Author : Debasish Mallick

Published on Apr 16, 2020 Commentaries 0 Hours ago

कोरोनाच्या महामारीमुळे झालेले आर्थिक नुकसान वेगाने भरून निघण्याची अपेक्षा ठेवता येण्यासारखी परिस्थिती नाही. त्यासाठी वाट पाहावी लागणे, अपरिहार्य आहे.

कोरोनामुळे अर्थक्षेत्रात अनर्थ

कोविड -१९ अर्थात कोरोना विषाणूच्या प्रसाराचा भारतासह संपूर्ण जगातील प्रत्येक घटकावर अत्यंत खोलवर परिणाम झालेला आहे. हे सारे पाहून, १९६३ साली अल्फ्रेड हिचकॉक यांची उत्कृष्ट निर्मिती असलेल्या ‘बर्ड्स’ या चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. या चित्रपटात अशीच काळजी, चिंता आणि भयावह अनुभवाची आठवण होते. सतत होणाऱ्या पक्ष्यांच्या हल्ल्यानंतर बोदेगा बेटावर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते. सगळीकडे दहशतीचे वातावरण होते. रस्ते,  कार्यालये आणि रेडिओ स्टेशन्स सर्वच्या सर्व निर्मनुष्य झाले होते. सगळं काही ठप्प झाले होते. या पुढे काय होणार?  या चिंतेनं सर्वांनाच ग्रासले होतं. सगळीकडं अक्षरशः खळबळ माजली होती. मात्र यावेळी पक्षी नव्हे; तर एक जीवघेणा व्हायरस (विषाणू ) आहे. मात्र,  चिंता,  काळजी,  भीती आणि लॉकडाऊन यामध्ये साम्य दिसून येते. सर्व परिस्थिती सारखीच आहे.

हिचकॉकच्या चित्रपटात पक्ष्यांची भीती होती. ती फक्त एका ठराविक भागापुरतीच होती आणि वास्तविक जगात असे काहीच घडले नव्हते. हाच तो यातला मोठा फरक आहे. म्हणूनच आताचे जे आव्हान आहे, ते अधिक गहिरे आहे.  भारतासह जगभरातील अनेक भागांत माणसांच्या हालचाली,  साधन सामुग्री आणि वाहतूक आदी सर्वच क्षेत्रांना एकप्रकारे लकवाच मारला आहे. सगळे ठप्प झालेय. सेवा क्षेत्रातील लहान उद्योग ‘वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून हे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्पादन क्षेत्रे, लॉजिस्टिक्स,  वस्तू व सेवा क्षेत्रातील अर्थव्यवस्थेबरोबरच सर्वच क्षेत्र पूर्णपणे बंद आहेत. या साऱ्या उद्रेकाचे भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो, हे समजून घेणे महत्वाचे आहे.

अमेरिकेतील आर्थिक पडझड

अर्थशास्त्रज्ञांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबत एक गंभीर असा अंदाज व्यक्त केला आहे. पहिल्या तिमाहीत कमी घसरणीचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर, दुसऱ्या तिमाहीतही मोठ्या घसरणीचा अंदाज सर्वांनीच एकमताने व्यक्त केला आहे. दुसऱ्या तिमाहीत १४ टक्के घसरणीचा अंदाज ‘जे. पी. मॉर्गन’ने व्यक्त केला आहे. तर ‘बँक ऑफ अमेरिका’ आणि ‘ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स’ने १२ टक्के आणि ‘गोल्डमॅन सॅक्स’ आणि ‘मॉर्गन स्टॅनली’ यांनी सर्वाधिक म्हणजेच अनुक्रमे २४ टक्के आणि ३० टक्के घसरणीचा अंदाज व्यक्त केलेला आहे.

पहिल्या तिमाहीत ‘बँक ऑफ अमेरिके’ने ०.८ टक्के, तर ‘जे. पी. मॉर्गन’ने चार टक्के घसरण नोंदवली आहे. सर्व अभ्यासातून एक उल्लेखनीय विशेष बाब ही आहे की,  अलिकडच्या काळातील निराशेचे वातावरण असले तरी  तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत आशावादी विकासाचा दृष्टिकोन तयार होतो आहे. हे अंदाज संपूर्ण वर्ष अमेरिकी अर्थव्यवस्थेसाठी वृद्धी,  सौम्यता आणि सकारात्मकतेची भर घालतात. दुसऱ्या तिमाहीनंतर अधिक वेगाने नुकसान भरून निघेल अशी अपेक्षा आहे.

२०२०मध्ये १.५ टक्क्यांच्या धीम्या गतीने जागतिक अर्थिक विकास दरात वाढ होईल, असा अंदाज ‘ओईसीडी’नं (OECD) व्यक्त केला आहे. तर त्याआधी ओईसीडीने आर्थिक विकास दर २.९ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. जागतिक आर्थिक विकास दरात घसरण होणार नाही,  मात्र,  गंभीर मंदी अपेक्षित आहे. त्याचवेळी कोरोना व्हायरसच्या संकटामुळे मोठी आर्थिक घसरण पाहायला मिळेल,  असंही ‘ओईसीडी’ने नमूद केले.

भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम

पुढील दोन तिमाही आणि त्यानंतर भारतीय आर्थिक विकास दरावर काय परिणाम होतील,  याचा अंदाज लावणे सध्याच्या घडीला तरी कठीण आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही अभ्यासाकरिता देशांतर्गत,  त्याचबरोबर आंतरदेशीय क्षेत्रावर अवलंबून असलेल्यांच्या डेटाची आवश्यकता असेल. आजचे संकट यापुढील काळात मर्यादित राहणार नाही, कारण हे तेव्हा होतं,  जेव्हा एकटा चीनला या संकटाने घेरले होते. ‘सीआरआयएसआयएल’ने त्यावेळी चीनच्या व्यापारावर अवलंबून असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्वाच्या क्षेत्रांवरील संभाव्य परिणामांचे विश्लेषण केले होते.

आज या महासंकटाने जगातील एक मोठा भाग व्यापला आहे आणि व्यापाराचा मार्ग पूर्णपणे थोपवून धरला आहे. याशिवाय,  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे देशांतर्गत क्षेत्रावर अवलंबून असलेले उद्योग ठप्प झाले आहेत. अशा परस्परावलंबनाची आकडेवारी आज तरी उपलब्ध नाही. लॉकडाऊनच्या अल्पकालीन आणि मध्यम कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेला प्रभावित करणाऱ्या किंवा अडथळा ठरणाऱ्या संभाव्य घटकांचा विचार केला तरी, जगभरातील अर्थक्षेत्रातील अनर्थ स्पष्ट दिसतो.

आत्मविश्वासाचे संकट

आर्थिक अंदाज अचूक ठरवण्यासाठी प्रमुख डेटा म्हणजे मूलभूत मागणी आणि पुरवठ्याची स्थिती,  तसेच सुक्ष्म तरलता हवी असते. अज्ञात किंवा अनिश्चित कालावधीत अर्थव्यवस्थाच ‘लॉकडाऊन’  किंवा पूर्णपणे ठप्प करणारे हे वर्तमानकाळातील संकट ‘आत्मविश्वासाचे संकट’ ठरले आहे. हेच याचे प्रमुख कारण आहे. वर्तमानकाळातील संकट हे खूपच वेगळे आहे. कारण त्यात भीती,  चिंता,  अनिश्चितता निर्माण झाली आहे. पूर्वीच्या सर्व परिस्थितीच्या उलट, जिथे मागणी किंवा पुरवठा हे मूळ कारण होते आणि आत्मविश्वास हे संकट होते. मालाचे उत्पादन आणि पुरवठा किंवा वितरणाची साखळीच पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. कारण अत्यावश्यक सेवा वगळता,  सर्वच कामे ठप्प झाली आहेत आणि लॉजिस्टिक सुविधा बंद झाली आहे. जोपर्यंत या विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत नाही,  तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. अशीच परिस्थिती दीर्घकाळ राहिली तर,  याचे गंभीर परिणाम होऊन अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी घेण्यासाठी अधिक काळ लागू शकतो.

आजच्या मोठ्या संकटामुळे अनेक क्षेत्र प्रभावित झालेले आहेत. ही यादी खूप मोठी आहे. त्यात तयार माल आणि उपकरणांच्या किंवा वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या उद्योगांचा समावेश आहे. एका विकेंद्रीकृत उत्पादन प्रक्रियेबरोबरच, जिथे अनेक बाबतीत उपकरणांच्या सुट्या भागांचे उत्पादन मूळ प्रकल्पांमध्ये घेता येत नाही,  तसंच सुट्या भागांचा पुरवठा ठप्प होणे या बाबी संपूर्ण साखळी मोडून टाकू शकतात. अशा प्रकारच्या अडथळ्यामुळे आंतरराष्ट्रीय कराराचा भंग होऊ शकतो. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कंपन्या काळ्या यादीत टाकण्याच्या जोखमीचाही समावेश आहे.

कोरोनाच्या या संकटामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जात आहेत. सुरुवातीच्या टप्प्यातच वास्तविक आणि संभाव्य नोकऱ्या गमावण्याची आकडेवारी भीतीदायक आहे. विशेषतः त्याचा तात्काळ परिणाम उत्पादन निर्मिती क्षेत्रावर नव्हे,  तर हॉटेल उद्योगासह वाहतूक,  पर्यटन उद्योगावर झाला आहे.

लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने भारतातील सर्वात मोठ्या सेवा क्षेत्रातील नोकऱ्या कमी झाल्या आणि मागणी घटली तर उत्पादन निर्मिती क्षेत्राला मोठा फटका बसेल. मूलभूत पुरवठा आणि मागणीत कोणतेही बदल झालेले नाहीत. पण, आलेले संकट आणि त्याच्या संभाव्य वाढीच्या शक्यतेमुळे गुंतवणुकीच्या निर्णयातील आत्मविश्वासच नाही. तसेच दैनंदिन कामकाजामधील आत्मविश्वासही कमी झाला आहे. जोपर्यंत स्वीकारार्ह तोडगा किंवा आत्मविश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठीचे उपाय शोधले जात नाहीत, तोपर्यंत मंदीचा काळ सुरूच राहील.

या संकटाने अर्थव्यवस्थेचे असलेले मूळच अस्ताव्यस्त करून टाकले आहे. म्हणून त्याची बांधणी किंवा पुनर्बांधणी करण्यासाठी अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे आणि केवळ ते दीर्घकालानंतरच शक्य आहे. हे चित्र चीनमध्ये पाहायला मिळत आहे. तेथे कामगारांची संख्या रोडावली आहे. हा आजार पुन्हा बळावू नये किंवा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. परत येणाऱ्या कामगारांची कसून वैद्यकीय तपासणी केली जात आहे. ज्या प्रमाणे अमेरिकेत अर्थतज्ज्ञ किंवा गुंतवणुकदारांना अपेक्षित आहे,  त्याप्रमाणे भारताकडून तेजीने नुकसान भरून निघण्याची अपेक्षा न ठेवता,  हे नुकसान भरून निघण्यासाठी थोडी वाट पाहणे अपेक्षित आहे.

देशाच्या मागील २.९ ट्रिलियन डॉलरच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या आधारे विचार केला तर, (संपूर्ण लॉकडाऊन, त्यात जीवनावश्यक वस्तूंच्या समावेशासह) दिवसाला अंदाजे सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ८ अब्ज डॉलरचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हे महासंकट आणि लॉकडाऊन गृहीत धरला तर, सकल राष्ट्रीय उत्पादनाचे अंदाजे २४० अब्ज डॉलरचे म्हणजेच जवळपास १. ६ लाख कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.

संकटाचे इतर परिणाम

प्रदीर्घ कालावधीतील लॉकडाऊन हे अर्थव्यवस्था आपल्या अनुषांगिक परिणामांसह कमतरतांचे कारण ठरू शकते. आर्थिक घडामोडींनी गाठलेला खालचा स्तर आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवस्थाच ठप्प होऊ शकते. विशेषतः छोटे उद्योग आणि कमकुवत उद्योग. हे बँकांच्या भविष्यातील संपत्तीच्या गुणवत्तेबद्दलचा अंदाज कमकुवत असल्याचे दर्शवते. कदाचित ‘एनपीए’ (अनुत्पादक कर्ज) आकडेवारीत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसत असले तरी, ती यावेळी आधीच्या तुलनेत अधिक आहे. यामुळे बँकिंग क्षेत्रातील तरलता आणि पतपुरवठ्यावर विपरित परिणाम होईल.

सध्याचे संकट हे भारतासह जगभरातील दुय्यम भांडवली बाजारात देखील (कर्ज आणि इक्विटी) दिसून येते. हे मोठं नुकसान काही काळापुरते गुंतवणुकदारांच्या इच्छांना थोपवू शकते. अमेरिकी बाजारपेठेत कागदोपत्री भारताच्या क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप (सीडीएस)मध्ये आधीपासूनच मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे,  ज्यामुळे बँकांच्या व्याजदरामध्ये वाढ होऊ शकते आणि दुय्यम भांडवली बाजारातील स्त्रोत कमी होऊ शकतात. सुरक्षिततेसाठी गुंतवणूकदारांचा अधिक कल आता अमेरिकी तिजोरी आणि चलनाकडे असल्याचे दिसत आहे. परिणामी उदयोन्मुख बाजारात डॉलर अधिक मजबूत होत आहे.

संकटावर मात कशी?

या संकटावर मात करण्यासाठी जगभरातील प्रमुख बँकांनी आक्रमकपणे दर कपात आणि तरलता निर्माण केली आहे. या धोरणात्मक उपायांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन किंवा निष्कर्ष इतक्या लवकर काढण्याची घाई केली जात असली तरी,  प्राप्त परिस्थिती पाहता अधिक यश मिळेल असे वाटत नाही. जेव्हा अंतर्गत गतीशिलता ठप्प होते,  तेव्हा रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाप्रमाणे बाह्य यंत्रणेद्वारे तरलता वाढवणे आवश्यक आहे. दर कपात केली असली तरी, विषाणूचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत आत्मविश्वासाचं हे संकट आहे ते दूर होणे अशक्य आहे. बँकांकडून अवलंबलेल्या आर्थिक धोरणात्मक उपायांनी यावर तोडगा निघालेला दिसून येत नाही.

अदृश्य अशा व्हायरसमुळे हे संकट कोसळले आहे. हे लक्षात घेता,  एक प्रभावी धोरणात्मक उपाय म्हणजे,  आमच्या दृष्टिकोनातून पाहिले तर,  वैद्यकीय आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांवर करण्यात येणाऱ्या खर्चात वाढ करणे,  जे केवळ नाविन्यपूर्ण उपचार (लसीचा शोध) नव्हे,  तर एक व्यापक अभियान देखील असेल. ज्यात चाचणी केंद्रे (क्षमता) आणि गुणवत्तेत वाढ होऊन बाधित व्यक्तींना शोधून त्यांच्यावर तातडीने उपचार करावेत. यामुळे खरोखरच आत्मविश्वास वाढू शकेल. याच दरम्यान,  पुरवठा साखळी पूर्वपदावर आणण्यासाठी मर्यादित स्वरुपात विचारपूर्वक कार्यक्रम आखण्याबाबत विचार केला जाऊ शकतो.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.