Author : Sarthak Shukla

Published on Dec 16, 2021 Commentaries 0 Hours ago

हवामान बदलासंदर्भात काम करण्याची काळाची गरज आजच्या जगभरातील तरुणांनी ओळखली आहे आणि त्या दिशेने ते कामही करत आहेत.

हवामान बदलाचे आव्हान आणि तरुण

हवामान बदल रोखण्यासाठी सरकारने दिलेली वचनं वर्षानुवर्षं अपूर्णच राहिल्यामुळे आता यात तरुणांनीच पुढाकार घेतला आहे. त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. ग्लास्गोमध्ये झालेल्या हवामान बदल परिषदेत (COP26) याचंच प्रतिबिंब उमटलं. हवामान बदलाच्या बाबतीत जागतिक स्तरावर नेमका काय विचार होतो आहे याचं चित्र यामुळे उभं राहिलं. औपचारिक पातळीवर आणि प्रत्यक्षात बऱ्याच चांगल्या घडामोडी घडत आहेत, हेही या परिषदेत समोर आलं.

हवामान बदलाचे परिणाम रोखण्यासाठीचे करार करणाऱ्यांचं सरासरी वय ६० च्या सुमारास होतं पण या वरिष्ठ लोकांसोबतच १५ वर्षांची मुलंही होती. ‘आम्हाला कृती हवी आहे, नुसती वचनं नको’ असं लिहिलेले फलक घेऊन ही मुलं रस्त्यावर उतरली होती.

तरुणांचा विचार हवा

बाथ विद्यापीठाने केलेल्या एका सर्वेक्षणाचे निष्कर्ष पाहिले तर, हवामान बदलामुळे आपलं भविष्य धोक्यात आलं आहे, असं ७५ टक्के तरुणांचं मत आहे. तर सरकारने जाहीर केलेल्या कृतीकार्यक्रमांमध्ये तरुणांना विचारात घेतलेलं नाही, असं ६५ टक्के तरुणांचं मत आहे.

ज्या लोकांना हवामान बदलाचे गंभीर परिणाम भोगावेच लागणार नाहीत असे लोक हवामान बदलाबद्दलची वचनं देत आहेत, करारावर सह्या करत आहेत आणि आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांची आयुष्यं वाचवण्यासाठी पैसे गुंतवण्याची आश्वासनंही देत आहेत. या तरुणांचं रक्त सळसळतं आहे म्हणून अशी आंदोलनं होतात किंवा ती दिशाहीन आहेत, असं म्हणून त्यांची हेटाळणी करणं सोपं आहे. या तरुणांना हवामान बदलाचा गवगवा करण्यासाठी कुणीतरी भडकावतं आहे, असं म्हणणं तर याहीपेक्षा वाईट आहे.

अशा तरुणांच्या मागण्या तोंडदेखलेपणाने मान्य करायच्या आणि त्यावर तातडीने कृती करण्याची आश्वासनं द्यायची हे तर आता अगदी सर्रास चालतं. पण खरंतर हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी प्रगल्भतेने विचार करून उपाय काढण्याची गरज आहे. अशा वेळी तरुण कार्यकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी वरवरचे उपाय काढणं हिताचं नाही, हे लक्षात घ्यायलं हवं.

सावध ऐका पुढल्या हाका

तारुण्य आणि प्रगल्भता यांचा एकमेकांशी काही संबंध नाही असा खोटा प्रचार केला जातो पण जगभरातल्या हवामान बदल कार्यकर्त्यांनी केलेलं काम आणि त्याचे परिणाम पाहिले तर त्यामध्ये मोठी प्रगल्भताच दिसून येते. हे तरुण ‘सावध ऐका पुढल्या हाका’ हे लक्षात घेऊन वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत.

पर्यावरण रक्षणाच्या या मोहिमेची धुरा या तरुणांनी किती समर्थपणे आपल्या खांद्यावर घेतली आहे हेच यावरून दिसून येतं. त्यांच्या या कामामुळे आपण जागतिक पातळीवर शाश्वत विकासाचं उद्दिष्ट साधू शकणार आहोत. सौरऊर्जेवर चालणारी इस्री अशा बुद्धिमान तरुणांनी लावलेले शोध जागतिक पातळीवर नावाजले गेले आहेत. १५ वर्षांच्या विनिषा उमाशंकरने सौरऊर्जेवर चालणाऱ्या इस्रीचा लावलेला असाच शोध उल्लेखनीय आहे.

हवामान बदल हे आपल्यासमोरचं संकट नाही तर या संकटामध्ये अनेक संधी दडलेल्या आहेत, असं या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. या संधीचं सोनं केलं तर आपण हवामान बदलाच्या संकटावरही मात करू शकू आणि नवेनवे शोधही लावू शकू. यामुळे दोन्ही आघाड्यांवर विजय आपलाच आहे.

हवामान बदल हे आपल्या सगळ्यांवरचंच संकट आहे आणि त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊनच या संकटाचा सामना करायला हवा ही भावना यामुळे जागृत झाली आहे. मानवजातीचं भविष्य घडवण्यासाठी या संकटावर मात करून नव्या सुवर्णसंधी शोधायला हव्या, असं प्रत्येकाचंच म्हणणं आहे.

संकटातून संधी

पर्यावरण रक्षणासाठी एक विधायक संवाद घडवून आणायला हवा याच्याशी तरुण सहमत आहेत पण अशा प्रकारच्या संवादांनी, चर्चांनी आपल्याला फारसं पुढे नेलेलं नाही, असंही त्यांचं म्हणणं आहे.

शेवटच्या माणसाचा विचार

तरुणांचा हा दृष्टिकोनही योग्यच आहे. याबाबत झालेल्या चर्चा, शिष्टमंडळांचे प्रस्ताव, करारमदार यांचा विचार केला तर आपल्या अर्थव्यवस्था सर्वसमावेशक करण्यासाठी त्याची किती मदत झाली आहे किंवा अशा संवादांमुळे आपले कायदे सक्षम बनले आहेत का, आपलं प्रशासन लोकाभिमुख आणि माणसांच्या प्रती करुणा जागवणारं झालं आहे का हे प्रश्न विचारायला हवेत.

सार्वजनिक क्षेत्रात राबवली जाणारी विकासाची आणि परिवर्तन घडवून आणणारी धोरणं ही सर्वात शेवटच्या माणसाच्या हिताचा विचार करतात का हा कळीचा मुद्दा आहे. मात्र वर दिलेल्या निकषांचा विचार केला तर तळागाळातल्या बहुंताश माणसांपर्यंत असा विकास पोहोचलेलाच नाही हे स्पष्टपणे दिसून येईल. वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्या पाहिल्या किंवा परिस्थितीचा साधारण आढावा घेतला तर लक्षात येईल की ही धोरणं आणि वस्तुस्थिती यात खूप तफावत आहे.

व्यवस्थेमधल्या त्रुटी

हवामान बदल आणि पर्यावरण रक्षण यावर आपतापर्यंत झालेल्या चर्चा, संवाद, परिषदा कशा पद्धतीने झाल्या हे पाहिलं तर त्यातल्या त्रुटी लक्षात येतील. अशा प्रकारच्या चर्चांमधून फारसं काहीच निष्पन्न होत नाही आणि थेट मैदानात तर काहीच घडत नाही, नेतेही ‘बोले तैसा चाले’ या उक्तीनुसार वागत नाहीत, असंच लोकांचं मत आहे. त्यामुळेच अशा प्रकारच्या सामाजिक पातळीवरच्या चर्चेतच काहीतरी गडबड आहे असं लक्षात येतं.

हवामान बदल आणि कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर, सगळ्याच राजकीय नेत्यांनी ‘Building Back Better’ चा नारा दिला. देश आणि समुदायांना भविष्यात येणाऱ्या संकटांपासून वाचवायचं असेल तर या संकटांचे धोके कमी करायला हवे आणि चांगल्या भविष्याची हमी द्यायला हवी, असं उद्दिष्ट यामागे होतं. पण यामुळे फक्त घोषणाबाजी झाली आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याच्या दृष्टीने कोणतंही ठोस पाऊल उचललं गेलं नाही. याउलट, जगभरातल्या तरुणांचा झपाटा वाखाणण्याजोगा आहे. त्यांचा भर प्रत्यक्ष कृतीवर आहे.

ग्रीन होप फाउंडेशन

बांग्लादेशच्या दुर्गभ भागात खारफुटीचं संवर्धन करण्यासाठी झटणारी ‘ग्रीन होप फाउंडेशन’ हे त्याचंच उदाहरण आहे. ही संस्था अस्तित्वच धोक्यात आलेल्या लोकांना अन्नसुरक्षा पुरवण्याचं महत्त्वाचं काम करते. झिम्बाब्वेमधल्या व्हिक्टोरिया धबधब्याच्या परिसरात निकोसीलाथी न्याथी या १७ वर्षांच्या तरुणाचं कामही असंच उल्लेखनीय आहे. तो युनिसेफसोबत कार्यरत आहे. त्याच्या समुदायातल्या तरुणांमध्ये पर्यावरण रक्षणाबद्दल जागृती निर्माण करण्याचं काम तो करतो आणि या तरुणांनी प्रत्यक्ष कृतीतून जगालाच पर्यावरण रक्षणाचा धडा दिला आहे.

संयुक्त राष्ट्रांमध्ये, हवामान बदलाबवर काम करणाऱ्या तरुणांचा एक सल्लागार गट तयार करण्यात आला आहे. यामध्ये भारतासह विविध देशांच्या तरुणांचा समावेश आहे.पर्यावरणविषयक धोरणं प्रत्यक्षात राबवण्यावर या तरुणांचा भर आहे. ते त्यांच्या कृतीतूनच बोलतात आणि जगाला नवा आदर्श घालून देतात. अशा तरुणांना एकत्रितपणे काम करण्याची कलाही अवगत आहे. त्यामुळेच हवामान बदलाबद्दल थेट कृती करण्यासाठी वेगवेगळ्या देशांच्या सरकारांना एकाच व्यासपीठावर आणण्याची क्षमता त्यांच्यात आहे. ते अशा नेटवर्कचं नेतृत्व करू शकतात.

लोककल्याण आणि रोजगार

हवामान बदलाचा नोकऱ्या आणि रोजगारावर झालेला परिणाम पाहायचा असेल तर आताच्या तरुणांची काय स्थिती आहे हे पाहायला हवं. पर्यावरण रक्षणासाठी बहुतांश देशांनी, कार्बनचं उत्सर्जन कमी करण्यासाठीचे करार केले आहेत. पर्यायी ऊर्जेचा वापर वाढवण्याचा निर्धार केला आहे. आर्थिक क्षेत्रात पर्यावरणाचं संतुलन राखून विकास कसा करता येईल यावरही बराच उहापोह होतो आहे. यामुळे नोकऱ्या आणि खास करून पर्यावरण संवर्धन क्षेत्रातल्या नोकऱ्यांची आणि रोजगारांची संधी निर्माण झाली आहे.

सर्वसमावेशक आणि समानता आणणारा विकास कसा साधायचा यासारखाच हा प्रश्न आहे.तळागाळातल्या लोकांचा विकास हा आर्थिक प्रगतीचा निकष असयला हवा, त्यांचा विकास झाला नाही तर खरी प्रगतीच होणार नाही पण अशा लोकांचं कल्याण, रोजगार, त्यांच्या जीवनाचा दर्जा उंचावण्याचे उपक्रम अशा सगळ्याला दुय्यम स्थान दिलं जातं आणि त्यामुळेच या विकासाचं उद्दिष्टच हरवून जातं.

तरुण पिढीतल्या पर्यावरण कार्यकर्त्यांनी जगाला हाच संदेश दिला आहे की पर्यावरण रक्षणामधल्या ठराविक मुद्द्यांवर भर देऊन ही मोहीम पुढे नेता येणार नाही. जगभरातल्या सगळ्यात संवेदनशील समुदायांना न्याय मिळवून देणं आणि त्यांचं हित साधणं हाच या नव्या युगातल्या पर्यावरणवादी चळवळीचा मंत्र आहे. हवामान बदलाचे परिणाम रोखण्यासाठी त्यांना सक्षम बनवणं, प्रगल्भ बनवणं हा यामागचा उद्देश आहे.

पर्यावरणाशी जुळवून घेणारी जीवनशैली अंगिकारणं, उपजीविकेची पर्यायी साधनं मिळवून देणं, नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी लोकांना सक्षम बनवणं आणि पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्याही त्यांना सक्षम बनणं यासाठी तरुण पर्यावरणवादी कार्यकर्ते जनजागृतीची मोहीम चालवत आहेत. कृती आराखडे, धोरणविषयक कागदपत्रं, मार्गदर्शक तत्त्वं, किंवा मोजक्याच देशांनी राबवलेले पर्यावरणविषयक उपक्रम याहीपेक्षा या तरुणांनी ठोस कामांचा धडाका लावला आहे. काही तरुण कार्यकर्त्यांनी पर्यावरण मोहिमेत माध्यमांची भूमिका काय असावी याबदद्ल जाणीव जागृती केली आहे.

पर्यावरण रक्षणात माध्यमांची भूमिका

राजकीय नेते काय करतात याहीपेक्षा नुसतंच ते काय बोलतात यावरच माध्यमांचा भर असतो हे उघड करण्यामध्ये काही तरुण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर त्या त्या सरकारांनी पर्यायी ऊर्जेच्या वापराबद्दल क्रांतिकारक घोषणा केल्या की माध्यमं त्याची त्वरेने दखल घेतात पण असे निर्णय घेताना सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात यामुळे किती खळबळ माजली आहे याबद्दलचे मुद्दे कधीच हेडलाइन्समध्ये नसतात.

धोरणं बनवल्यानंतर त्याच्या अमलबजावणीची जबाबदारी घेणाऱ्या संस्था तयार करण्यात धोरणकर्त्यांना अपयश आलं. ज्या लोकांसाठी म्हणून हे निर्णय घेतले जातात त्यांच्यापर्यंत त्याचे लाभ पोहोचतच नाहीत हे स्पष्टपणे मांडण्याची गरज आहे.

एकविसाव्या शतकामध्ये खरी प्रगती करायची असेल तर लोकशाही मूल्यांच्या आधारे चालणारी उतत्म प्रशासकीय यंत्रणा असली पाहिजे. धोरणकर्त्यांनी आखलेली धोरणं किंवा निर्णय निमूटपणे स्वीकारायचे, ते बनवताना त्यात सहभाग घ्यायचा नाही अशा पद्धतीने निर्णय घेतले जात असतील तर यामध्ये सत्ताधाऱ्यांचंच फावतं हे लक्षात घ्याला हवं.

आम्हाला उपाय शोधायचे आहेत, असं राजकीय राजकीय नेते म्हणतात खरे पण जर समस्या पूर्णपणे जाणूनच घेतली नाही तर उपाय कसे काढणार हे त्यांच्या लक्षात येत नाही.

हे होणारच!

धोरणं आखताना त्या विषयाची नीटपणे माहिती नसेल तर या धोरणांचा वापर फक्त राजकीय कारणांसाठीच होत राहणार आणि प्रत्यक्ष काहीच घडणार नाही. दुर्दैवाने, धोरणं तयार झाल्यानंतर त्याच्या अमलबजावणीमध्ये बरीच आव्हानं असल्याने ‘हे होणारच नाही’ असं म्हणणं आणखी सोपं जातं. पर्यावरण क्षेत्रातल्या तरुण कार्यकर्त्यांनी हीच स्थिती बदलण्याचा निर्धार केला आहे.

पर्यावरण रक्षणासाठी केलेले काही प्रयत्न पाहिले तर हे एक आभासी चित्र आहे हे आपल्या लक्षात येईल. कार्बनचं उत्सर्जन खरंच कमी करायचं असेल तर समान न्याय आणि चोख पडताळणी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असं या तरुण कार्यकर्त्यांचं ठाम म्हणणं आहे.

अर्थात, सगळीकडे ही स्थिती नाही. उद्योगक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या गुंतवणूकदारांनी पर्यावरणाचा समतोल सांभाळून संपत्तीनिर्मिती आणि प्रगती करता येते हे दाखवून दिलं आहे. ‘बोले तैसा चाले’ ही काळाची गरज आहे पण राजकीय नेते मात्र हवामान बदलाची समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, कृती करत आहोत, असे खोटे दावे करण्यात मश्गुल आहेत. दुसरीकडे हेच नेते कोळसा खाणींच्या भरभराटीला परवानग्या देत आहेत, तेल काढण्यासाठीचे नवे परवाने देत आहेत आणि कोळशावर आधारित वीजनिर्मिती केंद्रांची क्षमता आणखी वाढवली जात आहे.

निष्कर्ष

जगभरात ज्या वेगाने हवामान बदल होतो आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत ते पाहता आपल्याला पर्यावरणाच्या या समस्येवर ठोस उपाय काढत राहावे लागणार आहेत.

वेगाने बदलणाऱ्या या परिस्थितीत सरकारं किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचं काम पाहिलं तर त्यात फारशी प्रगती झालेली नाही हेच लक्षात येईल. पण तरुणांनी मात्र काळाची गरज ओळखली आहे आणि त्या दिशेने ते कामही करत आहेत. या तरुणांनी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला आहे आणि सरकारांच्या दाव्यांमध्ये किती त्रुटी आहेत हेही दाखवून दिलं आहे.

तरुणांची फौज

त्यांच्या या कृतीचा नेमका काय परिणाम झाला आहे हे पाहायचं असेल तर हवामान बदलाच्या समस्यांवर उपाय काढण्यामधली कोंडी ते आता झालेलं काम या सगळ्याचा आढावा घ्यावा लागेल. छोट्याछोट्या ठिकाणी सुरू असलेली कामं, सामाजिक चळवळी, कार्यकर्त्यांचं नेटवर्क उभारणं आणि एकत्रिपणे पुढे जाणं अशा सगळ्या पातळ्यांवर तरुणांची ही फौज काम करत आहे. पुढच्या पिढीचं भवितव्य घडवायचं असेल तर अशा प्रयत्नांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातल्या धुरिणांनी पाठबळ दिलं पाहिजे.

आशावाद म्हणजे प्रत्यक्ष कृती

हे कार्यकर्ते तरुण आहेत म्हणून त्यांच्याकडे पुरेसा अनुभव नाही, असं समजून चालणार नाही. ते वयाने लहान असले तरी त्यांच्याकडे आदर्शवाद आहे, व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची ऊर्मी आहे आणि आपल्या सगळ्यांसाठीच उज्ज्वल भविष्य घडवण्याचा आशावादही आहे. म्हणूनच खालून वरपर्यंत अशा पद्धतीने दृष्टिकोन ठेवून धोरणकर्ते, आर्थिक क्षेत्रातले तज्ज्ञ आणि तथाकथित प्रौढ लोकांनी तरुणांचा हा आवाज ऐकण्याची, त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे. असं घडलं तरच एक व्यापक परिणाम साधता येईल.

पर्यावरण चळवळीची बिनीची शिलेदार असलेली ग्रेटा थनबर्ग म्हणते, ‘सत्तेत असलेल्या लोकांनी आपल्याला आशा दाखवावी, अशी अपेक्षा ठेवणं चूक आहे. आशा ही काही एकतर्फी गोष्ट नाही. आशा म्हणजे सत्य सांगणं. आशा म्हणजे प्रत्यक्ष कृती करणं आणि हा आशावाद लोकांमधूनच जागता राहिला पाहिजे.’

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.