कोरोनाने इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच शिक्षण क्षेत्रासमोरही मोठे प्रश्न उभे केले आहेत. प्रवेश, परीक्षा, निकाल या साऱ्या व्यवस्थांचे तीनतेरा वाजले आहेत. पण, कोरोना संकट हे पारंपरिक प्रकारच्या अध्ययनाची पुनर्रचना करण्याची मोलाची संधी असल्याचे मानत, इस्रायली शिक्षणव्यवस्थेने शाळा, महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावर नाविन्यपूर्ण बदल राबवायला सुरुवात केली आहे. भारतातही डिजिटल शिक्षणाचे हे आव्हान आपल्याला पेलावेच लागणार आहे. ते करताना अडचणीही असतील. पण त्यावर कल्पकतेने आणि सातत्याने मात करावीच लागेल.
ऑनलाइन शिक्षण आणि आपण
‘स्टार्ट अप नेशन’ म्हणवल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानात आघाडीचे स्थान संपादन केलेल्या इस्रायलने कोरोना संकटाच्या वेळेस ऑनलाइन शिक्षणाकडे तातडीने लक्ष पुरवले, यात मोठे ते काय? असेही अनेकांना वाटेल. भारतासारख्या देशात जिथे लहान घरे आहेत, संगणक असलेल्या घरांची संख्या कमी, तंत्रज्ञान वापरणाऱ्या शिक्षकांची संख्या जिथे फारच कमी, पालक एक तर कामात व्यग्र किंवा त्यांना मुलांना शिकवता येणे अशक्य अशी स्थिती आहे… अशा प्रतिकूल परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण आपल्याला त्यांच्यासारखे कसे राबवता येईल, असा प्रश्न आपल्या साऱ्यांच्याच मनात उपस्थित होतो, पण हे लक्षात घ्यायला हवे की, आव्हाने प्रत्येक देशातच आहेत, प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असल्याने समस्येचा प्रारंभ बिंदू वेगळा असतो, इतकेच!
याविषयी दि ए. ऑफ्री मशाव इंटरनॅशनल एज्युकेशनल ट्रेनिंग सेंटरचे उपसंचालक डॅमिअन फिलट म्हणाले की, इस्रायलमध्ये घरात कमी जागा, अत्यावश्यक सेवेत व्यग्र असल्यामुळे पाल्यांना वेळ देऊ न शकणारे पालक, प्रत्येक मुलाला संगणक उपलब्ध नसणे अशा समस्या भेडसावतातच, मात्र ज्ञान-कौशल्ये विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचवता येतील, याचा विचार प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करायला हवा.
कोरोना संकटाची चाहूल लागल्यानंतर इस्रायलच्या शिक्षण विभागाने त्वरित कार्यवाही करत, इयत्तेनुसार विषयवार अभ्यासक्रम आणि अध्ययनपाठ वेबसाइटद्वारे उपलब्ध करून दिले. शिक्षकांसाठी ‘झूम’ची हजारो अकाऊंट्स सुरू केली. शिक्षकांना अद्ययावत तंत्रज्ञान शिकण्याकरता व ऑनलाइन अभ्यासक्रम राबविण्याकरता ऑनलाइन क्लासेस, मीटिंग्जचे आयोजन केले. शिक्षकांसाठी ऑनलाइन शिक्षण परिणामकारक कसे देता येईल, याचे विनामूल्य शिकवणीवर्ग उपलब्ध झाले. केवळ सरकारी पातळीवरच नव्हे, तर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही आपला खारीचा वाटा उचलून शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षणवर्गांचे आयोजन केले आहे.
नाविन्यपूर्ण शिक्षण कसे असेल, याविषयीच्या कार्यशाळेत इस्रायली शिक्षणतज्ज्ञांचा पहिला पाठ असतो, तो म्हणजे- जर तुम्ही नवी शाळा सुरू केलीत, तर ती कशी असेल, सांगा बरे! कोरोना संकटामुळे त्यांचा हा पाठ सत्यात उतरला आहे. जगभरच्याच शाळांना, शिक्षकांना आणि शिक्षणतज्ज्ञांना कोरोनाच्या कालावधीत आणि कोरोनोत्तर काळात कल्पकता वापरून पारंपरिक शिक्षणपद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
हे सारेच सर्वोत्तम पद्धतीने सुरू आहे, असा त्यांचा दावा नाही, तेथील शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षण विभाग हे सारे प्रायोगिक तत्त्वांवर करून बघत आहेत, आणि चुकांतून शिकत पुढे सरकत आहेत. आपण मात्र, पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने तंत्रज्ञानाचा अनिवार्य वापर असणारी नवी अध्ययन प्रक्रिया कशी राबवणार, यापाशीच येऊन थांबत आहोत, त्याऐवजी तंत्रज्ञान आज किती परिणामकारक ठरत आहे, हे लक्षात घेत त्याचा वापर करण्याविषयीचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक करीत संस्थात्मक पातळीवर याची दखल घेतली जाणे, अत्यावश्यक ठरते. स्मार्ट फोन, शिक्षकांचे, शिक्षक-पालकांचे व्हॉट्स अप ग्रूप, झूमसारखे तंत्रज्ञान याद्वारे ऑनलाइन प्रशिक्षणाची सुरुवात करता येणार नाही का? ऑनलाइन शिक्षणातून मिळणारी स्वायत्तता आणि स्व-अध्ययन हीही मोठी जमेची बाजू आहे, हे विसरता कामा नये.
कोरोना कालावधीतील तसेच त्यानंतरचे शिक्षण
‘कोरोना कालावधीतील आणि त्यानंतरचे शिक्षण’ या संदर्भात बोलताना इस्रायलमधील शैक्षणिक शहरांचे निर्माते डॉ. याकोव म्हणाले की, खरे तर प्रत्येक मुलाला वेगळ्या प्रकारच्या शाळेची आवश्यकता असते, कारण प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययनाची पद्धत वेगळी असते; पण नेहमीच्या- पारंपरिक शाळांमध्ये सर्वांना सारख्या पद्धतीने शिकावे लागते. मात्र, कोरोना संकटामुळे ऑनलाइन शिक्षणाकडे वळताना पारंपरिक शिक्षणाने उभ्या केलेल्या भिंती नाहीशा करणे शक्य आहे का, हे शिक्षकांनी आणि शाळांनी बघायला हवे. ऑनलाइन शिक्षणात कधी, कसे आणि काय शिकायचे याचे पर्याय निर्माण करता येतील.
ऑनलाइन पाठांतून आपल्याला नेमके काय साध्य करायचे आहे, हे शिक्षकांनी ठरवायला हवे. नवनव्या कल्पनांतूनच शिक्षकांना यासंबंधीचे नवे उपक्रम राबवता येतील आणि त्यातूनच नवा बदल घडू शकतो. जेव्हा रुटीन सुरू असते, त्यातून बदल घडणे मुश्कील असते. मात्र, आता कोरोना संकटामुळे शाळा बंद आहेत, या परिस्थितीत अध्यापनाच्या पारंपरिक कल्पना उपयोगी नाहीत. आता नवे काय करता येईल, याची स्वायत्तता खरे तर प्रत्येक शिक्षकाला आणि शाळांना मिळाली आहे, याला उपयोग त्यांनी करून घ्यायला हवा.
इस्रायलमध्ये अनेक प्रयोगशील शाळांची निर्मिती करणारे डॉ. याकोव यांनी सांगितले, ‘आइन्स्टाइनचे ‘एव्हरीबडी इज अ जिनीअस’ हे वाक्य शाळांनी आणि शिक्षकांनी लक्षात ठेवायला हवे. पारंपरिक शिक्षणव्यवस्था सर्व मुलांना अभ्यासक्रमाच्या एकाच चौकटीत कोंबतेआणि गुणांच्या पिरॅमिडनुसार काहींवर हुशार आणि काहींवर अपयशी असा शिक्का मारते. या संकटकाळाने शिक्षकांना पुस्तकांच्या पलीकडे पोहोचत प्रत्येक मुलामधले वेगळेपण शोधण्याची संधी दिली आहे. पारंपरिक शिक्षण हे शाळाकेंद्री असते, नवा शिक्षणप्रवाह हा विद्यार्थीकेंद्री करता येईल. इथे सर्वच शिक्षक आणि सर्वच विद्यार्थी असू शकतील. सर्वांना एकत्रितरीत्या शिकता व शिकवता येईल.’
काय शिकायचे, हे ठरवताना विद्यार्थ्यांचे मत लक्षात घेतले, तर त्यांचा शिकण्यातील सहभाग वाढू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.ही संकल्पना स्पष्ट करताना ते म्हणाले की, उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना अधिक संदर्भ शोधता आले तर विद्यार्थ्यांना ते परस्परांमध्ये शेअर करता येईल आणि कमीत कमी वेळात एखाद्या पाठाविषयीची अधिक माहिती सर्वांना उपलब्ध होऊ शकेल. जर पाठातील एखादा भाग कुणा विद्यार्थ्याला कळला नाही, तर तो प्रश्न विचारू शकतो अथवा त्याचा एखादा वर्गमित्र त्याला तो भाग समजावून देऊ शकतो. अशा प्रकारे या पद्धतीत परस्परांकडून शिकण्यास प्रोत्साहन मिळते.
ऑनलाइन शिक्षण हे कमी पैशात उपलब्ध होणारे शिक्षण आहे. काही शाळा एकत्र येऊन अशा प्रकारचे उपक्रम राबवू शकतातआणि याद्वारे जगभरातील अनेक शाळांचे विद्यार्थी एकत्र शिकू शकतात. अशा प्रकारचे अध्ययन स्वारस्यपूर्ण आणि उत्कट तर होतेच, पण एखाद्या गोष्टीचे सखोल अध्ययन करताना वेगवेगळ्या गोष्टी आवश्यक असतात, हेही विद्यार्थ्यांना स्वत:हून कळते, असेही डॉ. याकोव म्हणाले.
नाविन्यपूर्णतेद्वारे मोठा बदल घडवण्याची संधी
नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धतींविषयी संशोधन करणाऱ्या आणि प्रशिक्षण देणाऱ्याजेरुसलेममधील‘इप्का’या संस्थेचे ज्येष्ठ पदाधिकारी इरान बराक म्हणाले की, पारंपरिक शिक्षण पद्धतीत मोठे बदल होण्याची आवश्यकता सर्वांनाच जाणवते खरी, पण त्या दृष्टीने शालेय स्तरावर तरी फारसे बदल होताना दिसत नाहीत. मात्र कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पारंपरिक शिक्षणव्यवस्थेत तातडीने आणि आमूलाग्र बदल करण्याची संधी जगभरच्या देशांना प्राप्त झाली आहे. नाविन्यपूर्ण शिक्षणाद्वारे हे करता येणे शक्य आहे.
सर्वसामान्य परिस्थितीत पारंपरिक शिक्षणपद्धतीत बदल घडवू पाहणाऱ्या शाळा आणि शिक्षकांना प्रमुख आडकाठी असू शकते ती शिक्षण खात्याची. मात्र, कोरोना संकटाने हा अडसर दूर केला असून ऑनलाइन शिक्षण देताना शिक्षकवर्ग त्यांची कल्पकता वापरूनविद्यार्थ्यांचे अध्ययन स्वारस्यपूर्ण करू शकतात, असे मत इरान बराक यांनी नमूद केले.
शाळांच्या वेळापत्रकात, शिकवण्याच्या पद्धतींतील आखीवरेखीवपणाने तोच तो पणा आलेला असतो, अमूक एका विषयाची अमूक एक तासिका- ठरलेल्या पद्धतीने, मर्यादित वेळी शिक्षक वर्गातील मुलांना शिकवणार, हे ठरलेले असते. कोरोनाच्या संकटाने यात आमूलाग्र बदल घडवण्याची संधी, शाळा- महाविद्यालये आणि शिक्षकांना प्राप्त झाली आहे. ऑनलाइन पद्धतीमुळे चाकोरीपलीकडे झेपावत, शिक्षकांनाआगळ्या प्रकारे अध्यापन आणि मूल्यांकन करता येईल. यात वेळापत्रक लवचिक ठेवत नेमके काय आणि कसे शिकवायचे हे निश्चित करणे आवश्यक आहे.
आजचा विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी शिक्षकांवर अवलंबून नाही. माहिती व ज्ञान मिळवण्यासाठी इतर अनेक स्रोत त्याच्यापाशी उपलब्ध आहेत. अशा वेळी शिक्षकांनी फॅसिलिटेटरची भूमिका निभावणे आवश्यक ठरते आणि आजच्या परिस्थितीत शाळा व शिक्षकांनी हेच लक्षात घ्यायला हवे.
कोरोनाने साऱ्या प्रचलित यंत्रणा ठप्प झाल्यानंतर अमेरिका, इंग्लंडसारखे इस्रायलच्या शिक्षण विभागाने आपल्या शिक्षणव्यवस्थेत तातडीने बदल केले आणि हे बदल अमलात आणण्याकरता शाळांना प्रेरित केले. पाश्चात्य देशांमध्ये या सुधारणा घडविण्यासाठी बाहेरील सल्लागारांची मदत घेतली गेली होती, इस्रायलमध्ये मात्र, तेथील शिक्षणतज्ज्ञांनी एक ढोबळ आराखडा शाळांना आखून दिला. अभ्यासक्रमाचा मूळ ढाचा कायम ठेवत, ऑनलाइन पद्धतीने शिकवताना कसे शिकावे, काय शिकवावे, हे ठरविण्याची लवचिकता शाळांना देण्यात आली आहे. त्यामुळे तेथील शाळांनी पारंपरिक शिक्षकांच्या मदतीनेच ऑनलाइन शिक्षणाचे प्रारूप राबवायला सुरुवात केली आहे. नाविन्यपूर्ण पद्धतींनीशिकवताना ‘कमी शिका- सावकाश पुढे जा’ हा मंत्र जणू प्रत्येक शाळा जपत आहे.
ही नाविन्यपूर्ण व्यवस्था अमलात आणताना या शिक्षणात स्पष्टता असावी, ते सुलभ असावे, व्यावहारिक असावे आणि नाविन्यपूर्ण असावे, या निकषांचे कटाक्षाने पालन करण्यात येत आहे.ऑनलाइन अभ्यासक्रम राबवताना तेथील शाळांनी केवळ प्रमुख दोन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करावे, असेही निश्चित करण्यात आले आहे. यामुळे आपोआपच काय साध्य करायचे आहे, यात नेमकेपणा आला व त्यानुसारशिक्षकांनी उपक्रम ठरवले. वेळापत्रक, कुठले पाठ शिकवायचे, शैक्षणिक उपक्रम कुठले वकसे घेणार याचे स्वातंत्र्य शाळांना बहाल करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना विषय समजावा,त्यांना कौशल्ये प्राप्त व्हावीत, हे यात अध्याहृत आहेच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या स्व-क्षमतांच्या जपणुकीपासून- स्वतंत्रपणे अध्ययन करण्यापर्यंतचा असा हा प्रवास असावा, याकडेही लक्ष पुरवले जात आहे.या संकटाच्या काळात या अभिनव पद्धतीमुळे शाळा, शिक्षक यांचा भावनिक आधार विद्यार्थ्यांना मिळण्यावरही भर दिला जात आहे. यामुळे शाळांशी विद्यार्थ्यांचे असलेले आंतरिक नाते जपले जात आहे.
इस्रायलच्या शाळांनी जी उद्दिष्टे निश्चित केली, त्यानुसार विविध अध्ययनाच्या नमुन्यांची रचना करण्यात आली. उदाहरणादाखल आपण वैयक्तिकीकरण नमुना (personalization Model) रचना पाहूयात-या पद्धतीत, सुरुवातीला विद्यार्थ्यांना काय शिकण्यात रूची वाटते, याचे विश्लेषण करण्यात आले. अभ्यासक्रमाच्या परिघातील ज्ञान आणि कौशल्ये विद्यार्थ्याला प्राप्त व्हावीत, हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. घरी असताना मुलांमधील अध्ययनाची प्रेरणा वाढलेली असते, कारण त्यांच्यावर शाळेत कामगिरी बजावण्याचा जसा ताण असतो, तो नसतो. मुले घरी मोकळेपणाने शिकत असतात, मात्र अशा वेळी त्यांची रूची लक्षात घेतली नाही, तर आपल्यावर अकारण हा विषय अथवा पाठ लादला गेला आहे, अशी त्यांची भावना होऊन त्या विद्यार्थ्याची अध्ययनातील प्रेरणा कमी होऊ शकते, हा मुद्दाही लक्षात घेतला गेला.मोठी विद्यार्थिसंख्या असलेल्या मिटिंग्ज टाळून, लहान गटबैठकांचे नियोजन केले तर विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देता येते, हेही ध्यानात घेतले गेले.
ऑनलाइन शिक्षणात मूल्यांकन आणि मूल्यमापन नेमके कसे करावे, हा प्रश्न अनेकांना भेडसावतो. यावर इस्रायली शाळांमध्ये प्रामुख्याने असे अभ्यासपाठ शिक्षक तयार करतो, ज्याची उत्तरे विद्यार्थ्याला शिकवताना-शिकताना स्क्रीनवर सबमीट करायची असतात, त्याचबरोबर विद्यार्थ्याची प्रतिबद्धता(एंगेजमेन्ट), विद्यार्थ्याची तत्परता, त्याचा मूड, नव्या प्रकाराशी जुळवून घेण्याची क्षमता आणि त्याची एकूण कामगिरी या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जातात.
ऑनलाइन अध्ययनासाठी शिक्षकांची टीम कशी तयार करावी, यासंबंधी इस्रायली शाळांचे उदाहरण वाखाणण्याजोगे आहे. यात काय, किती शिकवले जावे इथपासून दररोज किती उपक्रम राबवावेत, हे निश्चित केलेले असते. अनिवार्य विषयांचा अंतर्भाव त्यात असतो,शिक्षकांना दिवस व वेळ नेमून दिला जातो अथवा विद्यार्थी विभागून दिले जातात.प्रत्येक शिक्षक कुठल्या ना कुठल्या विषयात पारंगत असतात, काही निवेदनात, तर काही तंत्रज्ञान विषयातही जाणकार असतात. उपक्रम तयार करण्याकरता शिक्षकांना मदतनीस म्हणून सहशिक्षकांचेही सहाय्य घेतले जाते. अशा प्रकारे प्रत्येक शाळेची प्रशिक्षक टीम तयार करण्यात आली आहे, जेणे करून शाळेला बाहेरील कुणावर मदतीसाठी अवलंबून राहावे लागत नाही.
ऑनलाइन शिक्षणातून शाळा आणि शिक्षकांना पालकांचे सहकार्य अजमावता येतेतसेच विद्यार्थ्याचे पालकासोबत असलेले नाते समजून घेता येते. ऑनलाइन शिक्षणक्रम राबविताना शाळेची पालकांकडून असलेली अपेक्षा, पालकांची शाळेकडून असलेली अपेक्षा आणिझालेल्या पाठांबाबत पालकांचे अभिप्राय याकडे प्रत्येक शाळेने पुरेसे लक्ष दिले आहे. पालकांना प्रेरित करणे, पालकांना कशा प्रकारे आणि कधीसंपर्क साधावा, याचेही ठोकताळे इस्रायली शाळांनी निश्चित केले आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी शिकत असताना त्याची कुटुंबव्यवस्था समजून घेणे शक्य बनले आहे
वैयक्तिक अध्ययनाद्वारे विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते, हे या नव्या शिक्षणपद्धतीविषयी संशोधन विषयक अहवालांमध्ये स्पष्ट होत आहे. नव्या क्षमता लक्षात आलेल्या शालेय शिक्षकांच्या टीमची या संकटकाळात तर मदत होत आहेच, पण त्याचबरोबर भविष्यकालीन शिक्षणव्यवस्थेचे बीजही यांतून रोवले जात आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वत:हून शिकणारा विद्यार्थी यांतून तयार होत आहे, उच्च शिक्षण घेताना ही बाब विद्यार्थ्याला खूपच सहाय्यक ठरणार आहे.
कोरोना संकट निवळल्यानंतर शिक्षक-विद्यार्थी पुन्हा पारंपरिक पद्धतीच्या शालेय शिक्षणात परतणार जरी असले तरी, या दरम्यानच्या काळात त्यांना आपल्या शाळेचे अनोखे वैशिष्ट्य लक्षात आले असेल. ते त्यांनी जोपासायला हवे. वैयक्तिक अध्ययन वाढण्यासाठी पारंपरिक शिक्षणातही तंत्रज्ञानाचा वापर वाढायला हवा.
उद्योजकतेकडे वळायला हवे
इस्रायलच्या शिक्षण विभागासोबत काम करणाऱ्या ‘फंड ऑन इनोव्हेटिव्ह एज्युकेशन’ या संस्थेचे द्रोर झकाय यांनी सांगितले की, कोरोना संकटाचा शिक्षण क्षेत्रावर किती परिणाम होईल, हे आताच वर्तवणे जरी कठीण असले, तरी या परिस्थितीकडे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी उद्योजकता आणि नव्या उपक्रमातील पुढाकार अशा दृष्टिकोनातून पाहायला हवे.
इथे उद्योजकतायाचा अर्थ- बदलत्या परिस्थितीत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कोणती नवी कौशल्ये आत्मसात करावी लागतील असा होतो. या संकटकाळात शिक्षण आणि अभ्यासक्रमात बदल करण्यासाठी व्यवस्थेत कोणते बदल करावे लागतील, यासाठी आखावे लागणारे नवे मार्ग म्हणजेच पुढाकार घेणे. अशा वेळी शिक्षकांनी उद्योजकाची वृत्ती अवलंबायला हवी. जबाबदारी घेत सृजनशीलतेने आणिअर्थपूर्ण पद्धतीने शिक्षणाची पुनरर्चना करणे महत्त्वाचे ठरते.
आजवर पारंपरिक पद्धतीने शिकविणाऱ्या शिक्षकवर्गाला त्यांचा ‘कम्फर्ट झोन’ सोडून शैक्षणिक कौशल्यांच्या आणि साधनांच्या नव्या वर्तुळात प्रवेश करावाच लागेल. कोरोना संकटाच्या काळात परिणामकारक शिकवण्याच्या दृष्टीने नव्या अध्यापन-अध्ययन पद्धती निर्माण कराव्या लागतील.
कोरोना काळात शिक्षण क्षेत्रातील उद्योजकता विकास चक्र निर्मितीत पुढील घटकांचा समावेश होतो- गरज लक्षात घेणे, शिकताना अधिक माहिती मिळवणे (संशोधन) आणि त्या अनुषंगाने नवी स्वप्ने पाहणे, संकल्पनात्मक विकासावर काम करणे, कामाचा प्रारंभिक मसुदा बनवणे, त्याची अमलबजावणी करणे, त्याचे मूल्यांकन करणे व सुधारणा घडवणे.
हा कालावधी ‘क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन’चा!
इस्रायलचे इनोव्हेशन विषयक शैक्षणिक प्रणालीचे ज्येष्ठ तज्ज्ञ द्रोर झकाय यांनी या संकटसमयी, जगद्विख्यात अर्थतज्ज्ञ शुम्पिटर यांच्या ‘क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन’ या सिद्धान्ताचा विचार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘सृजनशील विध्वंसाने जीवनमानाचा दर्जा उंचावतो आणि प्रगती साधता येते. बदलाला विरोध असणाऱ्यांकडून प्रतिकार होण्याची शक्यता असते. अनेक यशस्वी कंपन्या त्यांची व्यापार योजना यशस्वी झाली, म्हणून तेच ते करत राहण्याऐवजी भविष्यकालीन नव्या संधींचा शोध घेत असतात.
यश संपादन करण्यासाठी ‘सृजनशील विध्वंस’ अर्थात ‘क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन’घडवणारे नेतृत्व आवश्यक ठरते. व्यवस्थेत व्यत्यय आणणारी, विघटन घडवणारी नाविन्यपूर्णता अर्थात इनोवेशनमुळे नव्या बाजारपेठा निर्माण होतात. अस्तित्वात असलेल्या बाजारपेठांमध्ये कालौघात अडथळे निर्माण होऊन पुराणमतवादी बाजारपेठांच्या जागी नव्या बाजारपेठा स्वार होतात. परंपरागत बाजारपेठांमध्ये क्रांतिकारी बदल होतात आणि नव्या ग्राहकांकडे बाजारपेठ वळते.’
कोरोनाच्या संकटाने आतापर्यंत सद्य शिक्षणव्यवस्थेत जे अडथळे निर्माण झाले आहेत, ते पाहुयात. या संकटामुळे अध्ययनाची गती बदलली. समूह अध्ययनाच्या ऐवजी व्यक्तिगत अध्ययन असा प्रवास सुरू झाला.वेळेचे परिमाण बदलले. शिक्षण देण्या-घेण्यात एक भौतिक अवकाश निर्माण झाला.शिक्षणात स्वायत्तता आली, विद्यार्थी आणि अध्यापकांना आवश्यक ठरणाऱ्या कौशल्यांमध्ये बदल झाला, विद्यार्थिसंख्या, त्यांचा वयोगट, वर्गाचा सामाजिक स्तर या गोष्टी बिनमहत्त्वाच्या ठरल्या.
हे सारे पाहिले तर लक्षात येते की, संकट काळ ही इनोवेशनसाठी सुपीक भूमी असते. या संकटाने शिक्षकांना तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात आले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जो भौतिक अवकाश निर्माण झाला आहे, तो इस्रायली शाळांनी लक्षात घेतला आणि परिस्थितीजन्य उदाहरणांचा वापर केला. म्हणजे गणितीहिशेबासाठी बेकिंग, स्वयंपाक पद्धतींचा वापर कसा करता येईल, ते विचारात घेतले गेले.
या नव्या शिक्षणपद्धतीत शिक्षकांकडून तीन प्रकारच्या व्यावसायिक कृती होणे आवश्यक ठरते. त्या म्हणजे प्रयोगशील उपक्रमांचे व त्यातील प्रक्रियांचे दस्तावेजीकरण करणे, हे प्रयोगशील उपक्रम अभ्यासक्रमाच्या चौकटीत बसवणे, संकल्पना निर्मिती करणे आणि या संपूर्ण अनुभवाला सिद्धान्ताशी जोडणे. याचे काटेकोर पालन नवे उपक्रम राबवताना इस्रायली शाळा करताना दिसतात.
या नव्या बदलाला सामोरे जाताना डिजिटल साक्षरता असणे, पुरेसे संगणक उपलब्ध असणे आणि त्याकरता अत्यावश्यक ठरणारी मानसिक तयारी असणे ही प्रमुख आव्हाने आहेत. मात्र, नाण्याला दोन बाजू असतात, हे आपण विसरता कामा नये. संकटकाळात आपण फक्त आव्हानांवर आणि वाईट बाजूंवर लक्ष केंद्रित करतो, त्याऐवजी परिस्थितीशी जुळवून घेत त्यावर स्वार होणे महत्त्वाचे असते, हे कोरोना संकटकाळात शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल घडवणाऱ्या इस्रायलच्या नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धतीने दाखवून दिले आहे.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.