Author : Cahyo Prihadi

Published on Feb 26, 2019 Commentaries 0 Hours ago

पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधांना नवे वळण मिळेल का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अमेरिका, चीन, फ्रान्स, सौदी यांची गणिते समजून घ्यायला हवीत.

पुलवामानंतर बदललेली आंतरराष्ट्रीय गणिते

पुलवामा हल्ला घडल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेने जैश-ए-महंमद या संघटनेला दहशतवादी ठरवावे आणि मसूद अझर या ‘जैश’च्या म्होरक्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे या मागणीचा पुनरुच्चार भारताने केला. फ्रान्सने भारताच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पुलवामा हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंधांना नवे वळण मिळेल काय? असा प्रश्न निर्माण होतोय.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेच्या पाच संस्थापक सदस्यात फ्रान्स आहे आणि चीनही आहे. २००९ च्या मुंबई हल्ल्यानंतर तीन वेळा सुरक्षा परिषदेमधे जैश-ए-महंमदला दहशतवादी घोषित करण्याचा ठराव आला असताना तीनही वेळा चीनने तो ठराव आपला नकाराधिकार वापरून ठोकरला. चीन पाकिस्तानच्या बाबतीत मऊ होतं याला कारणे आहेत. चीन साठेक अब्ज डॉलर पाकिस्तानात गुंतवत आहे. चीन आणि पाकिस्तान दोधांनाही चांगले परस्पर संबंध टिकवायचे आहेत. पुलवामानंतर चीन काय करते याकडे जगाचे लक्ष होते.

जैश-ए-महमंद या संघटनेने पुलवामा घटनेची जबाबदारी घेतली असतानाही, पाकिस्तानने पुलवामाचा संबंध पाकिस्तानशी नाही असे जाहीर केले. पुलवामा घडल्यानंतरच सौदी राजपुत्र महंमद बिन सलमान इस्लामाबादमधे दाखल झाले होते. त्यांनीही पुलवामाची दखल घ्यायला नकार दिला. बिन सलमान भारतात काही तासांसाठी आले आणि या प्रश्नी गुळणी धरून चीनला रवाना झाले.

बिन सलमान चीन दौरा आटोपून रियाधला परतल्यावर चीन सरकारने जैश-ए-महंमदला दहशतवादी घोषित केले. म्हणजे चीनने आपली भूमिका बदलली. पण अर्धीच. मसूद अझरला दहशतवादी म्हणून जाहीर केले नाही.बिन सलमान आणि चिनी राज्यकर्ते यांच्यात काही बोलणे झाले काय? पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांचा त्रास चीनलाही होतोय.

चीनच्या उईगूर प्रांतात मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. पाकिस्तान आणि सौदीतून जाणारे मौलवी तिथल्या मुसलमानांना उचकवत असतात. चीनने तो त्रास सहन केला; पण, पाकिस्तान किवा सौदीला त्या बाबत उघड तंबी कधी दिली नाही. चीनला ते आवश्यक वाटले नसेल कारण उईगूरमधल्या लोकांना दाबात ठेवण्याचे तंत्र चीनला माहीत आहे. चीनमधे कोणाचे लाड होत नाहीत, मानवी अधिकार वगैरे गोष्टी तिथे चालत नाहीत. फारच गडबड केली तर चिनी लष्कर गडबड करणाऱ्यांना चोपते. त्यामुळं उईगूर प्रकरण चीन हाताबाहेर जाऊ देत नाही. पण वेळीच तंबी देण्यासाठी चीनने पुलवामा प्रकरण वापरले असावे. पाकिस्तानला त्यातून योग्य संदेश गेला आणि सौदीलाही समजले की मौलवी लोकांना त्यांनी आवरले तर बरे.

चीनची घोषणा प्रसिद्ध झाल्या बरोब्बर पाकिस्तानने जैश-ए-महंमदचे मुख्यालय ताब्यात घेतलेय. म्हणजे आपण पाऊल उचललेय असे पाकिस्तान म्हणू शकते. पण, अशा पावलांना अर्थ नसतो. मुख्यालय ताब्यात घेऊन काय फरक पडतो? उद्या पाकिस्तान ‘जैश’ला बेकायदेशीर जाहीर करेल आणि मसूद अझरला अटकही करेल. मागे असे घडलेले आहे. संघटना बेकायदेशीर ठरली की, जैशेचे लोक नाव बदलून दुसऱ्या नावाने दुकान उघडतात. मसूद अझर काही दिवस नजरकैदेत राहील, पण नंतर सर्रास फिरू लागेल. दहशतवादाचा शिक्का बसलेली अनेक माणसे खुश्शाल पाकिस्तानात फिरत असतात, अमेरिकेनं लक्षावधी डॉलरचं बक्षीस त्यांच्या शिरावर लावले असतानाही ते शिरसलामत फिरत असतात. त्याचं कारण उघड आहे. जैश-ए-महमंद ही आयएसआयने वाढवलेली आणि पोसलेली संघटना आहे. आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराला भारताला छळण्यासाठी नॉन स्टेट हस्तक म्हणून जैशची आवश्यकता आहे.

चीनने पाकिस्तानच्या बरगडीत बोट खुपसल्यावर मागोमाग अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली. ट्रम्प म्हणाले की भारत आणि पाकिस्तानमधले तणाव गंभीर झाले आहेत. भारत काही तरी जोरदार कारवाई करण्याच्या प्रयत्नात आहे. दोन्ही देशांनी वातावरण निवळण्याचे प्रयत्न करावेत, आपण पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखांशी बोलणार आहोत असं ट्रम्प पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ट्रम्प पुलवामाबद्दल बोलले नाहीत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात न संपणारे वितुष्ट आहे. दोन्ही देशांचे पंतप्रधान शांततामय सहजीवनाची भाषा बोलतात, रसगुल्ले आणि बिरयाणी एकमेकाला खिलवतात पण मारामारी काही संपत नाही. काश्मीर हा शत्रुत्वाचा मुख्य मुद्दा आहे. पाकिस्तानी लष्करात एक भीतीगंड आहे. भारत आपल्याला गिळेल, आपले आणखी तुकडे पाडेल अशी भीती लष्कराला वाटते. काश्मीरचा मुद्दा काढून इस्लामी आणि मित्र देशांकडून शस्त्रे आणि पैसे उकळणे हा पाकिस्तानचा धंदा आहे. काश्मीरचा प्रश्न सुटला तर पैशाचा ओघ थांबेल ही लष्कर आणि सरकारची भीती आहे. त्यामुळं काहीही करून काश्मीरचा प्रश्न पाकिस्तानला तेवत ठेवायचा आहे.

मांजर कितीही डोळे बंद ठेवून दूध पीत असले तरी जगाला ते दिसत असते. अमेरिका आणि चीनला पाकिस्तानचे वर्तन समजते. नऊ अकराचा हल्ला संघटीत करणारी मंडळी पाकिस्तानातून हालचाली करत होती हे अमेरिकेला माहीत आहे. शेवटी बिन लादेनही पाकिस्तानातच सापडला. क्लिंटन, बुश, ओबामा या तिघांच्याही कारकीर्दीत अमेरिकेने पाकिस्तानला भरपूर सुनावले आहे. हिलरी क्लिंटननी तर पाकिस्तान दौऱ्यात पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तान सरकारच्या लबाडीवर टीका केली होती. अमेरिकन काँग्रेसमधे पाकिस्तानवर सतत टीका होत असते, पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखण्याचे ठराव होतात. तरीही अमेरिका पाकिस्तानला चिकटून रहाते.

आशिया, मध्य आशिया विभागात आपले वर्चस्व टिकवण्यासाठी पाकिस्तान ही उपयुक्त भूमी आहे असे अमेरिकेला वाटते. पाकिस्तानात लोकशाही नसल्याने त्या भूमीचा वापर आपल्या सोयीनुसार करून घेता येतो असा अमेरिकेचा अनुभव आहे. भारतात लोकशाही असल्याने सरकारला गुंडाळणे कठीण होऊन बसते. शिवाय भारतात फार लोकांना पेसै चारावे लागतात, पाकिस्तानात राजकारण आणि लश्करातली मोजकी मंडळी हाताशी धरली की प्रश्न सुटतो. अमेरिकेची ही समजूत अजूनही शिल्लक असल्याने पाकिस्तानला धारेवर धरायला अमेरिकन लष्करी एस्टाब्लिशमेंट तयार नाही. ट्रम्प इमरान खान यांच्याशी बोलायचे म्हणतात, पाकिस्तानची लष्करी मदत बंद करू, असे म्हणत नाहीत. यावरून खूप काही समजू शकते.

चीन, अमेरिका आणि सौदी या देशांना पाकिस्तानची चिंता आहे, भारताची नाही. पण स्वतंत्रपणे आपण बलवान आहोत, आपण खेळी करतोय, आपले परदेश धोरण या गोष्टी दाखवण्यासाठी, आपली प्रतिमा टिकवण्यासाठी त्यांना पाकिस्तानचा उपयोग करायचा आहे. स्वतंत्रपणे पाकिस्तानचे काय होते, भारत आणि पाकिस्तानमधले संबंध कसे असावेत यात ते गुंतलेले नाहीत.

बिन सुलतान पाकिस्तान, भारत, चीनच्या दौऱ्यावर का आले होते? त्यांना भारत पाकिस्तान संबंध सुधारायचे होते की आणखी काही करायचे होते? बिन सलमान हे गृहस्थ त्यांच्या स्वतःच्या देशात सर्वोच्च स्थान पटकावण्याच्या बेतात आहेत. इतर राजपुत्रांना मागे सारून त्यांना सलमान या राजांकडून सत्तेची वस्त्रे मिळवायची आहेत. त्या नादात त्यांनी देशाच्या आर्थिक आणि परदेश धोरणात जोरदार पावले उचलली. स्पर्धेत असलेल्या आपल्या भावांना तुरुंगात टाकणे आणि पत्रकार खाशोगजी यांचा खून असे आरोप त्यांच्यावर आहेत. सत्ता ताब्यात घेण्याची त्यांची पद्धत काळजीपूर्वक हालचाली करण्याची नाही, धटिंगणगिरी करण्याची आहे.

मित्र देश बिन सलमान यांच्यापासून अंतर राखू लागले. अशा परिस्थितीत आपण महत्वाचे आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी परदेशांचा दौरा काढला. पण तिथेही त्यांचे नीट जमले नाही. ट्युनिशियात गेले तेव्हा त्यांच्या विरोधात निदर्शनं झाली, खाशोगजी यांचे तुकडे करणाऱ्या तलवारी निषेध करणाऱ्यांनी बिन सलमान यांच्या समोर नाचवल्या. युरोप, अमेरिका इत्यादी देशांत जायचे म्हणजे स्वतःच्या हातानं चिखल उडवून घेण्यासारखे असल्याने त्यांनी पाकिस्तान-भारत-चीन दौरा आखला. २० अब्ज डॉलरच्या मदतीचे आश्वासन देत कंडोरा आणि बिश्तचे फलकारे मारत बिन सलमान तीनही देशात वावरले. पण अरेरावीचा डाग त्यांना पुसता आला नाही. एक गंभीर राजकारणी, एक विचार करणारा राजकारणी, काही एक दूरदृष्टी असलेला राजकारणी अशी प्रतिमा त्यांना या दौऱ्यात निर्माण करता आली नाही.

भारत पाकिस्तान संबंधात कोणतीही सुधारणा बिन सुलतान यांना करता आलेली नाही. सौदी, चीन आणि अमेरिकेने दहशतवाद आणि पाकिस्तानबद्दल किरकोळ वक्तव्ये करण्यापलिकडे फार मोठा बदल घडलेला नाही. लवकरच धुरळा खाली बसेल आणि पाकिस्तानची बैलगाडी चाकोरीत दाखल होईल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.