Author : Ayjaz Wani

Expert Speak Raisina Debates
Published on May 10, 2024 Updated 0 Hours ago

या क्षेत्रातील एक बडी भू-आर्थिक सत्ता होण्यासाठी आणि दक्षिण कॉकेशसशी संबंध सुधारण्यासाठी युरोपीय महासंघाने स्वतःचे स्थान भक्कम करायला हवे. त्यासाठी महासंघाने ‘टीआयटीआर’च्या विकासाचा लाभ घ्यायला हवा.

युरोपमधील चीनची BRI महत्त्वाकांक्षा कॉकेशसवर अवलंबून

चीनने आपल्या महत्त्वाकांक्षी आंतरखंडीय ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ प्रकल्पाला मिडल कॉरिडॉर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘ट्रान्स-कॅस्पियन आंतरराष्ट्रीय वाहतूक कॉरिडॉर’शी (टीआयटीआर) धोरणात्मकरीत्या जोडून घेतल्याने अझरबैजानला महत्त्व प्राप्त झाले आहे. पूर्व आणि पश्चिमेच्या मिलाफबिंदूवर असलेला हा देश आता केंद्रस्थानी आला आहे. युरोपीय महासंघ आणि अमेरिका या दोहोंकडून टीआयटीआर प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. या वैविध्यपूर्ण वाहतूक मार्गामध्ये मध्य आशिया, कॅस्पियन समुद्र आणि कॉकेशसमध्ये पसरलेल्या प्राचीन सिल्क रोडचे प्रतिबिंब पडलेले दिसते. रशिया-युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यावर युरोपीय महासंघ आणि मध्य आशिया दरम्यान विश्वासार्ह दळणवळण मार्गाची गरज निर्माण झाली. त्यामुळे टीआयटीआर प्रकल्पाची गती वाढली. ‘टीआयटीआर’शी संबंधित असलेल्या अझरबैजानशी आर्थिक संबंध वाढवून बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्प मजबूत करण्याचा चीनचा हेतू आहे. या दोन दळणवळण प्रकल्पांमध्ये समन्वय साधण्यासाठी चीनमधील तज्ज्ञ आणि सरकारी अधिकारी या दोहोंचे एकत्रित प्रयत्न सुरू आहेत.  

अझरबैजान आणि बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह

इराण आणि रशियावरील निर्बंधांमुळे कॅस्पियन समुद्रावर धोरणात्मकरीत्या स्थित असलेल्या अझरबैजानचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे. दळणवळण मार्गाचे महत्त्वपूर्ण ठिकाण आणि मध्य आशिया व युरोपदरम्यानच्या पाइपलाइन यासंबंधाने अझरबैजानचे भौगौलिक स्थान महत्त्वपूर्ण आहे. असे असले, तरी ‘टीआयटीआर’बद्दल चीनचे विचार संमिश्र आहेत. कारण युरोपकडे जाणाऱ्या रशियाचा उत्तरेकडील मार्गाची त्याला स्पर्धा असू शकते. या पार्श्वभूमीवर रशियाशी असलेल्या संबंधात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी चीनने अझरबैजानमध्ये व ‘टीआयटीआर’मध्ये थोडी गुंतवणूक केली. चीनने अझरबैजानमधील ५ कोटी ४० लाख डॉलर किंमतीच्या केवळ पाच बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमधील प्रकल्पांची २०१७ पर्यंत अंमलबजावणी केली आहे. अझरबैजानमध्ये विशेषतः देशाच्या तेल आणि दूरसंचार क्षेत्रात चिनी कंपन्यांनी ८० कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे, तर अझरबैजानने चीनमध्ये १७० कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. टीआयटीआर प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या काही देशांनी चीनशी भागीदारी असलेल्या प्रकल्पांविषयी प्रतिकूल मत नोंदवले आहे. या देशांनी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पाचे मर्यादित यश आणि चीनचे संशयास्पद हेतू हे मुद्दे उपस्थित केले आहेत.   

इराण आणि रशियावरील निर्बंधांमुळे कॅस्पियन समुद्रावर धोरणात्मकरीत्या स्थित असलेल्या अझरबैजानचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे. दळणवळण मार्गाचे महत्त्वपूर्ण ठिकाण आणि मध्य आशिया व युरोपदरम्यानच्या पाइपलाइन यासंबंधाने अझरबैजानचे भौगौलिक स्थान महत्त्वपूर्ण बनले आहे.

त्यानंतर, जॉर्जियामार्गे जाणाऱ्या तुर्की व अझरबैजानमधील बाकू-तिबिलिसी-कार्स रेल्वेमार्गासारख्या आधुनिक सुविधांमध्ये सुधारणा करून अझरबैजानने बहुतांश प्रकल्पांना अर्थपुरवठा केला; कॅस्पियन समुद्रातील बंदर आणि मुक्त व्यापार सुविधांमध्येही सुधारणा केल्या. बाकू-तिबिलिसी-कार्स हा ८२६ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग २०१७ मध्ये सुरू करण्यात आला. अझरबैजानने ४,२८६ किलोमीटरच्या रेल्वेमार्गात १.६ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. त्यापैकी ६० टक्के मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आणि सुमारे ४० टक्के मार्गाचे दुपदरीकरण केले गेले. हे रेल्वेमार्ग अझरबैजानमधील नव्या कॅस्पियन बंदराशी जोडले असून त्यांमुळे युरोप आणि आशियादरम्यानचे दळणवळण सुलभ झाले आहे.

युरोपीय महासंघासाठी ‘टीआयटीआर’चे महत्त्व

रशिया-युक्रेन युद्ध आणि त्यानंतर अमेरिका व युरोपीय महासंघाने रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे उत्तर कॉरिडॉर वापरणे रोखण्यात आले. त्यामुळे युरोपीय वाहतूकदारांना आणि जहाज वाहतूकदारांना नव्या पर्यायी मार्गाची गरज भासू लागली. त्याचप्रमाणे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे मध्य आशियायी देशांमध्ये आपल्या सार्वभौमत्त्वाबद्दल चिंता निर्माण झाली. मध्य आशायायी देशांच्या दृष्टीने टीआयटीआर हे त्यांचे रशियावरील अवलंबित्व कमी करण्याचे आणि चीनवरील अवलंबित्वावर मर्यादा ठेवण्याचे साधन आहे.

टीआयटीआर हे ४५०० किलोमीटरच्या रेल्वेमार्गावर आणि ५०० किलोमीटरच्या समुद्रमार्गावर पसरलेला रशियाच्या नॉर्दर्न कॉरिडॉरच्या दोन हजार किलोमीटरपेक्षा कमी लांबीचा प्रकल्प आहे. तो दळवळणासाठीचा एक पर्याय बनला आहे. या प्रकल्पामधील कंटेनरचे दळणवळण २०२१च्या तुलनेत २०२२ मध्ये ३३ टक्क्याने वाढले आहे. युरोपीय महासंघाला आपल्या भू-सामरिक आणि भू-आर्थिक हितासाठी टीआयटीआरमध्ये सुधारणा व्हावी, असे वाटत आहे. कारण आपल्या उर्जा स्रोतांचे वैविध्यीकरण करण्याचे महासंघाचे उद्दिष्ट आहे. दक्षिणी गॅस कॉरिडॉरमार्गे कॅस्पियन समुद्रातून वायू खरेदी करणे रशियाकडून होणाऱ्या वायू पुरवठ्याला पर्याय होऊ शकत नाही. युरोपीय महासंघाला तो पर्याय वाटत असला, तरी तो अपुरा आहे. तुर्कमेनिस्तानने ट्रान्स कॅस्पियन पाइपलाइनमार्गे कॅस्पियन क्षेत्रातून युरोपमध्ये गॅस विक्री वाढवण्याचे आपले उद्दिष्ट जाहीर केले आहे. युरोपीय महासंघाच्या गॅस बाजारपेठेवरील रशियाचे नियंत्रण लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. २०२१ च्या तिसऱ्या चौमाहीत युरोपने ३९ टक्के गॅस रशियातून आयात केला होता. २०२१ मध्ये गॅसची आयात कमी म्हणजे केवळ बारा टक्के करण्यात आली.

युरोपीय महासंघ आणि मध्य आशियातील नेत्यांनी भू-सामरिक आणि भू-अर्थशास्त्रीय कारणांसाठी आपसात चर्चेला सुरुवात केली आहे. युरोपीय महासंघ मंडळाने मध्य आशियायी देशांच्या नेत्यांशी टीआयटीआरमधील अधिक लक्षणीय सहभागाबाबत उच्चस्तरीय चर्चा केली. २०२२ मध्ये झालेल्या युरोपीय महासंघ-मध्य आशिया परिषदेत परस्पर हितसंबंध आणि सामायिक मूल्यांवर आधारित भक्कम व प्रगतिकारक भागीदारीसाठी वचनबद्धतेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. २०२३ मध्ये झालेल्या दुसऱ्या शिखर परिषदेत मध्य आशियायी क्षेत्रातील देशांदरम्यानचे आणि युरोप व मध्य आशियातील देशांदरम्यानचे सहकार्य वाढीस लागावे, अशी इच्छा विविध नेत्यांनी दर्शवली. पर्यायी पुरवठा मार्ग विकसित करण्यासाठी आणि दळणवळण सुविधा वाढवण्यासाठी उर्जा सुरक्षा बळकट करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. युरोपीय महासंघाच्या नेत्यांच्या उच्चस्तरीय दौऱ्यांमध्ये वाढ झालेली असून युरोपीय महासंघाच्या पंतप्रधानांनीही या परिषदांना मान्यता दिली आहे.  

२०२३ मध्ये झालेल्या दुसऱ्या शिखर परिषदेत मध्य आशियायी क्षेत्रातील देशांदरम्यानचे आणि युरोप व मध्य आशियातील देशांदरम्यानचे सहकार्य वाढीस लागावे, अशी इच्छा विविध नेत्यांनी दर्शवली होती. पर्यायी पुरवठा मार्ग विकसित करण्यासाठी आणि दळणवळण सुविधा वाढवण्यासाठी उर्जा सुरक्षा बळकट करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.

युरोपीय महासंघ आणि बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह

चीनने आपल्या परराष्ट्र धोरणाचे साधन म्हणून बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या प्रकल्पाला २०१३ मध्ये गाजावाजा करीत सुरुवात केली. ‘विकासात्मक परराष्ट्र रणनीती आणि परराष्ट्र धोरणा’च्या आधारावर आपली अतिरिक्त क्षमता ओलांडून ‘पुढे जाणे’ ही चीनची याकडे पाहण्याची दृष्टी होती; परंतु बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या प्रकल्पामध्ये पारदर्शकतेचा अभाव असून या प्रकल्पाने आशिया आणि आफ्रिकेतील गरीब देश कायमस्वरूपी कर्जात लोटले जातील, असा मुद्दा युरोपीय महासंघाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. सुरक्षा, पाळत ठेवणे आणि दडपशाही या गोष्टींवर आधारित हुकूमशाही आघाड्या निर्माण होण्यासारख्या संभाव्य धोक्यांबद्दलही त्यांनी सावध भूमिका घेतली आहे. या धोक्यांमुळेच बेल्जियमने चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हविरोधात भूमिका घेतलेली दिसते. युरोपीय महासंघातील इटली या देशानेही २०२३ च्या डिसेंबरमध्ये या प्रकल्पातून माघार घेतली.   

कोव्हिड-१९ साथरोगासंबंधीच्या पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे आणि भू-राजकीय तणाव वाढल्याने युरोपीय महासंघाने ग्लोबल गेटवे योजनेला प्रारंभ केला. या योजनेअंतर्गत संशोधन व शिक्षण, डिजिटलीकरण, पायाभूत सुविधा, आरोग्य, हवामान आणि उर्जा या क्षेत्रांत २०२७ पर्यंत जागतिक स्तरावर तीन अब्ज तीस कोटी डॉलरची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेअंतर्गत टीआयटीआर आणि मध्य आशियातील शाश्वत पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी ११ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट युरोपीय महासंघाने चालू वर्षीच्या मार्च महिन्यात निश्चित केले. त्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांकडून संपूर्ण पाठिंबा मिळाला आहे. त्याचप्रमाणे, टीआयटीआर विकासाला मदत करण्यासाठी जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधांसाठी आणि गुंतवणुकीसाठी जी-७ देशांच्या भागीदारीचा वापर करण्याचे आश्वासन अमेरिकेने दिले आहे. चीन, रशिया आणि इराणशी जागतिक स्पर्धा करण्यासाठी अमेरिका व युरोपला मदत करण्याची टीआयटीआरची क्षमता आहे.

आर्थिक मंदी, भ्रष्टाचार, कर्जाचा ताण आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अपयशामुळे चीनला आपल्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या महत्त्वांकाक्षी प्रकल्पावरील खर्च कमी करणे भाग पडले आहे. युरोपीय महासंघाबरोबरच्या नव्या भू-सामरिक आणि भू-आर्थिक संबंधांमध्ये विशेषतः वाढते विभाजन आणि वाढत्या भू-राजकीय स्पर्धेत स्वतःचे स्थान निश्चित करण्यासाठी चीन टीआयटीआरवर आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. टीआयटीआरमुळे युरोपीय महासंघाला विशेषतः मध्य आशियात महत्त्वपूर्ण भू-आर्थिक सत्ता बनण्यासाठी मदत होणार आहे. तसे झाले, तर तो चीन व रशिया दोघांवरही मात करू शकतो. या क्षेत्रातील एक बडी भू-आर्थिक सत्ता होण्यासाठी आणि दक्षिण कॉकेशसशी संबंध सुधारण्यासाठी युरोपीय महासंघाने स्वतःचे स्थान भक्कम करायला हवे. त्यासाठी महासंघाने टीआयटीआरच्या विकासाचा लाभ घ्यायला हवा. या धोरणात्मक खेळीमुळे या क्षेत्रातील चीनच्या वाढत्या प्रभावाला आव्हान उभे राहील आणि आळाही बसेल.


एजाज वानी हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.