Published on Mar 25, 2020 Commentaries 0 Hours ago

कोरोनाच्या हाहाःकारने जागतिक अर्थव्यवस्थेचे अपरिमित नुकसान होत आहे. हे असे किती दिवस चालणार या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही.

जागतिक अर्थव्यवस्था डबघाईला?

एखाद्याला आजार झाला तर त्यातून बरे होण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ त्यास औषधाच्या कठोर मात्रा देतात. कोरोना विषाणूमुळे त्रस्त झालेल्या जागतिक अर्थव्यवस्थेलाही अशाच एका कठोर मात्रेची गरज आहे…

कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात

वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक अर्थव्यवस्थेचा आढावा अहवाल जाहीर केला होता. २०१९ मध्ये २.९ टक्के असलेला जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग २०२० मध्ये ३.३ टक्क्यांपर्यंत तर २०२१ मध्ये हा दर ३.४ टक्के असेल, असे या आढावा अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात घेतलेल्या आढव्याच्या पार्श्वभूमीवर २०१९ आणि २०२० या आर्थिक वर्षांसाठी हा अंदाज ०.१ टक्क्यांनी तर २०२१ सालासाठी ०.२ टक्क्यांनी कमी करण्यात आला. जागतिक अर्थव्यवस्था वाढीच्या वेगाच्या अंदाजाची टक्केवारी कमी करण्यामागील प्रमुख कारण म्हणजे भारतासह ज्या काही उदयोन्मुख आर्थिक महासत्ता आहेत, त्यांच्या वाढीचा मंदावलेला वेग! त्याच्या जोडीला जगभरात सध्या सुरू असलेले व्यापारी तणावही आहेतच.

२०१९च्या अखेरच्या महिन्यात मात्र जागतिक अर्थव्यवस्थेला सुरूंग लावेल अशा साथीच्या आजाराची निर्मिती झाली. चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान शहरात डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात विचित्र आजाराचे रुग्ण आढळू लागले. सुरुवातीला त्याचे गांभीर्य कोणाच्याच लक्षात आले नाही. साम्यवादी चीन सरकारने तर त्याकडे साफ दुर्लक्ष केले. मात्र, जसजशी रुग्णांची संख्या वाढू लागली तसतसे त्याचे गांभीर्य लक्षात येऊ लागले. वुहानमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी यासंदर्भात चीन सरकारला सतर्कतेचा इशाराही दिला. मात्र, सुस्तावलेल्या चीन सरकारने अजूनही त्याची गंभीर दखल घेतली नाही.

जानेवारीच्या तिस-या आठवड्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागताच चीन सरकार खडबडून जागे झाले. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. आजाराने चीनमध्ये सर्वदूर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होती. प्राण्यांमधून माणसाच्या शरीरात संक्रमित झालेल्या या आजाराचे नाव कोव्हिड-१९ अर्थात कोरोना असल्याचे अखेरीस निष्पन्न झाले. सुरुवातील चीनपुरता मर्यादित असलेला कोरोना विषाणू अल्पावधीतच जगभर पसरला. कोरोनाचा प्रादुर्भाव अजून वाढतोच आहे. चीनमध्ये साडेतीन हजार लोकांचा बळी कोरोनाने घेतला. चीनबाहेर इटली, इराण आणि अमेरिका या देशांमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या लक्षणीय असून ती झपाट्याने वाढत आहे. इटलीत तर कोरोनामुळे दिवसागणिक शेकडो लोक मरण पावत आहेत.

कोरोनाच्या झपाट्यामुळे अखेरीस जागतिक आरोग्य संघटनेला कोव्हिड-१९ला जागतिक साथीचा आजार म्हणून घोषित करावे लागले. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार व विकास परिषदेने (यूएनसीटीएडी) कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला १ ट्रिलियन डॉलर एवढे नुकसान होईल, असा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणखी एक अत्यंत वाईट बातमी म्हणजे जागतिक विकासाचा वेग ०.५ टक्क्यांनी कमी होऊन २०२० मध्ये २ ट्रिलियन डॉलरचे नुकसान होणे अपेक्षित आहे. हे सर्व एकट्या कोरोना विषाणूमुळे होणार आहे.

कोरोनाच्या उद्रेकावर नियंत्रण मिळविण्यात यश येईल, असे फेब्रुवारीपर्यंत वाटत होते. मात्र, ही आशाही आता फोल ठरली आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी आता जगभरातील विविध देशांची सरकारे उपाययोजना राबवत आहेत. त्यातील समान धागा म्हणजे सार्वत्रिक बंदी. लोकांनी एकत्र येऊन या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी समुदायांमधील, समाजातील अंतर वाढवणे हा एकच उपाय असून त्यासाठी सर्व व्यवहार बंद ठेवणे, लोकांच्या हालचालींवर नियंत्रण आणणे वगैरे उपाय मोठ्या प्रमाणात देशोदेशी राबवले जात आहेत.

या सर्व गोष्टींचा अर्थातच उद्योग, व्यापार आणि अर्थव्यवस्थेवर होत आहे. अनेक उद्योगांचे लाखो-करोडोंचे नुकसान होत आहे. हे असे किती दिवस चालणार, किती नुकसान सोसावे लागणार, असे प्रश्न त्यामुळे निर्माण होऊ लागले आहेत.

कोरोनाचा जेवढा प्रादुर्भाव तेवढा हाहाःकार निश्चित

आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने (ओईसीडी) कोव्हिड-१९ वर या महिन्यात जारी केलेल्या हंगामी अहवालात दोन संभाव्य परिणामांमध्ये वर्गीकरण केले आहे –  मूळ परिणाम आणि दीर्घकालीन परिणाम

तक्ता १: कोविड-१९चा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम: दोन शक्यता
मूळ परिणाम : तात्पुरता होणारे नुकसान दीर्घकालीन परिणाम : व्यापक संसर्ग

चीनमध्ये तीव्र परंतु अल्पजीवी अधोगती- ज्यात जीडीपी विकासाचा दर ५ टक्क्यांच्या खाली जाईल. जो २०१९ मध्ये ६.१ टक्के होता. परंतु २०२१ मध्ये जीडीपी विकासाचा दर ६.४ टक्के होईल.

जपान, कोरिया, ऑस्ट्रेलिया यांच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसून त्यानंतर हळूहळू त्यांत सुधारणा होईल.

इतर देशांच्या अर्थव्यवस्थांवर होणारा परिणाम तितकासा गंभीर नसेल परंतु त्यांच्या आत्मविश्वासात घट होईल आणि पुरवठा साखळीत व्यत्यत निर्माण होईल.

चीनच्या अर्थव्यवस्थेवर होणा-या तीव्र परिणामांची पुनरावृत्ती उत्तरेकडील विकसित अर्थव्यवस्थांबाबत होईल. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास तर घटेलच शिवाय प्रवास आणि खर्च यांवर निर्बंध येतील.

२०२० मध्ये जागतिक विकास दरात १.५ टक्के घट होईल. म्हणजे कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वी जे भाकीत करण्यात आले होते त्याच्या निम्म्याने किंवा त्याहून अधिक घट होईल.

त्यातून सावरायला वेळ लागेल पण २०२१ मध्ये पूर्णतः सावरली जाईल.

्रोत: ओईसीडी आर्थिक पाहणी, हंगामी अहवाल, मार्च २०२०

कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वीही (आकृती १) जागतिक व्यापाराची प्रकृती तोळामासाच होती. अमेरिका, चीन आणि एकूणच जगातील विकसित देशांचे जीडीपी आणि व्यापार अंदाज फारसे उल्लेखनीय असतील असे वर्तविण्यात आले नव्हतेच परंतु अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारावरून निर्माण झालेली तणावाची स्थिती आणि त्यानंतर उभय देशांमध्ये झालेला तह यांमुळे जागतिक व्यापार आणि जीडीपी यांची परिस्थिती सुधारली होती आणि २०२० मध्ये त्यात आणखी सुधारणा (आकृती १ मधील बी पॅनेल) होईल, अशी अपेक्षा होती. परंतु कोरोना विषाणूमुळे आता सर्वच बदलले आहे.

आकृती १: कोव्हिड-१९च्या उद्रेकापूर्वी जागतिक व्यापार मंदावल्या अवस्थेतच होता.

अमेरिका आणि चीन यांच्यात २०१९ मध्ये टप्पा १ करारापूर्वी आणि नंतर झालेल्या द्विपक्षीय व्यापारातील बदलाचा एकत्रित अंदाज पॅनेल बी मध्ये दर्शविण्यात आला आहे आणि गुंतवणूक जोखमीच्या प्राथमिकतेत ५० बेसिस पॉइंट्सने जागतिक वाढ होते जी तीन वर्षे राहील आणि नंतर हळूहळू नाहिशी होईल. सर्व व्यापार धक्के सहा वर्षांसाठी गृहीत धरण्यात आले आहेत. परिणामांची पाहणी अंदाजाधारित आहे.

स्रो: ओईसीडी आर्थिक पाहणी, हंगामी अहवाल, मार्च २०२०

व्यापारउदिमाला जसजशी मरगळ आली तसतसा जागतिक जीडीपी विकासही कमीकमी होत गेला, विशेषतः २०१७ नंतर. चार विकसित आर्थिक क्षेत्रांच्या पीएमआयमध्ये घसरण झाली, त्यामुळे जागतिक स्तरावर तीव्र मंदी (आकृती २) निर्माण झाली. २०१७च्या मध्यापासून उत्पादन आणि सेवा आदेश या दोघांमध्ये झालेली घसरण पॅनेल बी मध्ये दर्शविण्यात आली आहे. त्यातच कोरोनाचा उद्रेक झाल्याने परिस्थिती आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

आकृती २ : ागतिक विकास दरही आधीच घसरत गेला.

* जीडीपी कायमच पीपीपीवर (क्रयशक्ती तुल्यता सिद्धांत) आधारित राहिलेला आहे. २०१९च्या चौथ्या तिमाहीतील डेटा अंदाजित आहे. विकसित अर्थव्यवस्था पीएमआय (पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स) मालिका ऑस्ट्रेलिया, युरो झोन, जपान, युके आणि यूएस यांच्यासाठी पीपीपी-आधारित आहे.

स्रो: ओईसीडी आर्थिक पाहणी, हंगामी अहवाल, मार्च २०२०

जागतिक अर्थव्यवस्था किती डबघाईला येईल?

कोरोना विषाणूमुळे त्रस्त झालेल्या देशांच्या अर्थव्यवस्था ७० टक्के जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतात (पीपीपी संदर्भात) हे गृहीत धरून ओईसीडी अहवालाने दीर्घकालीन परिणामांचे चित्र उभे केले.

आकृती ३: कोरोना विषाणूचा सचित्र आढावा : २०२० मध्ये जीडीपी विकासात बदल होईल हे बेसलाइनला धरून आहे (टक्केवारीच्या स्वरूपात).

* मंदावलेली देशांतर्गत मागणी, वस्तूंचा घटलेला पुरवठा आणि घरंगळलेला भांडवली बाजार आणि उच्च प्रकारची अस्थिरता यांचा एकत्रित परिणाम. चीनमध्ये पसरलेला विषाणूचा प्रादुर्भाव ही आधारभूत परिस्थिती, आशिया-प्रशांत महासागर क्षेत्र, युरोप आणि उत्तर अमेरिका या ठिकाणी वेगाने पसरत चाललेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा विस्तारित आधारभूत आहे. वस्तूंच्या निर्यातदारांमध्ये अर्जेंटिना, ब्राझील, चिली, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि इतर ना-ओईसीडी तेल उत्पादक अर्थव्यवस्थांचा समावेश आहे.

स्रो: ओईसीडी आर्थिक पाहणी, हंगामी अहवाल, मार्च २०२०

कोरोना संसर्गाचा विस्तारित परिणाम सगळीकडे तीव्र स्वरूपाचा (आकृती ३) असेल. कोरोना विषाणूचे उगमस्थान असलेल्या चीनला त्याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रातील देशांचा जीडीपी १.६ टक्क्यांपर्यंत घसरेल. उत्तर अमेरिका, वस्तू निर्यातदार देश आणि युरोप यांनाही प्रचंड प्रमाणात झळ पोहोचेल. जागतिक जीडीपीवर १.५ टक्के नकारात्मक परिणाम होईल.

जगभरातील भांडवली बाजार मार्चमध्ये (आकृती ४) साफ कोसळले. या विसंगतीला चीनमधून सुरुवात झाली. कोरोनाच्या संसर्गानंतर सावरलेल्या चीनमधील कारखाने आणि रेस्टॉरंट्स पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करत आहेत, गुंतवणूकदार सरकारकडून काही आर्थिक पॅकेजची घोषणा होते का, याकडे डोळे लावून बसले आहेत.

आकृती ४ : भांडवली बाजारांवर कोरोना विषाणूचा परिणाम
स्रोत बीबीसी न्यूज

जागतिक अर्थव्यवस्था चीनप्रमाणेच हिंदकोळे खाऊन पूर्वपदावर येईल.

ग्रुबेल-लॉइड निर्देशांकाने (जीएलआय) मोजलेली विविध क्षेत्रांतील जागतिक मूल्य साखळीतील चीनची विद्यमान एकरूपता आकृती ५ मध्ये दर्शविण्यात आली आहे. प्रिसिजन उपकरणे, यंत्रे, ऑटोमोटिव्ह आणि कम्युनिकेशन उपकरणांच्या मूल्य साखळीत तो मुख्य आधार असतो. कोरोनाशी संबंधित निर्बंध उत्पादकांमध्ये नकारात्मकता निर्माण करून या प्रक्रियेस खीळ घालतील.

तसेच ज्या ठिकाणी जागतिक मूल्य साखळीतील चीनची एकरूपता ज्या ठिकाणी कमी असेल, तर अशी काही क्षेत्रे आहेत ज्या ठिकाणी चीनचीच सद्दी चालते, उदाहरणार्थ वस्त्रोद्योग आणि प्रावरणे, ते चीनला तारून नेतील. यापैकी काहींमध्ये चीन स्वयंपूर्ण आहे आणि त्याची उत्पादन प्रक्रिया कच्चा माल ते उत्पादित माल अशी आहे.

आकृती ५ : जागतिक मूल्य साखळीतील चीनची एकरूपता, क्षेत्रनिहाय (ग्रुबेल-लॉइड निर्देशांकाच्या स्वरूपात)

* विशिष्ट उत्पादनाच्या इन्ट्रा-इंडस्ट्री व्यापाराची मोजमाप ग्रुबेल-लॉइड निर्देशांक करतो.

स्रोत यूएनसीटीएडी

नासासह विविध उपग्रहांद्वारे घेण्यात आलेल्या या छायाचित्रांत चीनच्या प्रदूषण पातळीत लक्षणीय घट झाल्याचे (आकृती ६) दिसून येते. जानेवारीमध्ये चीनच्या वातावरणातील नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण अल्प होते. मात्र, फेब्रुवारीत ते पूर्णतः नाहिसे झाले. नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण महिनाभरात नाहिसे होऊ शकते यावरून सर्व व्यवहार बंद करण्याची परिणामकारकता अधोरेखित होते. जगातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र म्हणून नावाजलेल्या चीनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात औद्योगिक बंदी होत असेल तर त्याचे व्यापक परिणाम जगाच्या बाजारावर होऊ शकतात, याचा अंदाज आपल्याला येतो.

कृती ६: ंदीच्या काळात चीनमध्ये प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्याचे या उपग्रहाद्वारे प्राप्त झालेल्या छायाचित्रांत दिसून येते.

* नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण घटल्याचे प्रदूषण पातळीत दर्शविणअयात आले आहे.

स्रोत :बीबीसी न्यूज

कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका पर्यटन उद्योगाला बसला आहे. कोरोना उद्रेकानंतर जगभरातच चिनी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली (आकृती ७). उदाहरणार्थ, सप्टेंबर, २०१९ पर्यंतच्या १२ महिन्यांत इंग्लंडला भेट देणा-या चिनी पर्यटकांची संख्या ४,१५,००० होती. चिनी पर्यटक. १,६८० पौंड, इंग्लंडमध्ये येणा-या अन्य पर्यटकांच्या तुलनेत तिप्पट खर्च करतात. चिनी पर्यटकांची संख्या घटल्याने हवाई वाहतूक, स्वागत क्षेत्र आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या उद्योगांवर परिणाम होणार आहे.

कृती ७ : जगभरातील प्रमुख पर्यटन स्थळांवरील चिनी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट.
स्रोत:बीबीसी न्यूज

आधी उल्लेख केल्याप्रमाणे जागतिक अर्थव्यवस्थेत मागणीत मोठी घट होणार आहे आणि चीन त्यास अपवाद ठरणार नाही. चारचाकी गाड्यांच्या विक्रीचा विकास दर नकारात्मक राहणार असून २०१९ हे त्याचे निदर्शक वर्ष असेल. फेब्रुवारी, २०२० च्या पहिल्या दोन आठवड्यांत कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर चीनचा कार विक्रीचा आलेख तब्बल -९२ टक्क्यांनी (आकृती ८) घसरला. टेस्ला किंवा गीली सारखे उच्चभ्रू कारनिर्माते आता त्यांच्या गाड्यांची विक्री ऑनलाइन पद्धतीने करत आहेत कारण अनेक ग्राहकांनी शोरूमकडे पाठ फिरवली आहे. रेस्टॉरंट्स आणि इतर मनोरंजन उद्योग, शॉपिंग मॉल्स, चित्रपटगृहे या क्षेत्रांनाही कोरोना विषाणूची झळ पोहोचली आहे.

कृती ८: ०२० मध्ये चीनमध्ये कारविक्रीचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले.
स्रोतबीबीसी न्यूज

या जागतिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज

भासणार आहे

कोरोनाच्या संसर्गाला रोखण्याची पूरेपूर आर्थिक किंमत जगाला मोजावी लागणार आहे. त्यास काही पर्याय नाही. मात्र, आधीच जग मंदीच्या लाटेवर स्वार झालेले असताना कोरोनाच्या उद्रेकामुळे परिस्थिती अधिकच चिघळणार आहे. देशोदेशीचे सरकारे उद्रेकानंतरच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतील, त्यात आरोग्य तसेच अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या असलेल्या क्षेत्रांचे हितरक्षण यांना प्राधान्य असेल. चीनमध्ये या उद्रेकाची किंमत गरिबातल्या गरिबांना मोजावी लागत आहे. या साथीच्या रोगाचे बळी पडणारे गरीबच जास्त आहेत. त्यातच त्यांच्या आर्थिक हालाखीलाही पारावार उरलेला नाही.

एकंदरच जगाच्या अर्थव्यवस्थेची दुरवस्था करणा-या या साथीच्या आजाराला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सहकार्य गरजेचे आहे. साथ आटोक्यात आल्यानंतरही देशादेशांमध्ये हे सहकार्याचे धोरण निरंतर चालू ठेवावे लागणार आहे. मानवी दृष्टिकोनातून अल्पमुदतीची उद्दिष्टे साध्य झाली की मग अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता भासणार आहे. सध्या तरी ती ताकद कोणत्याही देशात नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन एक आर्थिक महासंकल्प करून यंदाच्या वर्षात त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व देशांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.