‘राज्यकर्ता कितीही ताकदवान असला तरीही, नेहमीच लेखणी ही तलवारीपेक्षा शक्तिशाली राहिली आहे…’ एडवर्ड बुलवर लिट्टन यांनी १८३९ मध्ये हे लिहिलेले हे वाक्य प्रचंड लोकप्रिय आहे. पण त्याने हे वाक्य लिहिण्याआधीच कित्येक शतके या वाक्याची ताकद चीनमधील राज्यकर्त्यांनी अनुभवलेली आहे. चीनमधील त्रस्त जनता आपली गाऱ्हाणी लिखित स्वरूपात चिनी सम्राटांच्या नजरेत आणून देत असे. या पद्धतीला ‘शिनफंग’ म्हणत. राज्यातील अधिकारपदावरील व्यक्तींचे गैरवर्तनाकडे सम्राटांचे लक्ष वेधण्याचा आणि न्याय मागण्याचा तो एक मार्ग होता. मात्र, कधी कधी खुद्द सम्राटांनाच प्रश्न विचारण्याचे आणि सत्ताशकट उलथवून टाकण्याचे ते एक शस्त्र ठरत असे.
गेल्या काही दिवसांमध्ये चीनमधून अशाच दोन तक्रारी जगासमोर आल्या आहे. रेन झिकियांग यांचा ‘माय रीडिंग ऑफ फेब्रुवारी २३’ आणि शू झँगरून यांचा ‘व्हायरल अलार्म: व्हेन फ्युरी ओवरकम्स फीअर’ हे दोन निबंध म्हणजे ‘शिनफंग’ची आठवण करून देणारे लक्षवेधी लेखन आहे. हे दोन्ही लेखक कधी काळी चीनच्या सरकारी व्यवस्थेचा भाग होते. पैकी शू हे चीनची ‘एमआयटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीजिंग येथील किंघुआ विद्यापीठात प्राध्यापक होते. तर रेन हे पक्के साम्यवादी भांडवलदार होते. अर्थात, हे दोघे सध्या चिनी सेन्सॉरशिपचे बळी ठरले आहेत आणि दोघेही सार्वजनिक जीवनातून अदृश्य झाले आहेत.
ढोबळमानाने पाहिल्यास दोघांनीही लिहिलेल्या निबंधांचा किंवा दीर्घ लेखांचा आशय सारखाच आहे. त्यांचा रोख चीनचे सर्वशक्तीमान अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडे आहे. ‘कोविड १९’ चे संकट जिनपिंग यांनी अत्यंत बेजबाबदारपणे हाताळले आहे. त्यामुळे चीनचे आणि जगाचेही जे अतोनात नुकसान झाले आहे, त्यासाठी जिनपिंग हे वैयक्तिकरित्या जबाबदार आहेत, असा दोघांचाही आरोप आहे. रेन यांनी जिनपिंग यांना उपरोधिकपणे ‘सम्राट’ अशी उपमा दिली आहे. तर, शू यांनी त्यांना ‘अंतिम न्यायकर्ता’ असं म्हणून हिणवले आहे. चिनी जनतेला कोरोनाच्या संकटातून वाचवण्यात कम्युनिस्ट पक्ष पुरता अपयशी ठरल्याची जहरी टीका या दोघांनी आपल्या लिखाणातून केली आहे.
रेन झिकियांग यांनी तर, जिनपिंग यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत हल्ला चढवलाय. देशावर आलेल्या संकटाचा वापर करून आपले नेतृत्व अधिक भक्कम करण्याचा जिनपिंग यांनी प्रयत्न केल्याचे त्याचे म्हणणे आहे. जानेवारीच्या ७ तारखेपासून आपण आघाडीवर राहून कोरोनाविरोधी लढ्याचे नेतृत्व करत असल्याच्या शी जिनपिंग यांच्या दाव्याची झिकियांग यांनी खिल्ली उडवली आहे. २३ फेब्रुवारी झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत जिनपिंग यांच्या नेतृत्वाची विनाअट भलामण करण्याचा व त्यांना यशस्वी नेते म्हणून मान्यता देण्याचा निर्णय हास्यास्पद असल्याचं त्यांनी म्हटले आहे. त्याबाबत झिकियांग लिहितात की, ‘तिथे उभा राहून कुणी सम्राट आपल्याला त्याचे नवे कपडे दाखवत नव्हता, तर अंगावर कपडे नसलेला एक विदूषक सम्राटाची भूमिका साकारण्याच्या केविलवाणा प्रयत्न करत होता.’
शू यांनी जिनपिंग यांचे चित्रण ‘आव्हानांशी झगडताना असहाय्य झालेला नेता’ असे करून त्यांचा तितक्याच तीव्र शब्दांत धिक्कार केला आहे. कोरोना विषाणूचे संकट समोर असतानाही जबाबदार व्यक्तींकडून त्याबद्दल माहिती मिळवण्यात हा नेता सपशेल अपयशी ठरला. असे मांडून रेन आणि शू दोघांनीही चीनच्या अध्यक्षांवर लपवाछपवीचा आरोपही केला आहे. खरेतर, ७ जानेवारीनंतर जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या पॉलिट ब्यूरोची बैठकही झाली होती. त्यात त्यांनी कोविड १९च्या साथीचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. मग ७ जानेवारीनंतर चीनने कोरोनाची साथ आल्याची सार्वजनिक घोषणा का केली नाही, असा मूलभूत प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ७ जानेवारीनंतरच्या दोन आठवड्यांतील सर्व प्रकारच्या राष्ट्रीय कार्यक्रमांना सरकारने परवानगी का दिली? वार्षिक वसंतोत्सवाच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी लाखो चिनी नागरिकांना प्रवासाची मुभा का दिली गेली? चीन सरकारच्या या निर्णयांमुळंच कोरोनाचे जागतिक महामारीमध्ये रूपांतर होण्यास हातभार लागला, असा आरोप शू यांनी केला आहे.
झिकियांग आणि शू यांचे लेख तात्कालिक संकटाच्या पलीकडे जाऊन मुख्य मुद्द्याला हात घालतात. त्यावर भाष्य करतात. हे सगळे करण्यामागचे कारण सांगताना शू हे अध्यक्ष जिनपिंग आणि त्यांच्याभोवती असलेल्या कारस्थानी कंपूकडे बोट दाखवतात. नेमकी इथेच त्यांची लेखणी एखाद्या सुऱ्यासारखी धारदार होत गेलेली दिसते. चीनचा सर्वेसर्वा बनण्याच्या महत्त्वाकांक्षेपायी अध्यक्ष जिनपिंग यांनी केलेल्या उपद्व्यापावर ते प्रकाश टाकतात. नागरी, लष्करी आणि पक्षासह सर्व अधिकार पद्धतशीरपणे स्वत:कडे ठेवणे, एखाद्या व्यक्तीला अध्यक्षपदी राहण्यासाठी कालमर्यादा घालून देणारं घटनेतील कलम रद्दबातल करणे, पक्ष तसेच सरकारची कामे आणि जबाबदाऱ्यांची फेररचना करून प्रांतीय मंत्रिमंडळांच्या प्रमुखांकडे असलेल्या अधिकारांचे (खास करून आर्थिक) केंद्रीकरण करणे, धोरणात्मक बाबींच्या संदर्भातील अधिकार पक्षातील समित्यांऐवजी स्वत:च्या मर्जीतील गटांकडे सोपवणे, स्वत:च्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी भ्रष्टाचार विरोधाच्या नावाखाली राबवलेला राजकीय शुद्धीकरणाचा प्रयोग आणि राजाचे राजेपण टिकवण्यासाठी झटणाऱ्या आपल्या बगलबच्च्यांची वरिष्ठ सरकारी पदांवर केली गेलेली नेमणूक… जिनपिंग यांच्या या सत्ताप्रयोगाची लक्तरेच या लेखकद्वयींनी वेशीवर टांगली आहेत.
चीनमधील अब्जावधी जनतेचा अनभिषिक्त नेता होण्याच्या महत्त्वाकांक्षेपायी माओ झेडाँग यांनी सर्व अविवेकी मार्गांचा अवलंब केला. त्यांनी राबवलेल्या सांस्कृतिक क्रांतीच्या प्रयोगामुळं चीन अक्षरश: उद्ध्वस्त झाला होता. माओनंतर सत्तेवर आलेल्या डेंग झिओपिंग यांनी १९८० मध्ये शहाणपणाचा निर्णय घेत पक्षांतर्गत राजकीय व्यवस्थेसाठी मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली. डेंग हे स्वत: काही लोकशाहीवादी नेते नव्हते. ‘तिआन मेन’ सारखी निर्णायकी घटना १९८९ साली घडली हे वास्तव असले तरी, संस्थात्मक मार्गानं काहीएक नियमावली तयार न केल्यास दुसरा माओ तयार होऊ शकतो, अशी भीती डेंग यांना होती. सामूहिक नेतृत्व हा या नियमांचा गाभा होता. सामूहिकरित्या घेतलेला निर्णय जास्तीत जास्त संतुलित असण्याची शक्यता असते. त्यातून अन्यायकारक निर्णयाचा धोका टळतो. तसेच, एखाद्या व्यक्तीकडून सर्व सत्ता ताब्यात घेतली जाण्याचा धोकाही कमी होतो, असा डेंग यांचा विश्वास होता. त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांसाठी व सरकारी अधिकाऱ्यांसाठी वयाची मर्यादा लागू केली. कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस आणि प्रांतीय सरकारांच्या प्रमुखांमध्ये समतोल राखण्यासाठी पक्ष आणि सरकार यांच्यातील विभाजनाकडे लक्ष दिले. धोरण ठरविण्यासाठी अधिकृत पक्ष समितीच्या जागी अन्य कुठलीही तात्कालिक यंत्रणा स्थापण्याची प्रथा मोडीत काढली आणि पक्षातील उमरावांच्या विशेषाधिकारांना चाप लावला.
डेंग यांनी प्रत्यक्ष कृतीतून नेतृत्वाचा आदर्श घालून दिला. कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर त्यांनी नाकारली. इतकंच नव्हे, १९८७ पर्यंत पक्ष आणि सरकारमधील आपल्या सर्व पदांचा त्याग केला. पुढची ३० वर्षे सामूहिक नेतृत्व ही चिनी कम्युनिस्ट पक्षाची ओळख बनली होती. त्याचा पक्षाला मोठा फायदा झाला. सामूहिक नेतृत्वामुळेच १९८९च्या राजकीय वादळात पक्ष तरला. १९९७ नंतर डेंग यांच्या राजकीय अस्तानंतरच्या कालखंडात हू जिंताव आणि झियांग जेमीन या दोन सरचिटणीसांच्या गटांमध्ये समतोल राखण्यास मदत झाली. याच काळात चीनचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) चौपटीने वाढले आणि त्याच प्रमाणात जागतिक पातळीवर चीनचे वजनही वाढले.
हु जिंताव यांचे उत्तराधिकारी म्हणून २०१२ साली बो शी लाय यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आत्ममग्न आणि चमको वृत्तीच्या बो यांच्याबद्दल पक्षात फारसे अनुकूल मत नव्हते. बो यांच्याविषयीच्या धास्तीमुळे सुरक्षित पर्याय म्हणून शी जिनपिंग यांच्या नावावर एकमत झाले. मात्र, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांचा आणि एकंदर जगाचाही तर्क चुकीचा ठरला. पक्षामध्ये सर्वोच्चपदी निवड झाल्यापासून अध्यक्ष शी जिनपिंग यांनी डेंग यांचा राजकीय वारशाची पद्धतशीरपणे मोडीत काढायला सुरुवात केली. शी जिनपिंग यांची विचारधारा माओच्या तत्त्वज्ञानाच्या पातळीवर आणण्यात आली आहे.
पीपल्स लिबरेशन आर्मी अर्थात, चिनी लष्करासाठी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ‘कमांडर-इन-चीफ’ या पदासह सर्व अधिकार व पदांचे केंद्रीकरण करण्याच्या या प्रक्रियेकडे जिनपिंग यांचे सहकारी केवळ मूकपणे पाहत आहेत. हाँगकाँगमधील निदर्शने, तैवानमधील स्वातंत्र्य समर्थक सरकारची फेरनिवडणूक आणि अमेरिका-चीनममधील व्यापारी युद्ध हाताळताना जिनपिंग यांनी घेतलेल्या निर्णयाला पक्षातून कुणीही मोठे आव्हान दिले नाही. मात्र, कोरोनानंतरच्या काळातील चित्र कदाचित वेगळे असेल.
रेन झिकियांग यांनी म्हटल्याप्रमाणे ‘कपडे घातल्याचा देखावा करून राजा स्वत:ला फसवू शकतो, पण प्रत्यक्षात कमरेखाली तो नागडा आहे हे शेंबड्या पोरालाही माहीत असते. शिवाय, ‘राजा नागडा आहे’ हे सांगण्याची हिंमत लोक करत नसले तरी नवे कपडे घालणं काय असते आणि नागडे असण्याचे अर्थ काय, हे त्यांना चांगले कळते.
चीनमध्ये याचिका किंवा लिखित गाऱ्हाणी हा ठिणगीला हवा देण्याचा एक उत्तम मार्ग असतो. उच्चपदस्थ आणि शक्तीशाली लोकांना व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी अशा याचिका उपयुक्त ठरतात. कधी-कधी अगदी राजेशाही बदलण्यासाठीही. चीनचे दिवंगत पंतप्रधान चाऊ एन लाय यांच्या स्मरणार्थ ४ एप्रिल १९७६ रोजी तिआन मेन चौकात चिकटवण्यात आलेली एन निनावी कविता याचे उत्तम उदाहरण आहे.
जेव्हा मी दु:खात असतो, मला सैतानाची किंकाळी ऐकू येते
लांडगे आणि कोल्हे हसतात, तेव्हा मला रडू कोसळते
पण, एखाद्या नायकाच्या स्मृतींनी जेव्हा मी अश्रू ढाळतो
तेव्हा, ताठ मानेने मी माझी तलवार उपसतो
चीनमधील अराजकी परिस्थितीने पोळलेल्या जनतेसाठी हे काव्य म्हणजे समरगीत ठरले होते. माओ झेडाँग याची विधवा पत्नी झियांग किंग हिच्या नेतृत्वाखालील चौकडीची सत्ता उलथवण्यासाठी ऑक्टोबर १९७६ मध्ये या काव्याने चीनच्या तत्कालीन नेतृत्वाला स्फूर्ती दिली आणि चीनमध्ये राजकीय स्थैर्य आणि सुधारणावादी युगाचा आरंभ झाला.
शक्यता अनेक वर्तवल्या गेल्या असल्या तरी या कवितेला पडद्यामागून अधिकृत पाठबळ मिळाले होते का, याबद्दल अनभिज्ञता आहे. इतर याचिकांना अर्थातच तसा पाठिंबा होता. १९५८ मध्ये माओच्या नेतृत्वाखालील तत्कालीन चीन सरकारने राबवलेली ‘ग्रेट लीप फॉरवर्ड’ ही मोहीम व्यर्थ होती आणि तिची अंमलबजावणी अत्यंत विनाशकारी पद्धतीने झाली, असं पक्षातील सर्वांचंच मत होते. ही मोहीम फसल्यामुळे लाखो चिनी नागरिकांचे बळी गेले. माओचे विश्वासू सहकारी असलेले तत्कालीन संरक्षणमंत्री मार्शल पेंग देहूई यांनी याबद्दल माओला पत्रही लिहिले होते. पण त्यातून काही साध्य होणार नव्हते. तेव्हा चिनी जनतेला बळ देऊन माओच्या सर्वाधिकाराला चाप लावण्यासाठी आणि देशातील जनतेला भूकबळीतून वाचवण्यासाठी एका याचिकेची गरज होती.
१९८६ साली चीनमधील एक विचारवंत आणि कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य वांग रुवांग यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या निरंकुश सत्तेच्या हट्टाविरोधात आवाज उठवला. एक पक्षीय हुकूमशाही केवळ आणि केवळ जुलूमशाहीला आमंत्रण ठरू शकते, असा लेखी आरोप त्यांनी केला. रुआंग यांच्या या लिखित तक्रारीचा उपयोग सरचिटणीस हू योबांग या शक्तिशाली, पण उपद्रवी नेत्याला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी झाला. १६ जानेवारी १९८७ साली योबांग याची अधिकाराची कवचकुंडले हिरावली गेली. फॅग लिची यांनी ६ जानेवारी १९८९ साली डेंग झियोपिंग यांना लिहिलेले खुले पत्र कुणीच विसरू शकणार नाही. या पत्रातून लिची यांनी चिनी लोकशाहीचे जनक वी झिंगशेंग यांच्यासह सर्व राजकीय कैद्यांना सोडण्याची मागणी केली होती. याच पत्राचा उपयोग कम्युनिस्ट पक्षाची निर्विवाद हुकुमशाही मोडीत काढण्याच्या प्रयत्नात असलेले दुसरे एक सरचिटणीस चाओ झियांग यांना पदच्युत करण्यासाठी करण्यात आला.
रेन आणि शू यांचे बेधडक लिखाण चीनमधील मुक्या जनतेला आवाज उठवण्यास प्रवृत्त करेल का, याच्या उत्तरासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. चीनचे अध्यक्ष शी हे इतर अनेक वादळांप्रमाणेच यातूनही सुखरूप बाहेर पडतील. मात्र, नाराजीचा लहानसा सूरही चिनी साम्राज्यात सर्व काही आलबेल असल्याच्या विश्वासाला तडा देणारा ठरला. अचानक वुहानमधील कोविड १९ या विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीचा फेरआढावा घेतला गेला आणि त्यात ५० टक्क्यांनी वाढ झाल्याचे जाहीर केले. लोकांपासून सत्य फार काळ लपवता येणार नाही, याची जाणीव झाल्याने चीनने हा निर्णय घेतला असावा. कारण, रुग्णांच्या अंत्यविधीनंतर त्यांच्या नातलगांना देण्यात येणाऱ्या अस्थिकलशावरून मृतांची संख्या सहज मोजली जाऊ शकते, हे सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आले असावे.
कोविड – १९ ची उत्पत्ती नेमकी कुठं झाली याचे शास्त्रीयदृष्ट्या संशोधन केले पाहिजे, अशी अधिकृत भूमिका चीनने जाहीर केली होती. त्यानंतर काही दिवसांतच चीन सरकारने कोविडच्या उत्पत्तीविषयीचे कोणतंही संशोधन केंद्राच्या मंजुरीशिवाय प्रकाशित करू नये, असे निर्बंध स्वतःच्याच संशोधन संस्थांवर घातले. चीनमध्ये कोविडच्या विषाणूची पैदास नेमकी कुठे झाली याची माहिती आपल्या लोकांना मिळेल, अशी भीती चीनला वाटली असा याचा अर्थ घ्यायचा का?
पुढं काय होईल याबद्दल अंदाज बांधणे किंवा एखाद्या गोष्टीचा अर्थ लावणे हे चीनमध्ये नेहमीच आव्हान राहिलं आहे. लोकांचे मत काय हे ओळखणं कठीण असते. पण इंटरनेट हे त्याचं निदर्शक मानले तर चीनच्या सरकारी सेन्सॉरसाठी हा काळ खडतर असल्याचे दिसते. लोकांसमोर राजा हा नेहमी कपडे घातलेलाच दिसायला हवा. त्यामुळेच की काय, ७ जानेवारीपासून चीनचे अध्यक्ष सर्व काही नियंत्रणात असल्याचे जनतेला अधिकृतरित्या भासवत आहेत.
दोन तळटिपा लिहून मी या साऱ्याचा समारोप करतो.
एक म्हणजे, चिनी लोक अंधश्रद्धाळू आहेत. त्यांचा कदाचित धर्मावर विश्वास नसेलही, परंतु परंपरा आणि संस्कृतीकडं त्यांचा कमालीचा कल आहे. अकार्यक्षम वा अन्यायी सत्ताधीशांच्या शेवटाचे संकेत नैसर्गिक आपत्तीतून मिळतात, अशी श्रद्धा चीनमध्ये साम्राज्यशाहीचा उदय झाल्यापासून आहे. १९७६ साली चीनमधील तांगशॅन भूकंपात पाच लाखांहून अधिक माणसे मारली गेली. माओच्या मृत्यूचा आणि त्यांच्या नेतृत्वाखील ‘गँग ऑफ फोर’च्या पतनाचा तो संकेत होता, असं मानलं गेलं. तांगशॅनच्या भूकंपानंतर चीनमध्ये आतापर्यंत आलेल्या नैसर्गिक संकटांपैकी कोविड १९ हे सर्वात मोठे संकट आहे.
दुसरे असे की, चीनमध्ये मूळ तक्रारकर्ते किंवा याचिकाकर्त्यांना क्वचितच चांगली वागणूक मिळाली आहे. सांस्कृतिक क्रांतीच्या काळात पेंग देहूई यांना आधी पद गमवावे लागले आणि नंतर जीवही गमवावा लागला आहे. वांग रूवांग आणि फॅँग लिची यांना अटक करून हद्दपार करण्यात आले. ही पार्श्वभूमी लक्षात घेता रेन झिकियांग व शू झँगरून यांच्या नशिबातही कदाचित असेच काही असू शकेल.
(विजय गोखले हे देशाचे माजी परराष्ट्र सचिव असून, त्यांनी चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे.)
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.