Author : Sunaina Kumar

Published on Feb 26, 2024 Updated 0 Hours ago

जर भारत विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि गणित विद्याशाखेतील आपल्या महिला पदवीधरांना कार्यबळात कायम राखणे सुनिश्चित करू शकला, तर भारत ‘विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि गणित’ विषयातील एक सामर्थ्यकेंद्र बनू शकतो.

महिला आणि STEM: शिक्षण आणि कार्यबळ सहभागातील प्रचंड तफावत समजण्यापलीकडे

हा लेख ‘शिक्षणाची पुनर्कल्पना: आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन २०२४’ या मालिकेचा भाग आहे.

 

दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचा व्यापक अवलंब केल्याने ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ विद्याशाखेतील शिक्षण हे शाश्वत व सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक कल्याण साध्य करण्यासाठी एक पूर्वअट बनले आहे. महिला आणि मुलींकरता ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ विद्याशाखेतील समान प्रवेश आणि सहभाग उपलब्ध असणे ही शाश्वत विकास २०३०च्या अजेंडाची गुरुकिल्ली आहे. मात्र, ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ या क्षेत्रांत- शाश्वत विकास उद्दिष्टे- ४ (समान दर्जाचे शिक्षण सुनिश्चित करणे आणि सर्वांसाठी आजीवन शिकण्याच्या संधींना चालना देणे) आणि शाश्वत विकास उद्दिष्टे- ५ (लैंगिक समानता प्राप्त करणे आणि सर्व महिला व मुलींना सक्षम करणे) संदर्भातील प्रगती मंदावली आहे.

जगातील प्रत्येक प्रदेशांत ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ विद्याशाखेत महिलांचे कमी प्रतिनिधित्व दिसून येते. ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ विद्याशाखेतील महिला आणि मुलींच्या सहभागाच्या जागतिक कलासंदर्भातील जागतिक बँकेच्या २०२०च्या अहवालात असे आढळून आले आहे की, जरी महिलांमध्ये पदवी प्राप्त करण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे, तरीही महिलांनी ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ या विद्याशाखांचा, विशेषतः अभियांत्रिकी, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा (आयसीटी) आणि पदार्थविज्ञानाचा अभ्यास करण्याची शक्यता कमी आहे. ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ क्षेत्रात अभ्यास करणाऱ्या महिला, ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ क्षेत्रातील करिअरमध्ये प्रवेश करण्याची शक्यता कमी असते आणि पुरुष समवयस्कांच्या तुलनेत त्या या करिअरमधून लवकर बाहेर पडण्याची शक्यता असते. ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ क्षेत्रातील महिला त्यांचे संशोधनपर काम कमी प्रकाशित करतात आणि त्यांना कमी वेतन मिळण्याची शक्यता असते. जागतिक लिगभेद अहवाल (२०२३) मध्ये मूल्यांकन केलेल्या १४६ राष्ट्रांमधील ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपैकी महिलांचा समावेश २९.२ टक्के आहे, आणि ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिता’चा समावेश नसलेल्या व्यवसायांमध्ये एकूण रोजगाराच्या ४९.३ टक्के किंवा सुमारे निम्म्या महिला आहेत.

‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ क्षेत्रांत अभ्यास करणाऱ्या महिला याच क्षेत्रातील करिअरमध्ये प्रवेश करण्याची शक्यता कमी असते आणि पुरुष समवयस्कांच्या तुलनेत त्या या करिअरमधून लवकर बाहेर पडण्याची शक्यता असते.

जागतिक स्तरावर पुन्हा पुन्हा दिसून येणारा एक रंजक विरोधाभास हा आहे की, जागतिक बँकेच्या अहवालानुसार, ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ क्षेत्रांमधील लिंगभेदाच्या दरीत देशाचे उत्पन्न आणि लैंगिक समानतेनुसार वाढ होते. कमी-उत्पन्न असलेल्या देशांतील मुलींनी- माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकी, उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रातील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याची शक्यता, पुरुषांच्या तुलनेत ७ टक्के कमी असताना, उच्च-मध्यम-उत्पन्न आणि उच्च-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, ही दरी अनुक्रमे १५ आणि १७ टक्के गुणांपर्यंत वाढली आहे. हा कल लक्षात घेत, म्यानमार, अझरबैजान, थायलंड आणि जॉर्जिया या देशांमधील महिला संशोधकांची संख्या सर्वाधिक आहे.

जगात भारतामध्ये सर्वाधिक ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ विद्याशाखेतील पदवीधर आहेत आणि जरी ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ अभ्यासक्रम निवडणाऱ्या महिलांची संख्या सातत्याने वाढत असली तरी याच क्षेत्रातील कार्यबळातील महिलांच्या सहभागात भारत पिछाडीवर आहे. ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ शिक्षणातून करिअरकडे वळत असताना मोठ्या संख्येने स्त्रिया बाहेर पडतात.

पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी-स्तरीय उपक्रमांतील नावनोंदणीचा मागोवा घेणाऱ्या, शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षणानुसार, महिला पदवीधरांची संख्या २०१४-१५ मधील ३८.४ टक्क्यांवरून, २०२१-२२ साली ती ४२.६ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर, देशामध्ये जगातील सर्वाधिक महिला ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ विद्याशाखेच्या पदवीधर आहेत, या महिला म्हणजे एक अफाट आणि तुलनेने न वापरलेले मनुष्यबळ भांडवल आहे.

सापेक्ष दृष्टीने, ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ शिक्षणाची निवड करणाऱ्या देशातील महिलांची टक्केवारी बहुतांश देशांहून अधिक आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ क्षेत्रात भारतातील महिला पदवीधरांचा वाटा २०१८ मध्ये ४२.७ टक्के होता, अमेरिकेत २०१६ मध्ये ३४ टक्के, ऑस्ट्रेलियात २०१७ मध्ये ३२.१ टक्के आणि जर्मनीत २०१७ मध्ये २७.६ टक्के होता.

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ क्षेत्रांत महिलांना साह्य करणारी धोरणे

संयुक्त राष्ट्रांच्या ‘बीजिंग घोषणे’पासून सुरुवात करून, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ क्षेत्रातील लैंगिक असमानतेविषयी अनेक आंतरशासकीय व्यासपीठांवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ क्षेत्रांत महिलांचे आणि मुलींचे कमी प्रतिनिधित्व ही भारतातील धोरणकर्त्यांसाठी सतत चिंतेची बाब राहिली आहे. महिलांच्या कमी सहभागाची कारणे ओळखण्यासाठी आणि त्यात सुधार होण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय मूल्यमापन हाती घेण्यात आले आहे. सरकारने अलीकडे केलेल्या मूल्यांकनात असे दिसून आले आहे की, भारतातील संशोधन आणि विकास उपक्रमांमध्ये १८.६ टक्के महिला संशोधक आहेत आणि स्त्रियांच्या कौटुंबिक जबाबदारीमुळे महिलांचा या क्षेत्रातील सहभाग कमी होतो, ज्यामुळे त्यांच्या करियरला ब्रेक मिळतो आणि त्यांची कामावरील गैरहजेरी वाढते.

संयुक्त राष्ट्रांच्या ‘बीजिंग घोषणे’पासून सुरुवात करून, ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ क्षेत्रांमधील लैंगिक असमानतेवर अनेक आंतरशासकीय व्यासपीठांवर लक्ष देण्यात आले आहे.

अनेक धोरणांद्वारे या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रम (एसटीआय) धोरण २०१३’मध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांत लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यात आले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे ‘विमेन इन सायन्स अँड इंजिनीअरिंग-किरण’ (WISE-KIRAN) या योजनेंतर्गत विविध उपक्रम आहेत, उदा. महिलांना करिअरच्या विश्रांतीनंतर पुन्हा कामावर परत येण्यासाठी प्रोत्साहित करणारी- 'महिला वैज्ञानिक योजना' आणि पायाभूत सुविधा आणि संशोधन सुविधांच्या विकासासाठीची ‘कन्सोलेशन ऑफ युनिव्हर्सिटी रीसर्च थ्रू इनोवेशन अँड एक्सलन्स इन विमेन युनिव्हर्सिटी (क्युरी) प्रोग्राम’.

‘जेंडर ॲडव्हान्समेंट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इन्स्टिट्यूशन्स’ (गति) उपक्रमाचे उद्दिष्ट लैंगिक असमानतेचे मूल्यांकन करणे आणि लिंगाधारित-संवेदनशील दृष्टिकोनांच्या दिशेने संस्थांचे परिवर्तन करणे हे आहे. ‘सर्ब-पॉवर’तर्फे (प्रोमोटिंग ऑपॉर्च्युनिटीज फॉर विमेन इन एक्सप्लोरेटरी रिसर्च) अनुदान आणि फेलोशिप्स प्रदान करीत संशोधन कार्यात महिला शास्त्रज्ञांचा कमी सहभाग वाढविण्यावर प्रयत्न केले जात आहेत. ‘विज्ञान ज्योती कार्यक्रमा’अंतर्गत, ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींवर लक्ष केंद्रित करून त्यांना ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ विद्याशाखा निवडण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ने अलिकडच्या वर्षांत अतिरिक्त जागा सुरू करून महिलांचे प्रवेश वाढवले आहेत. ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने महिलांकरता ‘प्रगती शिष्यवृत्ती’ आणि ‘टेकसक्षम कार्यक्रम’ या दोन योजना सुरू केल्या आहेत, ज्यामुळे संबंधित क्षेत्रातील बाजारपेठेत त्यांची रोजगारक्षमता वाढते.

यांपैकी अनेक योजना ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ विद्याशाखेत शिक्षण घेणाऱ्या महिलांची संख्या वाढवण्यात प्रभावी ठरले आहेत, परंतु कर्मचाऱ्यांमध्ये भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यात या योजना सक्षम झालेल्या नाहीत.

‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ क्षेत्राच्या कार्यबळातील लैंगिक असमानता दूर करणे

महिला ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ विद्याशाखेतील पदवीधरांचे उच्च प्रमाण असूनही, जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, भारतातील ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपैकी एक तृतीयांशपेक्षा कमी- २७ टक्के इतका वाटा महिलांचा आहे. महिलांच्या कमी प्रतिनिधित्वाची ही बाब अनेक देशांत दिसून येते. तिला ‘गळती असलेली पाइपलाइन’ अशी परिभाषित करण्यात आली आहे. ज्याचा अर्थ असा आहे की, ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ क्षेत्रातील करिअरमध्ये यशस्वी होण्याची क्षमता असूनही, स्त्रिया कामाचा पाठपुरावा करत नाहीत किंवा हळूहळू काम सोडतात.

घरगुती आणि देखभाल करण्याच्या ओझ्यामुळे महिला करू शकतील अशा वैयक्तिक निवडींव्यतिरिक्त, त्यांना घर आणि कामाच्या ठिकाणी पूर्वग्रह, रूढीवादी आणि पद्धतशीर अडथळ्यांचा सामना करावा लागतो. व्यापकपणे करण्यात आलेल्या दस्तावेजीकरणानुसार, हे पूर्वग्रह ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ उत्पादने आणि नवकल्पनांवरही परिणाम करतात.

महिला ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ विद्याशाखेतील पदवीधरांचे उच्च प्रमाण असूनही, जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, भारतातील ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपैकी महिलांचा वाटा- एक तृतीयांशपेक्षा कमी- २७ टक्के इतका आहे.

महिलांनी या क्षेत्रात प्रवेश करावा आणि त्या या क्षेत्रात टिकाव्यात, याकरता पाठिंबा देण्यासाठी, जागरूकता वाढवून सांस्कृतिक पूर्वाग्रहांशी लढा देणे आणि धोरणात्मक हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती आणि त्यांच्या शिक्षणास समर्थन देणाऱ्या उपक्रमांशिवाय, कामाच्या ठिकाणी महिलांना प्रशिक्षण व मार्गदर्शन उपक्रम आणि देखभाल घेण्याविषयीच्या पायाभूत सुविधा तसेच रजा-संबंधित धोरणे उपलब्ध करून देण्याकरता गुंतवणुकीद्वारे प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

भारतातील ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ विद्याशाखेतील शिक्षण आणि कार्यबळातील महिलांची संख्या वाढवण्यासाठी अनेक आघाड्या आणि उपक्रम नव्याने सुरू करण्यात आले आहेत. भारत हा आधीच जागतिक ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ क्षेत्रातील मनुष्यबळ निर्माण करण्यात अग्रेसर आहे. फक्त भारताने ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ विद्याशाखेतील महिला पदवीधरांना कार्यबळात कायम कसे राखता येईल, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

सुनैना कुमार या ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’मध्ये वरिष्ठ फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.