Published on Jun 09, 2020 Commentaries 0 Hours ago

कोव्हिड-१९च्या पहिल्या रुग्णाची जेव्हा नोंद झाली, तेव्हापासून या विषाणूच्या फैलावास मुस्लिम समाजच सर्वाधिक कारणीभूत आहे, ही गैरसमजूत पसरविण्यात आली.

कोरोना आणि ब्रिटनमधील इस्लामोफोबिया

मुस्लिमांविरोधातील पूर्वग्रह ही ब्रिटनमधील कायमच मोठी समस्या राहिली आहे. परंतु कोरोनाच्या साथीत ती कमी होण्याऐवजी वाढतच गेली आहे. अशा बिकट काळातही लोक कडव्या आणि अवमानास्पद विचारांचा प्रसार करत आहेत. अशा परिस्थितीत एका विशिष्ट गटाविरोधात अविश्वास रुजविण्यापासून, तसेच हिंसक घटनांपासून समाजाचा बचाव करणे हे आत्यंतिक आवश्यक आहे. यामुळे एकंदरितच सार्वजनिक आरोग्याला धोका पोहोचू शकतो. कोरोनाच्या साथीच्या फैलावादरम्यान काही संदिग्ध कट-कारस्थानांची गृहितके पसरली गेली, की त्यामुळे मुस्लिम जगताविषयी असहिष्णुता आणि भेदभाव वाढीस लागला.

गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे कोव्हिड-१९च्या पहिल्या रुग्णाची जेव्हा नोंद झाली, तेव्हापासून विषाणूच्या फैलावास मुस्लिम समाजच सर्वाधिक कारणीभूत आहे, ही गैरसमजूत सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात पसरविण्यात आली. जेव्हा निर्बंध कमी होतील, तेव्हा ही समजूत म्हणजे समाजाला झालेला जणू एक आजारच असेल. या समजुतीमुळे सामाजिक अस्थिरता निर्माण होईल. त्याचप्रमाणे अशा गृहितकांमधील अनेकांचा पुरस्कार ब्रिटनमधील अतिउजव्या विचारसरणीच्या गटांनी पसरवला आहे.

मुस्लिम नागरिक सुरक्षित वावराचे नियम धुडकावत आहेत आणि विषाणूचा फैलाव करीत आहेत, असे त्यांना वाटत आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिमांविरोधात हेतुपुरस्सर गैरसमज पसरविण्याची जणू एक लाटच आली. मुस्लिमांच्या सणांचे दिवस असल्याने विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असे दावे केले जाऊ लागले.

बर्मिंगहॅम सिटी विद्यापीठातील प्राध्यापक इम्रान अवान आणि रुक्साना खान-विल्यम्स यांनी अलीकडेच केलेल्या अभ्यासानुसार, कोव्हिड-१९ या आजाराचा फैलाव करण्यासाठी मुस्लिमांना जबाबदार धरणारी, मुस्लिमांविषयी भीती निर्माण करणारी ऑनलाइन ‘सायबर हब’ द्वेषमूलक मिम्स आणि खोट्या बातम्यांचा वापर करीत आहेत. खोट्या बातम्यांचा उद्रेक आणि सोशल मीडियावर प्रसृत होणारा मजकूर यांमुळे अतिउजव्या विचारसरणीच्या गटांकडून यापूर्वी पसरविण्यात आलेल्या मुस्लिमविरोधी मिथकांना अधिक बळ मिळाले आहे. एकीकडे जग साथरोगाशी सामना करीत आहे आणि दुसरीकडे विषाणू जेवढ्या वेगाने फैलावत आहे, जवळजवळ तेवढ्याच वेगाने विषाणूसंबंधीचा द्वेषमूलक मजकूर इंटरनेटवरून पसरत आहे.

रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिमांचे सण असल्यामुळे विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला, असे गृहितक मांडून मुस्लिमांविरोधात विद्वेषक मजकूर पसरविण्यात आला. ‘कोरोना विषाणूचा फैलाव होण्यास मुस्लिमच जबाबदार आहेत, कारण विषाणू चीननंतर थेट अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनीसारख्या ख्रिश्चनधर्मीय देशांमध्येच गेला,’ असे सांगणाऱ्या अपमानास्पद ऑनलाइन पोस्ट विद्वेषी मजकूर पसरवत राहिल्या. विषाणूंपासून मुक्तता मिळवण्यासाठी सर्व मशिदींचा विध्वंस करा, असे विखारी आवाहन करणाऱ्या पोस्टही फिरत होत्या.

अतिउजव्यांचा मुस्लिमविरोधी पूर्वग्रह

मुस्लिम हा समाजातील परजीवी घटक आहे, परका, कोणत्यातरी दुसऱ्याच ग्रहावरून आलेला, जणू रोगच, या अतिउजव्या तत्त्वांनी रंगविलेल्या धारणेत भर घालणाऱ्या ‘विषाणूच्या फैलावास इस्लाम आणि मुस्लिमच जबाबदार आहेत,’ या मतावर ब्रिटनमधील अतिउजवे एकत्र आले आहेत. याचबरोबर प्रसिद्ध व्यक्तींकडून कट्टर उजव्या विचारसरणीची वक्तव्ये केली जात असल्याने, मुस्लिम समाजाचे आणखी नुकसान होत आहे. ‘इंग्लिश डिफेन्स लीग’चे संस्थापक आणि माजी प्रमुख टॉमी रॉबिन्सन यांनी एक जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात लॉकडाऊनदरम्यान बर्मिंगहॅममधील काही भाविक एका मशिदीतून बाहेर पडत आहेत, असे दिसत आहेत. नंतर न्यायविषयक विभागाने या व्हिडीओसंबंधी अविश्वास दर्शवून, तो सोशल मीडियावरून काढून टाकला. अशा प्रकारचे मुस्लिमविरोधी पूर्वग्रह असलेले विचार इंटरनेटवरून पसरवले जात असल्याने दर्शकांचे मत प्रतिकूल बनते आहे. अलीकडील काळात वाचक पूर्वीपेक्षाही मोठ्या संख्येने ऑनलाइन वृत्तांकडे आणि वादाकडे वळले गेले आहेत.

ट्विटरवरील एका वापरकर्त्याने असाच एक बनावट व्हिडिओ अपलोड केला होता. लंडनमधील विंम्बली सेंट्रलमध्ये मुस्लिम समुदाय नमाज पठण करीत आहे; परंतु सुरक्षित वावराचा नियम त्यांच्याकडून कसा पाळला जात नाही, असा दावा या व्हिडिओतून करण्यात आला होता. याच ट्विटर अकाउंटवर टोकाच्या मुस्लिम विरोधी कडव्या भावना पसरविल्या गेल्या. ‘इस्लामने आपले भविष्य धोक्यात आणले आहे आणि हा धर्म आपला देश नष्ट करून टाकेल,’ असे या अकाउंटवर लिहिण्यात आले आहे. ब्रिटनमधील मुस्लिमविरोधी घटनांच्या नोंदी ठेवणाऱ्या आणि अशा घटनांचे मूल्यमापन करणाऱ्या ‘टेल मामा’ या आंतरराष्ट्रीय गटाने या आणि कोव्हिड-१९च्या संकटकाळात प्रसिद्ध करण्यात आलेल्या, अशाच प्रकारच्या दाव्यांचा बुरखा फाडला आहे.

या पार्श्वभूमीवर, मुस्लिम समाजाने एकत्र येण्यासाठी अधिक प्रयत्न करायला हवेतच, शिवाय मुस्लिम श्रद्धेच्या नावाखाली ब्रिटन आणि जगातील अन्य देशांमध्ये सुरू असलेल्या घटनांची जबाबदारीही एकत्रितरीत्या स्वीकारायला हवी.

अतिउजव्या विचारसरणीच्या गटातील प्रसिद्ध केटी हॉपकिन्सन यांनी अलीकडेच एक ट्विट केले आहे. त्या म्हणतात, ‘सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करणाऱ्या मुस्लिमांवर भारतामध्ये जसे करण्यात आले, तसे ब्रिटनमध्येही करावे.’ ब्रिटनमधील विषाणूच्या फैलावापासून ते दहशतवादापर्यंत सर्वच समस्यांना ब्रिटिश मुस्लिमांना जबाबदार धरणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या कट्टरवादाची ही उदाहरणे आहेत. अशा गोष्टींना इंटरनेटवर किती वेगाने प्रतिध्वनी लाभतो. समाजाच्या मुख्य प्रवाहात किती गतीने पसरण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते!

इंटरनेटवरून प्रसिद्ध होणारी अशी माहिती खोटी आणि धोकादायक असतेच, शिवाय ती मुस्लिम समुदायाकडून राष्ट्रीय कार्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना उद्ध्वस्त करत असते. या समुदायातील कितीतरी जण संकटग्रस्तांच्या मदतीसाठी प्रत्यक्षात लढत आहेत, कितीतरी मुस्लिम डॉक्टरांनी त्यांचे जीव गमावले आहेत. या गोष्टी लोकांपर्यंत न पोहचवता, मुस्लिमद्वेष मात्र सर्वदूर पोहचवला जात आहे.

बाहेरून येणाऱ्यांची भीती

ब्रिटिश समाजाला प्रमुख धोका आहे, तो मुस्लिमांचा, असे नेहमी मानण्यात येते. अन्य वंशभेदी गटांकडून ज्या पद्धतीने मुस्लिमांचे चित्र रंगविण्यात येते, तसेच चित्र प्रसारमाध्यमांकडूनही रंगविले जाते. मुस्लिम समाज हा एकसंध असभ्य समाज आहे असे सांगत, मुस्लिमांचे सरसकटीकरण केले जाते. त्यांना दहशतवादी किंवा इस्लामिक कट्टरवादी ठरवले जाते. यामुळे, हेच मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले जाण्याचे मूलभूत कारण ठरते. मुस्लिम हे काहीही करून स्थानिक नागरिकांवर कुरघोडी करीत आहेत, स्थानिकांची जागा घेण्यासाठी आक्रमण करीत आहे, या समजाला खतपाणी घातले जात आहे. मुस्लिम कुठेही असले, तरी काहीतरी समस्या निर्माण करतातच, असा एक सर्वसामान्य दृष्टिकोन एकूण समाजात आहे.

ब्रिटनमध्ये याआधीच मुस्लिमविरोधी पूर्वग्रह आहे. अगदी साथरोगानेही मुस्लिमांविरोधात द्वेषमूलक आणि अवमानास्पद भावना पसरविणे रोखून समाजाला एकत्र आणण्यास मदत केलेली नाही, हे दुर्देवी आहे. हाच विचार या लेखाचा गाभा आहे. या अन्यायकारक मुस्लिमविरोधी विचारांमागे एक कारण असेही असू शकते, ते म्हणजे मुस्लिमविरोधक स्थलांतराकडे आणि बहुसांस्कृतिकतेकडे चुकीच्या दृष्टीने पाहतात. त्यांचे हे विचार, विषाणूच्या फैलावासाठी जागतिकीकरणास आणि स्थलांतरास जबाबदार धरणाऱ्या अतिउजव्या विचारांच्या गटांनी व्यक्त केलेल्या दृष्टिकोनालाच आणखी पुढे नेतात.

आपल्या राजकीय लाभासाठी समाजात इस्लामविषयक भीती निर्माण करण्याची इच्छा मुख्य प्रवाहातील राजकारण्यांनाही आहे. मुस्लिम अल्पसंख्य आणि इस्लाम हा पाश्चिमात्य धर्मनिरपेक्ष लोकशाहीला वेळोवेळी धोकाच आहेत, अशी मुख्य प्रवाहातील राजकारण्यांची धारणा आहे, हे याचे दर्शक आहे. खरे तर या समाजाला अल्पसंख्य असे संबोधणे, हे बहुसांस्कृतिकता आणि एकसंधतेलाच असलेला धोका आहे.

मुस्लिमांची संख्या मुस्लिमेतरांपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे, असा एक समज सर्वत्र पसरलेला आहे. या वाढीमुळे एक दिवस मुस्लिम समाज ब्रिटिश कायद्याच्या जागी शरीयत आणू पाहील, असे समजले जाते. या समजाला आणखी खतपाणी घालून मुस्लिम लोकसंख्या इतक्या वेगाने वाढत आहे, की एक दिवस ते ब्रिटिशांच्या संख्येपेक्षाही अधिक होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अतिउजवे गट याला ‘वंश स्थापना’ संबोधत आहेत.

रमजानच्या महिन्यात मुस्लिम नागरिक कायद्याचा भंग करत आहेत, असे आरोप करण्यात येत असल्यामुळे लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुस्लिम समाजाविरोधात हिंसाचार उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अल्पसंख्य आदिवासी समाज हा देशातील धोक्यात आलेली संस्कृती व राजकीय मूल्ये आहे, असे दाखविण्याची प्रसारमाध्यमांची व्यापक परंपरा आहे; तसेच ब्रिटनसह जगाच्या विविध भागांत गौरेतर समाजाच्या स्थलांतरामुळे ‘सांस्कृतिक संघर्षा’संबंधीच्या वादाला नव्याने तोंड फुटले आहे. प्रसारमाध्यमे आणि इंटरनेट कंपन्यांकडून या वाढत्या समस्या हाताळल्या जायला हव्यात; तसेच समाजाचे ऐक्य सर्वाधिक महत्त्वाचे असण्याची गरज असलेल्या सध्याच्या काळात सामाजिक विभाजन होईल, अशा पोस्टवर नियंत्रण आणणेही जरुरीचे आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.