हवामान बदल हे आज मानवजातीसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. पृथ्वीवर राहणाऱ्या सगळ्यांवरच याचे गंभीर आणि दूरगामी परिणाम होणार आहेत. हवामान बदलाचे हे परिणाम कमी करण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी तातडीची आणि प्रभावी कृतीची आज कधी नव्हे इतकी गरज निर्माण झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी नव्याने विकसित होणारं तंत्रज्ञान मदत करू शकतं, असं आपल्याला वाटतं. परंतु हवामान बदलाच्या या चर्चेमध्ये स्थानिक बुद्धिमत्तेकडे दुर्लक्ष केलं जातं आहे.
हे ज्ञान स्वदेशी ज्ञान किंवा पारंपरिक ज्ञान म्हणून ओळखले जाते. यातून आलेलं शहाणपण स्थानिक समुदायांमध्ये पिढ्यानपिढ्या विकसित होत आलेलं आहे. हे शहाणपण काळाच्या कसोटीवरही पारखून घेण्यात आलं आहे. यामध्ये आपल्या परिसंस्थेचं स्वयं-नियंत्रण करण्याची, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची आणि संतुलन आणि सुसंवाद राखण्याची क्षमता अंतर्भूत आहे. स्थानिक बुद्धिमत्ता ही त्या त्या प्रजातींमधील नातेसंबंधांमध्ये परावर्तित झालेली दिसते. यामध्ये संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्याची आणि त्याचबरोबर त्या परिसंस्थेची घडी विस्कटली तर त्यातून सावरून पुन्हा सुरळित होण्याची क्षमता असते.
हवामान बदल रोखण्याच्या कृतींचा विचार केला जातो तेव्हा स्थानिक बुद्धिमत्ता अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. स्थानिक समुदायांना अनेकदा वनस्पती, प्राणी, हवामानाचे नमुने आणि नैसर्गिक संसाधनांसह त्यांच्या स्थानिक परिसंस्थेचे सखोल ज्ञान आणि जाण असते.
यामुळे हवामान बदलाच्या कृतींसाठी महत्त्वाची अंतर्दृष्टी मिळू शकते. जैवविविधतेचे हॉटस्पॉट ओळखणे आणि त्यांचे संरक्षण करणे, एखादी परिसंस्था कशी कार्यरत असते किंवा ती परिसंस्था हवामान बदलाच्या प्रक्रियांना कशी सामोरी जाते हे समजून घेणे आवश्यक आहे. पर्यावरणातील लवचिकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शाश्वत संसाधन व्यवस्थापन पद्धती विकसित करणे हा त्यातला मोठा भाग आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर स्थानिक समुदायांनी बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी काही धोरणे विकसित केली आहेत. यामध्ये हवामानातील बदलांचाही समावेश आहे. अनेक पिढ्यांनी तपासून घेतलेल्या केलेल्या या धोरणांमुळे हवामान अनुकूलतेच्या प्रयत्नांसाठीचे मौल्यवान धडे मिळू शकतात. टेरेसिंग म्हणजे डोंगर उतारावर केलेली पायऱ्यापाऱ्यांची शेती, जल संवर्धन आणि कृषी वनीकरण यासारख्या स्थानिक पद्धती जलस्रोतांचे व्यवस्थापन करण्यात आणि मातीची धूप रोखण्यात मदत करू शकतात. हे हवामान बदलांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या शेतीसाठी महत्त्वाचं आहे. स्थानिक समुदाय बर्याचदा पारंपारिक पद्धतींचा अवलंब करत असतात. या पद्धती शाश्वत जमीन व्यवस्थापनाला प्रोत्साहन देतात आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी करतात. उदाहरणार्थ पारंपारिक आग नियंत्रण पद्धती. यामध्ये नियंत्रित पद्धतीचे जळण हे वणवे रोखू शकते आणि त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होते. मिश्र पीक आणि पीक बदल पद्धती यांसारख्या पारंपारिक कृषी पर्यावरणीय पद्धती मातीचा कस चांगला राखण्यास मदत करू शकतात आणि कार्बनचं मातीमध्ये चांगल्या प्रकारे पृथक्करण होतं. यामुळे अर्थातच हवामान बदल कमी होण्यात हातभार लागतो. स्थानिक संस्कृतींचा पर्यावरणाशी अनेकदा अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि नैतिक संबंध असतो. यामुळे निसर्ग संवर्धनाची मूल्ये त्यांच्यात आपोआप रुजतात आणि त्याप्रमाणेच त्यांच्या वर्तनालाही आकार येतो.
हे खोलवर रुजलेले शहाणपण कारभारीपणाची आणि पर्यावरणाबद्दल आदराची भावना वाढवू शकते. पर्यावरण रक्षणामध्ये त्यांचं योगदान वाढतं. निसर्ग संवर्धन, कचरा कमी करणे, आणि लोकाभिमुख प्रशासन या सगळ्या शाश्वत विकासाच्या पद्धती विकसित होतात आणि एकूणच समुदायाच्या वर्तणुकीत सुधारणा होते.
यंत्रे आणि माणूस
जंगलतोड, औद्योगिक उत्सर्जन आणि जीवाश्म इंधनाचा वापर यासारख्या व्यवहारांमुळे हवामान बदलाचे पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक असे गंभीर परिणाम होतात.असं असलं तरी हवामान बदल कमी करणे, अनुकूलन आणि देखरेख अशा विविध पैलूंमध्ये मदत करून शाश्वत आणि लवचिक भवितव्याच्या संक्रमणाला गती देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाऊ शकतो.
कार्यक्षम स्वयंचलित यंत्रणेसह तसंच वेगवान आणि अचूकतेसह मोठ्या प्रमाणात माहितीवर प्रक्रिया केली जाऊ शकते. या हवामान कृती प्रयत्नात यंत्रांची मदत घेतली जाऊ शकते.
AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणात माहितीचे विश्लेषण करू शकते आणि महत्त्वाची अंतर्दृष्टी देऊन हवामान बदलांना सामोरं जाण्याचे उपाय सुचवू शकते. AI अल्गोरिदम हवामानाची मॉडेल्स, उपग्रह प्रतिमा, हवामान नमुने आणि ऐतिहासिक डेटा यासारख्या जटिल माहिती संचांवर प्रक्रिया आणि विश्लेषण करू शकतात. त्यामुळे नमुने घेणं आणि ट्रेंड्स म्हणजे प्रचलित घडामोडी ओळखून निर्णय घेण्यात मदत होते. उदाहरणार्थ सौर आणि पवनऊर्जा यासारख्या पारंपरिक स्रोतांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी आणि या ऊर्जेचं व्यवस्थापन करण्यासाठी हवामानाचं स्वरूप, ऊर्जेची मागणी आणि ग्रिड ऑपरेशन्सच्या डेटाचे विश्लेषण करता येऊ शकते. यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता ही पारंपरिक ऊर्जाप्रणाली अधिकाअधिक प्रभावी करण्यासाठी मदत करू शकते.
चार्जिंग आणि डिस्जार्चिंगद्वारे ऊर्जेचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी AI बॅटरीसारखी यंत्रणा उपयोगी आहे. यामुळे ऊर्जेचा साठा आणि बचत हे दोन्हीही होऊ शकेल. हवामान बदलाचा अंदाज आणि मॉडेलिंग सुधारण्यातही AI महत्त्वाची भूमिका बजावू शकते. हवामानाचे नमुने आणि परिणामांचे अनुकरण करण्यासाठी आणि अंदाज बांधण्यासाठी जी मॉडेल्स वापरली जातात ती अत्यंत जटिल आहेत. अशा गोष्टींसाठी संगणकीय शक्तीची गरज असते.
AI मोठ्या प्रमाणात डेटावर प्रक्रिया करू शकते आणि त्याचे विश्लेषणही करू शकते. त्यामुळे मशीन लर्निंग अल्गोरिदमचा फायदा घेऊन हवामान मॉडेलची अचूकता आणि कार्यक्षमता वाढविण्यात नक्कीच मदत होईल.
याशिवाय स्थानिक पर्यावरणीय ज्ञान म्हणजेच स्थानिक समुदायांद्वारे वापरल्या जाणार्या हवामान अंदाज पद्धती किंवा एखादी यंत्रणा किती कार्यक्षम आहे हे दाखवणारे फिनोलॉजिकल इंडिकेटर या मॉडेल्समध्ये समाविष्ट करता येतील. AI या स्थानिक संदर्भांची अचूकता आणि प्रासंगिकता वाढवू शकते.
नैसर्गिक आपत्तींचा इशारा
हवामानातील धोके, पायाभूत सुविधांची असुरक्षा आणि सामाजिक घटक याबद्दलच्या डेटाचे विश्लेषण करून AI हे पूर, दुष्काळ किंवा इतर हवामान-संबंधित आपत्तींचा धोका असलेली क्षेत्रं ओळखू शकते. या माहितीचा वापर लवचिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी, आपत्ती निवारण यंत्रणा सुधारण्यासाठी आणि असुरक्षित समुदायांचे संरक्षण करण्यासाठीची धोरणे विकसित करण्यासाठी केला जाऊ शकतो. AI हे हवामानातील गतिशीलतेबद्दलची आपली समज सुधारण्यातही मदत करू शकते. अतिवृष्टी, उष्णतेची लाट अशा तीव्र हवामान घटनांचा अंदाजही लावू शकते आणि पर्यावरणावर व मानवी समुदायांवर होणाऱ्या हवामान बदलाच्या परिणामांचे मूल्यांकन करू शकते.
कृत्रिम बुद्धिमत्ता संसाधनांचं जास्तीत जास्त व्यवस्थापन करण्यात आणि हवामान बदलाचे प्रभाव कमी करण्यात मदत करू शकते.उदाहरणार्थ, AI चा शेतीमध्ये अचूक वापर केला जाऊ शकतो. हवामानाचे सेन्सर्स लावून आणि डेटाचं विश्लेषण करून विकसित केलेल्या पीक व्यवस्थापन पद्धती हवामान बदलाशी जुळवून घेऊ शकतात. तसेच पाणी आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी आणि कचरा कमी करण्यासाठीही याचा वापर होऊ शकतो. वाहतुकीचं नियंत्रण करण्यासाठी, वाहनांमधून उत्सर्जन कमी करण्यासाठी तसेच संसाधने आणि पुरवठा साखळीचे व्यवहार सुधारण्यासाठी स्मार्ट वाहतूक प्रणालींमध्ये देखील AI चा वापर केला जाऊ शकतो. यामुळे वाहतूक अधिक कार्यक्षम होते.
AI हे जंगले, महासागर आणि वन्यजीव अधिवास यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यातही मदत करू शकते. जंगलतोड किंवा बेकायदेशीर मासेमारीचा छडा लावण्यासाठी, वन्यजीवांच्या स्थलांतर पद्धतींचा मागोवा घेण्यासाठी आणि चांगल्या परिसंस्थांचं मूल्यांकन करण्याच्या दृष्टीने उपग्रह प्रतिमांचे विश्लेषण करण्यासाठीही AI चा चांगला उपयोग होतो. या माहितीचा वापर करून संवर्धनाच्या प्रयत्नांबद्दल जागृती निर्माण करता येते. त्यामुळेच जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता हे अत्यंत प्रभावी साधन आहे.
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने राष्ट्रीय कार्बन प्रकल्प विकसित केला आहे. यामध्ये AI आणि रिमोट सेन्सिंगचा वापर करून भारताच्या जंगलाच्या आच्छादनाचा नकाशा बनवते. त्याचे निरीक्षण करते आणि हे जंगल किती कार्बन शोषून घेऊ शकते याचा अंदाज बांधते. यातून गोळा झालेल्या पुराव्यांवर वन संरक्षण आणि व्यवस्थापनाची धोरणे ठरवता येतात.
शिवाय, AI हे समुदायांना आणि सरकारांना हवामान बदलाचे परिणाम चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि त्याला प्रतिसाद देण्यास मदत करून हवामान बदल अनुकूलनात योगदान देऊ शकते.
उदाहरणार्थ, समुद्रकिनाऱ्यांची होणारी धूप, समुद्राच्या पातळीत होणारी वाढ आणि वादळी लाटा याबद्दलच्या माहितीचे विश्लेषण AI चांगल्या प्रकारे करू शकते. याचा उपयोग समुद्री भिंती बांधणे, असुरक्षित समुदायांचे स्थलांतर आणि गंभीर पायाभूत सुविधांचे संरक्षण अशा अनुकूलन उपायांचं नियोजन आणि अमलबजावणीमध्ये होऊ शकतो.
AI हे धोरणकर्त्यांना प्रभावी हवामान धोरणे विकसित करून ती अमलात आणण्यासाठी उपयोगी पडेल. याचा उपयोग करून उत्सर्जन, आर्थिक निर्देशक आणि सामाजिक घटकांवरील डेटाचं विश्लेषण करून विविध धोरणांच्या संभाव्य परिणामांचे मॉडेलही बनवता येऊ शकते. विविध धोरणांच्या अमलबजावणीतले खर्च, फायदे आणि त्यातला व्यापार लक्षात घेऊन हवामान शमन आणि अनुकूलन उपायांवर, पुराव्यांवर आधारित निर्णय घेण्यात AI ची मदत होईल. हवामान उद्दिष्टांच्या दिशेने प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी उपग्रह डेटा, रिमोट सेन्सिंग आणि इतर स्त्रोतांचे विश्लेषण करून, पॅरिस करारामध्ये नमूद केलेल्या हवामान वचनबद्धतेचे निरीक्षण आणि त्याची व्यावहारिकता तपासता येईल.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग (ML) च्या साह्याने हवामानाशी संबंधित प्रकल्प, जोखीम आणि परतावा यांच्याशी संबंधित मोठ्या प्रमाणात डेटाचे विश्लेषण आणि प्रक्रिया करून हवामान वित्त आणि गुंतवणूक निर्णय सुलभ होऊ शकतात. यामुळे शाश्वत प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीच्या संधी ओळखण्यात आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठीच्या हवामान कृतींसाठी संसाधनांचे वाटप करण्यातही मदत होऊ शकते. AI हे हवामान कृतीत नागरिकांच्या सहभागाची आणि सक्षमीकरणाची सुविधा देखील देऊ शकते. AI समर्थित प्लॅटफॉर्मद्वारे नागरिक माहिती मिळवू शकतात, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात आणि हवामानाशी संबंधित उपक्रमांमध्ये योगदानही देऊ शकतात. AI पर्यावरणीय डेटाची प्रत्यक्ष देखरेख आणि रिपोर्टिंग सक्षम करू शकते. व्यक्ती आणि समुदायांनी पर्यावरणाला अनुकूल व्यवसायांशी जोडून घ्यावं आणि सरकारनेही याची जबाबदारी घ्यावी यासाठी त्यांना सक्षम बनवण्याचं काम कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकते. हवामान बदलाशी संबंधित सार्वजनिक धारणा, वृत्ती आणि वर्तन समजून घेण्यासाठी AI सोशल मीडिया डेटा, भावना विश्लेषण आणि इतर संभाषण वाहिन्यांचे विश्लेषणही करू शकते.
निष्कर्ष
हवामान कृतींमध्ये AI चे एकत्रीकरण नैतिक, सामाजिक आणि प्रशासनातील आव्हाने निर्माण करते. त्यावरही काळजीपूर्वक विचार करावा लागेल, हे समजून घेणे गरजेचे आहे. डेटामधील पक्षपात, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गोपनीयता यांसारख्या मुद्द्यांवर AI ला योग्य, न्याय्य आणि जबाबदार रीतीने सज्ज केले गेले आहे का आणि हवामान कृतींमध्ये AI चे फायदे वेगवेगळ्या भागधारकांमध्ये समान रीतीने वाटले जात आहेत का याची खात्री करण्यासाठीही काटेकोर लक्ष देणे आवश्यक आहे.
ज्यामध्ये स्थानिक आणि स्थानिक समुदायांचे पारंपारिक ज्ञान आणि पद्धतींचा समावेश आहे अशी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील सहकार्य हवामानाच्या कृतीसाठी प्रभावी उपाय शोधू शकते. मानवी ज्ञानाचे शतकानुशतके जमा झालेले ज्ञान ही मूळ बुद्धिमत्ता आहे आणि हीच बुद्धिमत्ता AI इंजिनला अधिक प्रभावी बनवू शकते हेही महत्त्वाचे आहे. स्थानिक बुद्धिमत्तेच्या शहाणपणासह AI च्या सामर्थ्याचे संयोजन करून आपण अधिक प्रभावी, न्याय्य आणि शाश्वत हवामान कृती विकसित करू शकतो. यातच पृथ्वीचे आणि मानवजातीचे हित सामावलेले आहे.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.