Author : Rumi Aijaz

Published on Nov 23, 2021 Commentaries 0 Hours ago

पाण्याच्या गैरवापरामुळे असमान पाणी वाटपाची समस्या अधिकच तीव्र झाली आहे. ही परिस्थिती म्हणजे धोक्याची घंटा आहे.

शहरांचे नियोजन आणि पाणी पुरवठ्याचा प्रश्न

भारताच्या काही शहरांतील सुनियोजित रहिवाशी वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे चित्र आहे. संबंधित शहरातील प्रशासकीय यंत्रणांकडून रहिवाशांना रोजच्या वापरासाठी पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. वसाहतींमध्ये पाणी पुरवठ्याच्या सुविधा असल्या व तेथील जलवाहिन्यांमध्ये पाणी सोडले जात असले तरी बहुतेक कुटुंबांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.

पाण्याची उपलब्धता हे यामागचे कारण नाही तर, व्यवस्थापनातील त्रुटी आणि गैरवापर हे यामागचे महत्त्वाचे कारण असल्याचे या समस्येचा खोलात जाऊन अभ्यास केल्यानंतर आढळून येते. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत परिस्थिती सुधारण्यापेक्षा अधिकाधिक बिघडत चालली आहे. सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी लोकसंख्या कमी असल्यामुळे पाण्याची मागणी कमी होती, त्यामुळे त्यावेळी होणारा पुरवठा आणि पाण्याचा दाब पुरेसा असायचा. त्यावेळी पाणी दररोज मिळायचे.

पाणीपुरवठ्याच्या वेळा ठरलेल्या होत्या. शिवाय, पाण्याचा दाब चांगला असल्याने इमारतींच्या छतांवरील टाक्यांमध्ये पाणी चढवण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर पंपांची गरज लागत नव्हती. मात्र, दिवसागणिक परिस्थिती बदलत गेली. लोकसंख्या वाढल्यामुळे पाण्याची मागणीही वाढली. हा बदल समजून घेण्यासाठी पाणी पुरवठा व पाणी वापराच्या पद्धतींची माहिती घेणे गरजेचे आहे.

सर्वसाधारणपणे प्रशासकीय यंत्रणांकडून नागरिकांना दिवसातून तीन वेळा (सकाळ, दुपार आणि संध्याकाळ) जलवाहिन्यांमध्ये पाणी सोडून पुरवठा केला जातो. मात्र, मागच्या एक वर्षाचा आढावा घेतल्यास या पद्धतीमध्ये बरीच अनिश्चितता दिसून येते. काही वेळा दिवसातून तीन वेळा पाणी येते, तर कधी येत नाही. पाणी नेमके कोणत्या वेळेला सोडले जाणार आहे याची माहिती लोकांना दिली जात नाही. त्यामुळे पाणी मिळेल की नाही, मिळाले तर ते कधी मिळेल याबाबत लोकांमध्ये संभ्रम असतो. शिवाय, वर्षभरात होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कुठलेही सातत्य नसते. पावसाळ्याच्या दिवसात पाणी पुरवठा वाढतो, तर वर्षाच्या इतर महिन्यांत तो कमी असतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर नागरिकांची कसोटी असते. या काळात पाण्याची मागणी सर्वाधिक असते व पुरवठा खूपच कमी असतो.

त्याचप्रमाणे, पाणीपुरवठा किती वेळ होईल याबाबतही अनिश्चितता असते. अनेकदा सोडलेले पाणी किती वेळ पाणी असेल याची लोकांना माहितीच नसते. कधी-कधी महापालिकेकडून अर्धा तास पाणी सोडले जाते, तर कधी पाच ते दहा मिनिटेच सोडले जाते. इतक्या कमी वेळेत पुरेसे पाणी साठवून, रोजच्या वापराची गरज भागवणे नागरिकांना अवघड जाते.

पावसाळ्याच्या दिवसांत पाणीपुरवठा प्रचंड अनियमित असतो. बराच वेळ पाणी सोडले जाते. याशिवाय, कधी-कधी कमी दाबामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. अनेकदा दोन फूट किंवा त्यावरील उंचीवर असलेल्या घरांतील नळाला पाणीच येत नाही. जेव्हा-केव्हा उंचावरील घरांमध्ये पाणी येते तेव्हा पाण्याचा दाब अगदीच कमी असतो. कमी दाबामुळे लोकांना भांड्यांमध्ये किंवा टाक्यांमध्ये पुरेसे पाणी साठवून ठेवता येत नाही.

पाण्याची शुद्धता हाही एक चिंतेचा विषय आहे. त्याचा परिणाम थेट लोकांच्या आरोग्यावर होतो. अनेकदा पाण्याला विचित्र वास येतो. पालिका ज्या जलवाहिन्यांद्वारे पाणी पुरवठा करते, त्या वाहिन्यांच्या गळतीची समस्याही मोठी आहे.

गळतीमुळे पाणी दूषित होते. सांडपाणी आणि चिखल त्यात मिसळला जातो. पाण्यावर प्रक्रिया करताना त्यात गरजेपेक्षा जास्त क्लोरिन मिसळले जात असल्यामुळे चवही बदलून जाते. खराब पाणी आणि त्यामुळे आरोग्यावर होऊ शकणारा परिणाम लक्षात घेऊन अनेक घरांमध्ये वॉटर प्युरिफायरसारख्या यंत्रणांचा आधार घेतला जातो किंवा मिनरल वॉटर खरेदी करून पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाते.

घरोघरी वेगवेगळ्या परी

पाणी पुरवठ्याच्या या पद्धतीची आता लोकांनाही सवय झाली आहे. पाणी कधी येणार? किती वेळ येणार? आले तर किती दाबाने येणार? ते चांगले असेल की नाही याची चिंता सर्वांनाच असते. या सगळ्या अडचणींना तोंड देण्यासाठी काही कुटुंबांनी आपापल्या पद्धतीने उपाय शोधले आहेत. त्यातील काही उपायांवर नजर टाकूया.

पालिकेने सोडलेले पाणी जलवाहिन्यांच्या माध्यमातून घरात येईपर्यंत त्याचा दाब कमी झालेला असतो. शिवाय ते अस्वच्छही झालेले असते. पाणी जास्त दाबाने यावे यासाठी अनेक सोसायट्यांनी थेट पालिकेच्या जलवाहिन्यांनाच शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर पंप जोडलेले असल्याने पाण्याच्या दाबाची समस्या निर्माण झाली आहे. अशा पद्धतीने लोक जास्तीत जास्त प्रमाणात पाणी मिळवतात. मोटरच्या दाबामुळे जलवाहिन्यांतील सूक्ष्म कचराही खेचला जातो.

या सगळ्या प्रक्रियेत पाणी दूषित होण्यास हातभार लागतो. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुन्या, गंजलेल्या आणि तडे गेलेल्या आहेत. जलवाहिन्यांच्या या भेगांमधून चिखल व सांडपाणी पाण्यात मिसळले जाते. पावसाळ्याच्या दिवसात शहरी भागांमध्ये पाणी तुंबण्याच्या समस्या उद्भवतात. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या तुंबलेल्या पाण्यात बुडून जातात. त्यामुळे या दिवसांत अनेकदा गढूळ पाणी येते.

पालिकेच्या जलवाहिन्यांमधून इलेक्ट्रिक मोटरने पाणी खेचणे अनेक कुटुंबांना पटत नाही. त्यांना ती गोष्ट चुकीची वाटते. मात्र, सरळमार्गाने पाणीच मिळत नसल्याने त्यांना अशा गोष्टी कराव्या लागतात. अशा पद्धतीने मिळालेले व प्रक्रिया केलेले हे पिण्यायोग्य पाणी वेगवेगळ्या कामांसाठी वापरले जाते. ते जसे पिण्यासाठी व अन्न शिजवण्यासाठी वापरले जाते, तसेच आंघोळीसाठी, कार किंवा रस्ते स्वच्छ करण्यासाठी आणि बागकामासाठीही वापरले जाते.

अनेक कुटुंबे हे पाणी घराशेजारच्या मोकळ्या जागांमध्ये भाज्या पिकवण्यासाठी वापरतात, त्यामुळे पाण्याचा वापर कित्येक पटीने वाढतो व पिण्यायोग्य पाणी विनाकारण वाया जाते. त्याशिवाय, काही लोकांनी बोअरवेलही खोदल्या आहेत. भूगर्भातील पाणी खेचून घेऊन ते आपली पाण्याची गरज भागवतात. इलेक्ट्रिक मोटर पंपचा वापर करून पाणी खेचणे, मोकळ्या जागांवर भाज्या पिकवण्यासाठी पिण्याचा वापर करणे आणि बोअरवेल खोदणे याला कायद्याने परवानगी नाही. त्यामुळे संबंधित भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. मात्र, हे सगळे सर्रास होत असूनही प्रशासनाकडून पाण्याच्या गैरवापराच्या विरोधात कारवाई केली जात नाही.

पाणी पुरवठ्यात सुधारणा व्हावी म्हणून…

हे सगळे असले तरी पाणी पुरवठा अधिक सुरळीत होण्यासाठी काही उपाय योजण्यात आले आहेत. पालिकेच्या वेबसाइटवर नागरिकांना तक्रारी करता येतात व त्यावर काय कार्यवाही झाली याची माहिती देखील घेता येते. सर्वसाधारणपणे सहज कार्यवाही करता येण्याजोग्या तक्रारींची आधी दखल घेतली जाते. उदाहरणार्थ, पाण्याची तीव्र टंचाई असलेल्या भागांत पाण्याचे टँकर्स पाठवले जातात. मात्र, पाण्याची शुद्धता, पाण्याचा दाब, जलवाहिन्यांची गळती असा किचकट तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते.

दुसरे म्हणजे, पालिकेच्या यंत्रणा पाणी पुरवठ्याच्या वेळेबाबत काही वेळा प्रयोग करत असतात. कधी-कधी मध्यरात्रीच्या वेळेस जलवाहिन्यांमध्ये पाणी सोडले जाते. या वेळी लोक झोपलेले असतात आणि इलेक्ट्रिक मोटर पंप बंद असतात. यावेळी सोडले जाणारे पाणी पुरेशा दाबाने येते, तसेच समप्रमाणात मिळते. भूमिगत आणि छतावरच्या टाक्याही भरल्या जातात. त्याचप्रमाणे पाणी पुरवठ्याच्या वेळी संबंधित भागातील वीज अर्धा तास बंद ठेवली जाते. पाणी सोडल्या-सोडल्या मोटरच्या द्वारे ते खेचून नेण्यास आळा घालण्याच्या उद्देशाने हे केले जाते. साहजिकच, वीज विभागाने वीज पुरवठा बंद केला की पालिकेचे पाणी प्रत्येक घरात पोहोचते.

निष्कर्ष

पाणी पुरवठ्याच्या व वापराच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर असा निष्कर्ष काढता येऊ शकतो की, नागरिकांना पाणी पुरवठा करण्याचा पालिकांचा सध्याचा दृष्टिकोन एका विशिष्ट उद्देशाने व तात्कालिक आहे. रहिवाशांना नियमित, पुरेसे व स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवण्याची हमी ही व्यवस्था देत नाही. पाण्याच्या गैरवापरामुळे असमान पाणी वाटपाची समस्या अधिकच तीव्र झाली आहे. ही परिस्थिती म्हणजे धोक्याची घंटा आहे. प्रशासकीय यंत्रणांचा कारभार कार्यक्षम करण्याची व लोकांकडून पाण्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्याची हीच वेळ आहे. या अनुषंगाने खालील काही सल्ले विचारात घेता येण्यासारखे आहेत.

दरडोई पाणी पुरवठ्याचे सूत्र पालिका प्रशासनाने अंमलात आणणे गरजेचे आहे. पाण्याची उपलब्धता आणि दर्जा या बाबतीत प्रशासनाने प्रत्येक घरातून अभिप्राय घ्यायला हवा. पाणी पुरवठ्याच्या वेळा निश्चित असायला हव्यात. त्या वेळापत्रकानुसारच पालिकेने पाणी सोडायला हवे. पाण्याच्या वेळांबाबत रहिवाशांना माहिती दिली जावी.

जलवाहिन्यांमधील पाण्याचा दाब, गळती, साठवण टाक्या आणि जलवाहिन्यांतील पाण्याच्या दर्जाची पाहणी करण्यासाठी पालिकेने योग्य तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. पालिका यंत्रणांनी दिवसा जास्तीत जास्त वेळ पाणी सोडण्याचे प्रयत्न करावेत. तसेच, २४ तास पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करावेत.

यासाठी शक्य तेवढ्या सार्वजनिक ठिकाणांवर पावसाच्या पाण्याची साठवणूक करण्याची यंत्रणा कार्यान्वित करावी. तसेच, अशा गोष्टींमध्ये रस असलेल्या रहिवाशांना ही यंत्रणा बसविण्यासाठी सहकार्य करावे. याशिवाय, सांडपाणी व नाल्याच्या पाण्यावर प्रक्रिया करून पिण्याव्यतिरिक्तच्या कामांसाठी त्याचा पुनर्वापर कसा करता येईल हे पाहायला हवे.

पाण्याच्या गैरवापरामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या समस्यांबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. विद्युत मोटार पंप वापरणे, बोअरवेल खोदण्यासारख्या नियमबाह्य कृत्यांना आळा घालण्यासाठी पालिका यंत्रणांनी शहरातील विविध भागांत नियमित पाहणी करणे गरजेचे आहे. प्रत्येक घरामध्ये पाण्याचे मीटर बसवलेले आहेत का याची खात्री केली पाहिजे आणि पाण्याचे शुल्क हे मालमत्तेच्या आकारानुसार घेण्याऐवजी पाण्याच्या वापरानुसार आकारले गेले पाहिजे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.