Author : Sushant Sareen

Published on Sep 06, 2021 Commentaries 0 Hours ago

तालिबानशी संबंध हे आंतरराष्ट्रीय पातळीवर आतापर्यंत अमान्य होते, पण ‘आयएसकेपी’विरोधात तालिबानशी हातमिळवणी सुरू झाली आहे.

तालिबान आणि ‘आयएसकेपी’ वेगळे नाही

काबूल विमानतळावरील जीवघेण्या आत्मघातकी हल्ल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष तालिबान आणि अल कायदावरून इस्लामिक स्टेट खोरासन प्रोव्हीन्स (आयएसकेपी) या दहशतवादी संघटनेवर स्थिर झाले आहे. ‘आयएसकेपी’ने घडवून आलेल्या हल्ल्यांच्या मीडिया कव्हरेजमुळे अफगाणिस्तानमध्ये तालिबानची मजबूत झालेली पकड हा कळीचा मुद्दा राहिलेला नसून, ‘आयएसकेपी’ची उपस्थिती अधिक धोकादायक आहे, हे दिसून येत आहे.

तालिबान आणि पाकिस्तान हे चांगले आहे, त्यांना सर्वांनी मदत करायला हवी, हे दोन्ही घटक जागतिक सुरक्षेसमोरील आव्हाने नसून ‘आयएसकेपी’चे संकट अधिक जीवघेणे आहे, हे लोकांच्या मनावर बिंबवले जात आहे. किंबहुना असे आत्मघातकी हल्ले घडवून आणणार्‍या सूत्रधारालाही हेच हवे आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ‘आयएसकेपी’ला तालिबानचा कट्टर विरोधक म्हणून जाहीर केले आहे.

या घटनांमुळे ‘चांगले तालिबान आणि वाईट आयएसकेपी’ अशी काहीशी संकल्पना रुळायला मदत होते आहे. अमेरिकन लष्कराचा तालिबानवर इतका विश्वास, श्रद्धा आणि आत्मविश्वास आहे की त्यांनी अत्यंत संवेदनशील माहितीही तालिबानला सुपूर्द केली आहे. ‘आयएसकेपी’ला लक्ष्य करण्यासाठी तालिबानला अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने माहिती पुरवल्याची चर्चा आहे.

तालिबानी राजवटीसोबत समन्वय आणि सहकार शक्य आहे हे दाखवण्यासाठी, ‘आयएसकेपी’ची निर्मिती झाली आहे असे दिसून येते. पण ‘आयएसकेपी’ किती धोकादायक आहे ? जागतिक किंवा स्थानिक पातळीवर ( किंवा अफगाणिस्तान – पाकिस्तानच्या बाहेर) या गटाचे अस्तित्व काय आहे ? हा एक स्थानिक दहशतवादी गट आहे का ? या गटाचे इतर आंतरराष्ट्रीय संबंध आहेत का ? केवळ आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचे बिरुद लावून स्वतःचे स्थान भक्कम करण्याचा हा ‘आयएसकेपी’चा प्रयत्न आहे का ? अफपाक क्षेत्राबाहेर दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची या गटामध्ये क्षमता आहे का ? असे साधे प्रश्नही कोणी विचारण्याची तसदी घेत नाहीत.

साऊथ आशिया टेररिझम पोर्टल (एसएटीपी) च्या नुसार ‘आयएसकेपी’ने आतापर्यंत तीन मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. जलालाबादमधील टीव्ही स्टेशनवरील हल्ल्यात ३ महिला कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला, मे मध्ये काबूलमधील शिया इमामबरगा मधील हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू झाला आणि काबूल विमानतळावरील हल्ला या तीन हल्ल्यांचा समावेश आहे. खरेतर या गटाने न घडवलेल्या हल्ल्यांचीही जबाबदारी घेतलेली आहे. पण या पार्श्वभूमीवर काबूल मधील मुलींच्या शाळेवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी ‘आयएसकेपी’ने स्वीकारलेली नाही. गेल्यावर्षी ‘आयएसकेपी’ने ७ मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. ह्यातील बहुतेक हल्ले स्त्रिया, मुली, वृद्ध, शाळकरी मुले यांच्यावर झाले आहेत.

२०१८ मध्ये ‘आयएसकेपी’ १३० दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. तर २०२१ मध्ये पहिल्या आठ महिन्यात फक्त मुलींच्या शाळेवरील हल्ला लक्षात घेतल्यास फक्त ४ हल्ले ‘आयएसकेपी’ने घडवून आणले आहेत. २०१८ ते २०२१ या काळात ‘आयएसकेपी’च्या कामामध्ये विस्कळीतपणा आला आहे तसेच त्याची ताकदही लक्षणीयरित्या घटली आहे. यूएनएससीने तयार केलेला अहवाल एसएटीपीच्या अहवालापेक्षा काहीसा वेगळा आहे. असे असले तरीही दोन्ही अहवालातील निष्कर्ष हा काहीसा सारखा आहे.

यूएनएससीच्या अहवालानुसार, २०१८च्या उन्हाळ्यातील जोजनमधील सततच्या लष्करी हल्ल्यांपासून ‘आयएसकेपी’चा दबदबा कमी झालेला दिसून आला आहे. खरेतर गेल्या दोन वर्षांपासून ‘आयएसकेपी’ला तालिबान, अफगाणिस्तान सरकार आणि अमेरिकन लष्कराने पद्धतशीररित्या लक्ष केले आहे. अनेकदा या तीनही घटकांमध्ये ‘आयएसकेपी’च्या विरोधात युती झाल्याचेही दिसून आले आहे.

यूएन अहवालानुसार ‘आयएसकेपी’कडे जवळपास १५००-२२०० दहशतवादी आहेत. समान विचारसरणी असणारे अनेक लोक आणि लहान गट यांनी एकत्र येऊन हा दहशतवादी गट बनलेला आहे. असे असले तरी तालिबान आणि इतर जिहादी गटांसाठी हा गट चुंबक ठरू शकतो म्हणून या गटाला त्या अहवालात ‘सक्रिय आणि धोकादायक’ असे म्हटले आहे. हे सगळे असले तरी या गटाला नेस्तनाबुत करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांनी एकत्र येऊन पैसे आणि शस्त्रास्त्रांच्या स्वरुपात तालिबानला मदत करावी असे म्हणणे काहीसे अतिशयोक्तीचे ठरणार आहे.

अर्थात याचा अर्थ असा नाही की ‘आयएसके’पी कोणत्याही प्रकारचा हल्ला घडवून आणू शकत नाही. कदाचित अफगाणिस्तानमधील एखाद दोन प्रांत आणि काही जिल्हे ‘आयएसकेपी’ काबीज करू शकते. हयापलीकडे जाऊन काहीतरी मोठे घडवून आणणे किंवा दहशत माजवण्याची ‘आयएसकेपी’ची क्षमता नाही.

तालिबानने आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘आयएसकेपी’चे अस्तित्व आणि त्यापासून असलेला धोका मान्य करणे, ही एकच उल्लेखनीय बाब ‘आयएसकेपी’बाबत झाली आहे. ‘आयएसकेपी’च्या धमकीमुळे रशिया, चीन, इराण, मध्य आशियाई देश आणि पाश्चिमात्य राष्ट्रे यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्याची नामी संधी तालिबानसमोर चालत आली आहे. जर या दहशतवादी गटाच्या उदयामागे हा हेतू असेल तर तो साध्य झाला आहे.

तालिबानशी कोणतेही संबंध जोडणे आंतरराष्ट्रीय पातळीवर आतापर्यंत अमान्य होते पण ‘आयएसकेपी’ला नेस्तनाबूत करण्यासाठी आता ही राष्ट्रे तालिबानशी हात मिळवणी करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. ‘आयएसकेपी’च्या तुलनेत तालिबान ही अधिक धोकादायक दहशतवादी संघटना आहे. तसेच पाकिस्तानी आणि अफगाणी दहशतवाद्यांची भरती असलेली तालिबान ही संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा धोका निर्माण करू शकते, हे अगदी सोयिस्कररित्या ही राष्ट्रे विसरली आहेत असे दिसते.

‘आयएसकेपी’ आणि इतर अनेक दहशतवादी गट (‘आयएसकेपी’ने ज्या दहशतवादी गटांना चिरडून टाकले आहे अशा गटांचेही) यांचे आयएसआय ह्या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी असलेले संबंध सर्वज्ञात आहेत. दशकभराच्या अनुभवानंतर विविध दहशतवादी गट यांच्यातील संघर्ष आणि विरोधाभासांचा वापर पाकिस्तानच्या सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणासाठी कसा करून घ्यायचा हे ‘आयएसआय’ला नेमके कळले आहे.

एका गटाला दुसर्‍या गटाविरुद्ध भडकवणे, एका गटाची ढाल करून दुसर्‍या गटाला वाचवणे, एका गटाकडून मिळणारा लाभ मिळवण्यासाठी दुसर्‍या गटाचे महत्व वाढवणे, दोन शत्रू गटांना एकमेकांविरुद्ध उभे करणे किंवा त्यांच्यात समेट घडवून आणणे आणि पुन्हा त्यांना एकमेकांसमोर लढाईसाठी उभे करणे ही गोष्ट आयएसआयला पक्की जमलेली आहे. मुळात तालिबान विरुद्ध ‘आयएसकेपी’ हा मुद्द्याचाच उगम पाकिस्तानातून झालेला आहे.

अफगाणिस्तान व पाकिस्तानातील दहशतवादी गटांचा अभ्यास करताना काही मुलभूत गोष्टींकडे लक्ष दिले जात नाही. उदाहरणार्थ, आयएसआयचाच भाग असलेल्या हक्कानी नेटवर्क हे आयएसआयचा शत्रू असलेल्या तहरीक-ई-तालिबान पाकिस्तानचा शत्रूच असेल किंवा अफगाण तालिबानला पाठिंबा देणार्‍या पाकिस्तानचा ‘आयएसकेपी’शी कोणताही संबंध नसेल असे गृहीत धरले जात आहे.

वास्तविक पाहता हक्कानी नेटवर्क हा तालिबानचा अविभाज्य भाग आहेच आणि त्यासोबत टीटीपी, अल कायदा आणि ‘आयएसकेपीशी’ही हक्कानीचे जवळचे संबंध आहेत. या सर्व दहशतवादी गटांमधील तसेच हे दहशतवादी गट आणि आयएसआय यांच्यातील हक्कानी हा मोठा दुवा आहे. अनेकदा एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले गट संधी मिळताच एकमेकांना सहकार्य करण्यासाठीही तयार असतात. तालिबान आणि ‘आयएसकेपी’ने जॉइंट ऑपरेशन केल्याची अनेक उदाहरणे आहेत. तसेच दोन्ही गट एकमेकांविरुद्ध उभे राहिल्याचीही उदाहरणे आहेत.

२०१४ मध्ये टीटीपी मधील काही कमांडर्सनी मुल्लाह फझ्लुल्लाह पासून वेगळे होऊन अबु बक्र अल बगदादीला पाठिंबा दिला. ह्या घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या गेल्या होत्या. हकीमुल्ला महसूदनंतर आलेल्या मुल्लाह फजलूल्लाह याच्यासोबत अनेक कमांडर्सचे मतभेद झाले. फझलूल्लाह हा मुल्लाह ओमर (त्यावेळेस ओमर याचा मृत्यू झाला होता फक्त ही बाब कोणालाही माहीत नव्हती) याच्याशी एकनिष्ठ राहिला. मूळ गटापासून फुटलेल्या लोकांसाठी ‘आयएस’मध्ये भरती होणे हा अगदी सोपा मार्ग होता.

२०१४ जूनमध्ये टीटीपीविरुद्ध उत्तर वजीरीस्थानमध्ये मोठी लष्करी कारवाई करण्यात आली तिथूनच ही फुट झाली असे म्हटले जाते. टीटीपीची ताकद कमी करणे आणि पाकिस्तानच्या उंबरठ्यावर असलेले युद्ध पुन्हा अफगाणिस्तानात ढकलणे हा यामागचा मूळ उद्देश होता, असे दिसून येते. ‘आयएसकेपी’चा माजी नेता अब्दुल रहीम मुस्लिमदोस्त याच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानामध्ये असलेले दहशतवादी सीमेपल्याड परतवण्यासाठी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेने हे घडवून आणले आहे.

वास्तविक काहीही घडलेले असो, पण ‘आयएसकेपी’ आणि ‘आयएसआय’ मधील दुवा म्हणून हक्कानी नेटवर्क काम करत असल्याचा दाट संशय अनेक अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. अफगाणिस्तानाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष अमृल्लाह सालेह यांनी ‘आयएसकेपी’ हा ‘आयएसआय’चा समर्थक असल्याचा आरोप केलेला आहे. दोन वर्षांपूर्वीच्या मुलाखतीमध्ये सालेह यांनी हे स्पष्ट केले होते की ‘आयएसकेपी’च्या अटक केलेल्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानकडून पैसे आणि प्रशिक्षण मिळाल्याचे मान्य केले आहे. ‘आयएसकेपी’चे लोक सतत पाकिस्तानच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी उघड केले आहे.

२०१७ मध्ये ‘आयएसआय’शी झालेल्या डीलनुसार पाकिस्तानी दहशतवादी अस्लम फारुकी याला ‘आयएसकेपी’चा प्रमुख बनवण्यात आले आहे, असे अॅंटोओ जीस्टोझ्झी यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. ‘आयएसआय’शी संबंधित नेत्याची नियुक्ती आणि पाकिस्तान सरकारवरील हल्ले थांबवण्याच्या बदल्यात ‘आयएसकेपी’ला पाकिस्तानातील सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये प्रवेश दिला जाईल असे ते डील होते. या डीलसाठी हक्कानी नेटवर्कने लॉब्बिंग केल्याचे समोर आले आहे. पण फारूकीच्या नियुक्तीमुळे ‘आयएसकेपी’मध्ये फुट पडली. गेल्यावर्षीच्या अहवालानुसार ‘आयएसकेपी’चा ताबा मिळवण्याचा प्रयत्न हक्कानी नेटवर्ककडून करण्यात आला होता, हे समोर आले आहे. पण याला काही गटांकडून मोठ्याप्रमाणावर विरोध करण्यात आला.

तालिबान चळवळीत महत्त्वाची भूमिका असलेल्या हक्कानी नेटवर्कचे ‘आयएसकेपी’शी जवळचे संबंध आहेत. ‘आयएसकेपी’ने काबूलमध्ये घडवून आणलेल्या अनेक हल्ल्यांमध्ये हक्कानी नेटवर्कचा सहभाग होता. त्यातील अनेक हल्ले हक्कानी नेटवर्कनेच घडवून आणले होते. यूएनएससीच्या २०२०च्या अहवालानुसार, काबूलमध्ये जीवघेणे हल्ले घडवून आणण्याची ‘आयएसकेपी’ची क्षमता नाही. त्यामुळे हे हल्ले हक्कानी नेटवर्कने घडवून आणल्याची शक्यता सर्वात दाट आहे.

शीख गुरुद्वारावरील हल्ल्यानंतर मे महिन्यात अफगाणी गुप्तचर यंत्रणेकडून हक्कानी आणि ‘आयएसकेपी’च्या महत्वाच्या केंद्राचा पर्दाफाश करण्यात आला होता. अशाप्रकारच्या संयुक्त हल्ल्यांमध्ये दोन कट्टर शत्रूंनी एकत्र येणे ही काही साधी गोष्ट नाही. पाकीस्तानातही अशाप्रकारे एकाच हल्ल्याची जबाबदारी अनेक संघटनांनी घेतली होती. खरेतर ह्या हल्ल्यांमध्ये या सर्वच संघटनांनी भाग घेतला होता त्यामुळे त्यांनी त्याची जबाबदारी घेणे रास्तच मानायला हवे.

एका गटाने हल्ला करून दुसर्‍या गटाने त्याची जबाबदारी घेतल्याच्याही घटना अनेकदा घडलेल्या आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यामागे स्पष्टपणे लश्कर ए तोयबा किंवा जैश ए मोहम्मदचा हात असला तरी त्याची जबाबदारी हिजबूल मुजाहिद्दीनने घेतल्याची उदाहरणे आहेत. असाच काहीसा प्रकार अफगाणिस्तानात घडून आल्याचे यूएनएससीच्या अहवालावरून स्पष्ट होते. या अहवालात असे म्हटले आहे की काही हल्ल्यांची जबाबदारी तालिबानने न घेता आयएसआयएल -के ने घेतली आहे. अर्थात हे हल्ले हक्कानी नेटवर्ककडून घडवून आणले गेले आहेत की इतर कोणासोबत संयुक्तरित्या हल्ले करण्यात आले आहे ते अजूनही अस्पष्ट आहे.

‘आयएसकेपी’ हा आता नव्याने उदयाला आलेला राक्षस आहे आणि त्यामुळे तालिबानचे अनेक गुन्हे माफ करण्यात आले आहेत. ‘आयएसकेपी’वरील पकड घट्ट करण्यासाठी तालिबान आणि हक्कानी नेटवर्क या दोन वेगळ्या संघटना आहेत असे सांगण्यापर्यंत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांची मजल गेली आहे. तालिबान्यांनी जेव्हा अफगाणिस्तानातील तुरुंग उघडले तेव्हा ‘आयएसकेपी’चे अनेक दहशतवादी पळून गेले असल्याचे आणि त्यांची तालिबानमध्ये भरती होण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त आहे. आयएसकेपीच्या अनेक नेत्यांची हत्या झाली आहे. यात खोरासान विलायतचे गव्हर्नर अबू उमर खोरासानी यांचा समावेश आहे. ‘आयएसकेपी’च्या कार्यकर्त्यांना तालिबानमध्ये सामील होण्यासाठी एक संधी दिली जात आहे. जर त्यांनी ही संधी गमावली तर त्यांचीही अशाचप्रकारे हत्या केली जाणार आहे.

तालिबानला ‘आयएसकेपी’शी लढण्यासाठी पैसा, साहित्य आणि अधिकार देण्याआधी अमेरिका आणि तिच्या मित्रराष्ट्रांनी विचार करायला हवा. तालिबान अंगिकार करत असलेल्या गोष्टी तालिबानवर शेकणे गरजेचे आहे. ‘आयएसकेपी’ प्रमाणे तालिबानने हजारो लोकांचे जीव घेतलेले आहेत हे विसरता कामा नये. तालिबान ‘आयएसकेपी’पेक्षा काही वेगळा नाही. अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतल्याचा फायदा उठवून ‘आयएसकेपी’ने डोके वर काढले आहे. जर असे असेल तर तालिबानला स्वतःच संसाधनांचा वापर करून ‘आयएसकेपी’चा सामना करू द्यावा. यामुळे तालिबान अडकून पडेल, इतर गोष्टींकडे पाहण्याची त्याला उसंत मिळणार नाही आणि असे विष पसरण्यावर पण निर्बंध लागेल.

आता अफगाणिस्तानातून अमेरिकेने माघार घेतली आहे या पार्श्वभूमीवर तालिबानचे समर्थक असलेल्या पाकिस्तान, रशिया, चीन आणि इराण याराष्ट्रांनी आता या परिस्थितीचा सामना करावा आणि त्याचे परिणामही भोगावेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Sushant Sareen

Sushant Sareen

Sushant Sareen is Senior Fellow at Observer Research Foundation. His published works include: Balochistan: Forgotten War, Forsaken People (Monograph, 2017) Corridor Calculus: China-Pakistan Economic Corridor & China’s comprador   ...

Read More +