Author : Ramanath Jha

Expert Speak Terra Nova
Published on Aug 20, 2024 Updated 0 Hours ago

शहरांसाठीच्या हवामान कृती योजनांची महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करायची असतील तर शहरी भागातील पक्ष्यांच्या विविधतेचे संवर्धन करावे लागेल. 

भारतीय शहरे आणि त्यांचे पक्ष्यांशी असलेले सहजीवन

पक्ष्यांच्या किलबिलाटाने जागे होणे हा सर्वात आनंददायक अनुभव आहे. खिडकीत येणाऱ्या चिमुकल्या पक्ष्यांची किलबिल कानाला फार गोड वाटते. त्यामुळे आनंदही होतो. भारतात पक्षी हे शतकानुशतके आपल्या संस्कृतीचा, कलांचा आणि लोककथांचा भाग आहेत. शहरात अजूनही त्यांची संख्या मोठी आहे. फुलांचे परागीभवन, बिया विखुरणे, कचरा स्वच्छ करणे, तण कमी करणे आणि कीटक नियंत्रण करणे अशा अनेक कामांतून पक्षी शहरातल्या पर्यावरणामध्ये योगदान देत असतात. पक्ष्यांचे पंख, त्यांच्या पिसांची शोभा, रंग हे सगळंच आपल्याला मोहवून टाकतं. त्यामुळे शहरांमध्ये बागकामासोबतच पक्षीनिरीक्षण हा एक लोकप्रिय छंद आहे. खरंच पक्ष्य़ांमुळे आपले जीवन सुंदर झाले आहे.  

‘स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स’ या 2023 च्या अहवालात पक्ष्यांच्या प्रजाती कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. शहरीकरण, पर्यावरणाचा ऱ्हास, भौतिक पायाभूत सुविधांचा विस्तार आणि हवामान बदल ही पक्ष्यांच्या प्रजाती कमी होण्याची कारणे आहेत. यात मूल्यांकन केलेल्या 942 पक्ष्यांच्या प्रजातींपैकी 142 कमी होत आहेत आणि फक्त 28 वाढत चालल्या आहेत. माळढोक, पांढऱ्या पोटाचा हेरॉन, बंगाली तणमोर आणि फिनचे विणकर पक्षी या गंभीरपणे धोक्यात आलेल्या प्रजाती आहेत. दुसरीकडे मोर, कबूतर, कोकिळा आणि कावळे या प्रजातींची भरभराट आणि वाढ होत असल्याचे दिसून आले. पक्ष्यांच्या या सामान्य प्रजातींनी शहरी परिस्थितीशी कमालीचे जुळवून घेतले आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. 

‘स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स’ या 2023 च्या अहवालात पक्ष्यांच्या प्रजाती कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. शहरीकरण, पर्यावरणाचा ऱ्हास, भौतिक पायाभूत सुविधांचा विस्तार आणि हवामान बदल ही पक्ष्यांच्या प्रजाती कमी होण्याची कारणे आहेत.

पक्ष्यांची संख्या कमी होण्याच्या कारणांपैकी शहरीकरण हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे अहवालात म्हटले आहे. शहरी विस्तार आणि सततच्या बांधकामांमुळे नैसर्गिक अधिवासांचा अधिकाधिक ऱ्हास होतो आहे. याचा थेट परिणाम पक्ष्यांच्या विविधतेवर आणि संख्येवर होतो. झाडांचे कमी झालेले प्रमाण, वनस्पतींच्या विविधतेत होणारी घट याचा पक्ष्यांच्या संख्येवर विपरित परिणाम होतो. मांजर आणि कुत्र्यांसारखे पाळीव प्राणी भयाचे वातावरण तयार करतात. अनेक पक्षी शिकारीमुळे मारले जातात. शहरातले आवाजही पक्ष्यांसाठी त्रासदायक ठरतात. या आवाजांमुळे पक्ष्यांना आपला योग्य अधिवासही सोडावा लागतो.  

त्याचप्रमाणे पक्ष्यांना दिव्यांचा प्रकाशही विचलित करतो. काचेच्या इमारती पक्ष्यांसाठी धोकादायक बनल्या आहेत. त्यावर टक्कर होऊन पक्ष्यांचा मृत्यू होण्याचं प्रमाणही खूप आहे. सर्वाधिक शहरीकरण झालेल्या भागात पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या कमी आहे. शहरातल्या पक्ष्यांमध्ये आधी काही दुर्मीळ प्रजातीही होत्या. यात सर्वात कमी कीटकभक्षी प्रजातीही आहेत. पण शहरीकरणामुळे कबूतर, मैना, कावळे अशा पक्ष्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे इतर प्रजातींसाठी जागा उरलेली नाही. 

शहरीकरणाचा पक्ष्यांवर होणारा विपरीत परिणाम आणि त्यांचे शहरांसाठी असलेले महत्त्व पाहता शहरी वस्त्यांमध्ये पक्ष्यांचे जाणीवपूर्वक संवर्धन करणे आवश्यक आहे. पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी तीन सूत्रे आहेत. 1. पक्ष्यांसाठी धोका कमी करण्याचे उपाय 2. पक्ष्यांना अनुकूल अधिवासांची निर्मिती आणि तिसरे म्हणजे अशा परिसरांच्या निर्मितीमध्ये लोकांचा सहभाग.

शहरातल्या स्थानिक स्वराज्य संस्था पक्ष्यांच्या अधिवासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. झाडे आणि झुडुपे लावणे आणि शक्य असेल ते भाग हरित करण्याचे प्रयत्न करणे यावर लक्ष देता येते. पाणथळ अधिवासांसह नैसर्गिक अधिवासांचे रक्षण करणे, उद्याने विकसित करणे तसेच रस्त्याच्या कडेला स्थानिक झाडे आणि झुडुपे लावणे अशा मार्गांनी पक्ष्यांच्या विविधतेसाठी अधिवास वाढवता येतात. शहरातला कोलाहल, ध्वनी आणि प्रदूषणाच्या वातावरणात उंच झाडे पक्ष्यांसाठी योग्य जागा ठरतात. ही बाब महापालिकेच्या वृक्ष विभागाने लक्षात घ्यायला हवी.

शहरातले मोठे वृक्ष आणि लावलेली झाडे वन्यजीव संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा झाडांवर पक्ष्यांना घरटी बांधता येतात. हीच झाडे त्यांच्यासाठी अन्न स्रोत आहेत. झाडांच्या फांद्या आणि पानांमध्ये कीटक आणि छोट्या अळ्यादेखील असतात. त्याच्यावर अनेक पक्ष्यांचा उदरनिर्वाह चालतो. झाडांच्या फांद्या आणि पानांच्या दाटीमध्ये पक्ष्यांना भक्षकांपासून आपला बचाव करता येतो. तसेच प्रतिकूल हवामानात झाडांमध्ये आश्रयही घेता येतो. वेगवेगळ्या झाडांमुळे पक्ष्यांमध्येही विविधता येते. तसेच पक्ष्यांच्या स्थलांतरात अशी झाडे संचारमार्ग म्हणून मदत करतात. पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी आणि त्यांची पिल्ले वाढवण्यासाठी झाडाच्या फांद्यावर घरटी बांधायला आवडतात. त्यामुळे शहरांमध्ये झाडे लावण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी स्वयंसेवकांना एकत्रित करून सामुदायिक प्रयत्न होण्याची गरज आहे. यामध्ये नगरपालिका, महापालिका पुढाकार घेऊ शकतात.

हरित पायाभूत सुविधांच्या नियोजनाला चालना देतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांनी विकास प्रकल्पांमध्ये झाडे लावावी आणि हिरवीगार जागा तयार करावी. यामध्ये एकाच प्रकारचे वृक्षारोपण किंवा शोभेची झाडे टाळावी. स्थानिक जाती आणि विविध प्रजातींचे वृक्ष लावावे. ही झाडे फळं देणारी आणि फुलांची असली तर पक्ष्यांसाठी ती जास्त उपयोगी ठरतात. वड आणि पिंपळासारख्या मोठ्या झाडांनाही यामध्ये प्राधान्य दिले पाहिजे. उद्याने आणि पाणवठ्यांसह हिरव्यागार जागा निर्माण करणे वाढवणे अशा सोप्या पायऱ्या पक्ष्यांसाठी सुरक्षित अधिवास तयार करतात आणि विविध पक्ष्यांच्या प्रजातींना आकर्षित करतात. त्याचबरोबर यामुळे माणूस आणि निसर्ग यांच्यात सखोल संबंध निर्माण होऊ शकतो. 

याव्यतिरिक्त वनस्पति उद्याने, छतावरील बागा, शहरी जंगले आणि पाणवठ्यांभोवती असलेली वनस्पतींची दाटी याला जागतिक स्तरावर महत्त्व दिले गेले आहे. जिथे स्थानिक झाडांचे प्रमाण मोठे आहे अशा ठिकाणी कृत्रिम तलाव आणि उद्याने विकसित करणे टाळले पाहिजे. कारण त्यामुळे मूळ वनस्पतींच्या जागी हिरवळ आणि विदेशी वनस्पतींचे आक्रमण होऊ शकते.  त्यामुळेच अशा जागांवर लागवड केलेली वनस्पती स्थानिक असावी आणि त्यात जैवविविधता राखण्याचेही भान हवे. 

सर्वच हिरवळीच्या जागा समान नसतात. उदाहरणार्थ लहान आणि मॅनिक्युअर पार्कच्या तुलनेत मोठ्या आणि अधिक समृद्ध हिरव्या अधिवासात जास्त पक्षी राहतात. त्यांचे अन्नही विशिष्ट स्वरूपाचे असते आणि घरटे करण्यासाठी तशाच विशिष्ट जागा आवश्यक असतात. हिरव्यागार जागेत किंवा त्याच्या आजूबाजूला असलेले पाणी असेल तर पक्ष्यांची विविधता वाढते. मृत झालेल्या आणि कुजलेल्या झाडांचे सौंदर्यात्मक मूल्य कमी असू शकते पण अशी झाडे कीटक खाणाऱ्या पक्ष्यांना अळ्या आणि कीटकांचा पुरवठा करतात. अशी झाडे घुबड, पोपट, मैना, बार्बेट आणि सुतार पक्ष्यांसाठी आदर्श आहेत. या झाडांमध्ये ते आपल्या ढोल्या किंवा घरटी कोरून तयार करू शकतात. वठलेल्या झाडांमध्ये पक्षी आपल्या संरक्षणासाठी आसरा घेतात किंवा घरटेही बांधतात. 

सर्वच हिरवळीच्या जागा समान नसतात. उदाहरणार्थ लहान आणि मॅनिक्युअर पार्कच्या तुलनेत मोठ्या आणि अधिक समृद्ध हिरव्या अधिवासात जास्त पक्षी राहतात. त्यांचे अन्नही विशिष्ट स्वरूपाचे असते आणि घरटे करण्यासाठी त्यांना विशिष्ट जागा आवश्यक असतात.

शहरामध्ये इमारतींच्या दर्शनी भागावर काचा आणि काचेच्या खिडक्या असतील तर अशा रचना पक्ष्यांसाठी घातक ठरतात. यामध्ये झाडांचे किंवा आकाशाचे प्रतिबिंब पडल्याने पक्ष्यांचा गोंधळ होतो. अशा जागांतून आपण उड्डाण करून दुसरीकडे जाऊ शकतो, असे पक्ष्यांना वाटते. अशा इमारतींवर आदळल्याने अनेक पक्षी मृत्युमुखी पडतात. यामध्ये स्थलांतरित पक्ष्य़ांचे प्रमाण खूप आहे. हे पक्षी साधारणपणे रात्री उडत असतात. त्यामुळे इमारतींमधील काचेचा वापर कमी करणे किंवा काचांमध्ये प्रतिबिंब पडू नये अशी रचना केल्या, हे अपघात टाळता येतील. काचा लपवण्यासाठी शटर्स आणि शेड्स वापरल्या तर पक्षी खिडक्यांमधून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाकडे आकर्षित होणार नाहीत. 

सामुदायिक स्तरावर पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी चांगल्या जागा विकसित करणे सोपे आहे. पक्ष्यांच्या पाणी, अन्न आणि निवारा या गरजा पूर्ण केल्या तर पक्षी तिथे कायमचे वास्तव्य करतील. अन्न, पाणी आणि निवारा यांनी सुसज्ज अशा लहान जागा किंवा घराभोवती पक्ष्यांना अनुकूल अशा जागा हा पक्ष्यांना आकर्षित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. त्याचप्रमाणे पक्ष्यांचे नैसर्गिक अन्न असलेले लटकते बर्ड फीडर पक्ष्यांना त्वरीत आकर्षित करतात. सर्व पक्ष्यांना पिण्यासाठी, पिसे स्वच्छ करण्यासाठी आणि आंघोळीसाठी पाणी लागते. असे पाणी भरलेले खोलगट आकाराचे छोटे छोटे पाणवठे तयार केले तर त्यावर पक्ष्यांची झुंबड उडते. घराभोवती असलेली झाडे आणि भिंती किंवा खिडक्यांवर पक्ष्यांसाठी छोटी घरटी बसवली तरी पक्षी ती आपलीशी करतात. सिंगापूरमध्ये बऱ्याच दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती जतन करण्यासाठी हिरव्या छताचा आणि वनस्पतींनी नटलेल्या उंच इमारतींचा यशस्वीपणे वापर करण्यात आला आहे.

हरित नागरी विकास हा माणूस आणि पक्षी या दोघांसाठीही चांगला आहे आणि त्याचा पुरेपूर प्रचार केला पाहिजे. 2020 च्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, मुंबई महानगर प्रदेशातील 85 टक्के पक्ष्यांना वाढत्या काँक्रिटीकरणामुळे अत्यंत प्रतिकूल परिणामांचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता यासह भारतातील इतर महानगरांमध्येही नागरीकरणामुळे पक्ष्यांना विविधता धोक्यात आली आहे. स्थानिक परिसंस्था आणि पर्यावरणाचा विचार न करता झालेल्या शहरीकरणामुळे आपली शहरे त्यांची पक्षी विविधता गमावून बसतील आणि शहरांशी जुळवून घेणाऱ्या काही चतुर पक्ष्यांचेच वर्चस्व वाढेल. त्यामुळेच शहरांची रचना आणि हवामान कृती योजनांमध्ये पक्ष्यांच्या संवर्धनाचा विचार होणे गरजेचे आहे. शहरी भागातील पक्षी विविधतेचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यावर लक्ष केंद्रित केले तरच शहरांच्या पर्यावरणाचे संतुलन राखणे शक्य होईल.


रमानाथ झा हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे प्रतिष्ठित फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Ramanath Jha

Ramanath Jha

Dr. Ramanath Jha is Distinguished Fellow at Observer Research Foundation, Mumbai. He works on urbanisation — urban sustainability, urban governance and urban planning. Dr. Jha belongs ...

Read More +