Published on Feb 29, 2020 Commentaries 0 Hours ago

बससेसा सुधारून शहर परिवहन उपक्रम योजनेत अमुलाग्र सुधारणा होऊ शकते. यामुळे शहरांतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवली जाऊ शकते.

बससेवा सुधारा, शहरांची ‘कोंडी’ फोडा

बेंगळुरू, मुंबई, पुणे आणि राजधानी दिल्ली ही देशातील प्रमुख चार शहरे ‘टॉम टॉम इंडेक्स’ या यादीनुसार जगातील सर्वाधिक वर्दळीच्या शहरांमध्ये गणली गेली आहेत.  या यादीत बेंगळुरू पहिल्या स्थानी आहे. जागतिक स्तरावर सर्वाधिक वर्दळीच्या शहराचा काटेरी मुकुट बेंगळुरूकडे आला आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीला अनेक घटक कारणीभूत आहेत. शहरातील वाहतूक कोंडीवरील “रामबाण” उपायांबद्दल नुसत्या चर्चा केल्या जातात. अर्थात मेट्रो रेल्वे सुविधा हा या कोंडीच्या समस्येवर जालीम असा उपाय आहे,  असं बोलले जाते. या वरील चार शहरांपैकी तीन शहरांमध्ये आधीच मेट्रो रेल्वे सुविधा आहे.

हे फक्त दिखाव्यापुरतेच आहे, पण नुसते मेट्रोचे जाळे उभारले म्हणजे शहरांची वाहतूक कोंडीपासून सुटका झाली असे होत नाही. मेट्रो व्यतिरिक्त सध्या तात्काळ व्यवस्था उभारण्याची आवश्यकता आहे. अधिक पद्धतशीरपणे बदल घडवून आणायचे आहेत. अगदी अतिदुर्गम भागात दळणवळण सुविधा हे या कोंडीला किंवा शहरांतील वर्दळीचे प्रमुख कारण आहे आणि या समस्येचे शक्य तितक्या लवकर निराकरण करायला हवे.

बससेसा सुधारून शहर परिवहन उपक्रम योजनेत अमुलाग्र सुधारणा करणे, हा एक महत्वाचा बदल आहे. या बदलाच्या माध्यमातून दुर्गम भागातील दळणवळण सुविधा आणि शहरांतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवली जाऊ शकते. विकसनशील अर्थव्यवस्थांच्या शहरांमध्ये परिवहन उपक्रम महत्वाचा आहे, तसेच बससेवा किफायतशीर देखील आहे. बससेवेतील सुधारणा या तात्काळ प्रभावी ठरल्याचे दिसून आलेले आहे. शहरांतील प्रवासासंदर्भात बदलत्या मागण्या आणि पद्धत आदींसाठी बस उपक्रमाची पुनर्जुळवणी सहजगत्या करता येऊ शकते.

जगभरातील शहरे ही आपल्या महत्वाच्या उपक्रमांचे नुतनीकरण म्हणजेच नेटवर्कचे नियोजन आणि पुनर्जुळवणी, खरेदीप्रक्रिया, बसयोजना चालविणे आणि तिची देखभाल आदींच्या माध्यमातून बस सेवेत सुधारणा करत आहेत. तथापि, भारतातील शहरांमध्ये मेट्रो रेल्वे यंत्रणा उभारण्यावर सर्वाधिक भर दिले जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचवेळी शहर बस सेवेकडे पूर्णतः दुर्लक्ष केले गेले आहे. बऱ्याचदा दळणवळण यंत्रणेतील अकार्यक्षम ठरलेल्या गोष्टींसाठी विनाकारण खर्च केला जातो.

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) हा मुंबई महापालिकेचा एक उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत शहरात बसगाड्या चालविल्या जातात. गेल्या काही वर्षांत बेस्टला आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि कासवगतीने सुरू असलेली योजना याबाबत परिवहन क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आणि प्रवाशांकडून होणाऱ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. आधीच तोट्यात असलेल्या मार्गांवर वातानुकूलित बस चालवण्यासारखे अविवेकी निर्णयही घेतले गेले. या व्यतिरिक्त बेस्टच्या आर्थिक अस्थिरतेमुळे अनेक मार्गांवरील वाहतूक सेवा बंदही झाली.

सन २००३ पासून, उपक्रमासाठी विद्युत पुरवठा विभागाकडून मिळणारा अनुदानही बंद करण्यात आले. त्याचा बस परिवहन विभागाच्या वित्तपुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला. भाडेवाढ,  कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये वाढ,  इंधन दरांमध्ये झालेली वाढ, यंत्रांसाठी लागणारं तेल आणि सुट्या भागांच्या किंमतींमध्ये झालेली वाढ आदींमुळे भारतीय शहरांमधील बहुतांश बस सेवेला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.

मुंबईतील ‘बेस्ट’ सेवेच्या पुनरुज्जीवनासाठी सध्या मोठे प्रयत्न केले जात आहे. बेस्टचे रुतलेले चाक पुन्हा मार्गावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अलिकडेच बेस्टने प्रवासी भाडे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली. असे असले तरी, महसुलात किंचितशी घटही झाली आहे.

सध्याच्या घडीला दुर्गम भागात बससेवा पुरवणे आणि सेवेची हमी यावर लक्ष केंद्रीत करून वाढता तोटा कमी करण्याची कार्यपद्धती अवलंबल्याचे दिसत आहे. मुंबईत मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले गेले आहे. मेट्रो सेवा जिथपर्यंत सुरू झालेली आहे, त्या दृष्टीनं लांब पल्ल्यांच्या मार्गावर बससेवा सुरू करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच, मेट्रो रेल्वेचं जाळे जिथपर्यंत विणले गेले आहे,  त्याच्या आवश्यकतेनुसार शहर बस सेवेला आपला दृष्टीकोन बदलायला हवा.

बेस्टने अलीकडेच शहरातील विविध भागांमध्ये पॉइंट-टू-पॉइंट मिनी वातानुकूलित बससेवा सुरू केलेली आहे. आतापर्यंत साधारणपणे २५ मार्गांवर २०० बस चालवल्या जात आहेत. याशिवाय आणखी बस लवकरच धावणार आहेत. ही सेवा सध्या सुरू असलेल्या आणि लवकरच सुरू होणाऱ्या मेट्रो सेवेसह प्रवाशांच्या बदलत्या गरजा आणि पर्यायी प्रवासाचं साधन बदलतानाच,  बस सेवेला नवसंजिवनी देण्याच्या प्रयत्नाचाच एक भाग आहे.

२१ प्रवासी क्षमता असलेल्या मिनी बस सध्या पॉइंट – टू- पॉइंट असलेल्या कमी अंतरावरील मार्गांवर किंवा कमी थांबे असलेल्या मार्गांवर चालवण्यात येत आहेत. वर्दळीचे रस्ते आणि बसमधील तुडुंब गर्दी, तसंच शहरातील अरुंद रस्त्यातून बसला वाट काढताना करावी लागणारी तारेवरची कसरत,  प्रत्येक ठिकाणी थांबा या अग्निदिव्यातून प्रवाशांना दररोज जावं लागतं. प्रवाशांचा हा वेळ वाचतो.

सध्या या बस भाडेतत्वावर घेतल्या असून,  या मार्गांवर चालवण्यात येत आहेत. याचाच अर्थ या बसेस खासगी कंत्राटदारांकडून घेतलेल्या आहे. त्यांच्याकडून बस आणि चालकांचाही पुरवठा केला जातो. बेस्टनं कोणत्याही मनुष्यबळ आणि भांडवली गुंतवणुकीशिवाय हा उपक्रम सुरू केलेला आहे. एकूणच, भविष्यात मिनी बसच्या ताफ्यातील ५० टक्के मालकी मिळवण्याची ‘बेस्ट’ची योजना आहे.

थेट सेवा योजनेमुळे प्रत्येक बससाठी आवश्यक अतिरिक्त मनुष्यबळ (वाहक) कमी लागतो आणि मनुष्यबळामुळं बेस्टच्या महसूलावर येणारा ताणही कमी होतो. सर्वसाधारणपणे प्रवाशांना मूळ ठिकाणांवर किंवा शेवटच्या थांब्यावर तिकीटं वितरीत करण्यात येतात. सर्वसामान्य प्रवाशांना आरामदायी आणि परवडेल असे प्रवासी भाडे आकारण्यात येत आहे. प्रत्येकी पाच किलोमीटरचे प्रवासी भाडे २५ रुपयांवरून सहा रुपये करण्यात आलं आहे. शहरात अनेक बस आगार आणि टर्मिनलवर ही बससेवा सुरू करण्यात आली आहे,  जी उपनगरी रेल्वे आणि मेट्रो स्थानकांसह मोठ्या संख्येने असलेल्या कार्यालयांची ठिकाणे आणि रहिवासी भागांशी जोडलेली आहेत.

चालू वर्षी म्हणजेच, २०२० च्या सुरुवातीला जवळपास ४०० मिनी बस चालवण्याची बेस्टची योजना आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये या बससेवेला प्रारंभ झाला होता. त्यानंतरच्या एका महिन्यात या मिनी बस सेवेतून दिवसाला २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. बेस्ट उपक्रमानं उचललेल्या या पावलामुळे प्रवाशांकडून मनमानीपणे भाडे उकळणाऱ्या ट्रक्सी आणि रिक्षाचालकांचे पितळ उघडे पडले आहे. शहरातील प्रवासी मोठ्या संख्येनं बस सुविधेचा लाभ घेऊ लागले आहेत. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे.

बेस्टचा हा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे. दुर्गम भागात दळणवळणाची जी समस्या आहे,  ती देखील सुटली आहे. आगामी काळात अशा ६००० बसेस घेण्याची बेस्टची योजना आहे आणि ही संख्या १० हजारांपर्यंत वाढवण्याचा मानस आहे. सध्या या बसेस डिझेलवर धावत आहेत. तथापि, बेस्ट उपक्रमानं अधिक टिकाऊ ऊर्जा स्त्रोताची कास धरली पाहिजे. तसंच,  वर्तमान काळात विविध मार्गांवर नव्यानं सुरू करण्यात आलेल्या बस सुविधेविषयी ट्विटरवर माहिती देण्याव्यतिरिक्त प्रवासी संख्या वाढावी यासाठी बेस्टकडून विशेष प्रयत्न केलेले दिसत नाहीत.

प्रवाशांना सोयीस्कर होईल याकरिता मिनी बससेवा आणि बेस्ट बस अॅप एकीकृत करावे लागेल. थेट वाहतुकीची सेवा आणि दुर्गम भागातील बस सेवेमुळं शहरातील वाहतुकीचे जाळे;  विशेषतः बस सेवेच्या चांगल्या नियोजनासाठी एक उपयुक्त अशी ब्लू-प्रिंट तयार केली आहे. मेट्रो आणि रेल्वेगाड्या यांसारख्या दळणवळणाच्या साधनांना पूरक म्हणून बेस्ट आणि देशभरातील विविध शहरांमधील परिवहन उपक्रमांना त्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या नव्यानं सुनिश्चित करण्याची आवश्यकता आहे. बस परिवहन सेवा सर्वोत्तम देण्यासाठी उपक्रमांना खालील बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.

१. प्रवासी मूळ आणि गंतव्य ठिकाणांवरील वाहतुकीची साधने आणि अनेक मार्गांवरील अंदाजित आर्थिक कामगिरीचा आराखडा तयार केला जाऊ शकतो.

२. कॉरिडोर,  बीआरटीएस आणि मूलभूत सुविधांना प्राधान्य देऊन सर्वाधिक गरज असलेल्या मार्गांचे नियोजन केले जाऊ शकते. आतापर्यंत ज्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक सेवा पोहोचली नाही असे परिक्षेत्र,  विशेष सेवा आणि बस थांबे यांसारख्या मुलभूत सुविधा दिल्या जाऊ शकतात.

३. लहान मुले,  वयोवृद्ध आणि दिव्यांगासाठी आवश्यक असलेल्या सेवा दिल्या जाऊ शकतात.

४. सार्वजनिक हितार्थ,  व्यावसायिक व्यवहार्यता विचारात घेऊन आणि वेगवेगळ्या गटातील प्रवाशांच्या खर्चाच्या क्षमतेचा विचार करून आखलेले दर धोरण हे सर्वांना मान्य असणे अत्यावश्यक आहे.

५. एकाच तिकीटावर विविध प्रवासाची साधने,  विशेषत: बस आणि मेट्रोनं प्रवास करता आला पाहिजे. अशा प्रकारे एकच तिकीट सेवा योजना सुरू करायला हवी. स्वयंचलित तिकीट संकलन सेवा प्रवासी गळती, प्रवाशांची माहिती संकलित करण्यास आणि वास्तविक वाहतुकीचा मागोवा घेण्यास आणि वाहन ताफ्याच्या व्यवस्थापनासाठी मदतगार ठरू शकते.

गर्दी आणि प्रदूषण यामुळं भारतातील अनेक शहरांचे प्रचंड नुकसान होत आहे. शहर परिवहन यंत्रणेला प्रवाशांच्या गरजेला प्राधान्य देतानाच स्वत:मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. शहर परिवहन सेवा अधिक कुशलतेनं कार्यरत आहेत आणि जिथे बससेवा महत्वपूर्ण भूमिका बजावू शकते तिथे एकसंध,  परवडणारी, पॉइंट – टू- पॉइंट सेवा,  किमान बदलांसह एकमेकांसोबत मिळून काम करावे लागणार आहे. यासाठी शहरातील बस,  उपनगरी रेल्वे, मेट्रो आणि मोनोरेल आदी सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवणाऱ्या यंत्रणांना मार्गांचे नियोजन,  सेवेची तरतूद, इंटरमोडल एकीकरण,  परिवहन क्षेत्र नियोजन,  प्रवासी भाडे संरचना,  सर्वसामान्यांसाठी प्रवासी भाड्याचे वाटप,  एकाच सक्षम यंत्रणेच्या माध्यमातून अचूक वेळापत्रकाबाबत माहिती आदी विशिष्ट मुद्द्यांवर एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.

तथापि,  कोणत्याही मान्यताप्राप्त यंत्रणेपेक्षा एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (यूएमटीए) आपलं ध्येय साध्य करण्यात अपयशी ठरलं आहे आणि देशातील अनेक शहरांमध्ये ही परिस्थिती बिकट आहे. या यूएमटीएच्या कामकाजात अडथळा आणणाऱ्या विविध वाहतूक यंत्रणा, राज्य-शहरतील यंत्रणांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. मेट्रो नेटवर्क,  सहज उपलब्ध होणारी कॅब सेवा आणि टॅक्सी,  रिक्षा आदी प्रवासी साधनांमुळे शहर बस सेवेचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. आता सर्व बससेवा देणाऱ्या यंत्रणावर,  हितचिंतक- प्रवाशांसह सर्वांवर स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची आणि शहराची गरज म्हणून अस्तित्व टिकवून ठेवण्याची जबाबदारी आहे.

प्रणालींतर्गत सुधारणा घडवून आणेल अशा बदलांचं समर्थन करणाऱ्या एका प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या नेत्याची आवश्यकता आहे. स्थायी सुधारणांसाठी समर्पित अशा संस्थात्मक सहाय्य प्रणालीद्वारे आर्थिक पाठबळ मिळणं आवश्यक आहे. यश मिळवण्यासाठी आणि स्थायी सुधारणांसाठी अद्ययावत ताफा आणि संचालक, नियोजक; तसेच अधिकाऱ्यांची क्षमता वाढवणे महत्वपूर्ण आहे. तुर्कस्तान, फिलिपाइन्स आणि फ्रान्ससारख्या जगभरातील अनेक देशांनी त्यांच्या शहरांमध्ये बस सेवेत कमालीच्या सुधारणा केल्या आहेत. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याची वेळ भारतीय शहरांवर आली आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Amruta Ponkshe

Amruta Ponkshe

Amruta Ponkshe was Associate Fellow with the Sustainable Development Programme at ORF. Amruta works on mobility and urban infrastructure issues with a special focus on ...

Read More +
Ameya Pimpalkhare

Ameya Pimpalkhare

Ameya Pimpalkhare is an Associate Fellow at ORFs Mumbai Centre. He works on the themes of energy and transportation. His key research interests include: sustainable ...

Read More +