कोरोनाविरोधातील लढाईत धारावी हा कधीही फुटू शकणारा बॉम्ब आहे, असे म्हणणे हे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. त्यामुळे हा बॉम्ब फूटू न देणे, हे फार मोठे आव्हान आहे.
मुंबईतील धारावीत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडताच सगळ्या यंत्रणांची धाकधूक वाढीस लागली. मुंबईकरांचा थरकाप उडाला. कारण, धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून ती अत्यंत दाटीवाटीची वस्ती आहे. २३९ हेक्टर परिसरात पसरलेल्या या अवाढव्य वस्तीमध्ये दहा लाखांच्या आसपास रहिवासी आहेत. गलिच्छ वस्त्या, सांडपाण्याची सोय नाही, एकाच खोलीत दाटीवाटीने राहणारी कुटुंबे, आरोग्य आणि स्वच्छता यांच्याशी दुरान्वयानेही संबंध नाही, अशी धारावीची ओळख आहे. या ठिकाणी सर्व जाती-धर्माचे लोक राहतात. शिवाय चर्मोद्योग, किरकोळ वस्तूंची निर्मिती अशा अनेक उद्योगांचीही धारावीत वस्ती आहे. अशा या परिसरात आता कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आरोग्यव्यवस्थेपुढचे हे फार मोठे आव्हान ठरणार आहे.
नजीकच्या कालावधीत धारावी हे कोरोनाचे मुख्य आजार केंद्र बनण्याची दाट शक्यता आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी २७४ सामुदायिक आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांची सहा पथके, मलनिःसारण पर्यवेक्षक आणि मुंबई महापालिकेचे २०० आरोग्य कर्मचारी सज्ज आहेत. धारावीतील रहिवाशांची तातडीने आरोग्य तपासणी करणे आणि बाधितांच्या विलगीकरणासाठी जागा शोधून वैद्यकीय सुविधांची उभारणी करणे, ही या यंत्रणांसमोरील तातडीची आणि महत्त्वाची आव्हाने आहेत. वैद्यकीय प्रमाण परिषदेने मंजुरी दिली की, तातडीने चाचणी कक्षांची उभारणी केली जाईल, अशा आशयाची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच दिली आहे.
धारावीला उच्च जोखमीची वस्ती म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मुंबईतील कोरोनाचे केंद्र म्हणूनही धारावीकडे पाहिले जात आहे. देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या आठ हजारांवर गेली असताना त्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त मुंबईत आढळून आले आहेत आणि दिवसागणिक त्यांची संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर धारावीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एप्रिलच्या १ तारखेला धारावीत कोरोनाच्या पहिल्या बळीची नोंद झाली. २३ मार्चला या रुग्णाला तापाने गाठले. त्यानंतर त्याला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १ एप्रिलपासून धारावीतील कोरोनारुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. ८ एप्रिलपर्यंत धारावी परिसरात कोरोनारुग्णांची संख्या नऊ झाली. धारावीनजीक असलेल्या राजीव गांधी क्रीडा संकुलात निर्माण करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात स्थलांतरित करण्यात आले.
धारावी आणि परिसरातील लोकांच्या मनोरंजनासाठी म्हणून, निर्माण करण्यात आलेल्या राजीव गांधी क्रीडा संकुलाचे रुपांतर आता ३०० खाटांच्या रुग्णालयात करण्यात आले आहे. धारावीनजीक असलेल्या डॉ. बालिगा नगर, वैभव अपार्टमेंट, मुकुंद नगर, मदिना नगर आणि धनवाडा चाळ या पाच निवासी वस्त्यांमधील ५००० हून अधिक लोकांना विलग करण्यात आले आहे.
धारावीत असे ८५ निवासी समूह आहेत ज्यांमध्ये १५० चौरस फूट आकाराच्या झोपड्यांमधून विविध उद्योग चालवले जातात. या वस्त्यांमध्ये एका झोपडीत सरासरी सहा जण राहतात. धारावीत काही पक्की घरेही आहेत. अशा पक्क्या घरांची संख्या धारावीतील एकूण घरांच्या २५ टक्के एवढी आहे. या पक्क्या घरांमध्ये २०,००० लघुउद्योग चालवले जातात. उरलेल्या वसाहतीत झोपड्यांचीच संख्या जास्त आहे. धारावीत चर्मोद्योग, कापड निर्मिती, कपड्यावरील कशिदाकारी, काचेचे पेले तयार करणे, मातीची भांडी निर्माण करणे, टाकाऊ पदार्थांपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती वगैरे उद्योग मोठ्या प्रमाणात चालतात. एका अंदाजानुसार या छोट्या उद्योगांतून धारावीला घसघशीत आर्थिक कमाई होते. धारावीत स्वच्छतागृहांची मात्र प्रचंड प्रमाणात वानवा आहे. धारावीत एका स्वच्छतागृहाचा वापर साधारणतः १४०० जणांकडून होतो.
धारावीत आढळलेल्या पहिल्या कोरोनारुग्णाच्या घराचे चित्र परिसरातील वॉर्ड कर्मचा-यांनी आमच्यापुढे उभे केले. या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी वॉर्ड कर्मचा-यांनी त्याच्या घरी धाव घेतली, त्यावेळी एका पडक्या इमारतीतील जेमतेम ४०० चौरस फुटांच्या घरात ८ जण राहात असल्याचे त्यांना आढळून आले. धारावीतील कोरोनाचा पहिला बळी ठरलेला हा रुग्ण वस्त्रोद्योगात काम करत होता. या रुग्णाने १० तबलिगी जमातच्या सदस्यांचा पाहुणचार केला होता. तसेच तो मशिदीतही गेला होता आणि अनेकांना भेटलाही होता. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व जणांना आता विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
धारावीत सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळले जाणे अशक्य आहे. कारण या ठिकाणी कमी जागेत अधिकाधिक लोकांची वस्ती आहे. त्यामुळे कोरोनारुग्णाच्या संपर्कात आल्याने संक्रमित झालेल्या विषाणू वाहकाला शोधून काढणे (काँटॅक्ट ट्रेसिंग), हे धारावीतील सर्वात मोठे आव्हान आहे. सद्यःस्थितीत वॉर्ड अधिकारी किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कोरोनारुग्णांना शोधणे, परिसर विलग करणे आणि विलगीकरणात असलेल्यांना जीवनावश्यक वस्तू घरपोच पुरवणे, हे कामाचे प्रारूप विकसित केले आहे. तसेच इमारती आणि झोपड्यांमध्ये राहणा-यांसाठी वेगळ्या प्रारूपाची निर्मिती करण्यात आली आहे.
इमारतींमध्ये कोरोना संशयित आढळल्यास त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सक्तीने घरात ठेवता येते, संपूर्ण इमारती सील करता येतात, परंतु झोपडपट्टी परिसरात असे करणे मुश्किल असते. कारण या ठिकाणची घरे पक्की नसतात. ती दाटीवाटीने उभी असलेली कच्ची आणि सच्छिद्र घरे असतात. या घरांत राहणारे अनेकदा घराच्या बाहेरच झोपतात. या ठिकाणी असलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे सर्वाधिक प्रमाणात रोगराई पसरवतात. त्यामुळे झोपडपट्टीत आढळलेल्या रुग्णाला ताबडतोब विलगीकरणात हलविण्यात येते. मुंबई महापालिकेने धारावीत पाच ठिकाणी तापाचे दवाखाने किंवा आरोग्य केंद्रे उभारले आहेत. या ठिकाणी कोरोनाची लागण झाल्याचा संशय असलेल्यांची तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जाते. दररोज सरासरी ४५ ते ५० जणाची या दवाखान्यांत किंवा केंद्रांत तपासणी केली जाते.
या दवाख्यान्यांमध्ये डॉक्टर आणि पालिका अधिकारी यांच्याकडून प्रत्येक कोरोना संशयिताची कसून चौकशी केली जाते. डॉक्टर वैद्यकीय चाचण्यांच्या प्रक्रियेला सुरुवात करतात तर पालिका अधिकारी काँटॅक्ट ट्रेसिंगची चाचपणी करतात. तर आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी संयुक्तपणे संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्या घरी जाऊन, त्यांची माहिती मिळवण्याचे काम करतात. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची चाचणी घेतली गेली की, त्यांच्यात आढळणा-या लक्षणांच्या तीव्रतेवरून त्यांना एकतर घरातच थांबण्यास सांगितले जाते, मध्यम लक्षणे आढळल्यास संबंधितांना राजीव गांधी क्रीडा संकुलातील तात्पुरत्या रुग्णालयात पाठवले जाते आणि कोरोनाची लागण झाल्याची लक्षण आढळून आल्यास संबंधितांना धारावी परिसरात नुकत्याच उभारण्यात आलेल्या साई रुग्णालयात पाठवले जाते.
साई रुग्णालयात ५१ खाटांची व्यवस्था असून आठ अतिदक्षता विभागाच्या (आयसीयू) खाटा आहेत. या ठिकाणी महापालिकेच्या डॉक्टरांचे पथक कार्यरत असते. दरमहा ३० लाख रुपये भाड्यावर हे रुग्णालय पालिकेने ताब्यात घेतले आहे. कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांनाच या ठिकाणी आणले जाते.
लोकांना त्यांच्याच घरात स्थानबद्ध ठेवत. त्यांना दररोजचा शिधा मोफत देण्याचा उपक्रमही हाती घेण्यात आला आहे. काही उद्योगसमूहांच्या मदतीने आणि शहरातील दानशुरांकडून येणा-या देणग्यांच्या आधारावर महापालिकेने हा उपक्रम राबविण्यास घेतला आहे. विलगीकरणात असलेल्या सर्व घरांना तांदूळ, कांदे, टोमॅटो, पीठ आणि तेलाचे एक पाकीट असा शिधा वाटप करण्यात येत आहे. लोकांना अन्नदान करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत. धारावी निर्जंतुक राहावी, स्वच्छ राहावी यासाठी १५० सफाई कर्मचा-यांच्या पथकाबरोबर मलनिःसारण पर्यवेक्षक अहोरात्र परिश्रम घेत आहेत. कोरोनाची बाधा झालेल्या घरे, खोल्या, इमारतींवर रसायनांची फवारणी करणे, सर्व परिसर झाडून काढणे, मलनिःसारण योग्य पद्धतीने होत आहे किंवा कसे यावर लक्ष ठेवणे अशी कामे हे सर्व जण मिळून करत आहेत.
धारावीमध्ये कोरोनाचा कहर होऊ नये, संसर्गाला आळा बसावा यासाठी या सर्व यंत्रणा धडपडत असताना परिसरातील दवाखान्यांमध्ये काम करणा-या कर्मचा-यांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे. या ठिकाणच्या लोकांची सातत्याने आणि जलदगतीने आरोग्य तपासणी करणे हाच कोरोनाला रोखण्याचा एकमेव पर्याय असला तरी धारावीसारख्या झोपडपट्टीबहुल परिसरांमध्ये, जिथे लोक अनधिकृत झोपड्या उभारून दाटीवाटीने राहतात, मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी केली जायला हवी, असे मत येथील एका आरोग्य कर्मचा-याने व्यक्त केले. धारावीत पोलिसांची कुमकही तैनात करण्यात आली आहे. परंतु लहानशा जागेत दाटीवाटीने राहणा-या लोकांना स्थानबद्ध करून त्यांच्या हालचालींवर निर्बंध आणणे, विशेषतः स्वच्छतागृहे घराच्या बाहेर असताना, पोलिसांसाठीही जिकिरीचे ठरत आहे.
कोरोनाविरोधातील लढाईत धारावी हा एक कधीही फुटू शकणारा बॉम्ब बनला आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही, आणि या बॉम्बला फुटण्यापासून रोखण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी ते पुरेसे ठरतीलच असे नाही. धारावीच्या सुरक्षेसाठी सरकार, आरोग्य कर्मचारी आणि समाज एकत्रितरित्या पुढे आला असला तरी धारावीच्या प्रतिकारक्षमतेची ही परीक्षा आहे, हे निश्चित.
धारावीतील व्यवस्था
१. धारावीनजीक असलेल्या डॉ. बालिगा नगर, वैभव अपार्टमेंट, मुकुंद नगर, मदिना नगर आणि धनवाडा चाळ या पाच निवासी वस्त्यांमधील ५००० हून अधिक लोकांच्या वैद्यकीय चाचण्या करून त्यांना विलग करणे. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना प्रथम प्राधान्य असून धारावीत उभारण्यात आलेल्या ताप दवाखान्यांत या चाचण्या केल्या जात आहेत.
२. परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली असून, फेरीवाल्यांना या परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
३. आरोग्य कर्मचारी इतर लोकांना तपासत आहेत. संशयित रुग्णांना विलग करून त्यांची दवाखान्यांमध्ये तपासणी करण्यासाठी रवानगी करत आहेत. हे कर्मचारी जोखमीच्या संवादमोहिमेत सहभागी आहेत.
४. सौम्य लक्षणे आढळणा-या इमारतीतील रहिवाशांना त्यांच्या घरांमध्ये स्थानबद्ध करण्यात येत आहे. तर, झोपडट्टीमध्ये राहणा-या संशयितांना राजीव गांधी क्रीडा संकुलात, ज्याचे रुपांतर तात्पुरत्या ३०० खाटांच्या रुग्णालयात करण्यात आले आहे, पाठवले जात आहे.
५. कोरोनाची तीव्र लक्षणे आढळणा-या संशयितांना साई रुग्णालयात पाठवले जात आहे. सरकारने ताब्यात घेतलेल्या या रुग्णालयात ५१ खाटा असून आठ अतिदक्षता (आयसीयू) खाटा आहेत.
६. घरांमध्ये स्थानबद्ध करण्यात आलेल्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच केला जात आहे. त्यात अन्न, धान्य आणि दूध यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
७. धारावीतील प्रत्येक गल्ली, मलनिःसारण वाहिनी, घरे, खोल्या यांची १४० सफाई कर्मचा-यांकरवी रोज स्वच्छता केली जात आहे.
पुढे काय?
१. जलदगतीने सर्वंकष वैद्यकीय चाचण्या केल्या जाव्यात. जेणेकरून संशयित रुग्ण लवकर ओळखता येतील.
२. अधिकाधिक रुग्णांना सामावून घेण्यासाठी परिसरातील इमारती आणि इतर आस्थापने (उदाहरणार्थ शाळा, महाविद्यालये, रिकाम्या शासकीय आणि खासगी इमारती आणि खासगी रुग्णालये) हेरून ठेवणे गरजेचे आहे.
३. लोकांमध्ये अधिकाधिक जागरूकता निर्माण करून टेहळणी पथकांची संख्या वाढवणे
४. यातूनही जर रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच राहिली तर संपूर्ण धारावी परिसरच सील करावा.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Sayli UdasMankikar was a Senior Fellow with the ORF's political economy programme. She works on issues related to sustainable urbanisation with special focus on urban ...