या वर्षाच्या एप्रिलच्या सुरुवातीला चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग यांनी रशिया, इराण, पाकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची उझबेकिस्तानमधल्या समरकंद इथे भेट घेतली. हे सगळे देश अफगाणिस्तानचे शेजारी देश आहेत. चीनने अफगाणिस्तानबद्दलची आपली भूमिका जाहीर केल्यानंतर ही बैठक झाली आहे. ‘अफगाण मुद्द्यावर चीनची भूमिका’ असे शीर्षक असलेले हे 11 कलमी पत्रक दोन कारणांसाठी महत्त्वाचे आहे. यामध्ये अफगाणिस्तानमधील चीनचा सहभाग आणि संकटग्रस्त देश किंवा प्रदेशांबद्दल चीनचे काय धोरण आहे याचे स्पष्ट संकेत यातून मिळतात. चीनला तालिबानशी संबंध प्रस्थापित करून पुढे जायचे आहे हेही यातून दिसते.
अमेरिकेपेक्षा वेगळं धोरण
चीनचे हे पत्रक अफगाणिस्तानच्या मुद्द्याच्या पलीकडे जाऊन पाहिले तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत हे लक्षात येते. सध्याच्या जागतिक व्यवस्थेला बाधा आणण्यात प्रयत्न करणाऱ्या देशाला झुकतं माप देण्यापासून ते अगदी वादग्रस्त समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू इच्छिणाच्या भूमिकेपर्यंत असा हा चीनचा प्रवास आहे. यामध्ये अमेरिकेप्रमाणे चीनचे हितसंबंध मात्र गुंतलेले नाहीत हेही लक्षात घ्यायला हवे. या पत्रकामध्ये अफगाणिस्तानबद्दलच्या धोरणाचा संदर्भ देत चीनच्या धोरणात्मक निवडींबद्दल माहिती देणारी मुख्य तत्त्वे मांडण्यात आली आहेत. ‘थ्री रिस्पेक्ट्स’ आणि ‘थ्री नेव्हर्स’ म्हणजेच चीन अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आणि स्वतंत्र निवडीचा आदर करतो. त्याचबरोबर अफगाणी लोकांच्या धार्मिक भावना आणि राष्ट्रीय चालीरीतींचाही चीनला आदर आहे, असं य़ात म्हटलं आहे. ही तत्त्वे पाश्चिमात्य देशांनी अंगिकारलेल्या धोरणांच्या विरोधात आहेत. चीनच्या मते पाश्चात्य देशांप्रमाणे ही भूमिका भूराजकीय कारणे आणि हितसंबंधांवर आधारित नाही.
अफगाणिस्तान सध्या अमेरिकाप्रणित सरकारच्या अंतर्गत अशांततेच्या काळातून तालिबानच्या सापेक्ष स्थैर्याकडे संक्रमण करत आहे, असेही चीनने म्हटले आहे.
या पत्रकामध्ये सातत्याने पाश्चिमात्य देशांच्या भूमिकेचा उल्लेख करण्यात आला आहे. अफगाणिस्तानबद्दल असलेल्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यात पश्चिमात्य देशांना अपयश आले, असेही म्हटले आहे. अफगाणिस्तानची वैशिष्ट्ये विचारात न घेता लष्करी हस्तक्षेप करण्याचा आणि लोकशाहीची संकल्पना लागू करण्याचा पाश्चात्य देशांचा निर्णय अफगाणिस्तानमधल्या संकटाला जबाबदार आहे, असे चीनचे म्हणणे आहे.
एकतर्फी निर्बंध लादल्याबद्दल आणि अफगाणिस्तानची परकीय गंगाजळी बेकायदेशीरपणे गोठवल्याबद्दल चीनने अमेरिकेची खिल्ली उडवली आहे. त्याचबरोबर ही कृती मागे घेण्याचे आवाहनही चीनने केले आहे.अमेरिका आत्मपरीक्षणात अपयशी ठरली. त्यामुळेच चीन हा अफगाणिस्तानबद्दल पर्यायी आणि प्रादेशिक दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी आणि तो अंमलात आणण्यासाठी एक सक्षम आणि उत्तम स्थान असलेला आणि अधिक जबाबदार देश म्हणून योग्य आहे, असेही चीनने यात ठासून सांगितले आहे. चीन हा अफगाणिस्तानची पुनर्बांधणी आणि विकासामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेच्या अधिक शाश्वत स्वरूपाकडे जाण्यास मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे, असा यात उल्लेख आहे.
अमेरिका आणि त्यांच्या मित्रदेशांशिवायचा गट
आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानच्या समस्येकडे सर्वसमावेशक, संतुलित आणि वस्तुनिष्ठ रीतीने पाहावे, असे आवाहन करून चीन पर्यायी प्रादेशिक गटांचा वापर करू पाहतो आहे. यामध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ), मॉस्को फॉरमॅट डायलॉग अशा गटांचा समावेश आहे. या गटांमध्ये अमेरिका आणि त्यांचे मित्र देश नाहीत. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी चीन-अफगाणिस्तान-पाकिस्तान या त्रिपक्षीय परराष्ट्र मंत्र्यांचा संवाद हाही याच प्रयत्नांचा एक भाग आहे.
चीनचे हे धोरण चीनला पाश्चिमात्य देशांच्या बिघडलेल्या दृष्टिकोनाच्या विरोधात पर्यायी मॉडेलचा प्रचार करण्यास मदत करेल. यामुळे चीन आपल्या प्राधान्यांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकेल आणि अफगाणिस्तानच्या शेजाऱ्यांमध्ये एकमत तयार करू शकेल. अमेरिकेचा सहभाग वगळून एक वेगळा प्रादेशिक दृष्टिकोन स्वीकारल्यास चीनचे नेतृत्व आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी मदत होईल, असेही चीनला वाटते आहे. निव्वळ मानवतावादी दृष्टीने एक चांगला शेजार तयार करण्यासाठी आणि शेजाऱ्यांबद्दलचा परस्पर आदर राखणासाठी पुढाकार घेण्याची तयारी चीनने दाखवली असली तरी अफगाणिस्तानमध्ये आपले हितसंबंध आहेत हे मान्य करणे मात्र चीनने टाळले आहे. अनेक संकटे निर्माण झालेल्या सध्याच्या जागतिक परिस्थितीत आणि नव्याने सुरू झालेल्या स्पर्धेच्या वातावरणात अमेरिकेने आपली जबाबदारी सोडून दिली आहे. त्यामुळे या अशांततेच्या वातावरणात जबाबदारी घेण्य़ासाठी अनेक देश चीनला उद्युक्त करत आहेत, असा चीनचा युक्तिवाद आहे. त्याचबरोबर आम्हाला हा पुढाकार घेण्यास भाग पाडले जात आहे, असेही चीनचे म्हणणे आहे.
चीनला अफगाणिस्तानमध्ये स्वारस्य का?
अफगाणिस्तानातील स्थैर्य हे चीनला स्वतःची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंध साधण्यासाठी तसेच अमेरिकेच्या वर्चस्वाला राजकीय आणि आर्थिक अशा दोन्ही बाजूंनी विरोध करण्यासाठी महत्त्वाचे आहे. चीनच्या अफगाणिस्तानबद्द्लच्या भूमिकेमध्ये ही मेख दडलेली आहे. अफगाणिस्तानातून निर्माण होणारा दहशतवादाचा धोका आणि चीनच्या हितसंबंधांना आणि कर्मचार्यांना विस्तीर्ण प्रदेशात आणि चीनच्या पश्चिम सीमेवर हानी पोहोचवण्याची या दहशतवादाची क्षमता अतिशय वास्तविक आहे. दहशतवाद, अतिरेकी संघटना आणि फुटीरतावाद याला प्रत्युत्तर देण्यासाठी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय दृष्टिकोनाचे आवाहन करत चीनने तालिबान, प्रादेशिक देश आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला, पूर्व तुर्कस्तानातील इस्लामवादी चळवळीचा बीमोड करून अफगाणिस्तानला मदत करण्याचे आवाहन केले. अफगाणिस्तानची दहशतवादविरोधी क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे, असे चीनचे म्हणणे आहे. निर्वासितांचा प्रश्न, अंमली पदार्थांचे उत्पादन आणि विक्री आणि त्यांची सीमापार तस्करी हे चीनच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले मुद्दे या पत्रकात ठळकपणे मांडले आहेत.
अफगाणिस्तान त्याच्या मोक्याच्या स्थानामुळे चीनसाठी आर्थिकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे. चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) आणि खनिज संसाधनांच्या उपलब्धतेमुळे चीनसाठी हा देश अत्यंत महत्त्वाचा आहे.
लिथियमचे साठे, खाणी आणि तेल
दोन्ही बाजूंमध्ये आर्थिक प्रतिबद्धता सुरू असताना चिनी कंपन्यांनी इथे लिथियमचे साठे, इतर खाणी आणि तेल क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यात स्वारस्य दाखवले आहे. अशा प्रकारच्या आर्थिक अत्यावश्यक बाबींमुळेही चीनचा अफगाणिस्तानमधला सहभाग वाढतो आहे. 2023 च्या सुरुवातीपासून, चीनने जागतिक प्रशासन सुनिश्चित करण्यात आणि संवादासाठी ‘मध्यम आणि बहुलवादी वातावरण’ प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा एक प्रमुख देश म्हणून आपली प्रतिमा मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहेत. ग्लोबल सिक्युरिटी इनिशिएटिव्ह आणि युक्रेनवरील शांतता प्रस्तावाचे प्रकाशन हे अफगाणिस्तानवरील ‘पोझिशन पेपर’च्या आधी आले आहेत. यातून आपली प्रतिमा सुधारण्यासाठी आणि जबाबदार मध्यस्थ म्हणून आपली भूमिका मजबूत करण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे हेच दिसते. इराण आणि सौदी अरेबियाला वाटाघाटीच्या टेबलावर आणण्यात चीन यशस्वी ठरला आहे. त्याचबरोबर युरोपमधील नेत्यांच्या वाढत्या चीन भेटी हे बीजिंगच्या प्रभावाचे सूचक म्हणून प्रक्षेपित केले जाते.
तालिबानने या चीनच्या या पत्रकाचे आणि चीनच्या दीर्घकालीन राजकीय पाठबळाचे स्वागत केले आहे. आता चीन अफगाणिस्तानला काय देऊ शकतो यावर चीनचे इथले यश अवलंबून असेल. असे असले तरी अफगाणिस्तान आणि चीन यांच्यातील संबंधांवर चीनचे वक्तृत्व प्रत्यक्ष मैदानात ठोस कृती करण्यात अपयशी ठरले आहे.
मध्य आशियाई देशांसह रशिया आणि इराण या देशात चीन सातत्याने गुंतवणूक करत आहे आणि त्यावरच या देशांची धोरणे अवलंबून आहेत. या सगळ्या घडामोडींकडे भारताचे लक्ष असेल. अफगाणिस्तानमधील भारताच्या हितासाठी याचा काय अर्थ असेल हे समजून घेण्यासाठीही या गोष्टी परिणामकारक ठरतील.
हे भाष्य प्रथम The Hindu मध्ये प्रकाशित झाले.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.