Author : Ankita Dutta

Published on Oct 15, 2023 Commentaries 0 Hours ago

वॅग्नर या खाजगी लष्करी गटाच्या विद्रोहाने पुतिन यांच्या रशियावरच्या नियंत्रणाबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

वॅग्नर बंडाने पुतिन यांच्या वर्चस्वाला धक्का दिला का?

रशियामध्ये घडलेल्या घडामोडींची पडताळणी केली तर वॅग्नर बंडामुळे पुतिन कमकुवत झाले आहेत, असे दिसून येते. गेल्या अडीच दशकांत पुतिन यांनी जोपासलेल्या त्यांच्या अजिंक्य प्रतिमेला या बंडामुळे तडा गेला आहे. या बंडाकडे बारकाईने पाहिले तर यामुळे युक्रेनमधल्या कारवाई दरम्यान वॅग्नर गट आणि रशियन संरक्षण मंत्रालय यांच्यातले बिघडलेले संबंध समोर आले. 23-24 जून 2023 दरम्यानच्या घटना पाहिल्या तर हे बंड नेमके कशामुळे झाले, रशियाच्या नेतृत्वाने त्याचा कसा सामना केला आणि युक्रेनच्या युद्धावर त्याचा काय परिणाम झाला असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. या लेखात रशियामध्ये उद्भवलेल्या पाच प्रमुख प्रश्नांचा शोध घेतला आहे.

वॅग्नर गटाचे आव्हान नेमके काय आहे?

वॅग्नर गट आणि रशियाचे लष्करी नेतृत्व यांच्यातील तणावाचे पहिले कारण आहे मतभेद. युक्रेनमधल्या युद्धाची कारणे तसंच वॅग्नरला लष्करी नेतृत्त्वाचा पाठिंबा नसणे यासह अनेक मुद्द्यांवरून हे मतभेद काही काळापासून वाढले होते. वॅग्नर गटाच्या सैनिकांना लष्कराकडून पुरेशी मदत मिळत नाही, अशीही त्यांची तक्रार आहे. वॅग्नर गटाचे नेते येवगेनी प्रिगोझिन यांच्या म्हणण्यानुसार, रशियाच्या लष्करी नेतृत्वाने वॅग्नर गटाला शस्त्रे आणि दारूगोळा पुरवला नाही. त्यामुळे या गटातल्या अनेक सैनिकांचे युद्धामध्ये जीव गेले. वॅग्नर गटाने पुतिन यांच्याविरुद्ध केलेल्या ‘मार्च फॉर जस्टिस’ या बंडाला दोन निमित्तं झाली. रशियन सैन्याने युक्रेनमधल्या वॅग्नरच्या तळावर हल्ला केला, असा आरोप प्रिगोझिन यांनी केला. दुसरे म्हणजे वॅग्नर गटाला रशियन लष्करी कमांडच्या थेट नियंत्रणाखाली आणण्याची लष्कराची योजना होती, असेही प्रिगोझिन यांचे म्हणणे आहे.

युक्रेनमध्ये तैनात असलेल्या भाडोत्री लष्करी गटांशी 1 जुलै 2023 पूर्वी करार केला जाईल, असे आदेश संरक्षण मंत्रालयाने दिले होते. त्याला पुतिन यांनी दुजोरा दिला. या आदेशानुसार या गटांना संरक्षण मंत्रालयाच्या कमांड स्ट्रक्चर्समध्ये सामील केले जाणार होते. याला वॅग्नर गटाच्या नेतृत्वाने तीव्र विरोध केला. रशियन लष्कराने फसवले? यामुळे अर्थातच येवगेनी प्रीगोझिन यांचा या गटावरचा प्रभाव कमी होणार होता. 23 जून 2023 रोजी हा तणाव आणखी वाढला. रशियाचे संरक्षण मंत्रालय जनतेला फसवण्याचा, राष्ट्राध्यक्षांना फसवण्याचा आणि युक्रेनच्या आक्रमणाबद्दल वेगळीच माहिती देण्याचा प्रयत्न करते आहे, असा आरोप प्रिगोझिन यांनी केला. युक्रेनने संपूर्ण नाटो गटासह रशियावर हल्ला करण्याची योजना आखली होती, असं भासवण्याचा प्रयत्न लष्कराने केला. त्यामुळे लष्करी नेतृत्वाचा पाडाव करण्यासाठी आम्ही सर्व मार्गाने प्रयत्न करू, असंही प्रिगोझिन यांनी सांगून टाकलं. येवगेनी प्रीगोझिन यांनी लष्करी नेतृत्वाच्या विरोधात बंड केले तरी त्यांनी कधीही पुतिन यांची सत्ता उलथवून टाकण्याची भाषा केली नाही. उलट आपला विरोध हा संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु आणि जनरल स्टाफचे प्रमुख व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांना आहे हे त्यांनी थेटपणे सांगितलं. या दोघांमुळेच वॅग्नर गट अयशस्वी झाला, असा ठपका त्यांनी ठेवला. वॅग्नर गटातले आपले हितसंबंध कायम ठेवण्यासाठी प्रिगोझिन यांनी संरक्षण मंत्रालयालाच आव्हान दिलं आणि तिथे उठाव सुरू
झाला.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी 24 आणि 26 जून रोजी रशियाच्या नागरिकांना उद्देशून एक भाषण केलं. त्यात बरेच अर्थ दडलेले आहेत. पुतिन यांनी वॅग्नर गटाने केलेली सशस्त्र बंडखोरी चिरडून टाकण्याचा निर्धार व्यक्त केला पण त्याचबरोबर या गटाचे बहुसंख्य सैनिक आणि कमांडर हे देशभक्त आणि निष्ठावंत आहेत, अशीही पुष्टी जोडली. त्याचवेळी पुतिन यांनी आपल्या भाषणात प्रिगोझिन यांना मात्र अनुल्लेखाने मारलं. रशिया सध्या वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि हितसंबंधांमुळे देशद्रोहाचा सामना करत आहे आणि ज्यांनी जाणीवपूर्वक विश्वासघात केला आहे त्यांना शिक्षा अटळ आहे, असाही इशारा दिला. हे बंड म्हणजे घातक चूक आहे, असेही पुतिन म्हणाले.  पुतिन यांच्या दुसऱ्या भाषणाचा सूर मात्र पूर्णपणे वेगळा होता. हे बंड मोडून काढण्यासाठी रक्त सांडावं लागलं तरी चालेल, असे आदेश मीच दिले होते हे पुतिन यांनी सांगितलं आणि वॅग्नर
गटाच्या सैनिकांना दोन पर्याय देऊ केले. संरक्षण मंत्रालय, कायद्याची अमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा किंवा सुरक्षा यंत्रणांशी करारावर स्वाक्षरी करणे किंवा माघार घेणे आणि बेलारूसमध्ये हद्दपारी हे ते दोन पर्याय होते. पुतिन यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा ठासून सांगितली आणि ज्या नेत्याने आपले वचन पाळावे आणि कोणता मार्ग निवडायचा हे ठरवावे, असे ते म्हणाले. प्रत्येकजण आपले निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे, असंही त्यांनी जाहीर केलं. या दोन भाषणांमधून पुतिन यांनी शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न केला आणि रशियातल्या घडामोडींवर आपलंच नियंत्रण आहे हेही दाखवून दिलं. रशियाची सगळी सूत्रं आपल्याकडेच कशी आहेत आणि आपण यावर कशी मात केली आहे हे पटवून देण्याचाही त्यांचा प्रयत्न होता.

आता या बंडाबद्दल तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बेलारूसने रशियाशी नेमका कोणता करार केला आहे? येवगेनी प्रीगोझिन यांनी आपल्या सैन्याला मॉस्कोकडे जाण्याचे आणि दक्षिण रशियातील त्यांच्या तळावर परत जाण्याचे आदेश दिले आणि पुढे बेलारूसला जाण्यास सहमती दर्शवली हे आपल्याला माहीत आहे. तसेच, प्रीगोझिन रशियातून बाहेर पडल्यावर त्यांच्यावरील फौजदारी आरोप मागे घेतले जातील, असे रशियाचे मुख्यालय असलेल्या क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी घोषित केले. रशियामधल्या त्यांच्या सेवेचा विचार करून या बंडाचा भाग असलेल्या वॅग्नर सैन्याला कोणताही दंड आकारला जाणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले. पण त्याचवेळी प्रीगोझिन यांना नेमक्या कोणत्या सवलती दिल्या आहेत हे समोर आलेलं नाही.

पुतिन यांचे सध्याचे लक्ष्य हे बंडखोरी चिरडण्यापासून ते रक्तपात टाळण्याकडे आहे असे दिसते. 26 जून 2023 च्या पुतिन यांच्या भाषणातून आणि या करारानंतर प्रीगोझिन यांनी केलेल्या विधानातून हेच उद्दिष्ट समोर आले.

हा तिढा सोडवण्यासाठी बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी बजावलेली भूमिका मोठी रंजक आहे. युक्रेनमधील संघर्षाबद्दल लुकाशेन्को हे पुतिन यांचे सर्वात खंबीर पाठीराखे आहेत. त्यांनी अगदी रशियाला बेलारूसमध्ये अण्वस्त्रे ठेवण्याचीही परवानगी दिली आहे. या बंडानंतर केलेल्या हस्तक्षेपामुळे लुकाशेन्को यांचा रशियावरचा प्रभाव आणखी वाढला आहे. बेलारूसने रशियाशी हा करार का केला त्याचे खरे हेतू उघड झालेले नाहीत. पण लुकाशेन्को यांना 2020 च्या निवडणुकीत पुतिन यांनी समर्थन दिले होते. लुकाशेन्को यांच्यावर निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप झाल्यानंतरही पुतिन त्यांच्यामागे उभे राहिले. त्याची ही परतफेड असावी, असा एक कयास आहे. तरीही बेलारूसला या करारातून काय मिळाले हे पाहणे बाकी आहे.

चौथा प्रश्न म्हणजे या विद्रोहानंतर वॅग्नर गटाचे नशीब काय आहे? वॅग्नर गट हा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या परदेशातील वर्चस्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या गटाचे सैनिक आफ्रिकेतील विविध देशांमध्ये, विशेषत: माली, लिबिया, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक आणि सुदानमध्ये तैनात आहेत आणि सीरियामधील असाद यांची राजवट स्थिर करण्यात त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तथापि या वॅग्नर गटाने सर्वात मोठे यश युक्रेनमध्ये मिळवले. रशियाचे लष्कर युक्रेनमधल्या ज्या प्रदेशांत फारशी कामगिरी करू शकलेले नाही तिथे वॅग्नर गटाची मात्र सरशी झाली. युक्रेनमधल्या आक्रमणामध्ये या गटाचे मोठे नुकसानही झाले. इथल्या बखमुतच्या लढाईत 20 हजार हून अधिक सैनिक मारले गेले, असा प्रिगोझिन यांचा अंदाज आहे. त्यामुळेत ‘मार्च फॉर जस्टिस’ म्हणजेच रशियन लष्कराविरुद्ध केलेल्या बंडानंतर वॅग्नर गटाचे भवितव्य काहीसे नाजूक वळणावर आहे. आतापर्यंत प्रीगोझिन यांनी हा गट विसर्जित करण्याचा कोणताही मनसुबा व्यक्त केलेला नाही. बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को आपल्याला बेलारूसमध्ये कार्यरत राहण्याची परवानगी देत आहेत, असाही संदेश त्यांनी दिला आहे.

अलीकडेपर्यंत आलेल्या बातम्यांनुसार, वॅग्नर गट रशियन शहरांमधून सक्रियपणे सैनिकांची भरती करतच होता. आता युक्रेनच्या बाहेर कार्यरत असलेल्या ठिकाणांवर झालेल्या या विद्रोहाचा काय परिणाम झाला हे पाहणे बाकी आहे.

वॅग्नर गटाच्या आफ्रिका आणि पश्चिम आशियातील कारवायांचा देखील उल्लेख करणे आवश्यक आहे. वॅग्नर गट या देशांतून माघार घेणार नाही, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅवरोव्ह यांनी सांगितले होते. इथे तैनात असलेल्या भाडोत्री सैनिकांनी रशियामधील घडामोडींवर काय प्रतिक्रिया दिली याबद्दल फारच कमी माहिती आहे. युरोपबाहेरच्या त्यांच्या मोठ्या मोहिमांवर याचा कसा परिणाम होईल हेही कळू शकलेले नाही. युक्रेनमधील संघर्षावर वॅग्नर बंडाचा काय परिणाम होईल? हा शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न. वॅग्नर गटाने या लढाईतून माघार घेण्यापूर्वी मे 2023 मध्ये रशियन सैनिकांनी त्यांच्या तुकड्या बदलून बखमुत मधून माघार घेण्यास सुरुवात केली होती हे लक्षात घ्यायला हवे. रशियन सैन्याच्या आघाडीचा युक्रेनमध्ये कोणताही लक्षणीय परिणाम झालेला नाही. त्यामुळेच रशिया युक्रेनच्या विविध शहरांमध्ये तीव्र क्षेपणास्त्र हल्ले करते आहे. हे पाहता रशियाच्या युक्रेनबद्दलच्या दृष्टिकोनात बदल होण्याची सध्या तरी शक्यता नाही. तथापि वॅग्नर गटाच्या बंडामुळे रशियाच्या सैन्यामधली असुरक्षितता उघड झाली आहे. वॅग्नर गटाने उठाव केला आणि मॉस्कोच्या दिशेने सहजतेने कूच केले. त्यामुळे रशिया देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरक्षा यंत्रणा कडेकोड करण्यासाठी पावले उचलत आहे. असे उठाव पुन्हा होऊ नयेत यासाठी जास्तीत जास्त खबरदारी घेतली जात आहे.

निष्कर्ष

वॅग्नर गटाच्या बंडादरम्यान आणि नंतर नेमके काय घडले हे अद्याप स्पष्टपणे समजू शकलेले नाही. परंतु वॅग्नर गटाच्या ‘मार्च फॉर जस्टिस’ ने पुतिन यांच्या अडीच दशकांच्या सत्तेसमोर सर्वात गंभीर आव्हान उभे केले. बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी मध्यस्थी केलेल्या कराराबद्दलही फारशी स्पष्टता नाही, असेच म्हणावे लागेल. पण या करारामुळेच बंडाची परिस्थिती निवळली आणि वॅग्नर गटाला माघार घ्यावी लागली एवढे तरी नक्की आहे. प्रीगोझिन मॉस्कोला का गेले नाहीत? प्रीगोझिन यांनी मॉस्कोच्या दिशेने वेगाने पुढे जाण्यापासून ते अचानक माघार घेण्यापर्यंत घेतलेल्या निर्णयांमुळे अनेकांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल त्यांच्या हेतूंवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले
आहे. त्यांचे हे बंड राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी होते का? किंवा सर्गेई शोइगु आणि व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांनी उठाव केला का ? की संरक्षण दलात वॅग्नर गटाच्या सैनिकांच्या शोषणामुळे तो केवळ असंतोष व्यक्त करण्याचा मार्ग होता ? असे अनेक प्रश्न आहेत. एवढा मोठा उठाव करून त्यांनी मॉस्कोला धडक का दिली नाही हेही एक रहस्य आहे. पुतिन यांच्या सत्तेला आव्हान देण्याचा आपला कधीही हेतू नव्हता, असे प्रिगोझिन यांनी स्पष्ट केले आहे. पण तरीही या घटनाक्रमाने पुतिन यांच्या वर्चस्वाबद्दलही काही प्रश्न निर्माण केले आहेत. वॅग्नर बंडाचा संपूर्ण परिणाम अद्याप तरी उलगडलेला नाही. परंतु रशियन लष्कराची युक्रेनमध्ये चढाई आणि खालावलेल्या कामगिरीला कोण जबाबदार आहे याबद्दल प्रीगोझिन यांनी उठवलेले मुद्दे रशियाच्या नेतृत्वासमोर नवी आव्हाने घेऊन येणार आहेत.

अंकिता दत्ता या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामच्या फेलो आहेत.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.