Author : Sushant Sareen

Published on May 03, 2021 Commentaries 0 Hours ago

पाकिस्तानच्या रस्त्यांवर सुरू असलेल्या गोंधळामुळे संपूर्ण पाकिस्तान हे यादवी युद्धाच्या उंबरठ्यावर आहे, असा समज संपूर्ण जगभर पसरला आहे.

पाकिस्तानातील धार्मिक असंतोषाचे वास्तव

पाकिस्तानमध्ये ट्रेंड झालेला #सिव्हिल वॉर इन पाकिस्तान (#CivilWarinPakistan) हा हॅशटॅग म्हणजे काहीशी अतिशयोक्ती होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. परंतु आशिकान-ए-रसूल या संघटनेने पाकिस्तानच्या रस्त्यांवर घातलेल्या गोंधळामुळे संपूर्ण पाकिस्तान हे यादवी युद्धाच्या उंबरठ्यावर आहे, असा समज संपूर्ण जगभर पसरला आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानामध्ये विशेषतः पंजाब आणि कराचीच्या रस्त्यावर जे घडले ते काही नवीन नव्हते.

याआधीही तेहरीक-ए-लब्बाईक पाकिस्तान (टीएलपी) च्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर उतरून संपूर्ण देश ठप्प करण्याचा प्रयत्न केला आहे. हा पक्ष पाकिस्तानातील सर्वात मोठा धार्मिक पक्ष आहे. तसेच २०१८ च्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या मतांनुसार देशातील चौथ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष आहे व पंजाब प्रांतातील तिसर्‍या क्रमांकावरील राजकीय पक्ष आहे. हा पक्ष इस्लाममधील सर्वात जहाल विचारधारेचे समर्थन करतो. सध्या या पक्षावर पाकिस्तानात बंदी घातलेली आहे. असे असे तरीही त्यांचे काम कुठेही थांबलेले नाही.

पाकिस्तानात जहालमतवादी आणि धर्मांध लोकांची कमी नाही. टीएलपीची धर्मांधता प्रत्येक मुसलमानाच्या भावनांना हात घालणारी आहे. म्हणूनच देशातील हजारो लोक या पक्षाच्या पाठीशी उभे आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या विरोधकांनाही त्यांच्यापुढे माघार घेणे क्रमप्राप्त झाले आहे. खत्म -ए -नबुव्वत आणि नमूस-ए – रीसलात विरुद्ध तौहीन-ए रीसलात हे दोन टीएलपीचे आधारस्तंभ आहेत. पाकिस्तानातील इतर पक्षांच्या तुलनेत टीएलपीने राजकारणात या दोनही मुद्द्यांचा वापर शस्त्रासारखा केला आहे. टीएलपी हा पक्ष बहुसंख्य सुन्नी बरेलवी पंथाचे प्रतिनिधित्व करतो.

सुन्नी बरेलवी हा पंथ त्यांच्या मवाळ आणि सुधारणावादी विचारांसाठी ओळखला जातो. त्यामुळे याला अधिक लोकांचा पाठिंबा आहे. तसेच समाजातील दुर्लक्षित, पीडित लोक ज्यांना पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी लष्कराकडून गेली अनेक दशके धर्मांधतेचा खुराक दिला जात आहे, अशा लोकांचा टीएलपीला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे. बरेलवी पंथातील वाढता उग्रवाद आणि आक्रमकता हे टीएलपीला रस्त्यावर तसेच निवडणुकांमध्ये यश मिळवून देत आहेत. राजकीयदृष्ट्या हे एक प्रकारचे मोलोटोव्ह कॉकटेल आहे.

२०११ साली मुमताझ कादरी या पोलिस रक्षकाने पंजाबचे गवर्नर सलमान तसीर यांची हत्या केली. २०१६ ला कादरीला मिळालेल्या देहदंडाच्या शिक्षेवरून झालेल्या आंदोलनामधून टीएलपीचा जन्म झाला. धर्माभिमानामुळे टीएलपीला मोठा जनाधार मिळाला आहे.

निवडणूक कायदा २०१७ अंतर्गत प्रत्येक उमेदवाराने पैगंबरांच्या वचनाची अंतिमता मान्य करावी या घटनादुरूस्तीवरुन टीएलपीने रावळपिंडी ते इस्लामाबाद हा मुख्य मार्ग अडवला होता. त्यावेळेस टीएलपीला इमरान खान यांच्याकडून खुला पाठिंबा तर आयएसआयकडून गुप्त समर्थन मिळाले होते. पुढे या प्रकरणात झालेल्या न्यायलयीन चौकशीत तत्कालीन नवाझ शरीफ यांचे पाकिस्तान मुस्लिम लीगचे सरकार अस्थिर करण्यासाठी टीएलपी कडून प्रयत्न केले गेले, असे समोर आले होते.

२०१७ च्या ‘फैजाबाद आंदोलनाला’ अनेक प्रसार माध्यमांनी उचलून धरलेले होते. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आसिया बिबी नावाच्या ख्रिश्चन महिलेला धर्माची निंदा केल्याच्या आरोपातून निर्दोष ठरवले त्यावेळेस टीएलपीने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला होता. देशात त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराच्या घटना घडल्या, रस्ते अडवण्यात आले आणि संपूर्ण देश वेठीस धरला गेला होता. सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश आणि लष्कर प्रमुख कमर बाजवा यांना अहमदी असल्यामुळे अनेक धमक्या देण्यात आल्या होत्या.

बाजवा यांच्यासोबत झालेल्या वर्तवणुकीचे तीव्र परिणाम टीएलपी नेत्यांना भोगावे लागले. खादीम रिझवी आणि पीर अफजल कादरी यांच्यावर खटला भरवला गेला आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. काही काळासाठी टीएलपीवर पडदा टाकण्यात आला होता. पण काही महिन्यांनंतर दोन्ही नेत्यांना माफीनामा घेऊन सोडून देण्यात आले. खादीम रिझवी याने पुढील काळात पक्ष बांधणीसाठी प्रयत्न सुरू केले. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर मध्ये रिझवीचा मृत्यू झाला. पाकिस्तानाच्या इतिहासातील सर्वात मोठी अंतयात्रा ही रिझवी याची होती. यावेळेस लष्कराने टीएलपीवर जरी निर्बंध आणले असेल तरी या पक्षाला लोकांचा अफाट पाठिंबा आहे, ही गोष्ट दिसून आली होती.

फ्रान्समध्ये मुहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आले. त्याविरुद्ध गेल्या वर्षी टीएलपीने मोठे आंदोलन केले होते. कराची येथे आयोजित मोर्च्यामध्ये फ्रान्सशी असलेले सर्व राजनैतिक संबंध तोडून टाकावेत आणि फ्रेंच वस्तूंवर बंदी घालावी अशा मागण्या टीएलपीने जनतेसमोर ठेवल्या. ह्या घटनेनंतर फैजाबादमध्ये पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आले. त्यावेळेस आंदोलकांनी तो संपूर्ण भाग वेढला गेला होता.

या आंदोलनापुढे सरकारला झुकावे लागले आणि संसदेच्या परवानगीनंतर फ्रान्सच्या राजदूताला पदावरून दूर करण्याचे सरकारने वचन दिले. हे वचन फ्रेंच वस्तूंनाही लागू आहे असा टीएलपीचा समज झाला. ह्यानंतर दोनच दिवसात खादीम रिझवी याचा मृत्यू झाला. हा मृत्यू नैसर्गिक नसावा अशा पद्धतीच्या अफवा त्यावेळेस उठवल्या गेल्या. अर्थात त्या फार काळ टिकल्या नाहीत. रिझवीचा वारसदार कोण असेल यावरून अनेक वाद निर्माण झाले. पण अंतिमतः त्याचा मुलगा साद रिझवी याच्याकडे पक्षाची सूत्र आली.

खादीम रिझवीनंतर टीएलपी फार काळ टिकणार नाही असे अनेकांचे मत होते. आपल्या वडिलांसारखा जहाल भाषणांसाठी साद प्रसिद्ध नव्हता पण त्याचा एकूण दृष्टीकोन हा जहालमतवादी आणि आक्रमक होता.

फ्रान्समधील व्यंगचित्रांवरून झालेला वाद शमला असे लोकांना वाटत असतानाच सरकारने आधी दिलेले वचन पूर्ण केले नाही तर फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा टीएलपीने इशारा दिला. टीएलपीने सरकारला दिलेल्या मुदतीच्या एक आठवडा आधीच साद याला अटक करण्यात आली आणि सगळीकडे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एका आठवड्यानंतरही हा गोंधळ थांबण्याची चिन्हे नव्हती. टीएलपीच्या नेत्यांना तसेच शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

पोलिस आणि सैन्याशी झालेल्या चकमकीत काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. इतके होऊनही टीएलपी कार्यकर्ते आणि समर्थक माघार घेण्याची चिन्हं दिसत नव्हती. त्यांच्या या आंदोलनामधून पाकिस्तानातील राजकारणी, अधिकारी वर्ग आणि लष्कर हे इस्लाम आणि त्याच्या जोडल्या गेलेल्या भावनांचा आणि श्रद्धेचा वापर करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, पण ज्यावेळेस यामध्ये पैसा खर्च करण्याची वेळ येते तेव्हा मात्र ते यातून अंग काढून घेतात ही त्यांच्या वागण्यातील बाब प्रकर्षाने लोकांसमोर आली. वर वर पाहता याला व्यवहारिकता असे म्हटले जाते पण ही एका प्रकारची दांभिकताच आहे.

इस्लाम व पैगंबरांचा आदर व्हावा आणि त्यात कोणत्याही पद्धतीची हयगय होऊ नये, एवढीच मागणी टीएलपी कार्यकर्ते आणि इतर इस्लाम समर्थकांची होती. त्यात काहीही गैर नव्हते. पण ज्या वेळेस इमरान खान यांनी फ्रान्सविरुद्ध केलेल्या कोणत्याही कारवाईचा फायदा होणार नाही आणि झाला तर आर्थिक विनाश आणि राजनैतिक संबंधांवर ताणच येईल असे वक्तव्य केले त्यावेळेस इस्लामच्या मुद्द्यावर पाकिस्तानी नेत्यांची असलेली भूमिका स्पष्ट झाली. याविरुद्ध इस्लामच्या मुद्द्यावर आम्ही आमची मुलेही कुर्बान करण्यास तयार आहोत अशी भूमिका सामान्य नागरिकांची होती. म्हणजेच पाकिस्तानातील ‘एलिटस’ नी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याची इच्छा दाखवली नाही. तर याउलट हातात काहीही नसताना सामान्य नागरिकांनी त्याग करण्याची तयारी दाखवली.

पाकिस्तानातील सत्ताधारी वर्ग इस्लामच्या मुद्दयाचा वापर राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी करत असतानाच टीएलपी धर्माच्या मुद्दयावर आग्रही आहे आणि म्हणूनच टीएलपीच्या मागे वाढता जनाधार आहे. याचा परिणाम म्हणजे सत्ताधारी तेहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) पक्षाकडून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला. जर टीएलपीने फ्रान्सचा मुद्दा सोडला तर भरपूर पैसा आणि संसदेत जागांचे आमिष सत्ताधार्‍यांकडून दाखवले गेल्याचे एका टीएलपी नेत्याकडून कळले आहे. पण टीएलपी कोणत्याही प्रकारे ह्या आमिषाला बधली नाही.

हे आंदोलन दडपण्यात सरकार अपयशी ठरलेले आहे. टीएलपीवर बंदी लादलेली असतानाही पाकिस्तानचे गृहमंत्री आणि धार्मिक कार्यमंत्री हे टीएलपीच्या नेत्यांशी चर्चा करत असल्याचे वृत्त आहे. सध्या देशातील लष्करामध्ये तणावाचे वातावरण आहे. काही पोलिस आणि सैनिक टीएलपीमध्ये सामील झाल्याचेही वृत्त आहे. पण या वृत्ताची अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही. तसेच काही दहशतवादी गटांनीही टीएलपीशी हात मिळवणी केल्याच्या बातम्या येत आहे. एकूणच परिस्थिती अतिशय बिकट होत चालली आहे.

पाकिस्तानात बंदी असलेल्या तेहरीक-ए-तालिबान या दहशतवादी गटाने टीएलपीला समर्थन दर्शवले आहे. जर टीएलपीने आपल्या मागण्यांसाठी लॉन्ग मार्च काढल्यास त्याला मौलाना फजलूर रेहमान यांच्या जामियत उलेमा इस्लाम तसेच इतर धार्मिक पक्षांकडून पाठिंबा मिळणार आहे. जमात इस्लामी या पक्षाने देशातील परिस्थिती हाताळण्यावरुन इमरान खान सरकारवर ताशेरे ओढले आहेत व टीएलपीच्या मागण्यांना समर्थन दिले आहे. आतापर्यंत पीएमएलएन या विरोधी पक्षाने फक्त सरकारवर टीका केली आहे. अजूनही या पक्षाने टीएलपीला उघड समर्थन दिलेले नाही. पण कदाचित ही परिस्थिती बदलू शकते. विरोधी पक्षात असताना इमरान खान यांनी केलेल्या खटपटी आता त्यांच्यावरच उलटण्याची चिन्हं आहेत.

अर्थात पुढील काही दिवसात सरकार या परिस्थितीवर नियंत्रण मिळवेल. पण गेला आठवडा आणि पुढील काही दिवसात घडणार्‍या घडामोडींमुळे जनरल बाजवा आणि त्यांच्या लष्कराची स्वप्ने धुळीस मिळवली आहेत हे मात्र खरे. पंजाबमधील अपयशामुळे पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांना पदावरून दूर करण्यासाठी लष्कराकडून इमरान खान यांच्यावर दबाव आणला जाईल अशाप्रकारच्या अफवा पसरलेल्या आहेत. जर असे झाले तर इमरान खान यांना मोठा धक्का बसणार आहे. पण हयाहूनही मोठी बाब म्हणजे जर परिस्थिती वेळीच नियंत्रणात आली नाही तर इमरान खान यांना लष्कर पदावरून दूर करेल, अशी हलक्या आवाजात चर्चा होत आहे. असे असले तरी सध्या पाकिस्तानात उद्भवलेल्या परिस्थितीचे मूळ समजून घेण्याचा प्रयत्न कोणीच करताना दिसून येत नाही.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.