Published on Sep 25, 2020 Commentaries 0 Hours ago

जागतिक व्यापाराचा नवा केंद्रबिंदू म्हणून विकसित होत असलेल्या भारतीय उपखंडात सर्वांनाच शांतता हवी आहे. त्यासाठीच भारताची ‘नेबरहूड पॉलिसी’ सशक्त असायला हवी.

भारताचा शेजार’धर्म’!

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी पाकिस्तानात जाऊन १९९९ मध्ये एक ऐतिहासिक वाक्य उच्चारले होते. ते म्हणाले होती की, ‘तुम्ही मित्र बदलू शकता पण शेजारी नाही, इतिहास बदलू शकता पण भूगोल नाही.’ आज भारताच्या ‘नेबरहूड पॉलिसी’बद्दल बोलताना हे वाक्य कुणीही आणि कधीही विसरू नये, एवढे हे महत्त्वाचे वाक्य आहे. सरसकट पाकिस्तानला ‘पाकडे’ आणि चीनला ‘चिंकी’ अशी हडतूड करणारे सगळेच जण अटलजींचे ते वाक्य विसरत असतात. हे वाक्य विसरणे म्हणजे आपणच आपले अस्तित्व नाकारल्यासारखे आहे. जर याच शेजाऱ्यांसोबत आपल्याला गुण्यागोविंद्याने नांदायचे असेल, ते शेजारी आणि आपला त्यांच्यासोबतचा शेजारधर्म आपल्याला आधी नीट कळायला हवा.

‘शेजारधर्म’ या शब्दात शेजार आणि धर्म असे दोन शब्द आहेत. शेजारी आपण बदलू शकत नाही, हे आपण वर पाहिलेच. आता या शेजाऱ्यांशी वागायचा ‘धर्म’ कसा ठरवायचा? (हा शेजारधर्म म्हणजेच आपली नेबरहूड पॉलिसी) ‘धर्म’ या शब्दाबद्दल आधीच आपला गोंधळ आहे. ‘धारयति इति धर्मः’ अशी उत्पत्ती संस्कृतमध्ये धर्माची केलेली आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, ‘ज्या संकल्पना आपण धरून ठेवल्या आहेत त्या’ म्हणजे धर्म. अजून सोपे करून समजून घ्यायचे तर, आपल्या शेजाऱ्यांबद्दलच्या धारणा काय आहेत किंवा त्यांच्याबद्दल आपल्याला काय वाटते, त्यावर आपले त्यांच्याशी असलेले वागणे ठरत असते. जर आपल्याला शिकवलेच हे जात असेल की, पाकिस्तान आपला शत्रू आहे, तर त्या पाकिस्तानबद्दल आपण कसा सारासार विचार करणार?

एकदा स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार वगैरे म्हणणारे एक खर्डे वक्ते एके ठिकाणी मोठ्या राष्ट्रवादी त्वेषाने बोलले की, हा पाकिस्तान नाही पापस्थान आहे. मी हे वाक्य ऐकून विचारात पडलो. ज्या हिंदू धर्माची पताका खांद्यावर घेऊन हे स्वतःला सनातनी वगैरे म्हणवतात, त्याच हिंदू धर्माचे आधार असलेल्या वैदिक ग्रंथांची, संस्कृत व्याकरणाची निर्मिती पाकिस्तानमध्ये झाली. जेथे सर्वात आधी मंत्रघोष निनादले तो भाग पापस्थान कसा? एवढेच नव्हे तर भारतीय संस्कृतीची मुळे ज्या हडप्पा-मोहेंजोदरोत सापडतात, ते आज पाकिस्तान आहे. फक्त ७० वर्षांपूर्वी दोन भावांचे भांडण झाले आणि दोघांनी जमिनीवर कुंपण घातले म्हणून एकेकाळची आपली माती आज पापस्थान कशी होते? 

प्रश्न फक्त पाकिस्तानचा नाही. प्रश्न एकंदरीतच शेजारी देशांबद्दल आपल्या मनात भरलेल्या विविध मतांचा आहे. स्वतःच्या राजकिय स्वार्थापोटी ही मते असे स्वतःला विद्वान म्हणवणारे आपल्या डोक्यात भरतात. आपणही या विद्वानांचे ऐकतो आणि त्यांच्या ओ मध्ये ओ मिसळतो. आपल्या इतिहासाबद्दल त्याच्या रचनेबद्दल त्याच्या भविष्याबद्दल वाचन, चिंतन करण्याकडे आपण सारेच टाळाटाळ करतो. सर्व बाजूंचे वाचून स्वतःचे मत बनविण्याऐवजी, केवळ आपल्या विचारधारेच्या मतांचा पुरस्कार करण्याची वाईट सवय आपल्याला लागली आहे. ‘नेबरहूड पॉलिसी’ किंवा शेजारधर्म समजून घ्यायचा असेल तर आधी स्वतःच्या भूमिकांनाच प्रश्न विचारण्यापासून सुरूवात करावी लागेल.

आपल्या या असल्या पूर्वग्रहदुषित बुद्धीचे परिणाम आता दिसू लागले आहेत. नेपाळ आणि बांगलादेश हे त्यांचे उत्तम उदाहण आहे. या दोन्ही देशांबद्दल कायमच आपली भावना हे ‘भारतावर अवलंबून असलेले देश’ अशीच राहिली आहे. नेपाळला एकीकडे एकमेव हिंदुराष्ट्र म्हणून लोकांपुढे आणायचे आणि दुसरीकडे नेपाळच्या साऱ्या नाड्या आपल्याच हाती कशा आहेत, याच्या वल्गना करायच्या. बांगलादेशबाबतही तेच. बांगलादेशचा जन्मच आमच्यामुळे झालाय अशी भाषणे करायची आणि दुसरीकडे त्याच बांगलादेशाला बदनाम करायचे. साधारणतः या जनमताच्या प्रभावामुळे हे दोन्ही शेजारी देश आज चीनच्या जवळ जाऊ लागले आहेत.

नेपाळबद्दलच्या या अशा भूमिकांमुळे आज नेपाळशी असलेले भारताचे संबंधदेखील आधीसारखे सौहार्दयुक्त नसल्याचे दिसून येते आहे. यापाठी चीनच्या प्रभावही आहे आणि दुसरीकडे नेपाळमधील अंतर्गत राजकीय स्थित्यंतरेही आहेत. पण या साऱ्यासोबत नेपाळबद्दलची आपली भूमिकाही तेवढीच कारणीभूत आहे. नेपाळ आणि  बिहार या भारतीय राज्यातील सीमावर्ती भागातील वैवाहिक संबंधांतून निर्माण झालेले अनुबंध आता भारतविरोधी  भूमिका आणि त्यातून जन्मलेल्या राष्ट्रवादी अस्मितांच्या कचाट्यात सापडताना दिसत आहेत. त्यामुळे भारतीय सैन्यात असलेल्या गोरखा बटालियनमध्ये नेपाळचे शूर गोरखा जवान आता भारतीय सैन्यात जाऊ न देण्याची, त्यातही चीनसोबतच्या चकमकीत न उतरवण्याची मागणी नेपाळ मधल्या काही राजकीय गटांनी सुरू केली आहे.  

बांगलादेश या देशाची निर्मितीच मुळात भारताने केली. त्याविषयीच्या राजकारण आणि युद्धाच्या कहाण्या अनेक ठिकाणी, अनेक कार्यक्रमांतून प्रसारित केल्या जातात. या देशाच्या  निर्मितीनंतर काही महिन्यांतच मुजिब उर रहमान यांची हत्या झाली आणि त्यानिमित्ताने तिथल्या भारतविरोधी गटाने तोंड वर काढल्याची चिन्हे समोर आली. आज तिथला धार्मिक मूलतत्त्ववादही वाढीला लागला आहे, तर दुसरीकडे त्यांचे राष्ट्रीय उत्पन्न, शिक्षणाचा दर, दारिद्र्य निर्मूलन या बाबतीत झालेली प्रगती लक्षणीय आहे. त्यांचे भारतासोबत असलेले बिघडलेले असले तरी चीनचा प्रभाव शिरकाव करताना हळूहळू दिसू लागला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातला सीमाप्रश्न, पाण्याचा प्रश्न  अजूनही प्रलंबित राहिला आहे. हे सारे प्रश्न उद्या भारताच्या गळ्यातला खडा ठरू शकतात.

पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश असो, तसेच श्रीलंका, मालदिव, अफगाणिस्तान असो या साऱ्या शेजारी राष्ट्रांबद्दलची एकंदरीत आपली समज वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. ही समज वाढविण्याची गरज जेवढी धोरणकर्त्यांना आहे, त्यापेक्षा अधिक येथील जनमानसालाही आहे. कारण, याच जनमानसातून उद्याचे धोरणकर्ते ठरतात. त्यासाठीच आपल्याकडील शिक्षणसंस्था, वैचारिक संस्था या साऱ्यांनी या शेजारी राष्ट्रांबद्दल जाणून घेतले पाहिजे. शक्य तेवढे निरपेक्षपणे त्याचे आकलन करून, ते सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहचविले पाहिजे. त्यासाठीच आम्ही या शेजारी देशांची नवी ओळख करून देण्याचा प्रयत्न या मालिकेतून करत आहोत.

शेजारी देशांशी असलेलेले आपले हे अपरिहार्य नाते पाहता, दक्षिण आशियायी देशांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांतील गुंतागुंत आपल्याला दिसून येते. हे संबंध दक्षिण आशियायी भूभागासंदर्भात असले तरी त्यांची व्याप्ती मात्र जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अंगाने समजून घ्यावी लागते, कारण हे संबंध जागतिक राजकारणाला ढवळून काढण्याची क्षमता ठेवतात. या आणि अशा अनेक कारणांमुळे जबाबदार, सजग नागरिक म्हणून आपण आपल्या भवतालची  ओळख करून घेणे अतिशय अगत्याचे ठरते. 

भारतीय समाजात, त्यातही विशेषकरून मध्यमवर्गीय वर्तुळात उपखंडातील राजकारणाची चर्चा बांगलादेश,  पाकिस्तानात वाढणारा धार्मिक मूलतत्त्ववाद किंवा भारतात मुख्य सत्ताधारी राजकीय पक्ष व त्याची धर्माधिष्ठित राजकारणाची नीती इत्यादी अंगाने अधिक होत असल्याचे दिसून येते. सर्वसाधारण जनतेच्या आकलनानुसार दक्षिण आशियायी राजकारणातील संघर्षाचे मूळ कारण मुख्य दोन देशांतील धर्माधिष्ठित राजकारण, त्यातून उदयाला आलेला राष्ट्रवाद आणि स्वातंत्र्योत्तर संघर्षांचा इतिहास याभोवती केंद्रित झालेला दिसून येतो. मात्र वास्तव मात्र तितके संकुचित नाही. 

खरेतर दक्षिण आशिया हा जगाचाच एक छोटा भाग. हे लक्षात घेत, दक्षिण आशियायी भूप्रदेशाचे महत्त्व, उर्वरित जगाशी या भूभागातील व्यवस्थांचे असलेले वेगवेगळ्या स्तरांवरील संबंध, एकूण जगाच्या समाजकारण, राजकारणाच्या, अर्थकारणाच्या दृष्टीने या भागाचे औचित्य लक्षात घेणे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने कायमच अतिशय महत्त्वाचे मानले गेल्याचे इतिहासकाळापासून दिसून आले आहे. 

‘भारताचा शेजार’धर्म’’ या लेखमालेद्वारे आपण उपखंडातील मुख्य देश, त्यांचे अंतर्गत राजकीय इतिहास व राजकीय धारणा समजून घेऊ. या देशांचे भूराजकीयदृष्ट्या असलेले महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने त्यांचे उपखंडातील आणि जगातील महत्त्व यावर भाष्य करू. या सर्वाहून महत्त्वाचे मुद्दा म्हणजे हे सारे देश एकाच भूभागाचे भाग असल्याने यामध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. अनेक गोष्टी या ‘आमच्या’ किंवा ‘त्यांच्या’ नसून त्या ‘आपल्या’ आहेत. विद्यापीठीय भाषेत ज्याला आम्ही ‘शेअर्ड पास्ट’ किंवा ‘सामायिक भूतकाळ’ म्हणतो तो आजही आपल्या जगण्याचा भाग आहे. हे आपण समजून घेतले तर भविष्यातील नाते अधिक ‘जगणेबल’ असेल.

काहीही झाले तरी भारतीय उपखंडात शांतता असावी, हे सर्वच देशांना हवे आहे. जगातील व्यापाराचा नवा केंद्रबिंदू म्हणून विकसित होत असलेल्या या भूभागात शांतता हवी असेल, तर एकमेकांबद्दलची द्वेषभावना किमान पातळीवर येणे आवश्यक आहे. त्यासाठी किमान हे देश समजून घेणे महत्त्वाचे आहे. जर हे देश आपल्याला कळलेच नाहीत, तर त्यांच्याबद्दल आपल्याला काय वाटते हे बदलणार नाही, आपल्या धारणा बदलणार नाही, आपला शेजारधर्म बदलणार नाही. जर आपल्याला सशक्त ‘नेबरहूड पॉलिसी’ हवी असेल, तर आपल्याला हे देश कळणे अत्यंत आवश्यक आहेत.

भारताने जागतिकीकरण स्वीकारून आज जवळपास तीन दशके होऊन गेली. जागतिकीकरणासोबत  बाजारपेठ व्यवस्थांतून मिळणारे फायदेतोटे आज इथल्या समाजाने भोगले आहेत. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उपखंडातील मध्यम आणि निम्नवर्गातील माणूसही स्वतःच्या गुणवत्तेच्या व मेहनतीच्या जोरावर आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सुस्थित होताना दिसतो आहे. एकीकडे ग्रीनकार्ड, विदेशी नागरिकत्व याची क्रेझ असलेल्या दक्षिण आशियायी नागरिकांच्या विदेशात राहात असताना तिथल्या नागरिकत्वाची आस धरताना स्वतःच्या मूळ राष्ट्राशी राखायचे असलेले इमान वेगवेगळ्या राजकीय उपक्रमांतूनदेखील दिसून येऊ लागले आहे. 

जागतिकीकरणाच्या रेट्यात दोन गोष्टी ठळक दिसून येऊ लागलेल्या दिसतात, त्या म्हणजे विकसित राज्यांत आणि देशात जाण्याची ओढ स्थानिक राष्ट्रीय अस्मिता, अभिमान. राष्ट्रराज्य किंवा संघराज्यव्यवस्था स्वीकारल्यावर त्यातून आकाराला येणारी राजकीय, सामाजिक वास्तवे आणि संरचना यांविषयीच्या साचेबद्धतेचा आग्रह जगभरात होताना दिसतो आहे. राजकीय सत्ता आर्थिकदृष्ट्या उजव्या म्हणवल्या जाणाऱ्या पक्षांच्या ताब्यात असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांत अधिक वाढली. धार्मिक उजवेपणदेखील वाढीला लागल्याचा सूर एकीकडून वाढतो आहे तर त्या मताला विरोध करणाऱ्या गटाचा दुसरा सूरदेखील तितकाच किंवा त्याहून जास्त तीव्र होताना दिसतो आहे. अशावेळी नेमक्या या व्यवस्थांच्या वर्तमान चौकटीमध्ये दक्षिण आशियायी भूभागातील समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण यांकडे बघण्याच्या दृष्टीचे आयाम वारंवार तपासणे औचित्याचे होणार आहे.

साधनसंपत्तीसंदर्भातील व्यवहार आणि मनुष्यबळाची गरज किंवा मुबलकता हा एकुणात संबंध जगातील आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा महत्वाचा भाग राहिला आहे. भौगोलिक सान्निध्य,  साधनसंपत्ती आणि मनुष्यबळ या तत्त्वांमुळे  झालेल्या स्थलांतरांमुळे ब्रिटिशकालीन दक्षिण आशियामध्ये असलेल्या संवादात आज येतात त्यासारखे राजकीय अडथळे तुलनेने कमी येत. ब्रिटिशांच्या जाण्यानंतर बनलेल्या राष्ट्रीय सीमा व त्यातून येणाऱ्या मर्यादा यांची अपरिहार्यता कमी करण्यासाठी SAARC सारख्या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. मात्र भूभागातील राजकीय घडामोडींतील उलथापालथीमुळे या संघटनेच्या कामात अनेक अडथळे निर्माण झाले. 

अगदी अलीकडे चीनसारख्या बलशाली आणि विस्तारवादी  रोखण्यासाठी BIMSTEC या संघटनेद्वारे आग्नेय आशियातील देशांना एकत्र आणून त्यांची फळी उभारण्याची योजना यशस्वीरीत्या आकाराला येऊन कार्यान्वित झाली आहे. आंतरराष्ट्रीय  राजकारण  आणि त्याचे प्रादेशिक  अनुबंध यांचा दुवा  राजकीय  व्यवस्थांद्वारे  घडवलेल्या  SAARC किंवा  BIMSTEC सारख्या  आस्थापनांतून जोडला जातो  हे  एका  दृश्य  मर्यादेपर्यंत निश्चितच खरे असले तरी स्थानिक  राजकारण, समाजकारण आणि  संस्कृतिकारण हे घटक अनेकदा  धोरणनिश्चिती  करणाऱ्या वर्गाकडून दुर्लक्षिले जातात. 

जागतिक  बाजार आणि अर्थकारणाचा प्रभाव या साऱ्या घटकांना घटकांवर पडत असला तरी, स्थानिक स्तरावरील  घडामोडींचे थेट परिणाम भारतीय उपखंडातील राजकारणावर होत  असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासातील रूढ संकेतांनी सूचित केलेल्या व्यवस्थांसोबतच स्थानिक राजकारण, संस्कृतिकारणाचे पदरदेखील ऐतिहासिक आणि वर्तमान संदर्भात बघणेही गरजेचे आहे हे आता मान्य करावे लागणार आहे.    

दक्षिण आशियाचे राजकारणाचा धोरणनिश्चितीच्या दृष्टीने विचार होताना तेलवाहू पाईपलाईन, आंतरराष्ट्रीय सीमा,  संरक्षणखर्च, सागरी भागातील सत्ता, व्यापारी धोरणे आणि व्यवहार या अंगाने अधिक विषय हाताळणी होते. एकूण आंतरराष्ट्रीय व्यवहारांना व्यवहारांमधील सध्याचे प्रवाह आणि त्या प्रवाहांची दिशा ठरवणारे राजकीय, निमराजकीय विचारमंच यांची कार्यप्रणाली ही या घटकांच्या अर्थकारण राजकारणपर प्रवाहांभोवती केंद्रित असते, आणि त्यावर जगभरातील बिझिनेस लॉबीचा प्रभाव आणि पकड असते असा आरोप अनेकदा केला जातो. 

त्यातला तथ्यांश लक्षात घेतला तरीही या अर्थकारण आणि राजकारणातील भल्याबुऱ्या गोष्टींची जबाबदारी सर्वस्वी अशा व्यापारी समूहांवर, राज्यकर्त्या समूहावर ढकलणे अनुचित ठरेल. अशावेळी  सामाजिक, राजकीय, आर्थिक बाबींविषयीचे आकलन, धोरण आणि त्याविषयीची वैयक्तिक आणि सामूहिक भूमिका तपासणे, त्यानुसार व्यापक, सौहार्दकेंद्री जनमताचा रेटा तयार करणे ही सामान्य  जनतेची जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरते. 

(‘’भारताचा शेजारधर्म’’ या लेखमालेतील हा पहिला भाग आहे.)

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Hemant Rajopadhye

Hemant Rajopadhye

Hemant Rajopadhye was a Senior Fellow and Head of ORF Mumbais Centre for the Study of Indian Knowledge Traditions. His research focuses on what the ...

Read More +