Expert Speak Health Express
Published on Oct 14, 2024 Updated 0 Hours ago

विशेषतः भारतासारख्या विकसनशील देशाच्या संदर्भामध्ये जागतिक आरोग्य आणि काम या दोहोंबद्दलच्या आपल्या जाणीवेमध्ये सूक्ष्मता विकसित करण्याची अत्यंतिक गरज आहे.

मानसिक आरोग्यासाठी कामाचा पुनर्विचार गरजेचा

Image Source: Getty

    हा लेख "जागतिक मानसिक आरोग्य दिन 2024" या निबंध मालिकेचा भाग आहे.


    ॲमिनाटा फोर्ना यांच्या ‘द मेमरी ऑफ लव्ह’ या बहुचर्चित कादंबरीमध्ये ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ अँड्रियन लॉकहार्ट याला युद्धग्रस्त सिएरा लिओनामधील आपल्या रुग्णांना युद्धामुळे झालेले मनोविकार बरे करण्याच्या उद्दिष्टात अपयश येते. सिएरा लिओनातील ९९ टक्के नागरिक ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर’ (आघातानंतरच्या ताणाचा विकार) ने ग्रस्त होते. युद्धानंतरच्या सिएरा लिओनामध्ये ‘टॉक थेरपी’ (पाश्चिमात्य देशांमध्ये विकसित झालेली) सारखी पारंपरिक पद्धती पूर्णपणे अयोग्य असल्याचे लॉकहार्टच्या लक्षात येते. युद्धातून बचावलेल्या तेथील नागरिकांना सामूहिक बलात्कार, खून आणि अपंगत्वासारख्या व्यक्तही करता येणार नाही, अशा भयावहतेशी सामना करावा लागला होता. आपल्या प्रश्नांबद्दल अवाक्षरही न काढणे ही त्यांच्या जगण्याची केवळ एकच पद्धती होती किंवा त्यांच्या शब्दांत सांगायचे तर केवळ ‘जगणे’ होते. फोर्नाची चटका लावणारी कादंबरी वेदना आणि आघात यांवरील गुंतागुंतीच्या समस्यांना वाचा फोडते; तसेच वेगवेगळे समाज या भावना वेगवेगळ्या पद्धतींनी अनुभवतात का, असा प्रश्नही उपस्थित करते. त्याचप्रमाणे या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी पारंपरिक मानसशास्त्रीय साधनांचा अपुरेपणाही उघड करते.

    मानसिक आरोग्य दिनानिमित्त आपण कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यावर लक्ष केंद्रित करीत आहोत. अशा वेळी विशेषतः भारतासारख्या विकसनशील देशाच्या संदर्भामध्ये जागतिक आरोग्य आणि काम या दोहोंबद्दलच्या आपल्या जाणीवेमध्ये सूक्ष्मता विकसित करण्याची आत्यंतिक गरज आहे. जागतिक स्तरावर बहुतांश लोकांना जगण्यासाठी काम करणे आवश्यक आहे; परंतु अतिरिक्त कामाचे ओझे, कामाच्या ठिकाणची खराब स्थिती, अपमानास्पद वागणूक, भेदभाव, पूर्ण करता येणार नाही अशी कामाची उद्दिष्टे आणि छळ यांसारख्या गोष्टी लोकांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम करतात. जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) विविध सरकारे, मालक (काम देणारे), मालकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना आणि कामगार या सर्वांना कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काम करण्याचे आवाहन करते. कामाच्या ताणामुळे एका अग्रगण्य कंपनीत नोकरी करणाऱ्या एका महिलेचा नुकताच मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर बिघडलेली कार्यसंस्कृती आणि कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य समस्यांबाबतच्या चर्चेला तोंड फुटले आहे. कामाचे दीर्घ तास आणि कामाचा अतिरिक्त बोजा ही देशाच्या कॉर्पोरेट संस्कृतीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. अशा प्रकारच्या तणावपूर्ण नोकऱ्या करण्याची इच्छा असणाऱ्या कुटुंबातील मुले विद्यार्थी दशेत असताना नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कोचिंग क्लासेसमध्ये काही वर्षे कष्ट करीत असतात, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. अशाप्रकारे कोटामधील कोचिंग संस्था आणि आयआयटीसारख्या प्रमुख शैक्षणिक संस्थांमधील आत्महत्येचे वाढते प्रमाण यांचा कामाच्या ठिकाणी असलेल्या ताणाशी मेळ घालता येतो. येथे काम आणि समृद्धीची आकांक्षा व त्यासाठी पाठपुरावा हे मानसिक आणि अस्मितेच्या वेदनेचे प्रमुख कारण आहे.

    मानसिक आरोग्य दिनानिमित्त आपण कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यावर लक्ष केंद्रित करीत आहोत. अशा वेळी विशेषतः भारतासारख्या विकसनशील देशाच्या संदर्भामध्ये जागतिक आरोग्य आणि काम या दोहोंबद्दलच्या आपल्या जाणीवेमध्ये सूक्ष्मता विकसित करण्याची आत्यंतिक गरज आहे.

    गेल्या वर्षी दिल्ली विध्यापीठातील एका हंगामी शिक्षकाच्या आत्महत्येमुळे देशातील शैक्षणिक क्षेत्रातील अस्वस्थता आणि देशातील उच्चभ्रू सार्वजनिक विद्यापीठांमध्ये अत्यंत अस्थिर परिस्थितीत शिकवणाऱ्या उच्चशिक्षित पात्र शिक्षकांची असुरक्षितताही प्रकाशात आली आहे. कायमस्वरूपी शिक्षकांसारखीच पात्रता असलेले आणि कायमस्वरूपी व अधिक विशेषाधिकारप्राप्त शिक्षकांसारखेच अभ्यासक्रम शिकवणारे हे शिक्षक सतत चिंता, भेदभाव आणि बडतर्फ होण्याच्या भीतीच्या छायेखाली जगतात. ग्रोव्हर एट अल (२०१८) आणि कायरोगनम एट अल (२०२२) यांसारख्या अनेक अभ्यासांमधूनही भारतातील डॉक्टर व परिचारिकांमध्ये मानसिक त्रास, ताण आणि कामाच्या ताणामुळे थकवा (बर्नआउट) यांच्या अधिक व्याप्ती दर्शवतात. देशातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना कामाचे दीर्घ तास, अपुरी झोप, विरंगुळ्याचा अभाव, वरिष्ठ सहकाऱ्यांकडून त्रास, संस्थात्मक मदतीचा अभाव आणि कधी कधी कामाच्या ठिकाणी शारीरिक छळाशीही सामना करावा लागतो. देशातील काही आघाडीच्या अभिनेत्यांनीही अलीकडेच देशाच्या मनोरंजन उद्योगामध्ये काम करताना मानसिक आरोग्यविषयक आव्हानांवर भाष्य केले आहे. या क्षेत्रातही कामाचे दीर्घ तास, एकाकीपणा, अनिश्चितता, नैराश्य, लैंगिक अत्याचार आणि अति प्रमाणात अंमली पदार्थांचा वापर यांसारख्या गोष्टी दिसून येतात. 

    देशात कामासंबंधीच्या ताणावर अलीकडे होत असलेली चर्चा उच्चशिक्षित लोकांपुरतीच मर्यादित आहे; परंतु देशातील सुमारे ९० टक्क्यांहून अधिक श्रमिक अनौपचारिक क्षेत्रात लेखी करार, पगारी रजा किंवा अन्य कोणत्याही लाभांपासून वंचित असून अनिश्चित स्थितीत काम करीत आहेत. कामगारांच्या मानसिक आरोग्याबाबतच्या समस्या समजून घेताना संवेदनशीलता आणि बारकावे यांचा विचार केला नाही, तर असा प्रयत्न सिएरा लिओनमधील युद्धोत्तर मानसिक आरोग्याच्या समस्या सोडवताना उभ्या राहणाऱ्या आव्हानांनी ग्रस्त असेल. देशातील सुमारे ९९ टक्के कर्मचारी मानसिक आरोग्याच्या समस्यांशी सामना करीत आहेत. देशातील अधिक प्रमाणात पगार असलेल्या उच्चशिक्षित अल्पसंख्य व्यक्ती आता कामाच्या ठिकाणी होणारा छळ, दुजाभाव, गाठता न येणारी उद्दिष्टे आणि कामाचा बोजा याविषयी जाहीरपणे बोलत आहेत; परंतु देशातील ९० टक्के कामगार वेतनासाठी परिश्रम करतात. त्यांच्यापैकी काहींचे वेतन तर कधीकधी प्रति महिना दहा हजारांपेक्षाही कमी असते, अशा व्यक्ती कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या मानसिक आरोग्याविषयक समस्यांविषयी चकार शब्दही काढू शकत नाहीत. गप्प बसणे ही त्यांची जगण्याची पद्धती असते.   

    देशातील अधिक प्रमाणात पगार असलेल्या उच्चशिक्षित अल्पसंख्य व्यक्ती आता कामाच्या ठिकाणी होणारा छळ, दुजाभाव, गाठता न येणारी उद्दिष्टे आणि कामाचा बोजा यांविषयी जाहीरपणे बोलत आहेत; परंतु देशातील ९० टक्के कामगार वेतनासाठी परिश्रम करतात. त्यांच्यापैकी काहींचे वेतन तर कधीकधी प्रति महिना दहा हजारांपेक्षाही कमी असते, अशा व्यक्ती कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या मानसिक आरोग्याविषयक समस्यांविषयी चकार शब्दही काढू शकत नाहीत. गप्प बसणे हे त्यांची जगण्याची पद्धती असते.

    उदाहरणार्थ, शेतीत श्रम करणाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची स्थिती कशी आहे? शेतीवर आलेले गंभीर संकट, शेतीचे घसरलेले उत्पन्न, शेतमजुरांच्या वेतनातील साचलेपण आणि कर्जाचे संकट यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये ११,२९० शेतकऱ्यांच्या आत्महत्या नोंदवण्यात आल्या. या यादीत सर्वांत जास्त आत्महत्या महाराष्ट्रात झालेल्या असून त्या पाठोपाठ कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचे नाव येते. यातील बहुतेक आत्महत्या या कर्जाच्या ताणामुळे झालेल्या आहेत; तसेच कर्ज फेडण्याच्या असमर्थतेमुळे निर्माण झालेल्या लज्जेशी संबंधित आहेत. विशेषतः ही कर्जे कुटुंबाने किंवा नातेवाइकांनी घेतलेली आहेत. अलीकडील काही वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. प्रामुख्याने आर्थिक अडचणींमुळे शेतमजुरांच्या मजुरीत सातत्याने घट होत आहे.

    अलीकडेच करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार, ९० टक्के गिग कर्मचाऱ्यांना (नोकरी न करता मागणीनुसार स्वतंत्रपणे काम करणारे) मानसिक आरोग्याच्या समस्यांशी सामना करावा लागतो. शिवाय सुमारे ९८.५ टक्के कॅबचालक तणाव, नैराश्य, अस्वस्थता आणि संताप यांसारख्या विकारांनी ग्रस्त आहेत. वस्तू-मालाची डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तींना गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये भेदभाव आणि अपमानास्पद वागणूक मिळते. त्यांना लिफ्ट वापरण्याची परवानगी दिली जात नाही किंवा ग्राहक बरेचदा त्यांच्यावर ओरडतात. शिवाय छोट्या छोट्या गोष्टींचे कारण सांगून त्यांना कमी रेटिंग देतात. घरकामगारांच्या मानसिक आरोग्याबद्दलही आपल्याला काय माहिती असते? त्यांचे शोषण केले जाते, अपमानास्पद वागणूक दिली जाते, त्यांना रजा दिल्या जात नाहीत, वेतन कमी दिले जाते आणि त्यावर कोणतेही नियंत्रणही नसते. संजीव पी. साहनी आणि मोहिता जुन्नरकर या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, देशातील घरकामगारांना सातत्याने नैराश्य, चिंता जाणवत असते. त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतात आणि ते आत्महत्येचे प्रयत्नही करतात. आणखी म्हणजे, घरकामगार म्हणून काम करताना कामगारांना बरेचदा संबंधित घरातील तरुण व्यक्तींकडून आदेश घ्यावे लागतात. अशा वेळी अपमान सहन करावा लागतो.      

    कामाच्या ठिकाणाशी संबंधित मानसिक आरोग्याची समस्या केवळ एखाद्या क्षेत्राशी, गटाशी किंवा लोकांशी संबंधित नाही, तर तो संपूर्ण समाजाचाच प्रश्न बनला आहे.  

    दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर कामाच्या ठिकाणाशी संबंधित मानसिक आरोग्याची समस्या केवळ एखाद्या क्षेत्राशी, गटाशी किंवा लोकांशी संबंधित नाही, तर तो संपूर्ण समाजाचाच प्रश्न बनला आहे. एक समाज म्हणून आपण आपल्या कामाचा विचार करणे गरजेचे आहे. म्हणजे कामामध्ये कशाचा समावेश होतो आणि काम कसे, कुठे आणि कोणत्या परिस्थितीत केले जाते याचा विचार आवश्यक आहे. अल्प वेतन, अनिश्चितता, अपमान, भेदभाव, बेरोजगारीचा ताण, नोकरीसाठी पद्धतशीर बदल करणे आणि मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणाशी संबंधित मानसिक आरोग्यावरील समस्येने आपल्यासमोर काही साधे प्रश्न उभे राहिले आहेत. चांगले काम मिळणे इतके अवघड का असते? खूप परिश्रमपूर्वक काम करूनही लोक गरीब का राहतात? कामामुळे प्रतिष्ठा का कमी होते? काम हे ओझे का होते? समाजसेवा, छंद आणि अगदी विरंगुळा यांसारख्या गोष्टींच्या तुलनेत कामाचे दीर्घ तास अभिमानास्पद का समजले जातात? थोडक्यात, कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्यासाठी कामाचा पुन्हा एकदा विचार करू या.


    मलांचा चक्रवर्ती या ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशनमध्ये वरिष्ठ फेलो आणि उपसंचालक (संशोधन) आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.