Published on Dec 29, 2023 Updated 0 Hours ago

सौदी अरेबियाची आगामी उद्दिष्टे साध्य करण्याकरता त्यांच्याकरता आफ्रिका अनुकूल आहे. त्यामुळे या प्रदेशात सौदी अरेबियाच्या राजनैतिक आणि आर्थिक पाऊलखुणा अधिक तीव्र झाल्या आहेत.

आफ्रिकेच्या उज्ज्वल भविष्यासाठी सौदी अरेबियाने आखलेल्या योजना

जो देश प्रामुख्याने हजवर लक्ष केंद्रित करायचा, त्या सौदी अरेबियाचा आफ्रिकेतील वावर गेल्या ६० वर्षांत लक्षणीयरीत्या विस्तारला आहे, ज्यात शाश्वत विकास, व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, संस्कृती, खाणकाम आणि तेल व वायू या क्षेत्रांसह परस्परांना फायदेशीर ठरणाऱ्या क्षेत्रांचा समावेश आहे. आता, इस्रायलशी ऐतिहासिक अब्राहम करार करून आणि इराणशी समेट केल्यानंतर, सौदीने अलीकडेच आफ्रिकेत आपली राजनैतिक मोहीम तीव्र केली आहे.

सौदी आपल्या मर्यादित आर्थिक गुंतवणुकीत वाढ करून आफ्रिकेतील आर्थिक पाऊलखुणा विस्तारत आहे आणि आफ्रिकेसोबतचे संबंध पुढील पातळीवर नेण्यासाठी, सौदीने १० नोव्हेंबर २०२३ रोजी पहिल्यांदाच सौदी-आफ्रिका शिखर परिषद आयोजित केली. आपल्या प्रास्ताविकादरम्यान, सौदीचे अर्थमंत्री मोहम्मद अल-जदान यांनी सांगितले की, सौदी अरेबिया आणि आफ्रिकेचा इतिहास आणि नशीब सामायिक आहे. आयोजित करण्यात आलेली एकदिवसीय परिषद धोरणात्मक आघाड्या बळकट करण्यासाठी आणि संबंध व सहयोग वाढवण्यासाठी ही परिषद निश्चितच उपयुक्त ठरेल.

सौदी आपल्या मर्यादित आर्थिक गुंतवणुकीत वाढ करून आफ्रिकेतील आर्थिक पाऊलखुणा वृद्धिंगत करण्याचे काम करीत आहे.

सौदी-आफ्रिका शिखर परिषदेत काय घडले?

पहिल्या सौदी-आफ्रिका शिखर परिषदेत १० हून अधिक राष्ट्रप्रमुखांसह ५० हून अधिक मान्यवर उपस्थित होते. कोमोरानचे राष्ट्राध्यक्ष व आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष अझाली असुमानी आणि आफ्रिकन युनियन आयोगाचे अध्यक्ष मौसा फकी महामत हेदेखील या शिखर परिषदेला उपस्थित होते. शिखर परिषदेदरम्यान, सौदी अरेबियाने २०३० सालापर्यंत सौदीच्या निर्यातीसाठी विमा म्हणून १० अब्ज अमेरिकी डॉलर्स आणि आफ्रिकी देशांच्या विकासासाठी अतिरिक्त ५ अब्ज अमेरिकी डॉलर्सचे वाटप करण्याचा प्रस्ताव मांडला. सौदी विकास निधीने १२ आफ्रिकी देशांसोबत ५३३ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स किमतीचे ५० हून अधिक करार आणि सामंजस्य करार केले आहेत.

याशिवाय, आफ्रिकेकरता १ अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा अधिक रकमेच्या विकास योजना राजे सलमान यांनी सुरू केल्या आणि त्या पुढील १० वर्षांहून अधिक काळ सुरू राहतील, असा अंदाज आहे. सौदी अरेबियाने आफ्रिकी खंडावर आपली राजनैतिक उपस्थिती वाढवण्याचा इरादा जाहीर केला. नवीन दूतावासांची संख्या २७ वरून ४० पेक्षा जास्त केली. संस्कृती, मानव संसाधन, सामाजिक विकास आणि क्रीडा यांसारख्या सामाजिक क्षेत्रात अनेक करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.

शिखर परिषदेच्या निमित्ताने सौदी अरेबिया आणि नायजेरिया यांच्यात काही गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. नायजेरियातील चार बिघाड झालेल्या तेल शुद्धीकरण कारखान्यांचे नूतनीकरण करण्याबाबत एक करार झाला. सौदी सरकारच्या मालकीचे तेल महामंडळ अरामको दोन ते तीन वर्षांत या चारही तेल शुद्धीकरण कारखान्यांचे नूतनीकरण करणार आहे. नायजेरियाची झपाट्याने कमी होणारी परकीय गंगाजळी भरून काढण्यासाठी आणि सरकारच्या परकीय चलन विषयक सुधारणांना कायम ठेवण्यासाठी भरीव परकीय चलन जमा करण्याचे वचन सौदी अरेबियाने दिले आहे. २०१९ मध्ये प्रस्तावित असलेल्या नायजेरिया-सौदी अरेबिया व्यापार परिषदेच्या पुनरुज्जीवनामुळे उभय देशांमधील व्यावसायिक सहकार्याच्या नव्या युगाचा प्रारंभ होण्याची अपेक्षा आहे.

आफ्रिकेत प्रभाव प्रस्थापित करण्याकरता प्रादेशिक स्पर्धा

आफ्रिका अनेक जागतिक शक्तींमधील तीव्र संघर्षाचा केंद्रबिंदू बनत आहे. अमेरिका, युरोप, चीन, भारत, रशिया आणि ज्यात संयुक्त अरब अमिराती, कतार, तुर्किये, सौदी अरेबिया अशा अरब देशांचा समावेश आहे, ते आफ्रिकी देशांमध्ये राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. खरे तर, २०१३ च्या अरब-आफ्रिका शिखर परिषदेदरम्यान आफ्रिकेचे यजमानपद मिळवणारा कुवेत हा पहिला अरब देश होता. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती,  आणि इराण २०२४ मध्ये ब्रिक्सचे नवीन सदस्य बनणार आहेत, आफ्रिकेतील नफ्याचा मोठा तुकडा प्राप्त करण्याकरता आता स्पर्धा वाढेल.

आफ्रिका अनेक जागतिक शक्तींमधील तीव्र संघर्षाचे केंद्रबिंदू बनत आहे. अमेरिका, युरोप, चीन, भारत, रशिया आणि ज्यात संयुक्त अरब अमिराती, कतार, तुर्कस्थान, सौदी अरेबिया अशा अरब देशांचा समावेश आहे, ते आफ्रिकी देशांमध्ये राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या प्रवेश करण्याच्या विचारात आहेत.

आज, संयुक्त अरब अमिराती हा युरोपीय युनियन, चीन आणि अमेरिकेनंतर आफ्रिकेतील चौथा सर्वात मोठा गुंतवणूकदार देश आहे. अबू धाबी विकासनिधीने २८ आफ्रिकी राष्ट्रांमधील ६६ प्रकल्पांसाठी १६.६ अब्ज अमेरिकी डॉलर्स निधी प्रदान केला. बंदर विस्तार आणि सागरी सहकार्याच्या बाबतीत अग्रगण्य असलेली दुबई पोर्ट्स वर्ल्ड (डीपी वर्ल्ड) ही एक सरकारी मालकीची प्रचंड मोठी संस्था दहाहून अधिक आफ्रिकी देशांमधील प्रकल्पांचे व्यवस्थापन करते. गेल्या १० वर्षांमध्ये, दुबई पोर्ट्स वर्ल्डने आफ्रिकेत १.८ अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे आणि आणखी ३ अब्ज अमेरिकी डॉलर्स गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे.

इराणला आफ्रिकेत आपले उपक्रम वाढविण्यात खरोखरच स्वारस्य आहे. २०१४ मध्ये अध्यक्ष हसन रूहानी आणि विद्यमान अध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी व्यक्त केल्याप्रमाणे इराणचे मुख्य उद्दिष्ट आफ्रिकेशी असलेले संबंध सुधारणे हे आहे. रायसी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला तीन देशांचा दौरा केला आणि ११ वर्षांत आफ्रिकी खंडाला भेट देणारे ते इराणचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले. इराणच्या नेतृत्वाकरता आफ्रिका महत्त्वपूर्ण आहे, याचे कारण इराण आफ्रिकी नेत्यांशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित करून आपल्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरील अमेरिका आणि युरोपीय युनियनने लादलेल्या निर्बंधांचे प्रतिकूल परिणाम कमी करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.

२००५ पासून, आफ्रिकेसंदर्भात सातत्यपूर्ण धोरणाचे पालन करून तुर्किये आफ्रिकेतील एक महत्त्वपूर्ण देश म्हणून नावारूपाला आला आहे. भारताप्रमाणेच, तुर्कीयेने यापूर्वी तीन आफ्रिका शिखर परिषदांचे आयोजन केले आहे. संस्कृती आणि इतिहास यांसारखी मूल्ये आणि परकीय धोरणे वापरून बदल घडवून आणणाऱ्या साधनांसोबतच, विविध राजनैतिक, व्यावसायिक, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, सुरक्षा आणि लष्करी सहकार्य या सम्यक मुत्सद्देगिरीच्या मार्गांद्वारे खंडावरील आपले स्थान मजबूत करण्याचे तुर्कीयेचे उद्दिष्ट आहे. गेल्या १५ वर्षांत, अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी ३० हून अधिक आफ्रिकी राष्ट्रांचा प्रवास केला आहे, त्यांनी तुर्कियेकरता आफ्रिकेचे असलेले महत्त्व अधोरेखित केले आहे. खरे तर, आफ्रो-युरेशियाचा भाग म्हणून तुर्कीयेचा संदर्भ ते देतात.

सौदीची आफ्रिकेतील सद्य पोहोच

आफ्रिकेतील गुंतवणूक सौदी अरेबियासाठी नक्कीच नवी नाही, परंतु यावेळी असे दिसते की, सौदीने आफ्रिकेकडे झुकलेल्या आक्रमक अशा सम्यक मुत्सद्देगिरीच्या मार्गांद्वारे आफ्रिकी खंडात यश मिळवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे, बदलत्या जागतिक व्यवस्थेत अधिक मध्यवर्ती भूमिका बजावण्याची सौदी अरेबियाची इच्छाही या शिखर परिषदेत दिसून आली. सध्या, सौदीचे उपक्रम प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका आणि मुस्लिम बहुसंख्य राष्ट्रांवर केंद्रित आहे (पूर्व आफ्रिका, पश्चिम आफ्रिका आणि भूमध्य समुद्राला लागून असलेला उत्तर आफ्रिकेचा पश्चिमी प्रदेश).

सौदीचे आफ्रिकेतील दोन प्रमुख व्यापारी भागीदार दक्षिण आफ्रिका आणि इजिप्त आहेत. सौदी आफ्रिकेला रबर, रसायने, ग्राहकोपयोगी वस्तू, खनिजे, धातू आणि खाद्यपदार्थ निर्यात करत असताना, आफ्रिकेतून ते ज्या वस्तूंची आयात करतात, त्यात प्रामुख्याने धातू, कच्चा माल, भाज्या, दगडी आणि काचेच्या उत्पादनांचा समावेश होतो. २०२२ मध्ये, सौदी आणि आफ्रिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार ४५ अब्ज अमेरिकी  डॉलर्सपर्यंत पोहोचला. २०१८ आणि २०२२ दरम्यान वार्षिक ५.९६ टक्के वाढीसह, आफ्रिकेतील सौदीच्या तेल वगळता इतर सर्व निर्यातींमध्ये, गेल्या पाच वर्षांत झालेली ही लक्षणीय वाढ आहे.

शिवाय, सौदी अरेबियाद्वारे आफ्रिकी देशांना कर्ज कपात आणि संघर्षमय परिस्थितीतील तडजोडीकरता मदत दिली जात आहे. यापूर्वी, २०२० मध्ये जी-२० अध्यक्षपदाच्या वेळी, सौदी अरेबियाने आफ्रिकेकरता कर्ज सेवा दायित्वे रद्दबातल करण्याबाबत वकिली केली होती. आफ्रिका शिखर परिषदेत, सौदी अरेबियाच्या अर्थमंत्र्यांनी खुलासा केला की, घाना आणि इतर काही आफ्रिकी मित्र देशांना त्यांच्या कर्जाबाबत मदत करण्यासाठी सरकार विविध निधी व्यवस्था करण्याचा विचार करत आहेत.

आफ्रिकेसाठी सौदीच्या योजना

सौदी अरेबिया हे एक उदयोन्मुख जागतिक शक्तिकेंद्र आहे, ‘ब्रिक्स युतीमधील त्यांचा समावेश हा त्याचा पुरावा आहे. २०१६ मध्ये, सौदी अरेबियाने त्यांचे व्हिजन २०३० स्पष्ट केले. तेल संपत्तीवरील देशाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि त्यांची अर्थव्यवस्था अक्षय ऊर्जा, क्रीडा, पर्यटन, रसद पुरवठा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेत विविधता आणण्यासाठी रचना केलेल्या भौगोलिक घटकांवर आधारित आर्थिक धोरणाचा प्रारंभ केला. निःसंशयपणे, ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी देशाला भरपूर भागीदारांची आवश्यकता आहे. त्यामुळे शाश्वत भागीदारी, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्यासाठी सौदी आफ्रिकेकडे वळणे स्वाभाविक आहे.

सौदी अरेबिया हे एक उदयोन्मुख जागतिक शक्तिकेंद्र आहे, ‘ब्रिक्स युतीमधील त्यांचा समावेश हा त्याचा पुरावा आहे.

खरे तर, जगाच्या वाढत्या बहुध्रुवीयतेत सौदी अरेबिया आफ्रिकेकडे एक अपरिहार्य सहयोगी म्हणून पाहतो. उप-सहारा आफ्रिकेतील सम्यक मुत्सद्देगिरीच्या मार्गांचे आकर्षण वाढवण्यासाठी ते आपल्या आर्थिक ताकदीचा वापर करत आहे. राजे सलमान आणि त्यांचे वारस- राजपुत्र मोहम्मद बिन सलमान सत्तेवर आल्यापासून, आफ्रिकेतील अनेक राष्ट्रप्रमुखांनी सौदीला भेट दिली आहे, ज्यातून सौदी अरेबिया आणि आफ्रिकी देशांमधील वाढत्या सहकार्याचे संकेत मिळतो. सौदीच्या विकास निधीद्वारे अनेक विकास उपक्रम राबवले जात आहेत.

आतापर्यंत, या सवलतीच्या दराने केल्या गेलेल्या अर्थसहाय्याने ४४ आफ्रिकी देशांमध्ये प्रकल्प विकसित करण्यास मदत झाली आहे. याशिवाय सौदी अरेबिया इस्लामिक डेव्हलपमेंट बँकेचे प्रमुख देणगीदारही आहेत. गेल्या काही वर्षांत, सौदी अरेबियाने आपल्या देशांतर्गत उद्योगांची भरभराट करण्यासाठी महत्त्वाच्या उद्योगांमध्ये जागतिक स्तरावरील आघाडीचे कौशल्य आणि दीर्घकालीन विकास धोरण विकसित केले आहे. हा अनुभव आफ्रिकेतील अर्थव्यवस्था आणि संसाधन तळांवर लागू करणे दोघांकरता एक उत्कृष्ट संधी आहे.

खंडातील सौदी गुंतवणूक, गुंतवणुकीवर परस्पर परतावा मिळण्याची अफाट क्षमता, हे सौदी अरेबिया त्यांच्या पारंपरिक उद्योगांपासून दूर जाण्याचे आणि नवीन, विस्तारित विशेषीकरणाच्या पोर्टफोलिओकडे वळण्याचे आणखी एक मजबूत सूचक आहे. सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाच्या युक्रेनसोबतच्या युद्धानंतर उद्भवलेल्या जागतिक ऊर्जा संकटामुळे सौदी अरेबियाला आपला प्रभाव मजबूत करण्याची आणि अमेरिकेवर कमी अवलंबून राहण्याची संधी मिळाली आहे.

तत्पूर्वी, सौदीने सुदानच्या आपापसांत लढणाऱ्या सैन्यप्रमुखांमध्ये शांतता करार करण्याचा प्रयत्न केला. सामरिक स्वायत्ततेसाठी सौदी अरेबियाचा शोध गॅबॉन, नायजर आणि सुदान यांसारख्या आफ्रिकन युनियनकडून निलंबित केलेल्या देशांपर्यंत पोहोचून, त्यांच्याशी फायदेशीर करार करण्यासाठी युक्तीने कसून नियोजन करत, त्यांच्यांशी राजनैतिक संपर्कही प्रस्थापित केला. त्यांना आमंत्रण देऊन, सौदी अरेबियाने पाश्चिमात्य देशांना एक मजबूत संकेत पाठवला की, ते पाश्चिमात्य देशांच्या सत्तापालटाविरोधी तत्त्वांची अवहेलना करीत आहेत.

पुढील मार्गक्रमण

सौदी अरेबियाच्या आगामी उद्दिष्ट्यांकरता, आफ्रिका अनुकूल आहे. आफ्रिकेत जगातील सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर तसेच कमीत कमी शोधलेली ऊर्जा संसाधने आहेत. सौदी अरेबियाने आफ्रिकेतील आपली सम्यक मार्गाने धार्मिक मुत्सद्देगिरीची ताकद मजबूत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि त्याच्या व्यावसायिक व राजनैतिक संबंधांमध्ये व्यापक सांस्कृतिक आणि सामाजिक परिमाण जोडले आहे.

खरोखरच, सौदीचे व्हिजन २०३० आणि आफ्रिकन अजेंडा २०६३ या दोहोंच्या अभिसरणासाठी अनेक संधी शोधल्या जाऊ शकतात. त्या अर्थाने, शिखर परिषद सौदीच्या आफ्रिकेबद्दलच्या परराष्ट्र धोरणासाठी एक अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.

दुसरीकडे, या परस्परसंबंधांतून आफ्रिकी राष्ट्रांच्या विकासासाठी आणि सहकार्यासाठी नवीन मार्गही खुले होऊ शकतात. सौदी-आफ्रिका संबंधांचा विस्तार किती प्रमाणात होईल हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. मात्र, सौदी अरेबिया अशा संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे हे सुस्पष्ट आहे, ज्या संबंधांचे येत्या काही वर्षांत आर्थिक आणि राजकीय महत्त्व वाढणे अपेक्षित आहे.

समीर भट्टाचार्य हे विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनमध्ये वरिष्ठ संशोधन सहकारी आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.