-
CENTRES
Progammes & Centres
Location
उत्तम प्रशासनासाठी कणखर नेतृत्वाव्यतिरिक्त खंबीर नियंत्रण आणि समतोल आवश्यक आहे.
गेली काही दशके श्रीलंकेत यादवी सुरू आहे. तरीही ‘संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमा’च्या अहवालानुसार, श्रीलंका १८९ देशांमध्ये ७२ व्या स्थानावर आहे आणि उच्च मानवी विकास श्रेणीमध्ये समाविष्ट आहे. एवढेच नव्हे, तर श्रीलंकेने सन २०१० पासून जागतिक मानवी विकासात ७२ ते ७० या दरम्यानचे स्थान सातत्याने कायम राखले आहे. हे स्थान अन्य दक्षिण आशियायी देशांमध्ये खूप वरचे आहे. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेमधील सध्याचा संघर्ष अधिक वेदनादायी बनला आहे. कारण मानवी विकासावर त्याचे होणारे परिणाम विनाशकारी ठरू शकतात.
आपला शेजारी देश सध्या टाळता येण्याजोग्या, भीषण संमिश्र परिस्थितीच्या परिणामांचे घाव सोसत आहे. हा परिणाम इतका मोठा आहे, की त्या देशाला त्याचा मानवी विकास निर्देशांकही साह्यकारी ठरणारा नाही. या स्थितीला कारणीभूत ठरलेले अनेक राजकीय आणि आर्थिक घटक शोधून काढण्याची आणि त्यांवर चिंतन करण्याची संधी या परिणामांमुळे आपल्याला मिळाली आहे; तसेच या क्षेत्रातील आणि जगातील प्रशासनासंबंधीचे धडेही त्यातून मिळू शकतात.
राजपक्ष यांच्या नेतृत्वशैलीची चुणूक २००९ मध्ये सर्वप्रथम दिसून आली. त्या वेळी गोटबया राजपक्ष हे श्रीलंकेचे संरक्षण मंत्री होते. त्या काळात त्यांनी सर्वसामान्य तमिळ नागरिकांचा जराही विचार न करता ‘तमिळ टायगर्स’ची धूळधाण करण्यासाठी निष्ठुरपणे बॉम्बचा वापर केला. यामुळे श्रीलंकेतील तमिळ आणखी दुरावत गेले.
दुर्बळ आणि विभाजित विरोधी पक्षामुळे २०१५-१६ मध्ये राजपक्ष बंधुंपासून मिळालेली सुटका अल्पकाळाची ठरली. गोटबया (२०१९) आणि महिंदा (२०२०) निवडून आल्यामुळे राजकीय दडपशाही अधिक मजबूत झाली. सन २०१९ मध्ये ‘इस्टर संडे’च्या निर्दयी बॉम्बस्फोटानंतर तमिळीप्रमाणेच मुस्लिम समाजाप्रति व्यक्त झालेली प्रतिक्रिया ही अल्पसंख्याकांविषयी असलेला तिरस्कारच दर्शवते.
यामधून पारंपरिक राष्ट्रवाद आणि भीती या शस्त्रांचा वापर करणाऱ्या सशक्त नेतृत्वशैलीचेही दर्शन घडले होते. या नेतृत्वाला बौद्ध धर्मगुरू आणि बहुसंख्य सिंहली समुदाय या समाजातील महत्त्वाच्या घटकांचे समर्थन लाभले होते.
राजकारणातील घराणेशाही, सरकारच्या वरिष्ठ स्तरावर किमान चार राजपक्षांची नियुक्ती, आर्थिक गुन्हेगारी आणि विरोधी मते व प्रसारमाध्यमांची दडपशाही ही या काळाची वैशिष्ट्ये बनली होती. राजपक्ष हे निरंकुश सर्वेसर्वा असल्याने त्यांच्या लहान अंतर्गत वर्तुळाबाहेर त्यांची सल्लामसलत होत नव्हती. शिवाय राजकीय अर्थकारणाचा किंवा सामाजिक उत्तरदायित्वाचा अभाव आणि धोरणांमधील अपरिहार्य दौर्बल्य यांमुळे सध्याचे संकट उभे ठाकले आहे.
सध्याच्या आर्थिक पेचाला कारणीभूत असलेल्या सरकारच्या धोरणांमध्ये या पाच प्रमुख घटकांचा समावेश होतो :
कोव्हिड-१९ साथरोगासंबंधातील व्यवस्थापन अत्यंत ढिसाळ असल्याने विषाणूचा फैलाव अत्यंत वेगाने झाला आणि त्यामुळे पर्यटनातून मिळणाऱ्या महसुलातही घट झाली.
या आणि अशा धोरणांच्या परिणामांबरोबरच श्रीलंकेतील अनिवासी नागरिकांकडून पाठवण्यात येणाऱ्या परकीय चलनातही लक्षणीय घट झाली. त्यामुळे श्रीलंकेतील परकी चलनाचा पेच अधिक चिघळला. यामुळे देश दिवाळखोरीस निघाला. श्रीलंकेतील सेंट्रल बँक महिन्याच्या खर्चासाठी किमान एक अब्ज डॉलर राखून ठेवते. या निधीतून इंधन, खते, अन्न, औषधे आणि किमान गरजा व जीवनावश्यक वस्तूंची गंभीर टंचाई दूर करण्यासाठी मर्यादित प्रमाणात आयात करण्यासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. हा निधीही संपुष्टात आला. त्यामुळे २०२२ च्या मे महिन्यात देशाची कर्जे पहिल्यांदा बुडित निघाली.
सुप्रशासनासाठी विश्वासार्ह, भ्रष्टाचारमुक्त राज्यकर्त्यांची गरज असते. ज्यांच्याकडे स्पष्ट दूरदृष्टी आहे आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनांवर चर्चा करण्याची आणि वेगवेगळी मते स्वीकारण्याचीही ज्यांनी तयारी आहे, अशा नेत्यांची गरज असते. यासाठी सशक्त नियंत्रण आणि संतुलनाची आवश्यकता असते. त्यामध्ये विश्वासार्ह राजकीय विरोधक, स्वायत्त व निर्भय न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोग; तसेच प्रसारमाध्यमे यांचा अंतर्भाव होतो.
हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Kamal Malhotra is Non-Resident Senior Research Fellow at Boston Universitys Global Development Policy Center. He led the UN in Vietnam Turkey Malaysia Singapore and Brunei ...
Read More +