Author : Shoba Suri

Published on Jan 31, 2024 Updated 0 Hours ago

जोमाने राबवीत असलेल्या लसीकरण कार्यक्रमांद्वारे लस-प्रतिबंधात्मक रोगांचे उच्चाटन करण्यात भारताने प्रशंसनीय प्रगती साध्य केली आहे.

लस-प्रतिबंधक रोगांचे निर्मूलन करण्याच्या दिशेने भारताचा विजयी प्रवास

भारताने लस-प्रतिबंधात्मक रोगांचे उच्चाटन करण्याच्या आपल्या ध्येयात लक्षणीय प्रगती केली आहे आणि निरोगी समुदाय निर्माण करण्याच्या दिशेने आशादायक मार्गावर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. सर्वसमावेशक आणि जोमाने राबवल्या जाणाऱ्या लसीकरण कार्यक्रमांद्वारे, टाळता येण्याजोग्या आजारांचे देशावरील ओझे कमी करण्यासाठी, आपल्या सर्व नागरिकांना सुलभ आणि न्याय्य आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. १९९० ते २०२० पर्यंत, भारतातील पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमधील मृत्युदर लक्षणीयरीत्या कमी झाला, जन्मलेल्या दर एक हजार अर्भकांमागील १२६ हा मृत्युदर कमी होऊन तो जन्मलेल्या एक हजार अर्भकांमागे ३२ झाला. शिवाय, १२-२३ महिने वयोगटातील मुलांमध्ये पूर्ण लसीकरणाची व्याप्ती २०१५-१६ मधील ६२ टक्क्यांवरून २०१९-२० मध्ये ७६ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. महत्त्वपूर्ण यशामध्ये भारतातील पोलिओचे यशस्वी निर्मूलन हा २०१४ मध्ये भारताने गाठलेला एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो जागतिक आरोग्य उद्दिष्टांप्रति देशाच्या वचनबद्धतेचे उदाहरण ठरावे.

अडथळ्यांवर मात करण्यात आणि देशव्यापी पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात- सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्था आणि आंतरराष्ट्रीय भागीदार यांच्या सहयोगी प्रयत्नांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

लसीकरण मोहिमेचे नियमित आरोग्य सेवांमध्ये एकत्रीकरण आणि लस वितरण यंत्रणेतील नवकल्पनांमुळे विविध प्रकारच्या लोकसंख्येत लसीकरण वाढण्यास हातभार लागला आहे.

याशिवाय, भारताने गोवर, रुबेला, क्षयरोग आणि हेप्पेटायटीस बी यांच्याशी लढा देण्याकरता सातत्यपूर्ण लसीकरण उपक्रम राबवण्यात आणि रोगाच्या प्रादुर्भावावर सतत देखरेख ठेवण्यात प्रशंसनीय प्रगती दर्शवली आहे. लसीकरण मोहिमेचे नियमित आरोग्य सेवांमधील एकत्रीकरण आणि लस वितरण यंत्रणेतील नवकल्पना यांमुळे विविध प्रकारच्या लोकसंख्येत लसीकरण वाढण्यास हातभार लागला आहे.

मात्र, आव्हाने कायम आहेत, विशेषतः जिथे आरोग्यसेवा उपलब्धता मर्यादित आहे, अशा दुर्गम आणि उपेक्षित समुदायांपर्यंत लसीकरण पोहोचविण्यात आव्हाने आहेत. सामाजिक-आर्थिक असमानता आणि सांस्कृतिक श्रद्धा या बाबीही कधीकधी लसीकरण स्वीकारण्यात अडथळे आणतात, लसीकरणाबाबत विश्वासार्हता वाढवण्याकरता आणि लसीकरणाबाबतची चुकीची माहिती दूर करण्यासाठी लक्ष्यित संवादविषयक धोरण असणे आणि समुदायासोबत काम करणे आवश्यक असते. भारताच्या आगामी वाटचालीकडे पाहता, लस-प्रतिबंधित रोग निर्मूलनाकरता भारताची वचनबद्धता कायम आहे.

२०१४ मध्ये भारतात प्रारंभ झाल्यापासून, “इंटेन्सिफाइड मिशन इंद्रधनुष” (आयएमआय) लसीकरण मोहिमेने देशभरात लक्षणीय लसीकरण शक्य केले आहे. उच्च-जोखीम आणि कमी-लसीकरण क्षेत्रे ओळखणे ही या मोहिमेतील मुख्य कामगिरी होती. या विशिष्ट क्षेत्रांना लक्ष्य करून, सर्वात असुरक्षित समुदायांपर्यंत पोहोचण्याकरता आरोग्य अधिकारी त्यांचे प्रयत्न आणि संसाधने या क्षेत्रांवर केंद्रित करू शकतात. ‘आयएमआय’च्या बहुआयामी दृष्टिकोनात आरोग्यविषयक पायाभूत सुविधा बळकट करणे, जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात सुधारणा करणे, नियमित लसीकरण मोहिमेचे आयोजन करणे आणि समुदाय प्रतिबद्धता वाढवणे या बाबी समाविष्ट आहेत. दुर्गम आणि उपेक्षित समुदायांपर्यंत पोहोचण्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी, या मोहिमेने या भागात लस वितरीत करण्याकरता फिरती लसीकरण पथके तसेच सामुदायिक आरोग्य कर्मचाऱ्यांचा वापर यांसारख्या नाविन्यपूर्ण धोरणांचा वापर केला. लसीकरण जास्तीत जास्त होण्यासाठी आणि लसीकरण चुकवणे कमी करण्यासाठी लसीकरणाच्या फेऱ्या नियमित अंतराने आयोजित केल्या जातात.

‘आयएमआय’च्या बहुआयामी दृष्टिकोनात आरोग्यविषयक पायाभूत सुविधा बळकट करणे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात सुधारणा करणे, नियमित लसीकरण मोहिमेचे आयोजन करणे आणि समुदाय प्रतिबद्धता वाढवणे या बाबी समाविष्ट आहेत.

‘आयएमआय’ सामाजिक आणि पारंपरिक माध्यमे तसेच सामुदायिक सभांसह संवादाच्या विविध माध्यमांद्वारे, समुदाय एकत्रीकरणावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यांच्या मुलांचे लसीकरण करण्याकरता कुटुंबांना प्रेरित करण्यात स्थानिक समुदाय महत्त्वाची भूमिका बजावतात. नेते, स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवक हे मोहिमेचा प्रचार करण्यात आणि लोकांना सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्याकरता सक्रिय सहभागी असतात. काही भागांत, लसीकरण मोहीम घरोघरी जाऊन राबविण्यात येते, जेणे करून कोणतेही बालक लसीकरणाविना राहू नये. मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते (आशा), सहाय्यक परिचारिका-दाया (एएनएम्स) यांसारखे आघाडीवर असलेले आरोग्यसेवा कर्मचारी, लस समुदायापर्यंत पोहोचणे सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

कोरोना विषाणूच्या व्यापक परिणामांमुळे या साथीचा सामना करण्यासाठी जलद आणि यशस्वी लसीकरण उपक्रम आवश्यक होते. भारत हे लसीकरणाद्वारे प्रतिसाद देणाऱ्या पहिल्या काही राष्ट्रांपैकी एक होते आणि भारताने लसीकरण यशस्वीपणे राबवले. या लसीकरण कार्यक्रमाने लोकांचे केवळ कोविड-१९ पासून संरक्षण केले असे नाही, तर लसीकरणाबाबत लोकांचे मत आणि दृष्टिकोनही लक्षणीयरीत्या सुधारला. लसीकरण मोहिमेमुळे जनतेत लसीकरणाचे फायदे आणि संसर्गजन्य आजार टाळण्याच्या त्यांच्या कार्याबद्दल अधिकाधिक जागरूकता निर्माण झाली. कोविड-१९ लसीकरण मोहीम यशस्वी झाली, ज्यामुळे विशेषत: जोखीम असलेल्या गटांमध्ये, आणि पोलिओ, गोवर आणि हिपॅटायटीस बी यांसारख्या काही लस-प्रतिबंधात्मक रोगांचे निर्मूलन करण्यासाठी लसीकरणाची व्याप्ती वाढली आहे. लसीकरणावर नव्याने लक्ष केंद्रित करून गोवर आणि रुबेला (एमआर) यांसारख्या लस-प्रतिबंधात्मक रोगांविरोधात लढण्याकरता भारत आता आपले प्रयत्न बळकट करण्याच्या स्थितीत आहे.

लसीकरण मोहिमेमुळे जनतेत लसीकरणाचे फायदे आणि संसर्गजन्य आजार टाळण्यामधील लशीच्या उपयुक्ततेविषयी अधिकाधिक जागरूकता निर्माण झाली.

लशींच्या लाभांबाबत वाढलेल्या जागरूकतेमुळे लोकांमध्ये लसीकरणासंबंधी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे. गैरसमज दूर करून आणि लसीविषयी संकोच दूर करून, भारताने लसीकरण मोहिमांमध्ये स्वीकृती आणि सहभाग वाढवला आहे. शिवाय, लसीची सुलभता आणि वितरण यंत्रणा सुधारण्याकरता राष्ट्राचे समर्पण हे दुर्गम आणि सेवा नसलेल्या समुदायांपर्यंत पोहोचण्याकरता महत्त्वपूर्ण ठरले आहे. ही सर्वसमावेशकता हे सुनिश्चित करते की, कोणतेही मूल लसीकरणापासून वंचित राहणार नाही आणि ती ‘एमआर’सारख्या आजारांना दूर करण्याचा भारताचा संकल्प बळकट करते.

लसीकरणापासून वंचित राहिलेल्यांकरता एक लसीकरण कार्यक्रम, आयएमआय ५.० गर्भवती महिला आणि पाच वर्षांखालील मुलांकरता राबविण्यात येत आहे, जे एकतर सामान्य लसीकरण कार्यक्रमातून वगळले गेले होते किंवा ज्यांचे लसीकरण थांबले होते. २०२३ च्या ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये, ‘गोवर रुबेला निर्मूलन’ लक्ष्यावर विशेष भर देऊन, देशातील सर्व जिल्ह्यांत तीन आयएमआय ५.० फेऱ्या घेण्यात आल्या. गोवर आणि रुबेला निर्मूलनाची सविस्तर योजना सर्व जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे, ज्यामध्ये उच्च जोखीम असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे आणि नियमित लसीकरणाच्या प्रयत्नांना गती देण्यात आली आहे. ही गती कायम ठेवून आणि साथीच्या काळात मिळालेल्या यशाच्या आधारे, भारत लस-प्रतिबंधित रोगांचे निर्मूलन करण्याच्या आपल्या ध्येयात उल्लेखनीय टप्पे गाठण्यासाठी सज्ज आहे. लस जागरूकता वाढवण्याच्या आणि असुरक्षित लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दिशेने करण्यात येणाऱ्या एकत्रित प्रयत्नांमुळे भविष्याची आशा निर्माण होते, जिथे ‘एमआर’सह प्रतिबंध करण्यायोग्य रोगांचे ओझे ही भूतकाळातील गोष्ट बनते. सरकारी संस्था, आरोग्यसेवा कर्मचारी, समुदाय नेते आणि नागरी समाज संस्था यांची एकत्रित वकिली आणि लसीकरण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याकरता आयोजित उपक्रमांमुळे लशींबद्दल अचूक माहिती प्रभावीपणे प्रसारित केली गेली आहे, लसीकरण कार्यक्रमांकरता एक उत्तम माहितीचे आणि सहाय्यकारी वातावरण तयार करण्यात आले आहे.

शोबा सुरी या ‘ऑब्झर्व्हर रीसर्च फाऊंडेशन’च्या वरिष्ठ फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.