Author : Cahyo Prihadi

Published on Aug 28, 2020 Commentaries 0 Hours ago

सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणारे महागडे शिक्षण, त्यातून आलेला कर्जबाजारीपणा, शिक्षणसंस्थांमधील गोंधळ यामुळे अमेरिकन जनतेच्या मनात असंतोष आहे.

अमेरिकेतील निवडणुकीत ‘शिक्षण’ कुठेय?

आज अमेरिकेमध्ये निवडणुकीचे नगारे वाजत आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या अमेरिकेसमोर असलेल्या अनेक प्रश्नांची तावातावाने चर्चा होत आहे. त्यातील एक बिकट प्रश्न आहे, तो अमेरिकेतील शिक्षणव्यवस्थेचा. जगभरातील मुले ज्या अमरिकेत शिकण्यासाठी जाण्यासाठी धडपडतात, तिथे कसला आलाय शिक्षणाचा प्रश्न असा प्रश्न अनेकांना पडेल. पण, प्रचंड महागडे शिक्षण, त्यातून आलेला कर्जबाजारीपणा, त्यातच शिक्षणसंस्थांमधील गोंधळ आणि एकंदरीतच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणारे शिक्षण यामुळे अमेरिकन जनतेच्या मनात असंतोष आहे.

आज अमेरिकेतील सुमारे ४ कोटी तरुणांच्या खांद्यावर, सुमारे १.३ लाख कोटी डॉलरचे कर्ज आहे. शिकण्यासाठी घेतलेले हे कर्जं त्याना फेडता येत नाही. त्यातून मग नैराश्य, आर्थिक गुन्हे असे अनेक प्रकार घडतात. पब्लिक कॉलेज हे तुलनेने स्वस्त असते. तिथे साधारणतः एक वर्षाची फी २८ हजार डॉलर असली, तर खासगी कॉलेजाची फी सरासरी ४१ हजार डॉलर एवढी असते. त्यात अभ्यासक्रम आणि कॉलेजची कीर्ती यानुसार फिया वाढत जातात.

अमेरिकेतील कुटुंबाचे सरासरी उत्पन्न महिना ५ हजार डॉलर आहे. त्यात सुमारे १५ टक्के जनता ही गरीब आहे. त्यांच्या कुटुंबांचे उत्पन्न दरमहा सुमारे २ ते ३ हजार डॉलर असते. या सर्वांना महिन्याला अडीच हजार ते चार हजार डॉलर शिक्षणावर खर्च करणे परडत नाही. त्यामुळे गरीब घरची मुले सार्वजनिक शाळेत कशीबशी जातात आणि मग मध्येच शिक्षण सोडून देतात. मध्यमवर्गीय घरातील मुले बऱ्या दर्जाच्या शाळेत आणि पुढे तशाच बऱ्या कॉलेजात जातात. त्यातील हुशार मुले पाठ्यवृत्ती मिळवतात. काही घरांमधे आई-वडील पोटाला चिमटा काढून फी भरून मुलांना मोठे करतात, तर अनेकांना कर्ज काढून शिक्षण घ्यावे लागते.

या सगळ्या शिक्षणव्यवस्थेमुळे शिक्षणाबद्दलची एक प्रकारची अढी अमेरिकन जनतेमध्ये निर्माण झाली आहे. चांगले शिक्षण असले तर चांगली नोकरी मिळते. हे जरी खरे असले तरी, चांगले शिक्षण घेण्याची क्षमता सर्वांमध्ये नसते. त्यामुळे अमेरिकेतील शिक्षण हा एक बाजार झाला आहे. तेथे ज्याला परवडते त्याच्यासाठी शिक्षण आहे. पण, ज्यांना परवडत नाही, त्यांच्यासाठी कमी दर्जाचे किंवा काहीही दर्जा नसेलेले शिक्षण आहे. या शिक्षणापेक्षाही महत्त्वाची आहे, ती शिक्षणासाठी कर्ज देणारी व्यवस्था.

चांगली पदवी, चांगले कॉलेज यासाठी चांगलेच पैसे मोजावे लागतात. ते मोजायचे तर कर्ज काढावे लागते. आज अमेरिकेतल्या नोकऱ्या आणि व्यवसाय पदवीच्या पोकळ कल्पनेवर आधारलेले आहेत. त्यांचा संबंध माणसाच्या कसबाशी, बुद्दीमत्तेशी असेलच याची खात्री नाही. त्यामुळे अनेक प्रतिभावंत हे शिक्षणाच्या मुख्य व्यवस्थेपासून दूर राहिलेले दिसतात. हीच हुशार मुले मग कुठे छोटा मोठा उद्योग काढ आणि मग त्यातून स्टार्ट-अप उभे कर हा मार्ग चोखाळतात. मग या मुलांच्या सक्सेस स्टोऱ्या बनतात. पण तरीही या काही मोजक्यांचे अपवाद वगळता इतरांना मुख्य व्यवस्था कायमच आपल्या कक्षेबाहेर ठेवते.

एक उदाहरण पाहू. केलब (Caleb) या मुलाला लिबरल आर्ट्स या विषयातली पदवी घ्यायची होती कारण बाजारात त्या विषयांतली पदवी घेतली की बरी नोकरी मिळते. त्याची आई केरी लिन (Kerry Lynn) आणि डेविड यांनी आपापल्या नावावर कर्ज काढले आणि पैसे केलबच्या कॉलेजात भरले. केलबच्या आजोबानी आपल्या पेन्शन खात्यातून काही पैसे काढले आणि केलबला दिले. केलबही कॉलेज आटोपले की कामे करून पैसे मिळवत असे. कॉलेजची चार वर्षं झाली की बरे पैसे मिळतील आणि आईबापांनी काढलेल्या कर्जाचे पैसे फेडता येतील असा हिशोब. सामान्य घराचे सारे लक्ष केलबवर लागले होते, त्याला मोठे करण्यावर लागले होते.

केलबचं घर, त्याचा परीसर गरीब वस्तीचा. आसपासच्या वातावरणाचा परिणाम झाला आणि केलबची बहीण व्यसनी झाली. तिचं शिक्षण बंद झाले, तिची स्थिती बिघडत गेली. तिच्यावर उपचार करण्यात आई वडिलांचे पैसे खर्च झाले. केरीचे पेन्शनचे खर्च उपचारात खर्च झाले. घरातले तणाव वाढत गेले. केरी आणि डेविड यांच्यातले भांडण विकोपाला गेले, त्यांचा काडीमोड झाला. त्यात केलबच्या आजोबाना अलझायमर झाला. त्यांचा खर्च वाढला. गाडे रुळाबाहेर गेले. केलबवर कॉलेज खर्चाचे कर्ज आहे. तो ते कसे फेडणार?

अशा अनेकांना आज शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडता तरी येत नाही किंवा कर्ज फेडायचे तर लग्न करता येत नाही, चांगले घर घेता येत नाही, जगण्यातल्या अनेक आनंददायक गोष्टी करता येत नाहीत. वर उल्लेख केलेले चार कोटी तरूण स्वास्थ्य हरवून बसले आहेत, त्यांची जगण्याची उमेद हरवलेली आहे. त्यातही आणखी एक गोची असते. अमेरिकेत चांगल्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केली की अर्जदाराचा रहाण्याचा पत्ता पहातात. तो पत्ता सामान्य वस्तीतला, सामान्य घराचा असला तर त्याला ती नोकरी मिळत नाही.

या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकार शिक्षणातून अंग काढून घेते आहे. अनुदाने कमी कमी करत चाललेय. फिया वाढवा, काहीही करून तुमचे तुम्ही पहा असा सरकारचा कल दिसतो. या शिक्षणाच्या खासगीकरणाने एकंदरीतच शिक्षणव्यवस्था ‘परवडेल त्याला शिक्षण’ अशा पद्धतीची बनली आहे.

नामांकित कॉलेजेस, विद्यापीठे श्रीमंतांकडून देणग्या घेतात. त्या बदल्यात श्रीमंतांच्या मुलांना त्यांची पात्रता नसली तरी, कॉलेजात प्रवेश देतात. देणग्या देणारी मंडळी ज्या उद्योगातून पैसे मिळवत असतात त्या उद्योगाना उपयोगी असलेले शिक्षण विद्यापीठाने द्यावे यासाठी दबाव आणतात. त्यातून किरकोळ विषय शिकवले जातात, महत्वाचे विषय गाळले जातात. इतिहास, तत्वज्ञान, भाषा, कला या विषयांना दुय्यम स्थान मिळते. अमेरिकन विद्यापीठांतून आता शेक्सपियर गायब झालाय. ठरावीक उद्योगांना लागणारे सुटे भाग अशा रीतीने लागणारी मुले तयार करतात, मुलांमधून चांगले नागरीक तयार करण्याची प्रक्रिया थांबली आहे. एकूणच शिक्षण हे एक मोठे रॅकेट झाले आहे.

ही गोष्ट २०१८ सालच्या एप्रिल महिन्यातली. खरे म्हणजे हे संभाषण पोलिसांनी घेतले तिसऱ्याच एका प्रकरणाच्या चौकशीसाठी आणि एक नवेच घबाड पोलिसांच्या हाती लागले. त्यातूनच अमेरिकेतल्या नामांकित युनिव्हर्सिट्यांतला प्रवेश घोटाळा सिद्ध झाला. पोलिसांनी चौकशी केली आणि प्रवेश घोटाळ्याचा अहवाल २०१९ साली प्रसिद्ध केला. या घोटाळ्यात एक रिक सिंगर नावाचा माणूस सापडला. त्याने ३३ पालकांकडून २.५ कोटी डॉलर घेतले आणि प्रवेश परिक्षेसाठी लागणारे पात्रता गुण  गफला करून वाढवून घेतले

कॉलेजातल्या लोकांना पैसे चारून त्याने मुलांना प्रवेश करून दिला. या व्यवहारात येल, स्टॅनफर्ड आणि कॅलिफोर्निया युनिवर्सिट्याही गुंतल्या होत्या. ज्यांनी पैसे दिले ती माणसे खेळाडू, अभिनेते, बिझनेसमन इत्यादी धनाढ्य होती. त्यांच्या मुलांची या विख्यात युनिवर्सिटीत जायची पात्रता नव्हती, ती पात्रका त्यांनी पैसे चारून तयार करण्यात आली आणि तब्बल ७५० विद्यार्थ्यांना  प्रवेश देण्यात आला. पालक आणि युनिव्हर्सिटीतले लोक असे मिळून ५३ लोक दोषी ठरले आणि त्यांना तुरुंगवास आणि दंडाच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या.

अपोलो समूह कंपन्यानी शिक्षणात पैसे आहेत याचा अंदाज आल्यावर १९९४ साली अॅरिझोनातले फीनिक्स विद्यापीठ चालवायला घेतले. हे विद्यापीठ बाजारात रजिस्टर केले, त्याचे शेअर्स बाजारात विकले. फीनिक्सने खोटी माहिती देऊन, खोटा प्रचार करून, शेअर्सचे भाव चढवले. शेअर्सचा भाव ४६० टक्क्यांनी वधारला.   लोकानीही धडाधड फीनिक्समधे  पैसे गुंतवले.  पुढे या फिनिक्सने अमेरिकेत ११६ ठिकाणी शाखा-संस्था उघडल्या. कर्जाची सोय झाल्याने विद्यार्थीसंख्या २५ हजार वरून १.२५ लाखावर गेली.

पुढे फिनिक्स विद्यापीठाने विद्यार्थ्यांची भरती करण्यासाठी माणसे नेमली. भरतीचे कमीशन देण्यात आले. विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त भरती करण्याच्या नादात या भरती कंत्राटदारांनी निकस मुले भरली. सरकारने या संस्थेला दंड ठोठावला. पुढे ही शिक्षणसंस्था खोटे हिशोब दाखवून भागधारकांना फसवते या गुन्ह्यासाठी सरकारने भागधारकांना नुकसान भरपाई द्यायला लावली. तसेच ही शिक्षणसंस्था एका चर्चच्या लोकांना अग्रक्रमाने प्रवेश देते, इतरांना प्रवेश देतांना खळखळ करते, धार्मिक पक्षपात करते या गुन्ह्यासाठीही तिच्यावर कारवाई केली.

बाजारातली आपली प्रतिमा रंगवण्यासाठी आणि सरकारी कारवायांना तोंड देण्यासाठी फिनिक्सनं मार्केटिंग व्यावसायिक आणि वकिलांच्या मोठ्या फौजा उभ्या केल्या. अॅपल ही जगप्रसिद्ध कंपनी आयफोन खपवण्यासाठी  मार्केटिंगवर जेवढा खर्च करते त्या पेक्षा जास्त खर्च फिनिक्स विद्यार्थी मिळवण्यासाठी आणि संस्थेचा गाजावाजा करण्यासाठी करते. ४२ टक्के रक्कम मार्केटिंगसाठी आणि  १७ टक्के रक्कम प्रत्यक्ष शिक्षणासाठी खर्च केली जाते. फिनिक्सने फूटबॉल मैदानावर एक नवा स्कोरबोर्ड तयार केलाय, त्यासाठी तब्बल १४ लाख डॉलर खर्च केले.

अमेरिकेतील शिक्षणाची ही अशी अवस्था तेथील सामान्यांना झेपेनाशी झाली आहे. त्यामुळे आता त्याबद्दल जाहीरपणे बोलले जाऊ लागले आहे. वृत्तपत्रातून आणि समाजमाध्यमातून त्याविषयी चर्चा होत आहेत. आता निवडणुकीतही हा मुद्दा उचलला जावा यासाठीही प्रयत्न होत आहे. पण, शेवटी शिक्षणासारख्या मुद्द्याला राजकारण्यांनी महत्त्व दिले तर जगात क्रांतीच घडेल. अमेरिकतही याहून काही वेगळे होईल, असे वाटत नाही. किमान सामान्य अमेरिकन माणासाला पुढले आयुष्य बरेपणाने जगण्याचे सामर्थ्य देणारे शिक्षण कसे मिळेल, या चिंतेने अमेरिकन माणूस ग्रासला आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Cahyo Prihadi

Cahyo Prihadi

Cahyo Prihadi Director of Monitoring and Evaluation Project Management Office of Kartu Prakerja Coordinating Ministry for Economic Affairs of the Republic of Indonesia

Read More +