्याचे प्रमुखपद शी जिनपिंग यांच्याकडे आहे. याव्यतिरिक्त, सर्वोच्च दलाची रचना सुलभ केल्याने, शी जिनपिंग यांच्या‘पीएलए’च्या सर्वसमावेशक पुनर्रचनेमागचे उद्दिष्ट हे लष्करावर सीसीपीची पकड घट्ट करणे आहे.

शी जिनपिंग यांचा ‘चायना ड्रीम’ या आवडत्या प्रकल्पामागचे उद्दिष्ट देशाच्या महाशक्तीच्या संभाव्यतेला पुनरुज्जीवित करणे आहे. योगायोगाने, शी जिनपिंग यांनी देशाच्या पुनरुज्जीवनाबद्दल मांडलेले मुख्य युक्तिवाद निवृत्त ‘पीएलए’ कर्नल लियू मिंगफू यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित आहेत. पुस्तकात असे म्हटले आहे की: “प्रत्येक महाशक्तीचा कार्यकाळ मर्यादित असतो आणि अमेरिका त्या दिशेने येत आहे आणि २०४९ सालापर्यंत चीनने अमेरिकेला मागे टाकणे महत्वाचे आहे.” या पुस्तकात असेही म्हटले आहे की, जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून चीनची स्थिती, तितकेच शक्तिशाली लष्कर निर्माण करणे आणि देशाच्या स्वदेशी नवनिर्मितीच्या संभाव्यतेला चालना देणारी आहे.

चिनी सैन्याचा कायापालट करण्यात शी जिनपिंग यांनी स्वारस्य दाखवण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांची पार्श्वभूमी. चीनच्या पहिल्या आणि दुसऱ्या पिढीच्या नेतृत्वाला गनिमी पार्श्वभूमी होती अथवा त्यांच्यापाशी किमान लष्करी बाबींचे मूलभूत प्रशिक्षण होते. तिसऱ्या पिढीच्या नेतृत्वातून प्रारंभ करणारे, प्रामुख्याने चीनमधील उच्चवर्गीय टेक्नोक्रॅट्स आहेत: जिआंग जेमीन आणि हू जिन्ताओ (शी जिंनपिंग यांच्या आधीचे राज्यकर्ते) पेशाने अभियंता होते. त्यांच्या तुलनेत, शी जिंनपिंग यांचे सैन्यदलाशी असलेले संबंध अधिक मजबूत आहेत. त्यांची पत्नीपेंग लियान, पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये मेजर-जनरल या पदाच्या समकक्ष दर्जाचे असलेले पद भूषवीत होत्या आणि त्यांनी ‘पीएलए’च्या कला अकादमीच्या अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.

शी जिनपिंग यांनीही क्विन्घुआ विद्यापीठातून रासायनिक अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. त्यानंतर १९७९ मध्ये सीएमसीमध्ये तत्कालीन संरक्षणमंत्री गेंज बियाओ यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्याच वर्षी चीन आणि व्हिएतनाम यांच्यात युद्ध झाले. चीनकडे आण्विक शक्ती होती आणि जगातील सर्वात मोठे सैन्य असताना, व्हिएतनामी सैनिकांपाशी, १९७५ मध्ये अमेरिकेसारख्या महासत्तेचा पराभव करण्याचा लढाऊ अनुभव होता. ‘पीएलए’च्या मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांच्या आकड्याची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी, ‘पीएलए’च्या दोन लाख बलाढ्य सैन्यातील साडेसहा हजारांहून अधिक सैनिकांचा प्राणहानी झाली आणि सुमारे ३१ हजार सैनिक जखमी झाले, असा अंदाज वर्तवला जातो.

यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या आणि सामग्रीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. व्हिएतनामी अनुभवाने चिनी मानसिकतेवर ठसा उमटवला आहे. बखरींमध्ये नोंदल्या गेलेल्या देशाच्या लष्करी इतिहासाच्या इतिहासात, १९५० च्या कोरियन युद्धात भाग घेतलेल्या चिनी लोकांच्या स्वयंसेवी सैन्याच्या शौर्याचे गोडवे गाणारे उल्लेख आहेत, मात्र, व्हिएतनामी संघर्ष मोठ्या प्रमाणात स्मरणातून बाजूला सारण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये, ‘अमेरिकेच्या आक्रमकतेचा प्रतिकार आणि कोरियाची मदत’या स्मृतीप्रीत्यर्थ ७०वा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. या प्रसंगी आपल्या भाषणात शी जिनपिंग म्हणाले, “चिनी लोकांच्या स्वयंसेवक सैन्याच्या रूपात एक सशस्त्र प्रतिस्पर्धी निर्माण झाला… अमेरिकी सैन्य अजिंक्य आहे हे मिथक मोडीत काढले.”

व्हिएतनाममध्ये लष्करी-प्रशासन नोकरशाहीत काम केलेल्या आणि ‘पीएलए’ची दुखरी नस ठाऊक असलेल्या शी जिनपिंग यांना ‘पीएलए’ची पुनर्रचना करणे उत्तमरीत्या जमले. त्यांना याची जाणीव होती की, लष्कराला आधुनिक युद्ध परिस्थितीत लढा देण्यासाठी सुसज्ज करणे महत्वाचे आहे. ‘पीएलए’च्या डावपेचांचा शी जिनपिंग यांनी केलेला कायापालट ही विविध कारणांसाठी भारतीय संरक्षण योजनाकारांना मिळालेली सूचना आहे. चकमकी वगळता चीनने १९७९ पासून मोठे युद्ध लढलेले नाही. त्या लढाईत लढलेले सर्वजण निवृत्त झाले असून, प्रत्यक्ष लढण्याचा अनुभव गाठिशी असलेले चिनी लष्करात फारच थोडे आहेत.

१५ जूनला, २० भारतीय सैनिक आणि नेमकी संख्या सांगता येणार नाही, इतके चिनी सैनिक गलवान खोऱ्यात शहीद झाले. अमेरिकी काँग्रेसला सादर केलेल्या अहवालात, अमेरिका-चीन आर्थिक आणि सुरक्षा आढावा आयोगाने म्हटले आहे की, चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंघे यांनी “परिघ स्थिर करण्यासाठी सैन्य दलाच्या वापराला मान्यता दिली आहे. ”चीन आणि जपान यांच्यातही यापूर्वी विवादामुळे कुंठितावस्था आली होती. शी जिनपिंग, कदाचित अश्वमेधाची तयारी म्हणून ‘पीएलए’चा लढाऊ अनुभव सुधारण्यासाठी गलवानसारख्या चकमकींचा उपयोग करीत असतील.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.