Author : Harsh V. Pant

Published on Oct 16, 2023 Commentaries 0 Hours ago

सारे जग अस्थिरतेशी सामना करीत असताना इस्रायल आणि पॅलेस्टाइनच्या लढ्याने या अस्थिरतेत आणखी एक अधिक तीव्रतेची धोकायदायक भर पडली आहे.

इस्रायल-गाझा युद्ध – धक्का आणि धडे

सारे जग अस्थिरतेशी सामना करीत असताना इस्रायल आणि पॅलेस्टाइनच्या लढ्याने या अस्थिरतेत आणखी एक अधिक तीव्रतेची धोकायदायक भर पडली आहे. आखाती देशांच्या मानकांनुसारही ही नेहमीची घडामोड नाही. हा इस्रायलवर आलेला ९/११ (अमेरिकेवर झालेला हल्ला) चा प्रसंग असून पुढे येणाऱ्या सुरक्षाविषयक आव्हानांशी इस्रायल कसा सामना करतो, ते या प्रसंगातून स्पष्ट होणार आहे. त्याचप्रमाणे या प्रदेशातील संबंधित विविध देश या घडामोडीचा संबंध आपल्या धोरणाशी कसा जोडतात, तेही यातून दिसून येणार आहे. बलाढ्य सुरक्षा यंत्रणेचे वैभव अनुभवलेल्या इस्रायलसारख्या देशासाठी हे गुप्तचर स्तरावरील एक मोठे अपयश मानले जात आहे; परंतु त्याही पलीकडे जाऊन पाहिले, तर शत्रूंना पोहोचणे अशक्य नसले, तरी अवघड असेल, अशी सुरक्षेची उंची आपण गाठली आहे, अशा विश्वासाच्या जोरावर जे निवांत होते, त्या लोकांसाठी हा एक मोठा धक्का आहे.

बलाढ्य सुरक्षा यंत्रणा असण्याच्या वैभवात वावरलेल्या राष्ट्रासाठी हे एक मोठे गुप्तचर अपयश आहे.

योम किपूर युद्धातील आकस्मिक हल्ल्याला पन्नास वर्षे उलटल्यानंतरही आणखी रॉकेट हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांचा आधार घेऊन पॅलेस्टाइनी सैनिकांनी समुद्र, जमीन आणि हवाई मार्गाने दक्षिण इस्रायलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अस्थिर शेजाऱ्यासमवेत राहणे शिकून घेतलेल्या लोकांचा आत्मविश्वास मुळापासूनच डळमळीत झाला. या हल्ल्याची तीव्रता व व्याप्ती आणि त्याचा इस्रायली मानसिकतेवर होणारा परिणाम इतका मोठा होता, की त्याची कल्पनाही केलेली नव्हती. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी देश एका ‘दीर्घ व अवघड युद्धा’शी सामना करीत आहे, असे स्पष्ट केले. ‘हमासने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे आम्हाला जबरदस्तीचे पाऊल उचलावे लागले,’ असेही ते म्हणाले.

इस्रायलने २००५ मध्ये माघार घेतल्यानंतर हमासच्या ताब्यात असलेल्या गाझा येथून हा हल्ला करण्यात आला. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या सीमेवरील चौक्या आणि लष्करी तळांवर घुसून निष्पाप नागरिकांची हत्या केली. शिवाय या सर्वाचे जाहीर प्रदर्शनही केले. बंदी घालण्यात आलेल्या या दहशतवादी गटाने केलेले मोठे नुकसान साऱ्या जगाने पाहिले. विघ्नसंतोषी दहशतवाद्यांनी काही काळासाठी लष्कराची वाहने ताब्यात घेऊन नागरिकांना ओलीसही धरले. चोवीस तासांपेक्षा अधिक काळानंतर इस्रायली सैन्य ‘अजूनही युद्ध करीत आहे….हमासच्या ताब्यात गेलेल्या इस्रायली प्रदेशावर व समुदायावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी अजूनही आपली ताकद पणाला लावत आहेत.’ इस्रायलमधील तीनशे नागरिक ठार झाल्याचे सांगण्यात आले असून डझनभर इस्रायली नागरिकांना ओलीस धरण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इस्रायलने गाझा पट्टीत केलेल्या प्रति हवाई हल्ल्यांमुळे किमान ३१३ लोक मारले गेले आणि सुमारे दोन हजार लोक जखमी झाले. ही तर फक्त सुरुवात आहे. कारण या प्रदेशाला आणि साऱ्या जगालाही आणखी वाईटासाठी तयार राहावे लागणार आहे.

इस्रायलच्या दृष्टीने पाहिले, तर या हल्ल्यामुळे इस्रायलला आपल्या लष्करी धोरणाचा मुळापासून विचार करावा लागणार आहे. या हल्ल्यामागचे अत्यंत सावध नियोजन पाहता इस्रायलच्या बाजूने काय होऊ शकते, याची हमासला पूर्ण कल्पना होती, हे लक्षात येते. हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हल्ले सुरू झाल्यामुळे हमासने ‘(इस्रायली) कब्जा नष्ट करण्यासाठी’ पॅलेस्टाइनी आणि अन्य अरबांना आपल्या कारवायांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. हमासकडून वेगवेगळ्या आघाड्यांकडून लढण्याची शक्यता असल्याने इस्रायली लष्कराने सैन्याचे मोठ्या प्रमाणात बळकटीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायली अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार, ओलीसांची हमासच्या तावडीतून सुटका करण्यासाठी आणि नंतर दहशतवादी संघटनेला नेस्तनाबूत करण्यासाठी गाझामध्ये प्रत्यक्ष मोहिमा करण्याची गरज आहे. पण खरी मेख इथेच आहे. अशा प्रकारच्या खेळीमुळे इस्रायली सैनिकांना शहरी भागातील युद्धाला सामोरे जावे लागले. हे अत्यंत अवघड होईल. कारण हमासचे दहशतवादी शहरांमधील गर्दीत सहजपणे लपू शकतात. या दलदलीत फसू नये, यासाठीच इस्रायली संरक्षण दल कितीतरी दिवसांपासून त्यापासून लांब पळत आहे. हमासला नेमके हेच हवे आहे.

नेतान्याहू यांना गाझामध्ये मोठा हल्ला करण्यासाठी देशांतर्गत दबाव आणला जाईल आणि हमास हे वाढण्याची वाट पाहत असेल.

अर्थात, आता हा काही केवळ स्थानिक पातळीवरील संघर्ष राहिलेला नाही. इस्रायल-पॅलेस्टाइन प्रश्नाला व्यापक प्रादेशिक दुखऱ्या बाजू आहेत. हमासला इराणचे समर्थन आहे आणि लेबनॉनची हिजबुल्लाह (या संघटनेलाही इराणचा पाठिंबा आहे.) ही अतिरेकी संघटना या युद्धात सामील झाली आहे. लेबनॉन आणि सीरियाने दावा केलेल्या माउंट डोव्ह या मोठ्या भूखंडावर हल्ले करण्यात याच संघटनेचा हात होता. ‘पॅलेस्टाइनच्या प्रतिकाराच्या ऐक्यासाठी’ हे हल्ले केल्याचे हिजबुल्लाहने स्पष्ट केले आहे. इस्रायलने जेबलरूस भागात हिजबुल्लाहचा जोरदार प्रतिकार केला. इजिप्तमध्ये इस्रायली पर्यटक मारले गेल्याची वृत्ते आल्याच्या पार्श्वभूमीवर ‘पॅलेस्टाइनी लोकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन केले जात असल्याने जे काही चालू आहे, त्यास पूर्णपणे इस्रायलच जबाबदार आहे,’ असे कतारने अधोरेखित केले आहे.

सध्याच्या दुर्दशेबद्दल जागतिक स्तरावरील समज वाढली आहे. जोरदार हल्ले करून हमास इस्रायल-पॅलेस्टाइन प्रश्नामधील प्रमुख मध्यस्थ आपण आहोत, असे ठसवण्याचा प्रयत्न करीत आहेच, शिवाय अमेरिकेचे या प्रदेशासंबंधातील धोरण उद्ध्वस्त करण्याचाही प्रयत्न ही संघटना करीत आहे. सौदी अरेबियाला सुरक्षेची हमी व नागरी अणू तंत्रज्ञानाच्या बदल्यात सौदी अरेबिया व इस्रायल यांच्यात सामंजस्य व्हावे, यासाठी बायडेन प्रशासनाने दबाव आणल्याने आखातात नवी धोरणे दिसू लागली आहेत. या कराराला अंतिम स्वरूप मिळाल्यास या प्रदेशात इराण व हमास परिघाबाहेर फेकले जातील. त्यामुळेच त्यांनी ही शक्यता इस्रायलवरील जोरदार हल्ल्यांनी उधळून लावली. आता इस्रायलने हमास व अन्य दहशतवादी संघटनांना प्रत्युत्तर दिल्याने लोकांच्या नापसंतीच्या भीतीने परिस्थिती सुरळीत करण्यासाठी सौदी अरेबियाला परिस्थिती कठीण होऊन बसली आहे.

दहशतवादाशी दोन हात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतासारख्या देशाने शिकावेत असे महत्त्वाचे धडे यातून मिळू शकतात. जगाचे लक्ष महासत्तांच्या स्पर्धेवर केंद्रित झालेले असले, तरी बाह्य शक्तींकडून धोके वाढले आहेत. बाह्य शक्तींना विशेषतः इराण आणि पाकिस्तानसारख्या देशांची मदत असलेल्या घटकांना तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आघाडी घेण्यासाठी सुयोग्य वातावरणनिर्मिती झाली आहे. सुरक्षा संस्थांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांसंबंधीच्या पूर्वग्रहांचा अडसर ठेवायला नको आणि प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे राहायचे असेल, तर नेहमी अकल्पित ते घडेल, याचा आधीच विचार करायला हवा.

आयडीएफ (इस्रायली संरक्षण दल) हे एक शक्तीशाली लष्कर आहे आणि इस्रायली गुप्तचर संघटना जगातील सर्वोत्तम मानली जाते. तरीही नुकत्याच झालेल्या हल्ल्याने राष्ट्राची असुरक्षितता उघडकीस आली आहे ज्याला नॉन-स्टॉप वॉर मोडमध्ये रहावे लागेल. राजकीय हेतू साध्य करणे, हेच प्रत्येक युद्धाचे उद्दिष्ट असेल, तर इस्रायलने आपल्या युद्धसामग्रीला संजीवनी देण्याची आणि या साधनांची प्रतिकारशक्ती पुन्हा प्राप्त करण्याची वेळ आली आहेच, शिवाय बळाच्या जोरावर साध्य करू पाहणाऱ्या राजकीय हेतूंचाही पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे.

हा लेख मूळतः NDTV मध्ये प्रकाशित झाला आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.