Author : Rasheed Kidwai

Published on Dec 11, 2019 Commentaries 0 Hours ago

इस्लामोफोबियाच्या लाटेमुळे भारतातील मदरसे मुख्य प्रवाहापासून बाजूला फेकले जात आहेत. मदराशांमुळे दहशतवाद वाढतो आहे, हा शिक्का पुसण्याची नितांत गरज आहे.

मदरशांना गरज काळानुरूप बदलाची

“इस्लामोफोबियाच्या काळातील मदरसे” (Madrasas in the Age of Islamophobia) या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक झिया उस सलाम आणि डॉ. एम अस्लम परवेझ या लेखकद्वयींनी या पुस्तकात, भारतात इस्लामिक शिक्षणाचे धडे देणारे मदरसे कशा आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहेत आणि त्यांना मोठ्याप्रमाणात सुधारणा आणि अधुनिकीकारणाची कशी गरज आहे,  या अत्यंत विवादास्पद मुद्द्याला हात घातला आहे.

इस्लामोफोबियाच्या लाटेमुळे एकतर भारतातील मदरसे मुख्य प्रवाहापासून बाजूला फेकले जात आहेत. त्यात मदरशातून शिकून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थांवर दहशतवादाचा आरोप होत असल्याने या संस्था जास्तच दुरावल्या जात आहेत. मदराशांमुळे दहशतवाद वाढतो आहे, हा शिक्का पुसण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन नुकत्याच प्रकाशित झालेल्या एक पुस्तकाद्वारे करण्यात आले आहे. अशा प्रकारचा शिक्का देशातील मुस्लिम शाळांना अडचणीत आणत असल्याबाबतही या पुस्तकातून ताशेरे ओढण्यात आले आहेत.

उदाहरणादाखल, आपण अब्दुल वाहिद याचीच गोष्ट घेऊ, ज्याच्यावर मुंबईतील रेल्वेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचा आरोप होता. पण, तब्बल नऊ वर्षानंतर त्याची या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. किंवा त्याआधीच्या सलमान फारसीचे उदाहरण घ्या. ज्याचा कथित मालेगांव स्फोटामध्ये हात असल्याचे म्हंटले जात होते. पण, तब्बल आठ वर्षानंतर जेंव्हा तो निर्दोष सुटला तेंव्हा त्याला कसलाच आधार उरला नव्हता. एक उच्चविद्याविभूषित डॉक्टर पण, आपल्या गरजा भागवण्यासाठी त्याच्यावर शेळ्या पाळण्याची वेळ आली. अशा प्रकारचे परिणाम आपण सहज पणे टाळू शकलो असतो.

आपल्या देशातील प्रसारमाध्यमांवर, प्रत्येक आरोपीला दहशतवादी संबोधण्याऐवजी किमान त्याच्यावरील गुन्हा सिद्ध होईपर्यंत तरी, त्याला आरोपी म्हणूनच संबोधण्याची सक्ती केली पाहिजे. ज्यामुळे ते कोणीतरी गुन्हा सिद्ध झालेले आरोपीच आहेत, अशा पद्धतीने त्यांच्या प्रतिमांवर शिंतोडे उडवण्यापासून त्यांना परावृत्त केले पाहिजे. अर्थात, अनेक उपायांपैकी हा देखील एक उपायच झाला. संपूर्ण वस्तुस्थिती तपासण्यासाठी प्रसारमाध्यमातील व्यक्तींनी स्वतःच निवड करून एखाद्या इस्लामिक विद्यालयाला भेट द्यावी, म्हणजे त्यांच्या हे लक्षात येईल की, मदरसे हे शस्त्रास्त्र किंवा दारुगोळा साठवण्याची केंद्रे नाहीत आणि तिथे विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही, अशी सूचना सहलेखक झिया उस सलाम यांनी केली आहे.

मदरशांच्या संपूर्ण अभ्यासक्रमाची सखोल तपासणी केल्यानंतर, लेखक म्हणतात की, फिक (इस्लामिक न्यायशास्त्र) सारख्या पुस्तकावर अवलंबून राहिल्याने त्यांची शैली, भाषा आणि त्यातील उदाहरणे देखील काळाच्या ओघात मागे पडली आहेत. “हा अभ्यासक्रम चर्चा आणि वादविवादाऐवजी शत्रूत्वाच्या भावनेवर जास्त भर देतो. यामुळे माहितीपूर्ण वादविवादाऐवजी असंतोष वाढतो. यातील बऱ्याच टीका ज्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात, त्या खऱ्या तर टिकेवरील टीका आहेत! ज्या विद्यार्थ्यांमधील उत्सुकतेला खतपाणी घालण्यासाठी, नक्कीच फारशा उपयुक्त नाहीत,” असे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. परंतु, दक्षिण भारतात आणि त्यातही विशेषतः केरळ आणि पूर्व बंगाल मध्ये काही सन्माननीय अपवाद आहेत जिथे गणित, इंग्लिश आणि विज्ञान हे विषय देखील मदरशांमधून शिकवले जातात.

देशभरातील हजारो मदरशांचा सखोल अभ्यास केल्यानंतर झिया आणि परवेझ यांनी अशी खंत व्यक्त केली आहे की, मदरशांतून बाहेर पडणारे विद्यार्थी हे बाहेरच्या जगाबद्दल अगदीच अनभिज्ञ असतात. “विज्ञानाच्या क्षेत्रात भरीव योगदान देणारा हा समाज आज अंधानुकरण आणि परंपरेला चिकटून राहिलेला आहे,” असा निष्कर्ष त्यांनी या पुस्तकांतून मांडला आहे.

अनेक मदरशांमध्ये शाफी, मालिकी किंवा हंबाली सारख्या इतर महत्वपूर्ण विद्याशाखांनी इस्लामचा जो अर्थ लावला आहे, तो शिकवण्याऐवजी फक्त हनाफीची शिकवण शिकवली जाते. “जवळपास सगळ्याच सुन्नी मदरशांमध्ये सुमारे ३०० वर्षापूर्वीच्या दर्स-ए-निझामीचे अनुसरण केले जाते. अगदी मोजक्या ठिकाणी आधुनिक काळाशी सुसंगत असे बदल केलेले दिसून येतात. एकेकाळी काही शिया लोक देखील हीच चूक करत होते.  पण शिया पद्धतीच्या शिक्षण प्रणाली मध्ये तथाकथित भौतिक समजल्या जाणाऱ्या विषयांवर देखील अधिकाधिक भर दिला जात आहे, असे म्हणण्यास थोडाफार अवकाश आहे,” लेखकांची ही मते, हेच दर्शवतात की कशाप्रकारे काही मदरशांमधून तरुणांना इस्लामचे शिक्षण न देता इस्लामच्या विवेचानाची शिकवण दिली जाते.

“भारतासारख्या देशातील अल्पसंख्य समुदायातील एखाद्या व्यक्तीला या सगळ्या बाकीच्या पंथांचे ज्ञान घेण्याची काहीही आवश्यकता नाही, असे ग्राह्य धरण्यात आलेले आहे. किंवा हे म्हणजे असे आहे की, इस्लामचा फक्त त्यांनीच लावलेला अर्थ बरोबर असून इतरांनी लावलेले अर्थ हे दिशाभूल करणारे आहेत.” झिया आणि परवेझ यांच्या मते हे कुरआनच्या मार्गदर्शनाच्या अगदी उलटे आहे जे, इतर धर्मातील श्रद्धांना गौण लेखण्यास नकार देते.

काही अभ्यासकांच्या हे लक्षात आले आहे की, अनेक मदरशांतील २०१९ किंवा २०२० मधील अभ्यासक्रम हा अगदी सहजरित्या १९२० किंवा १८७० च्या काळातील मदरशांच्या अभ्यासक्रमाद्वारे बदलला जाऊ शकतो. “या सगळ्या घडामोडीत एक सातत्य राहिले आहे जे कुरआनच्या संदेशाचा अनादर करते. हा पवित्रग्रंथ मानवजातीला विचार करण्याचे, संशोधन करण्याचे आणि आत्मचिंतन करण्याची शिकवण देतो. परंतु, मदरसे मात्र विद्यार्थ्यांना कुरआनवरच लक्ष केंद्रित करून ते मुखोद्गत करण्याची शिकवण देतात आणि त्याबाबत कोणताही प्रश्न विचारण्याची अनुमती मात्र देत नाहीत. जरी कोणी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तर त्याला बंडखोरी मानली जाते; विद्यार्थ्याने फक्त त्यांच्या नियमांशी बांधील राहण्याची अपेक्षा केली जाते.”

आपल्या समजुतीप्रमाणे शिक्षण ही एक उत्क्रांतीची प्रक्रिया आहे. परंतु, भारतीय मदरशे अजूनही काळासोबत पुढे आलेले नाहीत. अनेक मदरशांमध्ये कुरआनवरील टीका पाहत असताना १४ व्या शतकातील इब्न काथीरच्या ग्रंथांचाच आधार घेतला जातो. त्यांच्या दृष्टीने २०व्या शतकातील अबुल हसन आली नादवी (आली मियान किंवा अला मौदुदी या नावानेही ओळखले जातात), डॉ. इसरार एहमद आणि वाहिदुद्दिन खान यांच्या साहित्याला काहीही अर्थ नाही. “भारतीय मदरशांच्या निश्चल जगतात विद्यार्थ्यांनी ओळींवर बोट ठेऊन, डोक्यावर टोपी घालून कुरआन वाचावे आणि त्याचे पाठांतर करावे एवढीच अपेक्षा केली जाते, ज्यामुळे त्यातील थोडासा अर्थ आत पर्यंत पोचतो, इथे कुरआनमधील एकाही सुरहचा नीट अर्थ देखील माहित नसलेल्या हाफिज-ए-कुरआनचे पठण केले जाते, यात कसलेच आश्चर्य नाही,”  यावरही लेखकांनी प्रकाशझोत टाकला आहे.

लेखकांच्या मते, १२व्या शतकापर्यंत अनेक मुस्लिम समाजाने वैज्ञानिक शिक्षण, संशोधन आणि शोध यात अग्रभागी राहून अनेक तत्वज्ञ, गणितज्ञ, वैद्य आणि इतिहासतज्ज्ञ निर्माण केले, ज्यांचे ज्ञान प्रायोगिक पद्धतीवर आधारलेले होते आणि आजही आधुनिक विज्ञानाचा तो एक अविभाज्य भाग आहे. याउलट, आज भारतातील बहुसंख्य मदरसे मात्र विद्यार्थ्यांना कम्प्युटर आणि इंटरनेटची सुविधा देखील पुरवत नाहीत.

भारतातील बहुसंख्य मदरशांना भेडसावणारी आणखी एक प्रमुख समस्या म्हणजे निधी. अनेक इस्लामिक शाळा या देणगीतून जमा होणाऱ्या पैशावर अवलंबून आहेत. अगदी कडक उन्हाळा आणि कडाक्याच्या थंडीच्या दिवसांतही अनेक निवासीशाळांतील विद्यार्थी हे जमिनीवरच झोपतात. अनेक शाळातून, जिथे ४० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान असते तिथे ४० पेक्षा जास्त विद्यार्थी हे समोर पवित्र ग्रंथ ठेवून त्यावर ओणवे होऊन वाचत बसलेले असतात आणि  उन्हाच्या गरम झळांपासून थोडासा दिलासा म्हणून फक्त दोन पातीचे दोन पंखे त्यांच्या डोक्यावर गरगरत असतात. थंडीच्या दिवासांत एक फाटकी रग विद्यार्थ्यांना दिली जाते, जी स्वच्छ धुवून जमिनीवर अंथरण्यास सांगितली जाते. रात्रीदेखील विद्यार्थी याच रगवर एकामागे एक असे एका ओळीत झोपी जातात. या निवासीशाळांमधून खाजगी किंवा वैयक्तिक आयुष्य या संकल्पनेची जाणीव देखील या विद्यार्थ्यांना होत नाही. मदरशांमधून शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे गरीब कुटुंबातून आलेले असतात.

अनेक मदरशे अधिकृतरित्या नोंदणी न करताच चालवले जातात, अगदी ज्यांची कागदपत्रे योग्य आहेत आणि ज्यांचा इतिहास देखील अगदी हेवा करण्याजोगा आहे, असे मदरसे देखील एका विशिष्ट वळणावर पोचले आहेत. झिया आणि परवेझ यांच्या मते, सध्या मदरशांतून शिक्षण घेतलेल्या मुस्लिमांची संख्या ही फक्त एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या चार टक्के इतकी आहे.

याबबत सरकारची भूमिका आणि हस्तक्षेप अधिक निर्णायक ठरणारा आहे, कारण मदरशांतून शिकून बाहेर पडलेल्या पदवीधर तरुणांना नोकरी मिळत नाही, त्यामुळे मदरशांतून बाहेर पडून पुन्हा मदरसा सुरु करणे किंवा कुठल्यातरी मशिदीत इमाम किंवा मुईझ्झीन (दिवसातून पाचवेळा श्रद्धेने नमाझ पाढणारी व्यक्ती)  म्हणून  काम करण्यापलीकडे त्यांना दुसरा पर्याय उपलब्ध नसतो. मदरशांना देखील प्रशिक्षित शिक्षक, पुस्तके, इंटरनेट आणि कम्प्युटर उपलब्ध करून दिल्यास ते देखील आधुनिक बनतील आणि मुख्यप्रवाहात सामील होतील.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.