Author : ARYAN KAUSHAL

Published on Oct 11, 2023 Commentaries 0 Hours ago

शिक्षणात स्पेशिअल कम्प्युटिंगचा वापर करण्यासाठी तसेच त्याचे अधिकाधिक फायदे मिळवण्यासाठी या तंत्रज्ञानाचे एकत्रिकरण करणे गरजेचे आहे.

सिद्धांताकडून कृतीकडे – शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी एआर/व्हीआरचा वापर

स्पेशिअल कम्प्युटिंग हे पारंपारिक कम्प्युटिंग आणि प्रोग्रॅमिंगला थ्री डायमेंशनल स्पेससह एकत्रित करते. यामुळे युजर (वापरकर्ता) इंटरफेसमध्ये क्रांती घडून आली आहे. अर्थात यामुळे भारतासारख्या देशांना शैक्षणिक क्षेत्रात त्याचे परिवर्तनकारी फायदे लागू करण्यासाठी एक अद्वितीय संधी मिळाली आहे. संगणनाच्या या स्वरूपाचे ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) आणि आभासी वास्तविकता (व्हीआर) हे दोन मुख्य पैलू आहेत. फोन स्क्रीन, विशिष्ट चष्मा किंवा हेडसेटद्वारे अनुभवलेल्या, वापरकर्त्याच्या वास्तविक जीवनातील वातावरणात डिजिटल पद्धतीने तयार केलेल्या वस्तूंचे अनुभव एआरमध्ये समाविष्ट आहेत. व्हीआरमध्‍ये वापरकर्त्याच्‍या सभोवतालात संगणक-व्युत्पन्न, काल्पनिक त्रिमितीय स्‍थान तयार केले जाते व यात हेडसेटचा वापर केला जातो.

सरकार विविध डिजिटल शिक्षण उपक्रम राबवत असल्याने, एआर आणि व्हीआर हे एकत्रितपणे (एकत्रित मिश्रित वास्तव किंवा एमआर म्हणून ओळखले जाणारे) भविष्यात परिवर्तन आणणारी भूमिका बजावू शकतात.

युनिक इमर्सिव्ह गेमिंग किंवा मनोरंजनाचा अनुभव प्रदान करण्याव्यतिरिक्त, एआर आणि व्हीआरची शिक्षणामधील एकत्रित क्षमता महत्त्वपूर्ण आहे. आभासी वातावरणाचा वापर करून व्हीआर हा शिक्षणाचा अनुभव आकर्षक व परस्परसंवादी होण्यासोबतच विद्यार्थ्यांचे आकलन व ज्ञान टिकवणे व वाढवण्यासाठी उपयोगी ठरतो. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांना पेशी, प्रायोगिक सेटअप आणि ग्रह यासारख्या वस्तूंचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासोबत एआर हा सैद्धांतिक संकल्पनाही समजणे सोपे करतो. भारताच्या शिक्षण व्यवस्थेला सध्या प्रवेश, समानता, गुणवत्ता आणि प्रासंगिकतेची आव्हाने आहेत. सरकार विविध डिजिटल शिक्षण उपक्रम राबवत असल्याने, एआर आणि व्हीआर हे एकत्रितपणे (एकत्रित मिश्रित वास्तव किंवा एमआर म्हणून ओळखले जाणारे) भविष्यात परिवर्तन आणणारी भूमिका बजावू शकतात.

व्हीआर आणि एआरचा समावेश असलेले स्पेशिअल कम्प्युटींग हे २०१६ मध्ये ऑक्युलसने ऑक्युलस रिफ्टच्या नावाने (आता त्यावर मेटाची मालकी असल्याने त्याचे नामकरण आता मेटा क्वेस्ट करण्यात आले आहे) लॉँच केल्यावर चर्चेत आले. यात भौतिक व आभासी विनाखंड अनुभव मिळतो. व्हीआर हेडसेट हे हँड कंट्रोलरच्या वापरासह वापरकर्त्यांना एक अपुर्व अनुभव देतात व आभासी विश्वाची यातून सफर घडते. मायक्रोसॉफ्ट, गुगल, एचटीसी, डेल, सॅमसंग, एचपी, सोनी आणि एप्सन सारख्या असंख्य कंपन्यांनी या आशादायक उद्योगात स्वतःच्या उपकरणांसह बाजारात प्रवेश केला आहे.

स्पेशिअल कम्प्युटिंग आणि शिक्षण

जागतिक स्तरावर शिक्षणात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब वेगाने होत आहे. २०१६ पासून स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ बिझनेस व्हीआर-आधारित प्रोग्राम विद्यार्थ्यांना ऑफर करत आहे. याव्यतिरिक्त, इमर्सिव्ह लर्निंग रिसर्च नेटवर्क (आयएलआरएन) ने एक आभासी परिसर विकसित केला आहे, जो व्याख्याने, कार्यक्रम, नेटवर्किंग आणि त्यांच्या वार्षिक परिषदेसाठी वर्षभर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील व्हीआरचा वापर हा उल्लेखनीय सहयोग आणि अनुप्रयोगांसह वेगाने वाढत आहे. उदाहरणार्थ, ऑक्सफर्ड मेडिकल सिम्युलेशनने ऑक्सफर्ड, युसीएलए, जॉन हॉपकिन्स आणि एनवाययुसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांशी भागीदारी केली आहे ज्यामुळे नर्सिंग, निदान आणि रुग्णांच्या काळजीसाठी व्हीआर वैद्यकीय प्रशिक्षण अनुभव विकसित केले जात आहेत.

मायक्रोसॉफ्टने विद्यार्थ्यांच्या चाचणी गुणांमध्ये २२-टक्के वाढ आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामध्ये ३५-टक्के सुधारणा नमूद करून, शिक्षणातील मिश्र वास्तवाचा सकारात्मक प्रभाव हायलाइट केला आहे.

एआर/व्हीआर अंमलबजावणी स्टेम (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीअरींग आणि मॅथमॅटिक्स) विषयांच्या पलीकडे विस्तारली आहे व सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षणासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. ईएसएजीई बिझनेस स्कूल व्हर्च्युअल कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना आणि कर्मचार्‍यांना खिळवून ठेवणारा अपुर्व अनुभव देण्यासाठी आभासी वास्तविकतेची मदत घेतली जात आहे. यात इतरांशी संवाद साधणे, मेटाव्हर्सच्या व्यावहारिक उपयोज्यतेबद्दल माहिती घेणे व नवनवीन प्रयोग करणे अपेक्षित आहे. यामुळे रोजगारक्षमता व डिसरप्टीव कौशल्यांमध्ये वाढ होत आहे.

याशिवाय, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांनी देखील शिक्षणातील मिश्र वास्तवाच्या भूमिकेबद्दल त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट केला आहे. मायक्रोसॉफ्टने विद्यार्थ्यांच्या चाचणी गुणांमध्ये २२-टक्के वाढ आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामध्ये ३५-टक्के सुधारणा नमूद करून, शिक्षणातील मिश्र वास्तवाचा सकारात्मक प्रभाव हायलाइट केला आहे. हॉलोलेन्स हे प्रशिक्षणासाठी लागणारा वेळ कमी करून शिक्षक उत्पादकता वाढवू शकते, असेही त्यांनी नमुद केले आहे. गूगलच्या अवकाशीय संगणन तंत्रज्ञान, कार्डबोर्ड आणि टिल्ट ब्रशमुळे देखील विद्यार्थ्यांना अधिक आकर्षक शैक्षणिक अनुभव मिळत आहे. शिक्षणातील या तंत्रज्ञानाच्या वापराचे अनेक फायदे असले तरी, एमआर उद्योग गेल्या काही वर्षांत घसरला आहे. ५ जून २०२३ रोजी अॅपलच्या डब्लूडब्लूडीसी २३ च्या व्हिजन प्रो हेडसेटच्या अनावरणप्रसंगी या गोष्टीची प्रचिती आली आहे. अॅपलने या तंत्रज्ञानाला अवकाशीय संगणनाचे भविष्य म्हटले आहे व यातूनच पुढे शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रावर एमआरच्या प्रभावाचा पुनर्विचार करण्यास प्रवृत्त केले आहे.

प्रमुख आव्हाने

अॅपलच्या व्हिजन प्रो सारख्या उपकरणांमुळे अनेक आव्हाने समोर आली आहेत. सर्वप्रथम, ज्यांना ३५०० अमेरिकन डॉलरचा हेडसेट परवडणार आहे त्यांनाच या तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार आहे. अॅपल जरी  परवडणारे हेडसेट विकसित करण्याचा प्रयत्न करत असला तरी भारतासारख्या देशात अशा उत्‍पादनाचा वापर केवळ देशामधील उत्‍पन्‍नाची असमानता दाखवणारा आहे. इतर हेडसेट जरी कमी खर्चिक असले तरी ते फार कमी लोकांनी परवडणारे आहेत. देशातील १ टक्‍क्‍यांहूनही कमी लोक आयफोन विकत घेऊ शकत असल्यामुळे, डिजिटल डिव्हाईड रुंदावून आधुनिक अवकाशीय संगणन तंत्रज्ञानाचा फायदा केवळ श्रीमंतांनाच मिळेल यात शंका नाही. सर्वात महागड्या संस्थांमध्ये शिक्षण आणि शिकण्याच्या गुणवत्तेच्या संदर्भात याचा स्पर्धात्मक फायदा होणार आहे. जर फक्त श्रीमंत कुटूंबातील विद्यार्थी याचा वापर करून अधिक चांगले शिकू शकले, तर त्यांना कौशल्य विकास आणि उच्च शिक्षण व रोजगाराच्या शक्यतांमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. असे झाल्यास इतर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या प्रगतीच्या शक्यता मर्यादित होऊन पुढील काळात आर्थिक असमानता वाढण्यास मदत होईल.

सर्वात महागड्या संस्थांमध्ये शिक्षण आणि शिकण्याच्या गुणवत्तेच्या संदर्भात याचा स्पर्धात्मक फायदा होणार आहे.

दुसरीकडे, आयआयटी मद्रासने विकसित केलेले शिक्षण सोपे करणारे मॉडेल हे ग्रामीण भागातील वंचितांसाठी शिक्षणातील स्थानिक संगणकीय एकात्मतेला चालना देणारे ठरत आहे. यातून अनेक फायदे मिळणार आहेत. शिवाय, आयआयटी भुवनेश्वरने भारतीय एआर/व्हीआर स्टार्ट-अप्सना तांत्रिक मार्गदर्शन, परिषदा, नेटवर्किंग इ.च्या स्वरूपात दिलेली मदत हे भारतातील अवकाशीय संगणन उद्योगाच्या योग्य टप्प्यावर वाढीस समर्थन देण्यासाठी आणखी एक सकारात्मक पाऊल आहे. अशाप्रकारचे दृष्टीकोन तंत्रज्ञानाचा प्रवेश सुनिश्चित करतात तसेच शिक्षणाच्या संधी वाढतात आणि गरीब सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील व्यक्तींच्या जीवनाची गुणवत्ता सुधारतात.

इतर आव्हाने

शैक्षणिक संस्थांमध्ये अवकाशीय संगणन समाकलित केल्याने गोपनीयतेला धोका निर्माण होतो हे स्पष्ट झाले आहे. उदाहरणार्थ, व्हिजन प्रोचा अनुभव देण्यासाठी डिव्हाइसमध्ये १२ कॅमेरे आणि सहा मायक्रोफोन वापरले जातात. वापरकर्त्याचे डोळे, आवाज आणि वापरात असताना त्याच्या जवळचा परिसर सतत रेकॉर्ड केला जातो. एआर/ व्हीआर हेडसेटप्रमाणेच, त्याच्या ऑपरेशनसाठी कॅमेरे आणि माइकची आवश्यकता असते व  त्यात सतत मोठ्या प्रमाणात वैयक्तिक माहिती आणि बायोमेट्रिक डेटाचा मागोवा घेतला जातो. परिणामी वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षितता धोक्यात येते. म्हणूनच, खाजगी डेटाच्या सामायिकरणास प्रतिबंध करणारे, सुरक्षिततेचे उल्लंघन आणि परिणामी ओळख चोरीचा धोका कमी करण्यास भाग पाडणारे कठोर नियम आणि कायदे अंमलात आणणे अत्यावश्यक आहे.

एआर/ व्हीआर हेडसेटप्रमाणेच, त्याच्या ऑपरेशनसाठी कॅमेरे आणि माइकची आवश्यकता असते व  त्यात सतत मोठ्या प्रमाणात वैयक्तिक माहिती आणि बायोमेट्रिक डेटाचा मागोवा घेतला जातो. परिणामी वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षितता धोक्यात येते.

याशिवाय, एमआर डिव्हाइसेस वापरताना विद्यार्थ्यांना हेडसेट घालावे लागतात. हे हेडसेट स्मार्टफोन्सपेक्षाही अधिक प्रमाणात विद्यार्थ्यांना वास्तवापासून दूर आभासी जगात गुंतवून ठेवतात. स्पेशिअल कम्पुटिंग (अवकाशीय संगणन) आणि विद्यार्थ्यांना लागणाऱ्या त्याच्या व्यसनामुळे सामाजिक अलगाव होण्याच्या जोखमीला सामोरे जावे लागते. सामाजिक परस्परसंवादात अशी घट विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकते, ज्यामुळे अलगाव आणि एकाकीपणा, भावनिक अलिप्तता वाढून सहानुभूती कमी होते.

वास्तावाला सामोरे जाताना

एमआर ही काहींसाठी एक मनोरंजक गोष्ट असली तरी आज आपण तंत्रज्ञान कसे वापरतो याच्या अनेक शक्यता खुल्या करणारी बाब आहे. यात अनेक धोके आहेत व त्याचा आपल्यावर वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर परिणाम होणार आहे. या तंत्रज्ञानाकडे पाहताना त्यात आपले भविष्य कायमचे बदलण्याची संधी आहे हे स्पष्ट आहे.

वर नमूद केल्याप्रमाणे आयआयटी मद्रासचे संशोधन आणि आयआयटी भुवनेश्वरचे एआर/ व्हीआर स्टार्ट-अप इनक्युबेशन व्यतिरिक्त, शिक्षणात अवकाशीय संगणनाच्या एकात्मतेमध्ये योग्य प्रगतीला चालना देण्यासाठी देशांतर्गत लक्षणीय विकास होत आहे. २०२२ मध्ये झालेल्या डिजिटल इंडिया वीक दरम्यान एआर/ व्हीआर स्टार्ट-अप्सना एआर/ व्हीआर तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यासाठी मदत करण्याच्या भारत सरकारच्या मोहिमेद्वारे राष्ट्रीय विकासाचे साधन म्हणून या उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी नागरिक आणि सरकारी समर्थन स्पष्ट झाले आहे. डिजिटल इंडिया उपक्रमात त्याचा समावेश होण्यासाठी एमआर तंत्रज्ञान ही एक आश्वासक बाब आहे.

तंत्रज्ञान झपाट्याने प्रगती करत असताना, देशाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्दिष्टांशी त्याची प्रगती संरेखित करणे महत्त्वाचे आहे. आपल्या अनोख्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशामुळे, भारतामध्ये पुढील काही दशकांमध्ये एक जागतिक सत्ता म्हणून उदयास येण्याची क्षमता आहे आणि शिक्षण यामध्ये परिवर्तन घडवून आणू शकते. म्हणूनच, भविष्याला आकार देण्यासाठी आणि राष्ट्राची क्षमता अनलॉक करण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखून शिक्षणाला प्राधान्य देणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.

आर्यन कौशल ऑब्झर्वर रिसर्च फाऊंडेशनच्या जिओ इकॉनॉमिक्स प्रोग्राममध्ये इंटर्न आहेत.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.