Published on Mar 31, 2021 Commentaries 0 Hours ago

अत्यंत मोक्याच्या अशा पर्शियन व ओमान आखातात होणाऱ्या युद्धसरावात, संयुक्त अरब अमिरात प्रथमच भारत व फ्रान्स या देशांसोबत सहभागी होणार आहे.

भारतीय नौदलाचा आखातात युद्धसराव

भारतीय नौसेना पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिरात, फ्रान्स आणि आखाती देशांबरोबर होणाऱ्या सागरी युद्ध सरावाच्या तयारीमध्ये गुंतलेली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात अत्यंत मोक्याच्या अशा पर्शियन व ओमान आखातात होणाऱ्या भारत व फ्रान्स या युद्ध  सरावात ती सहभागी होणार आहे. २५ ते २७ एप्रिल पर्यंत चालणारा हा युद्धसराव ‘वरूण’ या नावाने होणार आहे.

संयुक्त अरब अमिरात प्रथमच भारत व फ्रान्स या देशांदरम्यान होणाऱ्या युद्ध सरावात सहभागी होणार आहे. फ्रान्सकडून फ्रेंच विमानवाहू चार्ल्स डी गॉलच्या नेतृत्वात फ्रेंच स्ट्राईक ग्रुप व भारताकडून कोलकाता विनाशिका या युद्ध सरावाचे नेतृत्व करणार आहे. तत्पूर्वी २० ते २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या दोन नौदल संरक्षण प्रदर्शनांमध्ये भाग घेण्यासाठी भारताने अबुधाबीला पाठविलेल्या युद्धनौका या भारत आणि यूएई दरम्यान असलेल्या सैन्य – लष्कराच्या सहकार्याचे उत्तम उदाहरण आहे.

भारतीय नौदलाचे जहाज प्रलय नौदल संरक्षण प्रदर्शनात एन ए व्ही डी ई एक्स २१ आणि आंतरराष्ट्रीय संरक्षण प्रदर्शन आय डी ई एक्स-२१ मध्ये  सहभागी झाले होते. गोवा शिपयार्डने बांधलेले आय एन एस प्रलय हे प्रबळ श्रेणीतील क्षेपणास्त्र युक्त शस्त्रे व सेन्सर असलेली युद्धनौका असून पृष्ठभागावरील युद्ध मोहिमेत महत्त्वाची भूमिका साकारण्याच्या दृष्टीने बांधण्यात आलेली आहे.

भारतीय नौदलाची जहाजे नित्यक्रमीका बंदर थांब्यासाठी युएई देशातील बंदराचा उपयोग करतात अलीकडेच म्हणजे फेब्रुवारी २०२१ मध्ये आय एन एस म्हैसूर युएई बंदरावर थांबले होते व हे भारत – युएई मधील असलेल्या सागरी सहकार्याचे दर्शक आहे. भारत व यूएई यांनी मार्च २०१८ पासून नवीन द्विपक्षीय नौदल कवायतीची सुरुवात केलेली आहे.  “गल्फ स्टार १” अबुधाबीच्या किनारपट्टीवर १७ ते २९ मार्च २०१८ दरम्यान आयोजित करण्यात आला होता आणि त्यात भारतीय नौदलाच्या आय एन एस गोमती (मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिग्रेट )आणि आय एन एस कोलकता (एक मार्गदर्शक क्षेपणास्त्र नाशक) या दोन जहाजांच्या समावेश होता.

हा सराव भारत व यूएई दरम्यान संरक्षण सहकार्य बळकट करण्याच्या पाठपुराव्याचाच भाग होता. हया कवायतीत फोर्स प्रोटेक्शन मेनर्स ड्रिल, सागरी हस्तक्षेप मोहीम आणि क्रॉस-डेक लँडिंग इत्यादींचा समावेश करण्यात आला होता. नवी दिल्ली आणि अबुधाबी यांच्यात सैन्य आणि सुरक्षा सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी गेल्या डिसेंबरमध्ये पहिल्यांदाच भारतीय लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी युएईला भेट दिली.

इंडो – पॅसिफिक मध्ये ऑस्ट्रेलिया सोबत होणाऱ्या द्विपक्षीय कवायतीत आता  फ्रान्ससुद्धा सामिल होणार आहे. गलवान संघर्षानंतर भारताने अनेक राष्ट्रांसोबत आपली सुरक्षा व सामरिक भागीदारी वृद्धिंगत करण्याची उत्सुकता दर्शविली आहे. फ्रान्स हा इंडो – पॅसिफिक मधील महत्वपूर्ण धोरणात्मक भागीदारी असून तुलनेने नवीन असले तरी, गेल्या काही वर्षांत भारत-ऑस्ट्रेलिया व्दिपक्षीय धोरणात्मक संबंधांना चांगला वेग आलेला आहे. नौसेनेच्या कवायती ऑसिंडेक्स परिपक्व होत आहे व आता फ्रान्ससुद्धा या श्रृंखलेचा भाग होऊ इच्छितो आणि हे संबंध पुढे कशाप्रकारे नेहता येईल याबाबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त एका अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले.

भारत – ऑस्ट्रेलिया – इंडोनेशिया अशी आणखी एक त्रिपक्षीय चर्चा सुरू आहे. इंडो – पॅसिफिक भागात बीजिंगच्या आक्रमक भूमिकेमुळे चीन तणावपूर्ण वातावरण निर्माण करण्यास कारणीभूत ठरलेला आहे. परिणामी येत्या काही काळात इतर देशांशी सुद्धा त्रिपक्षीय आणि बहुपक्षीय कवायती घडविल्या जाण्याची दाट शक्यता आहे. ह्या सर्व कवायती करण्यामागे भारताला इतर देशांशी लष्करी सहकार्य वाढवून आंतर कार्यक्षमता सुलभ आणि बळकट करायची आहे. तसेच वेगवेगळ्या सागरी प्रदेशात वेगवेगळ्या भागीदारांसह युद्ध सरावाचा अनुभव घेऊन आपला आत्मविश्वास वृद्धिंगत करायचा आहे व या सर्व उपायातून भारताला निश्चितच फायदा होणार आहे.

चार क्वाड देश आणि फ्रान्स या देशांसमवेत एप्रिल महिन्यात होणाऱ्या क्वाड प्लस सागरी कवायती ची तारीख निश्‍चित होणे बाकी आहे. इंडो – पॅसिफिकमधील फ्रान्सची भूमिका आणि उपस्थिती अस्पष्ट असली तरी क्वाड प्लस सागरी कवायती या इंडो- पॅसिफिकमध्ये नियम आधारित मुक्त जलवाहतुकीस क्वाड देशांचा पाठिंबा दर्शविण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणावे लागेल. क्वाड प्लस कवायतीमुळे इंडो पॅसिफिक महासागरात पाच देशांच्या प्रचंड नौदल शक्तीचे प्रदर्शन जगाला दाखविले जाणार आहे.

अधिकृत वृत्तानुसार बंगालच्या उपसागरात चार ते सात एप्रिलच्या दरम्यान क्षेपणास्त्र – मार्गदर्शित विनाशक, फ्रिगेट्स, पाणबुड्या आणि पाळत ठेवणारी विमाने ला पेरॉस बॅनरखाली युद्धसरावात गुंतण्याची शक्यता आहे. चीनबरोबर गलवानच्या खोऱ्यातील तणावाच्या काळात भारताचे एकमेव विमानवाहू जहाज आय एन एस विक्रमादित्य तैनात केल्यामुळे त्याच्या देखभाल व दुरुस्ती कारणास्तव ह्या नियोजित युद्ध सरावात भाग घेऊ शकणार नाही. भारतीय विनाशक पी – ८ आय सागरी पाळत ठेवणारी विमाने आणि एक पाणबुडी क्वाड प्लस नेवल ड्रिल मध्ये भाग घेणार आहे. जहाज चालविण्याबरोबर थेट गोळीबार, संप्रेषण, शोध, बचाव, नुकसान नियंत्रण आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचा समावेश ह्या सागरी अभ्यासामध्ये करण्यात आलेला आहे.

क्वाड प्लस सागरी अभ्यासास अजून मूर्त स्वरूप जरी प्राप्त झाले नसले तरी क्वाड देश आणि इंडो पॅसिफिक बद्दल उशिराने का होईना परंतु बऱ्याच युरोपियन देशांनी दाखविलेल्या इच्छेमुळे नव्या युगाची सुरुवात झाली असे म्हणावे लागेल.  हिंद महासागर प्रदेशातील भारतीय नौदलाच्या माहिती फ्युजन सेंटर ( आय एफ सी – आय ओ आर) येथे संपर्क अधिकारी म्हणून काम करणारा फ्रान्स पहिला देश ठरला आहे. परिणामी हिंदी महासागराचे सागरी सत्तेतील महत्त्व अधोरेखित झाले आहे तसेच फ्रान्स, जर्मनी आणि नेदरलँड यांसह युरोपियन देशांनी इंडो पॅसिफिक बद्दल आपली रणनीती झाली जाहीर करून हा भाग शांत व स्थिर ठेवण्याचा प्रयत्नांस सुरुवात केली आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.