Author : Nilesh Bane

Published on Aug 01, 2020 Commentaries 0 Hours ago

लोकमान्यांसह सर्वच थोरामोठ्यांच्या स्मारकांचे राजकारण होऊ देण्यापेक्षा, या स्मृतिस्थळांचे किमान ‘डिजिटल अर्काइव्ह’ तरी करता येईल का, याचा विचार व्हायला हवा.

‘लोकमान्य” आठवणींचे डिजिटल अर्काइव्ह

लोकमान्य टिळकांची आजची स्मृतिशताब्दी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पुरती झाकोळली गेली आहे. ज्या लोकमान्यांच्या अंत्ययात्रेला मुंबईमध्ये अलोट गर्दी झाली, त्या मुंबईत आज सगळीकडे शुकशुकाट आहे. पण, या लॉकडाऊनच्या शांततेत आपण सारे इंटरनेटवरून काम करत आहोत. त्यामुळे टिळकांचा हा स्मृतिजागरही इंटरनेटवरून करण्याचा हा प्रयत्न…

आपल्या देशात पुतळे आणि स्मारके यांचे पुढे काय होते, हे आपण सर्वजणच जाणतो. जगभर फिरताना शेक्सपिअरचे घर, मोझार्टचे घर ही स्मृतिस्थळे हरखून जाणारे आपण, टिळकांनी अखेरचा श्वास घेतला त्या मुंबईतील सरदारगृहांच्या दुरवस्थेमुळे व्यथित मात्र होत नाही. आपण या वास्तुंचे वैभव पुन्हा मिळावे यासाठी आपण लगेच दुरुस्ती हातात घेऊ शकत नाही. पण, किमान इंटरनेटसारख्या माध्यमातून त्यांची आठवण जिवंत ठेवू शकतो. त्यासाठीच नव्या डिजिटल पर्यायांचा विचार करून पाहू.

लोकमान्यांसह सर्वच थोरामोठ्यांची स्मारके हा आपल्याकडे राजकारणाचा विषय ठरतो. आज त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्यापेक्षा या स्मृतिस्थळांचे किमान ‘डिजिटल अर्काइव्ह’ तरी करता येईल का, याचा विचार व्हायला हवा. आज सगळेच डिजिटल होत असताना, या समाजधुरिणांचे कार्यही डिजिटल व्हायला हवे. त्यासाठी जगभर झालेले थ्रीडी मॅपिंग, व्हर्च्युअल टूरसारखे प्रयोग या स्मृतिस्थळांबद्दलही व्हायला हवेत. आज कोरोनामुळे या स्मृतिस्थळांबद्दल अशा नव्या पद्धतीने विचार करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. त्याचा योग्य तो विचार झाला तर आपल्या या लोकनेत्यांचे कार्य जगभरातून कुठूनही अनुभवता येईल.

यासंदर्भात लोकमान्यांच्या मुंबईतील काही स्मृतिस्थळांचा विचार आपण करूयात…

टिळकांचा जन्म रत्नागिरीतला, शिक्षण पुण्यातले आणि नंतर आपल्या ध्येयासाठी ते देशभर आणि जगभर फिरले. हे सारे खरे असले तरी टिळकांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या आणि निर्णायक घटना मुंबईत घडल्या. मग तो आगरकरांसोबतचा डोंगरीचा ऐतिहासिक कारावास असो, मुंबई हायकोर्टातील स्वराज्याची सिंहगर्जना असो, पहिला गणेशोत्सव असो किंवा गांधीटिळक भेट असो… या व अशा अनेक घटनांना ही मुंबापुरी साक्षी होती. एवढेच नाही तर जीवितकार्य संपवून या नरकेसरीने आपला देह ठेवला तो ही या मुंबईच्या मातीवरच.

मुंबईतील लोकमान्यांच्या ज्या स्मृतिस्थळांचे डिजिटल अर्काईव्ह होऊ शकते, त्या जागा आणि घटना कोणत्या असतील, ते पाहुयात. या ठिकाणांचे थ्रीडी मॅपिंग, वर्च्युअल टूर अशा पद्धतीने डॉक्युमेंटेशन झाल्यास, पुढील पिढ्यांसाठी तो महत्त्वाचा दस्तावेज ठरेल.

लोकमान्यांचे डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस

सामाजिक क्रांती घडवायची असेल तर लोकांनी शहाणे व्हायला हवे आणि लोकांना शहाणे करण्यासाठी वृत्तपत्रे हवीत, हे टिळक आगरकर चांगलेच जाणत होते. त्यांचे हे विचार त्यांनी प्रत्यक्षात उतरवले आणि मोठ्या प्रयासाने २ जानेवारी १८८१ ला ‘मराठा’ हे इंग्रजी साप्ताहिक तर ४ जानेवारीला ‘ केसरी’ हे मराठी साप्ताहिक सुरू केले.

पहिल्याच वर्षी केसरीमध्ये ब्रिटिश सरकारविरुद्ध लेख प्रसिद्ध झाले. तसेच कोल्हापूर संस्थानातील कारस्थानेही उघड करण्यात आली. याच कोल्हापूर संस्थानातील कारस्थानाविषयी बनावट पत्रे छापल्याच्या आरोपाखाली टिळक आणि आगरकरांना चार महिन्याचा कारावास आणि एक हजार रुपये दंड सुनावण्यात आला.

दक्षिण मुंबईतल्या डोंगरी येथील तुरुंगात टिळक आणि आगरकरांना ठेवण्यात आले. या तुरुंगवासाचे वर्णन आगरकरांनी आपल्या ‘डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस’ या पुस्तकात केले आहे. वाईट अन्न व अन्य हाल यामुळे या चार महिन्यात टिळकांचे वजन २४ पौंडांनी तर आगरकरांचे १६ पौंडांनी कमी झाले.

तुरुंगात दाखल झाल्यानंतर महिन्याभराने त्यांना लिहिण्यावाचण्याची परवानगी मिळाली. पण या दोन मित्रांचा वेळ मुख्यत्त्वे बोद्धिक चर्चा करण्यातच जाई. २६ ऑक्टोबर १८८२ ला त्यांची सुटका झाली. या सुटकेनंतर लोकांनी त्यांचे सत्कार करून स्वागत केले. यावेळी दोन हजारापेक्षा जास्त लोक उपस्थित होते. यात महात्मा जोतिराव फुले, ‘ दीनबंधू’ चे संपादक नारायण मेघाजी लोखंडे आदी ब्राह्माणेतर समाजातील मंडळीनी पुढाकार घेतला होता.

टिळकांचा राजकीय उदय मुंबईतच!

टिळकांचे राजकीय आयुष्य पाहता ते आधीपासून काँग्रेससोबत असतील असा समज होतो. पण सुरवातीला ते राजकीय वर्तुळाच्या बाहेर राहून समाजसेवेच्या माध्यमातून प्रकाशात आले. १८८५ मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना ही टिळकांच्या त्यावेळच्या शैक्षणिक, सामाजिक चळवळीतील महत्त्वाची घटना म्हणता येईल.

१८८८ मध्ये क्रॉफर्ड भ्रष्टाचार प्रकरणावर टिळकांनी पहिल्यांदा सरकारवर टीका केली. पण टिळक नावाचा राजकीय उदय झाला तो मुंबईतच. १८८९ मध्ये मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या चौथ्या अधिवेशनाला ते हजर होते. त्यांच्या आयुष्यातील हे पहिले अधिवेशन. १९८९ मधील १ सप्टेंबरला त्यांचे पहिले भाषण झाले. यानंतर टिळकांचे नाव राजकीय क्षितिजावर चमकू लागले ते आजपर्यंत कायम आहे.

टाइम्सने माफी मागितली, पण…

जनरल रँडचा २२ जून १८९७ ला खून करून चापेकर बंधू मुंबईत परतले. या खूनाच्या नियोजनात ठरल्याप्रमाणे ते काळबादेवी येथील रामवाडीतील मंदिरात कीर्तनात दंग झाले. रँडवधाच्या या कटात टिळकांचा हात असल्याचे वृत्त तेव्हा मुंबईच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ने आणि लंडनच्या ‘ग्लोब’ या वृत्तपत्राने छापले. हे वृत्त निराधार असल्याचे ठामपणे सांगून टिळकांनी या वृत्तपत्रांवर फिर्याद केली. अखेर या वृत्तपत्रांना माफी मागायला लागली. पण स्वातंत्र्यानंतर उघड झालेल्या पुराव्यांमध्ये हे स्पष्ट झाले की रँडच्या वधाबद्दल टिळकांना आधीपासूनच माहिती होती आणि चापेकर बंधूना या कृतीनंतर आश्रय मिळावा अशी व्यवस्था खुद्ध टिळकांनीच केली होती.

मुंबईतला पहिला गणेशोत्सव आणि टिळक

उत्सवातून लोकसंघटन आणि संघटनेतून सबळीकरण व्हावे म्हणून टिळकांनी गणेशोत्सवाची योजना आखली. यामागे धार्मिक समतोल राखण्यात यश येईल, असे त्याची योजना होती. टिळकांच्या या हाकेला ‘ओ’ देत त्याच वर्षी पुण्यात तीन ठिकाणी आणि मुंबईत गिरगावातल्या केशवजी नाईकांच्या चाळीत गणेशोत्सवाला सुरुवात झाली. उत्सवाला सुरुवात १८९३ मध्ये झाली तरी टिळक केशवजी नाईक चाळीत आले ते २५ ऑगस्ट १९०१ रोजी.

गिरगावकरांनी टिळक महाराजांचे ‘ ना भूतो ना भविष्यति’ असे स्वागत केले . लोकमान्यांची बग्गीमधून मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशामध्ये हजारो टिळकप्रेमी या मिरवणूकीत सहभागी झाले होते. या मिरवणुकीत काही अप्रिय घटना घडू नयेत म्हणून खास फिरंगी सैनिक सुरक्षेसाठी ठेवण्यात आले होते. रस्त्यामध्ये ‘ बळंवतराव चिरायू होवोत’, ‘ टिळक महाराज की जय’ अशा घोषणांचे फलक लावण्यात आले होते.

गिरगावाच्या मुख्य रस्त्यावरून निघालेली ही मिरवणूक मोहन बिल्डिंगजवळ आल्यावर तेथे पुष्पवृष्टी करण्यात आली. नाईकांच्या चाळीत आल्यावर तर बग्गीपासून ते व्यासपीठापर्यंत पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या. गणपतीचे दर्शन झाल्यानंतर व्यासपीठावरून लोकमान्यांचे छोटेखानी भाषण झाले. तसेच त्यावेळी नरहरशास्त्री गोडसे यांचे ‘ गृहस्थाश्रम’ या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर पानसुपारीचा कार्यक्रम होऊन टिळकांना निरोप देण्यात आला होता.

२००१ मध्ये गिरगावकरांनी प्रतीकात्मक मिरवणूक काढून लोकमान्यांच्या त्या ऐतिहासिक गिरगावभेटीच्या आठवणी ताज्या केल्या.

हायकोर्टातील सिंहगर्जना

केसरी व मराठामध्ये घेतलेल्या सरकारविरोधी भूमिकेसाठी आणि ब्रिटिश साम्राज्यविरोधी कारवायांसाठी टिळकांवर राष्ट्रदोहाचा खटला चालविण्यात आला. या खटल्यात टिळकांना सहा वर्षे काळापाण्याची शिक्षा सुनावण्यात आली . ही शिक्षा सुनावल्यानंतर लोकमान्य टिळकांनी त्या हायकोर्टाच्या सेंट्रल हॉलमध्ये केलेले विधान इतिहासाच्या पानांवर कायमचे कोरले गेले.

टिळक म्हणाले, ‘ मला सांगायचे ते इतकंच की, पंचानी जरी वेगळा निर्णय दिला असला तरी मी पूर्णपणे निर्दोष आहे. या न्यायासनाहून महान आणि या चराचर सृष्टीचे नियंत्रण करणाऱ्या अशा काही शक्ती आस्तित्त्वात आहेत, यावर माझा ठाम विश्वास आहे. परमेश्वराची इच्छा असेल तर स्वतंत्र राहण्यापेक्षा या बंदिवासातही माझ्या हातून माझे कार्य पूर्णत्वाकडे जाईल.’

या महान उद्गारांचे आज स्मारक झाले आहे. मुंबई हायकोर्टाच्या ज्या सेंट्रल हॉलमध्ये टिळकांना ही शिक्षा सुनावण्यात आली, त्याच्याबाहेर शिलालेखावर टिळकांचे हे उद्गार कोरून ठेवण्यात आले आहेत. २४ जुलै १९५६ ला मुख्य न्यायमूर्ती एम . सी . छागला यांच्या हस्ते या शिलालेखाचे अनावरण झाले. या सोहळ्यात न्या. छागला यांनी काढलेले उद्गार सूचक आहेत. ते म्हणाले, ‘ याच न्यायालयाने पूर्वी देशभक्त टिळकांना शिक्षा देण्याचे महत्पाप केले आहे. आज हे स्मारक उभारून हे न्यायालय त्याचे प्रायश्चित घेत आहे.’

टिळक दंगे

टिळकांवरील राष्ट्रदोहाच्या खटल्याची सुनावणी मुंबईत सुरू होताच सर्वत्र संतापाचे वादळ उठले. कामगारांनी सार्वत्रिक संपाची घोषणा केली. मुंबईच्या इतिहासातील हा पहिला राजकीय संप. २४ जून १९०८ ला टिळकांना अटक झाली. २३ जुलैला कोर्टात टिळकांना शिक्षा सुनावली गेली आणि बाजारपेठा बंद होऊ लागल्या. मुंबईत अहोरात्र धडधडत असणाऱ्या बहुसंख्य कापडगिरण्या बंद पडल्या. लाखो मजूर रस्त्यावर उतरले. लाठीमार, गोळीबार सुरू झाला. संपाला हिंसक वळण लागले, रस्त्यावर रक्त सांडले. ३० पेक्षा अधिक कामगार ठार आणि शेकडो जण जखमी झाले. आठ दिवस गिरणगाव पेटले होते .

लोकमान्यांविषयीचे लोकांचे प्रेम पाहून गोऱ्या इंग्रजांच्या घाऱ्या डोळ्यात काजवे चमकले. वास्तविक याहून अधिक भयंकर दंगे मुंबईने त्याआधीही पाहिले होते. पण त्या दंग्याने ब्रिटिश साम्राज्याला धोका पोहचला नव्हता. हा संप कोणत्याही आर्थिक लाभासाठी किंवा मागण्यासाठी पुकारलेला नव्हता, तर तो होता राष्ट्रीय असंतोषाचा उदेक. टिळकांना सक्रिय राजकारणातून दूर करण्याचा हा खटल्याचा डाव ब्रिटिशांना चांगलाच महाग पडला. म्हणूनच पोलिसांच्या अधिकृत दप्तरातही या दंग्यांची नोंद ‘ टिळक दंगे ‘ अशीच करण्यात आली.

कामगारांच्या या संपाची दखल कम्युनिस्ट रशियात लेनिनलाही घ्यावी लागली. या संपाबद्दल लेनिनचे हे उद्गार बरेच काही बोलून जातात. ” युरोपातील वर्गविरोधात उभ्या ठाकलेल्या कामगाराला आता आशियाई सहकारी मिळाले आहेत. ही संख्या आता झपाट्याने वाढेल. वर्गविरोधी आंदोलनाचा लढा अधिक समर्थपणे लढण्यास भारतातील श्रमजीवी आता पुरेसे प्रगल्भ झाले असून रशियातील झारप्रमाणेच इंग्रजांच्या दडपशाही पद्धतीही निष्प्रभ ठरल्या आहेत.”

टिळकांचा अपमान आणि त्याचा बदला

पहिले महायुद्ध सुरू झाले आणि सैन्यात नवे जवान भरण्याच्या मोहिमेने वेग पकडला. या नव्या सैन्यभरतीचा टिळकांनी पुरस्कार केला, पण त्यासोबत ‘ होमरूल’ हवे असा आग्रह धरला. त्यावेळचे गव्हर्नर विलिंग्डन याला हे मान्य नव्हते. टिळकांच्या या समर्थनावर त्यांचा विश्वास नव्हता. पण होमरूल चळवळ कामगारांना संघटित करीत होती. त्याच वेळी गिरणीमालक, उद्योगपती, नोकरशहा यांचीही संघटना निर्माण झाली. ही संघटना म्हणजेच महालक्ष्मीचा विलिंग्डन क्लब .

या साऱ्या पार्श्वभूमीवर १० जून १९१८ मध्ये युद्धासंदर्भातील विचारासाठी मुंबईत ‘ प्रांतीय युद्ध परिषद ‘ झाली. या परिषदेत विलिंग्डनने टिळकांना बोलू दिले नाही आणि अपमानास्पद वागणूकही दिली. यासभेला टिळकांसोबत गांधीजीही उपस्थित होते. या अपमानाचा राग म्हणून टिळक , गांधीसह सर्व राष्ट्रवादी नेत्यांनी सभात्याग केला. या अपमानाचा बदला म्हणून मुंबईत आंदोलन पेटले. त्यासाठी मरिन लाइन्स येथे १० ऑगस्ट १९१८ ला काँग्रेसचे खास अधिवेशन बोलावण्यात आले. भारतीय जनतेच्या एकात्मतेचे प्रतीक म्हणून आजही या अधिवेशनाला इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे .

टिळक-गांधी भेट

क्रॉफर्ड माकेर्टसमोरील सरदारगृहात झालेली टिळक गांधी भेट ही भारतीय इतिहासाल्या ‘ दोन युगांची भेट’ होती. १६ जून १९१८ ला गांधीजी टिळकांना भेटायला सरदारगृहात गेले. त्यावेळी या दोन महान नेत्यांनी मनसोक्त वाद घातला. विषय होता महायुद्धात बिटिश सत्तेला मदत करायची की नाही!

गांधीजींच्या मते न्यायबुद्धीवर विश्वास ठेवून हिंदी जनतेने ब्रिटनला मदत करायला हवी. पण भारतात लोकशाही स्थापन करण्याचे अभिवचन मिळाल्याशिवाय सहकार्य नाही, अशी टिळकांची भूमिका होती. हा वाद पुढे, गांधीजी तुम्ही संत आहात हो पण राजकारणात संत नको असतात, अशा टिप्पणीपर्यंत पोहचला. या भेटीच्या वेळी जमनादास द्वारकादास उपस्थित होते. या ऐतिहासिक संवादाचे त्यांनी टिपण तयार केले आणि ते अचूक असल्याचे गांधीजींकडून तपासूनही घेतले.

भारतीय स्वातंत्र्याचा लढा टिळकयुगाकडून गांधीयुगाकडे नेणारी ही भेट होती. यानंतर १९२० मध्ये पुन्हा गांधीजी सिंहगडावर टिळकांना भेटायला गेले. तेव्हा टिळकांनी गांधीजींबद्दल उच्चारलेले वाक्य या विधानाची सार्थकता पटवते. टिळक गांधीजीना म्हणाले होते, ” तुम्हाला जेव्हा इंग्रजांच्या कुटिलनीतीचा अनुभव येईल तेव्हा इंग्रजांचा विरोध करण्यात तुम्ही माझ्याही पुढे जाल.”

लोकमान्यांचा अखेरचा दिवस

१ ऑगस्ट १९२०… ३१ जुलैचे बारा वाजून गेले म्हणून एक ऑगस्ट म्हणायचे एवढेच , पण संध्याकाळपासूनच लोक सरदारगृहाखाली जमू लागले होते… रस्त्यावर मुंगी शिरायलाही जागा नव्हती, साऱ्यांचे लक्ष सरदारगृहाच्या तिसऱ्या माळयाकडे लागलेले… डोईवर धोधो पाऊस कोसळतोय, पण गर्दी काही ढिम्म हलत नव्हती… आठवडाभर हिवतापाने आजारी असलेल्या टिळकांची तब्येत बळावली असून आता पुढे काय होणार याची चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. रात्री १० नंतर तर गर्दी अलोट या शब्दालाही लाजवू लागली… कुठे प्रार्थना, जपमाळ, चर्चा आणि बरेच काही सुरु होते… अखेर १२ वाजून २४ मिनिटांनी जी बातमी येऊ नये म्हणून सारेजण खाली उभे होते ती बातमी तिसऱ्या मजल्यावरून खाली आली आणि जगभर अक्षरश: वाऱ्यासारखी पसरली… टिळक गेले…

त्याच दिवशी गांधीजींनी मुंबईतच असहकाराची घोषणा केली. आचार्य अत्र्यांनी या दिवसाचे वर्णन करताना म्हटले आहे की, ‘ भारतीय इतिहासातील टिळकयुगाचा आणि गांधीयुगाचा हा एक महान संधीकाल आहे.’ देशाच्या राजकीय मंचावरून ज्या दिवशी टिळकांनी एक्झिट घेतली त्याच दिवशी गांधीजीनी खऱ्या अर्थाने एंट्री घेतली होती. स्वातंत्र्याची मशाल पुढील पिढीकडे सोपवून लोकमान्य अनंताकडे निघून गेले.

मुंबईतील सर्वात मोठी अंत्ययात्रा

आज जेथे लोकमान्यांचा पुतळा आहे त्याच सरदारगृहाच्या गॅलरीत, सकाळी सहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. अंत्यदर्शनाला येणाऱ्या माणासांची गर्दी काही केल्या थांबत नव्हती. अखेर दुपारी दोन वाजता अंत्ययात्रा सुरू झाली. शहरात अघोषित बंद होता. तोपर्यंतच्या मुंबईच्या इतिहासातील ती सर्वात मोठी अंत्ययात्रा होती.

सारी दुकाने, व्यवहार बंद होता. रस्ते माणसांनी भरून गेले होते. गिरगाव चौपाटीवर अंत्यविधी होणारे टिळक हे एकमेव नेते. तसेच त्यांचा मृतदेह मुद्दाम सर्वाना दर्शन होईल, असा खुर्चीत बसवून नेण्यात आला. रस्त्याच्या दुतर्फा, गॅलरीमधून, झाडांवर उभे राहून माणसे अंत्यदर्शन घेत होती. अखेर पाच तासानंतर लाखो माणसांसोबत ही अंत्ययात्रा संध्याकाळी सातच्या सुमारास चौपाटीवर पोहचली. तेथे त्या गर्दीत आणखी भर पडली.

जिकडेतिकडे माणसे, माणसे आणि फक्त माणसेच. अशा अलोट गर्दीत टिळकांना अग्नी देण्यात आला आणि लोकमान्य नावाचे चैतन्य इतिहासाच्या पानात विलीन झाले.

टिळकांची समाधी आणि जमिनीत पुरलेली पेटी

गिरगाव चौपाटीवर झालेला टिळकांचा अंत्यविधी ही एक ऐतिहासिक घटना होती. अशा पद्धतीने दहनाची परवानगी प्रथमच देण्यात आली आणि आजवर ती अन्य कोणाला मिळालेली नाही. पण ही परवानगी देताना ब्रिटिश सरकारने तेथे स्मारक उभारायचे नाही अशी अट घातली होती. पण डॉ. एम. बी. वेलकर आणि डॉ. साठे यांनी त्या स्थळाची खूण जपून ठेवली होती.

पुढे मुंबई पालिका भारतीय सभासदांच्या हातात आल्यावर १९२६ मध्ये चौपाटीवर टिळक समाधी बांधण्यास परवानगी देण्यात आली. काकासाहेब खाडिलकरांच्या पुढाकाराने मांडूचे शिल्पकार फडके यांनी टिळकांचा पुतळा तयार केला. १ ऑगस्ट १९३३ रोजी लोकमान्यांच्या या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. योगायोग असा की या दिवशीही तुफान पाऊस पडत होता, पण श्रद्धांजलीसाठी आलेली गर्दी मात्र तशीच वाढत राहिली.

या समाधीबद्दल अनेकांना माहित नसलेली गोष्ट म्हणजे, पुतळ्याच्या चबुतऱ्याखाली ३० फूट आतमध्ये एक हवाबंद पेटी पुरून ठेवण्यात आली आहे. त्यात टिळकांची पगडी, अंगरखा, उपरणे, जोडे, केळकरकृत टिळक चरित्र व गीतारहस्य ठेवण्यात आले आहे.

तिकिट लावून झालेली टिळकांची पहिली पुण्यतिथी

१ ऑगस्ट १९२१ ला टिळकांची पहिली पुण्यतिथी फोर्टमधील एक्सलसियर थिएटरमध्ये साजरी करण्यात आली, तीसुद्धा तिकीट लावून. पहिल्या रांगेतील तिकिटाची किंमत पंचवीस रुपये होती. त्याकाळात २५ रुपयांचे मोल खूप मोठे होते, तरीही थिएटरमधली एकही खुर्ची रिकामी नव्हती. मुख्य म्हणजे या समारंभाचे अध्यक्षस्थान गांधीजींनी भुषवले. या कार्यक्रमातून जमलेला निधी टिळक स्वराज्य फंडाला देण्यात आला.

समारोप

लोकमान्यांच्या या अशा अनेक आठवणी जशा मुंबईत आहेत. तशा त्या देशभर आणि जगभरही आहेत. या साऱ्या आठवणींचे डिजिटल अर्काईव्ह होणे ही काळाची गरज आहे. लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त हे जरी साध्य झाले, तरी लोकमान्यांना आपण यथायोग्य आदरांजली वाहिली, असे म्हणता येईल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.