Published on Apr 20, 2020 Commentaries 0 Hours ago

कोरोनाचा आजवरचा भारतातील प्रवास आणि देशातील आरोग्यव्यवस्थेची अवस्था पाहता, आपल्याला कोरोनाविरोधातील लढाई बरीच लांब लढावी लागणार आहे, हे निश्चित.

कोरोनाबाबत हवी ‘अखंड सावधानता’!

कोरोनाने भारतातील सर्व व्यवहार बंद पाडून आता जवळपास महिना उलटत आला आहे. अद्यापही या महाभयंकर साथीची लस दृष्टिपथात नसून, अद्यापही सारे जग बचावात्मक उपायच करत आहे. भारतातही एका बाजूला या विषाणूला कसे रोखायचे याचा, आणि दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्थेचे गाडे कसे हाकायचे? असा विचार करत पुढील पावले उचलली जात आहेत. हे सारे खरे असले तरीही भारताच्या आरोग्य व्यवस्थेची अवस्था पाहता, भारतात कोरोनाविरोधातील लढाई बरीच लांब लढावी लागणार आहे, हे निश्चित.

तसेच देशातील कोरोनाच्या बळींची संख्या वाढण्याची शक्यता आहे का? याचे उत्तर देणेही अवघड ठरते आहे. म्हणूनच भारतासाठी कोरोनाची ‘धोक्याची घंटा’ अद्यापही घणघणतेच आहे. आजघडीला जगभरातील विकसित अर्थसत्ताही या विषाणूशी संघर्ष करीत असताना, भारतालाही या अनिश्चिततेची झळ सोसावी लागणार, हे अटळ आहे. त्यामुळेच येणाऱ्या भविष्यकाळात भारतासारख्या देशाने दूरदृष्टीने आणि अखंड सावधानतेने पावले उचलणे, अत्यंत आवश्यक आहे.

कोरोनाचा प्रवास समजून घेणे महत्त्वाचे

३० डिसेंबर २०१९ रोजी जेव्हा चीन सरकारने जागतिक आरोग्य संघटनेशी संपर्क साधला, तेव्हा प्रथमच नॉवेल कोरोना हा विषाणू जगासमोर आला. त्यानंतर अवघ्या एका महिन्यातच म्हणजे ३० जानेवारी रोजी कोरोनाने बाधित झालेला भारतातील पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला होता. ही व्यक्ती वूहान वरून भारतात आल्याचे तिच्या प्रवासाच्या माहितीवरून समजले होते. त्यावेळी जगभरात कोरोनाबाधितांची अधिकृत संख्या ७,८१८ इतकी होती. यापैकी फक्त ८२ रुग्ण हे चीन व्यतिरिक्त इतर १८ देशांतील होते. चीनमध्येही मृतांची संख्या जेव्हा ७० होती, तेव्हा इतरत्र मृत्यूचे प्रमाण शून्यावर होते. या साऱ्या आकड्यांवरून एवढे निश्चितच कळत होते की, कमी मृत्यूदर असलेल्या पण कमालीच्या वेगाने पसरणाऱ्या विषाणूची ओळख तोपर्यंत सगळ्यांना पटली होती.

हीच आकडेवारी आणखी खोलात जाऊन तपासली की कळते की, ९ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रात पहिला रुग्ण आढळल्याचे वृत्त आले. तोपर्यंत १०४ देशांतील एक लाखांपेक्षा जास्त लोकांना याचा संसर्ग झाला होता जगभरात मृतांची संख्या होती ३,८०९. त्या वेळी भारतात एकूण ४३ रुग्ण होते आणि कुणीही भारतात दगावले नव्हते.

भारतात ४०व्या दिवशी कोरोनाचा ५० वा रुग्ण सापडला. त्यानंतर, हीच संख्या १०० वर पोहोचण्यास फक्त पाच दिवस लागले, (१५ मार्च) आणि पुढील पाच दिवसांत हा आकडा २०० वर पोहोचला (१९मार्च). २४ मार्च रोजी आपण ५०० चा आकडा पार केला, २९ मार्च पर्यंत १०००, ३ एप्रिल पर्यंत २००० आणि ४ एप्रिलला ४००० पेक्षा जास्त रुग्ण आढळले. सध्या दर चार दिवसांनी कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे. भारतात या विषाणूने गुणाकार पद्धतीने आपला विळखा आवळायला सुरुवात केली असल्याचे, वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञांचे मत आहे.

ICMR (Indian council of Medical Reserach) ने भारतात कोरोनाचा समुदायाच्या पातळीवर संसर्ग सुरू झाल्याची (Community transmission) शक्यताना नाकारली होती. मात्र AIIMS च्या संचालकांनी दिलेल्या सूचनांनुसार काही ठिकाणांपुरता आणि मर्यादित स्वरूपात समुदायिक पातळीवर संसर्ग झाल्याचे (Community transmission) मान्य केले आहे.

आकृती१. भारतातील कोव्हीड-१९ च्या रुग्ण संख्येतील वाढ आणि त्याचा मृत्युदर

कोरोनावर लस विकसित कधी होणार, याबाबत अद्यापही कोणाला काही सांगता येईल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे सध्या तरी या विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे एवढेच भारत सरकारच्या हातात आहे. त्यासाठी आधी १५ एप्रिलपर्यंत आणि आता पुन्हा तो वाढवत ३ मे पर्यंत देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. अत्यावश्यक सेवा आणि वस्तू पुरवठा वगळता, देशभर संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी जमा झाल्यास पोलीस कार्यवाही करता यावी, यासाठी अनेक राज्यांनी आपापल्या भागात फौजदारी कलम १४४ लागू केले आहे. एवढे सारे करूनही लॉकडाऊनच्या पाचव्या आठवड्यातही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतेच आहे. त्यामुळे हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन पुरेसे आहे का? असा प्रश्न अपरिहार्य ठरतो आहे.

आकृती २. कोव्हीड-१९ ची भारत चीन आणि जगभरातील वाढती संख्या

भविष्याचा अंदाज

लॉकडाऊन पुरेसे आहे का? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी भारतातील प्रसाराचा आणि मृत्यूदराचे गणित कसे असेल याची गणितीय मांडणी करावी लागेल. इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च(ICMR) च्या आकडेवारीनुसा या प्रादुर्भावाची सुरुवात फेब्रुवारीपासून धरल्यास २०० दिवासात ही संख्या उच्च स्तर गाठू शकते. अशा परिस्थितीत अगदीच नकारात्मक विचार केल्यास, दिल्लीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांची संख्या १ कोटी असेल. तर मुंबईमध्ये ४० लाख असेल.

ICMR च्या अंदाजानुसार प्रत्येक मृत्यूमागे ८-१० गंभीर रुग्ण आणि ४०-५० सामान्य रुग्ण असण्याची शक्यता आहे. The Centre for Disease Dynamics, Economics and Policy यांच्या अंदाजानुसार ०-१९ वर्षे वयोगटात आणि २०-६४ वर्षे वयोगटातील ६% लोकांना रुग्णालयात भारती होण्याची गरज भासेल. तर, ६४ वर्षावरील वयोगटासाठी हेच प्रमाण २८% असेल.

जागतिक आरोग्य संघटनेने देखील प्रत्येक देशाला नागरिकांची कोरोना तपासणी क्षमता वाढवण्याची आणि सामाजिक विलगीकरणावर जास्त भर देण्याचा सल्ला दिला आहे. याप्रमाणे २४ मार्च रोजी, ICMR ने सार्स-कोव्हीड-१९ ची तपासणी करणाऱ्या १०४ सरकारी आणि २४ खाजगी प्रयोगशाळांची यादी जाहीर केली आहे. २२ मार्च रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ICMR च्या महासंचालकांनी भारतात एका आठवड्यात ५००० नमुन्यांची तपासणी केली जाते असे सांगितले. तसेच लवकरच एका आठवड्यात ७०,००० तपासणी करण्यापर्यंत ही क्षमता वाढवण्यात येईल, असे निर्देश दिले आहेत. म्हणजेच दर महिन्याला २ लाख नमुन्यांची तपासणी केली जाईल.

तपासणीसाठी ICMR चे सध्याचे धोरण पुढील निकषांवर आधारीत आहे.

१. ज्या व्यक्तींमध्ये लक्षणे दिसत नाहीत पण, गेल्या चौदा दिवसात जर त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला असेल तर, त्यांनी १४ दिवस घरीच क्वारंटाईनमध्ये राहावे. १४ दिवसानंतर त्यांच्यामध्ये लक्षणे आढळून आल्यास (ताप,खोकला, श्वास घेण्यास त्रास) त्यांची तपासणी केली जाईल. त्यांचे निदान झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना घरीच क्वारंटाईनमध्ये ठेवले जाईल.

२. ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान निश्चित झाले आहे, त्यांचा संपर्कातील सर्व व्यक्ती. आरोग्य सेवेत काम करणारे कर्मचाऱ्यांमध्ये लक्षणे दिसत असतील तर त्या व्यक्ती.

३. ज्यांना गंभीर श्वसन विकारामुळे रुग्णालयात भारती व्हावे लागले आहे असे सर्व रुग्ण (ताप आणि खोकला आणि/किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवणे)

४. निदान झालेल्या रुग्णाच्या थेट संपर्कात आलेली आणि ज्यांना याचा गंभीर धोका आहे, पण लक्षण दिसत नसलेल्या व्यक्तीची पाचवा दिवस ते १४वा दिवस या दरम्यान तपासणी केली जाईल. थेट आणि गंभीर धोका असलेल्या व्यक्तींमध्ये त्या रुग्णासोबत राहणाऱ्या त्याच्या घरातील सर्व व्यक्ती आणि डब्ल्यूएचओच्या शिफारशीनुसार पुरेशी सरंक्षण साधने न वापरता रुग्णाची तपासणी करणारे आरोग्य कर्मचारी यांचा समावेश होतो.

कोरोना विरोधातील लढाईत मर्यादीच शस्त्रास्त्रे

कोरोनाला रोखण्यासाठी तपासणी करणे हे प्रमुख शस्त्र असले तरी, बाधित रुग्ण कदाचित एक आठवडाभर तरी लक्षणे दाखवत नाही. त्याची जरी तपासणी केली तरी सक्रीय लक्षणे विकसित होण्याच्या ४ -७ दिवस आधी रुग्णाची तपासणी निगेटिव्ह देखील येऊ शकते. हा व्हायरस काहीसा भ्रामक असल्याने तपासणी करण्याचे प्रमाण जितके जास्त असेल तितके चांगले आहे. भारतात किमान अंदाजित बाधितांच्या अगदी खालच्या स्तरातील तपासणी करण्याची क्षमता आहे? तर याचे उत्तर आहे, ‘नाही.’ अगदी आत्ताच दरमहा २ लाख नमुन्यांची तपासणी करण्यापर्यंत क्षमता वाढवली असली तरी, हे शक्य नाही.

अगदी मोठ्या प्रमाणात हा आजार पसरलाच तर अत्यंत वाईट परिस्थितीतही ICMR दररोज १ लाख नमुन्यांची तपासणी करण्याचे नियोजन करत आहे. परंतु, ही क्षमता विकसित करण्यात जास्त नसला तरी, किमान महिनाभरच कालावधी तरी जावा लागेल. कदाचित भारतात बहुसंख्य रुग्णांची लक्षणे न दिसण्याचीही शक्यता आहेच (लक्षणविरहित वाहक). अशा रुग्णांकडून गंभीर धोका असलेल्या व्यक्तींना- ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमजोर आहे, ज्यांना आधीच काही आजार आहेत किंवा वयाची सत्तरी ओलांडलेली व्यक्ती – यांना त्याची लागण होईपर्यंत त्यांचे निदानही होणार नाही.

६ मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हीड-१९वरील उपचारांसाठी जगभरात निगराणी ठेवणे, काळजी घेणे आणि उपचाराचे शिष्टाचार पाळण्यासाठी या गोष्टींवर भर देत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी ‘डिसीज कमोडीटी पॅकेज’ जरी केला आहे. या पॅकेजमध्ये रुग्णांची अतिदक्षता आणि गंभीर काळजी घेता यावी म्हणून पल्स ऑक्सिमीटर आणि व्हेंटिलेटर यांच्या आवश्यकतेवर जास्त भर देण्यात आला आहे. या बाबतीत भारतातील रुग्णालये कितपत सज्ज आहेत?

भारतात फक्त ४०,०००  व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. जगभरात, असे आढळून आहे की, बाधित रुग्णांमध्ये जवळपास २५-३० टक्के रुग्णांची अतिदक्षता आणि गंभीर काळजी घ्यावी लागते, ज्यासाठी व्हेंटिलेटर आवश्यक आहेत. भारतातील व्हेंटिलेटर्सचे भौगोलिक वितरण देखील निराशाजनक आहे, यापैकी अधिकाधिक व्हेंटिलेटर्स हे शहरी भागातच उपलब्ध आहेत.

भारतात प्रत्येक १,४५७ रुग्णांमागे १ डॉक्टर आहे. डब्लूएचओ ने शिफारस केलेल्या १००० रुग्णांसाठी १ डॉक्टर या प्रमाणापेक्षा हे प्रमाण खूपच कमी आहे. ग्रामीण भागात तर हेच प्रमाण १०,९२६ रुग्णांसाठी १ डॉक्टर एवढे भयानक आहे.

सरकारने भारतीय उत्पादकांकडून आणखी ४०,००० व्हेंटिलेटर्स मागणी केली असून, आणखी १०,००० व्हेंटिलेटर्स चीनकडून मिळाले आहेत. कोव्हीड-१९ विरोधातील युद्ध जेव्हा शिगेला पोहोचेल तेव्हा भारतात आणखी १० लाख व्हेंटिलेटर्सची गरज भासेल. शिवाय, कोव्हीड-१९ व्यतिरिक्त इतर रुग्णही असतील ज्यांना अत्यावश्यक वैद्यकीय उपचारासाठी व्हेंटिलेटर्सची गरज भासू शकते. अशा रुग्णांची संख्या नेमकी किती हे आपण मोजलेलेच नाही.

याव्यतिरिक्त कोव्हीड-१९मुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त संभवतो. यात हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचाही बळी जाऊ शकतो. जसे हल्लीच मुंबईत अशा काही घटना घडल्या. म्हणून, भारताने तपासणी करण्याची क्षमता वेगाने वाढवणे जास्त गरजेचे आहे. तपासणी पद्धतीतही ज्यांनी प्रवास केला आहे आणि ज्यांना गंभीर धोका आहे अशा समूहाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. कारण,त्यांना जर संसर्ग झालाच तर, अतिदक्षता सेवेची गरज अशा वर्गाला जास्त असणार आहे.

दक्षिण कोरियात तपासणी करण्याच्या वेग वाढवल्यानेच त्यांनी झपाट्याने वाढता आलेख रोखण्यात यश मिळवले. दुसरी गोष्ट म्हणजे, भारतातही जिथे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तिथे तातडीने पायाभूत सुविधा पुरवण्याचा वेग वाढवला पाहिजे. संसर्गजन्य व्यक्तींवर उपचार करण्यासाठी शहरी भागातील स्टेडियम किंवा प्रदर्शन केंद्रांचे रुपांतर हॉस्पिटलमध्ये केले पाहिजे. असे किती हॉस्पिटल निर्माण करावे लागतील याचा अंदाज बांधणे कठीण आहे. पण, ICMR च्या नियोजनानुसार प्रत्येक राज्यात किमान एक किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णालये हवीत जिथे फक्त कोव्हीड-१९ वर उपचार केले जातील.

शेवटी, हा लॉकडाऊन पूर्णतः उठवण्यापूर्वी (जेंव्हा केंव्हा उठवला जाईल तेंव्हा?) शक्यतो कोरोना विषाणूने बाधित सर्व रुग्णांवर उपचार सुरु झाले असतील किंवा जे कोणी कोरोनाबाधित रुग्ण आहेत त्यांचे पूर्णतः विलागीकारण केलेले असायला हवे. जेणेकरून नव्या रुग्ण संख्येत आणखी भर पडणार नाही. इतकी माफक अपेक्षा आहे. हे साध्य करण्यासाठी आपल्या आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण येणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर किती ताण द्यायचा याचेही भान ठेवावे लागेल. त्याच यंत्रणा जर कोलमडल्या तर लॉकडाऊन काढणे महागात पडू शकेल. त्यासाठी ‘अखंड सावधानता’, हाच या संकटातून बाहेर पडण्याचा पर्याय आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.