Originally Published The Diplomat Published on Sep 14, 2023 Commentaries 0 Hours ago

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या संबंधांमध्ये अद्याप खूप काही करण्यासारखे आहे. कारण चीनशी समतोल संबंध ठेवण्याची आणि भारत-प्रशांत क्षेत्राच्या धोरणात्मक व्यवस्थेला स्थैर्य आणण्याची इच्छा आहे.

जयशंकर यांचा ऑस्ट्रेलिया दौरा संबंधांसाठी हितकारक

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले होते. ही भेट अल्पकालीन असली, तरी महत्त्वपूर्ण होती. ‘ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूट’ (एएसपीआय) आणि ‘ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशन’ (ओआरएफ) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘रायसिना ॲट सिडनी डायलॉग’साठी ते सिडनी इथं गेले होते. भारत-प्रशांत क्षेत्राच्या दोन प्रमुख धोरणात्मक भागीदारांमधील वाढती जवळीक दाखवणारी गेल्या वर्षभरातील जयशंकर यांची ही तिसरी ऑस्ट्रेलिया भेट होती.

भारत-प्रशांत क्षेत्रातील वेगाने बदलत असलेल्या भू-राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय व अल्पपक्षीय संबंधांत परिवर्तन होत असलेले दिसत आहे. चीनचा उदय आणि या उदयामुळे झालेल्या धोरणात्मक परिणामांमुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांना जवळ आणले आहे. कारण चीनशी सशक्त आर्थिक संबंध असूनही दोन्ही देशांना युद्धखोर चीनच्या हालचालींशी सामना करावा लागत आहे. यावरून हे सूचित होते, की जवळच्या व्यापारी व गुंतवणुकीबाबतच्या संबंधांमुळे आंतरदेशीय संबंधांचे मूळ स्वरूप बदलत नाही; तसेच चीन बळाचा वापर करते, हे वास्तव भारत व ऑस्ट्रेलियाला हाताळणे आवश्यक आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान असलेल्या जवळच्या व विश्वासार्ह संबंधांचे आणखी एक दर्शक म्हणजे ऑस्ट्रेलिया प्रथमच पुढील मलबार नौदल सरावाचे यजमानपद भूषवणार आहे. हे एक नोंदवण्याजोगे वळण आहे. कारण २०२० पर्यंत या सरावांमधून ऑस्ट्रेलियाला वर्षानुवर्षे वगळण्यात आले होते. असा सराव हा चीनकडून धोकादायक ठरू शकतो, अशी भीती भारताला वाटत होती. जयशंकर यांनी सिडनी येथे अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट यशस्वी ठरलेली दिसते. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी झालेल्या भेटीनंतर जयशंकर यांनी ट्वीट केले, ‘आमच्या चर्चेत आपच्या धोरणात्मक भागीदारीचे प्रतिबिंब पडले. या संबंधातील अलीकडील घडामोडींची माहिती (अल्बानीज यांना) दिली.’

अल्बानीज यांनीही या भेटीबद्दल ट्वीट केले. त्यांनी नोंदवले, की आपण दोघांनी ‘आमची धोरणात्मक भागीदारी, आर्थिक संधी आणि आमचे देश समृद्ध करणारे लोकांचे आपसातील संबंध यांवर चर्चा केली.’ ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान येत्या मार्च महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत.

जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वाँग यांच्याशीही चर्चा केली. त्यांनी ‘भारत-प्रशांत क्षेत्राचे धोरणात्मक चित्र, क्वाडमधील प्रगती, जी-२० संबंधातील घडामोडी आणि आमच्या शेजारी देशांसंबंधीचे दृष्टिकोन यांविषयी आम्ही चर्चा केली.’ जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान व संरक्षणमंत्री रिचर्ड मार्लेस यांचीही भेट घेतली. त्यानंतर जयशंकर म्हणाले, की ‘भारत आणि ऑस्ट्रेलियासमोरील संरक्षण व सुरक्षा आव्हानांसंबंधात आम्ही अभ्यासपूर्ण चर्चा केली. आमची सामायिक मूल्ये व धोरणात्मक अभिसरण हे आमच्यातील वाढते सहकार्य भक्कम करते.’

जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या हवामान बदल व उर्जा मंत्र्यांचीही भेट घेतली. या भेटीत हवामानबदलासंबंधातील उपाययोजनांना अर्थपुरवठा करण्याची आणि भारत व ऑस्ट्रेलियादरम्यानच्या सहकार्यात अधिक वाढ होण्याची गरज असल्यावर एकमत झाले. रायसिना ॲट सिडनी’मध्ये झालेल्या ब्रेकफास्ट चर्चेत वाँग यांच्याच सूरात सूर मिसळून जयशंकर म्हणाले, ‘मला वाटते, जगातील सध्याच्या परिस्थितीमुळे भारत आणि ऑस्ट्रेलियाला एकमेकांसमवेत काम करणे क्रमप्राप्त झाले आहे. भारत व ऑस्ट्रेलियासारख्या देशांसाठी जग ज्या दिशेने जात आहे, त्या दिशेने अधिक बारकाईने काम करणे आवश्यक बनले आहे.’

द्विपक्षीय संबंधांना तत्काळ संदर्भ देत जयशंकर यांनी तणावग्रस्त व्यापार व आर्थिंक विवंचनेत असलेल्या जगाच्या स्थितीचा उल्लेख केला आणि अर्थातच जगाला उद्ध्वस्त करणाऱ्या कोव्हिड-१९ चाही त्यांनी उल्लेख केला. युक्रेनमधील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवरील सध्याच्या ताणात वाढ झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘अधिक विश्वासार्ह व लवचिक पुरवठा साखळ्या तयार करून’ जागतिक अर्थव्यवस्थेला जोखीममुक्त करण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांनी सहकार्य करावे, असेही जयशंकर यांनी सूचवले. ही पद्धती सध्या भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या त्रिपक्षीय स्वरूपात आधीपासूनच सुरू असलेला एक उपक्रम आहे. डिजिटलीकरणाची आव्हाने आणि अधिक सुरक्षित व विश्वासार्ह डिजिटल जगाची निर्मिती, हे त्यांनी सांगितलेले दुसरे उद्दिष्ट होते.

तिसरे उद्दिष्ट हे कदाचित सर्वांत महत्त्वपूर्ण असून जयशंकर यांच्या म्हणण्यानुसार, ‘पुढील काही वर्षांत अस्थिर अर्थव्यवस्थेकडे जाणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेला स्थैर्याकडे नेण्यासाठी देशादेशांतील महत्त्वपूर्ण संबंध उपयुक्त ठरू शकतात का,’ हे ठरवणे. भारताच्या हितासाठी; तसेच व्यापक भारत-प्रशांत क्षेत्रातील संबंध वाढवण्याच्या दृष्टीने त्याची जाण ठेवणे आणि असुरक्षितता कमी करून भारताचा धोरणात्मक अवकाश व पर्याय वाढवणे या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण आहे.

या बदललेल्या आर्थिक व धोरणात्मक संबंधाने जयशंकर यांनी एका क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले. या क्षेत्राची ताकद वाढवणे गरजेचे आहे. ते म्हणजे गुंतवणूक. गुंतवणुकीने व्यापारासमवेत पुढे जावे ‘कारण ते परस्परांना ताकद देतात,’ असे मत त्यांनी मांडले. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या भारतभेटीदरम्यान उभय देशांच्या व्यापार करारावर सह्या करण्यात येतील. उभय देशांनी यापूर्वी २०२२ च्या एप्रिल महिन्यात अंतरिम व्यापार करार केला होता.

भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान आर्थिक संबंध महत्त्वपूर्ण आहे. कारण दोन्ही अर्थव्यवस्था एकमेकांसाठी पूरक आहेत, असे अल्बानिज यांनी जयशंकर यांना सांगितल्याचे समजते. ‘हे संबंध बळकट करण्याबरोबरच सुरक्षाविषयक संबंध मजबूत करण्यासाठी मी उत्सुक आहे,’ असे अल्बानीज पुढे म्हणाले.

‘रायसिना ॲट सिडनी’मध्ये पुढील धोरणाची झलक सांगताना जयशंकर यांनी आधीच्या मुद्द्यांवर काही विशेष टिप्पण्या केल्या. त्यांनी जागतिकीकरण आणि पुन:समतोल या दोन प्रक्रियांचा उल्लेख केला. या दोन्हींच्या विशिष्ट व्याख्या करण्यात काही मतभेद आहेत. केवळ लोकशाही आणि बिगरलोकशाही यांच्यातच नव्हे, तर लोकशाहीची मानके कोण ठरवतात यांबाबतही लोकशाहींमध्ये फरक असतो, या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

विविध प्रकारच्या लोकशाहीतील फरक आणि मूल्ये व निकषांमधील फरक यावर भर देण्यात आला आणि ते गांभीर्याने तसेच पुढे चालू राहिले, तर भारताच्या पश्चिमेकडील लोकशाही देशांशी असलेल्या संबंधांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. विविध लोकशाहींमध्ये भिन्नता आहे; परंतु मानवी हक्क, मुक्त माध्यमे आणि वैविध्याविषयी आदर अशी काही वैश्विक मूल्ये आणि तत्त्वे सर्वच लोकशाहींमध्ये सामायिक मानली जातात.

मात्र जयशंकर यांच्या संवादातील सर्वांत महत्त्वाची सकारात्मक बाजू म्हणजे भारत हा भारत-प्रशांत क्षेत्रामध्ये ‘संकल्पनात्मक स्तरावर’ आणि ‘क्वाड’मध्ये ‘यंत्रणा स्तरावर’ कसे कार्य करील, याविषयीची त्यांची धारणा ही होय. ‘क्वाड’ समूहातील चार देशांच्या भौगोलिक सीमा सामायिक नाहीत, हे अधोरेखित करून जयशंकर म्हणाले, ‘खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला समुद्र आणि त्यामध्ये असलेल्या थोड्या भूभागावर आम्ही आहोत. पण वेगवेगळ्या मार्गांनी आपापले भूतकाळातील दृष्टिकोन बदलून जागतिक व प्रादेशिक गरजांच्या दृष्टीने काही सामायिक ध्येय निश्चित करण्यासाठी’ हे देश एकत्र आले आहेत. त्यांनी या समूहाला ‘महान निष्कर्ष’ असे संबोधले असून चारही देशांच्या परराष्ट्र धोरणांमध्ये याला ‘महत्त्वपूर्ण’ ठरवले आहे. काही वर्षांपूर्वी याची कल्पनाही कोणी केली नव्हती.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे द्विपक्षीय संबंध ‘असाधारणपणे महत्त्वपूर्ण’ आहेत, असेही जयशंकर म्हणाले. अर्थातच दोन्ही देशांमधील नेत्यांच्या उच्चस्तरीय दौऱ्यांची संख्या पाहता या भागीदारीचे महत्त्व दिसून येते. ऑस्ट्रेलियातील भारतीयांची सुरक्षा आणि भारतीय वंशाच्या नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या शीख अतिरेकी घटनांसारख्या संबंधांमधील काही अवघड मुद्देही जयशंकर यांनी उपस्थित केले.

असे असले, तरी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या संबंधांमध्ये अद्याप खूप काही करण्यासारखे आहे. कारण चीनशी समतोल संबंध ठेवण्याची आणि भारत-प्रशांत क्षेत्राच्या धोरणात्मक व्यवस्थेला स्थैर्य आणण्याची इच्छा आहे. मात्र चीनमुळे सुरक्षेसंबंधीच्या इतर नव्या भागीदारांप्रमाणेच भारताचे ऑस्ट्रेलियाशी असलेले संबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.

हे भाष्य मूळतः The Diplomat मध्ये प्रसिद्ध झाले आहे. 

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.