Image Source: Getty
कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्सपासून ते इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत आणि अक्षय ऊर्जा प्रणालीपासून ते संरक्षण प्रणाली पर्यंत, या सर्व क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने सेमीकंडक्टर्सचा वापर करण्यात येतो. दशकभरातील वाटचालीतून झालेल्या वाढीचा परिणाम म्हणून हे क्षेत्र २०३० पर्यंत एक ट्रिलीयन डॉलरचा टप्पा गाठण्यास सज्ज आहे. यातील सुमारे ७० टक्के वाढ ही ऑटोमोटिव्ह, कंप्युटींग व डेटा स्टोरेज आणि वायरलेस या तीन प्रमुख उद्योगांमुळे अपेक्षित आहे. ऑटॉनॉमस ड्रायव्हिंग आणि ई-मोबिलिटी मधील प्रगतीमुळे मागणीमध्ये तिप्पट वाढ होणे अपेक्षित आहे. या वाढीसह ऑटोमोटिव्ह क्षेत्राची सर्वात जलद वाढ होण्याची शक्यता आहे.
दशकभरातील वाटचालीतून झालेल्या वाढीचा परिणाम म्हणून हे क्षेत्र २०३० पर्यंत एक ट्रिलीयन डॉलरचा टप्पा गाठण्यास सज्ज आहे.
सध्या, युनायटेड स्टेट्स (यूएस), युरोपियन युनियन (ईयू), आणि चीन, तैवान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या पूर्व आशियाई राष्ट्रांचे या उद्योगावर वर्चस्व आहे. जगातील एक तृतीयांश खनिजांचा साठा असलेली आफ्रिका कोबाल्ट, तांबे, ग्रेफाइट, सिलिकॉन आणि टँटलम सारख्या सामग्रीचा पुरवठा करते. ही खनिजे सेमीकंडक्टर उत्पादनासाठी आवश्यक आहेत. असे असले तरी, आफ्रिकेचा सहभाग मूलत: उत्खननापुरताच मर्यादित आहे. जागतिक बाजारपेठेतील आफ्रिकेचा हिस्सा १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. विपुल खनिज संसाधने, वाढत्या अर्थव्यवस्था आणि तरुण लोकसंख्येसह, आफ्रिकेमध्ये अधिक एकात्मिक आणि लवचिक सेमीकंडक्टर उद्योग विकसित करण्याची महत्त्वपूर्ण क्षमता आहे.
मूल्य साखळीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील आफ्रिकेचे योगदान
उत्खनन, डिझाइन व उत्पादन आणि असेंब्ली, टेस्टिंग आणि पॅकेजिंग (एटीपी) या संबंधीची आव्हाने आणि संधींसह सेमीकंडक्टर व्हॅल्यू चेन मोठ्या प्रमाणावर तीन टप्प्यांमध्ये विभागली गेली आहे. आफ्रिकन खंडामध्ये प्रगत डिझाईन लॅब आणि फॅब्रिकेशन प्लांट उपलब्ध नसल्यामुळे सेमीकंडक्टर उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञान आणि प्रक्रियांमधील त्याचा प्रवेश मर्यादित आहे. परिणामी, उत्खननाच्या टप्प्यानंतर त्याचे योगदान लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. अशाप्रकारे, त्यानंतरच्या डिझाइन आणि उत्पादनाच्या टप्प्यात आफ्रिकेचे योगदान फारच कमी आहे. त्याचप्रमाणे, अपुरे संशोधन आणि विकास (रिसर्च अँड डेव्हलपमेंट – आर अँड डी), कमी गुंतवणूक आणि कौशल्यांमधील अंतर यामुळे आफ्रिका एटीपीच्या टप्प्यात मागे पडली आहे.
मूल्य साखळीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील आफ्रिकेची क्षमता:
खनन:
मोठे खनिज साठे आणि व्यापक खाणकामांमुळे या टप्प्यावर आफ्रिकेचे स्थान महत्त्वाचे आहे. असे असले तरी, यात सुधारणा करता येऊ शकते. सुधारणेसाठी महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे –
1) मौल्यवान कच्च्या मालाच्या प्रवाहाचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी निर्यात नियंत्रणे लावणे - उदाहरणार्थ, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी) ने कोबाल्टला “स्ट्रॅटेजिक मिनरल” म्हणून घोषित केले आहे, ज्यामुळे सरकार त्याच्या उत्खनन आणि निर्यातीवर कठोर नियम लागू करू शकते.
2) कायदेशीर फ्रेमवर्क मजबूत करणे - उदाहरणार्थ, १९९९ च्या बोत्सवानाच्या खाणी आणि खनिज कायद्यानुसार, हिऱ्यांची कच्च्या स्वरूपात निर्यात करण्याऐवजी त्यांची कटिंग आणि पॉलिशिंग स्थानिक पातळीवर करणे आवश्यक आहे.
3) खनिज करार आणि लीजमध्ये अधिक जबाबदारीची खात्री करण्यासाठी कराराची पारदर्शकता वाढवणे- एक्सट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीज ट्रान्सपरन्सी इनिशिएटिव्ह (ईआयटीआय) हे या संदर्भात एक उत्कृष्ट उदाहरण आहे. पश्चिम आफ्रिकेत, लाइबेरिया हा २००९ मध्ये ईआयटीआयचे पूर्णपणे पालन करणारा पहिला आफ्रिकन देश बनला आहे. याद्वारे सर्व खाण करार आणि नैसर्गिक संसाधनांच्या उत्खननापासून मिळणारा महसूल प्रकाशित करण्यासाठीची वचनबद्धता पाळण्यात आली आहे. यामुळे सरकार आणि परदेशी कंपन्यांमधील सौद्यांची कडक छाननी करणे सुलभ झाले आहे. त्याचप्रमाणे, घानाने ईआयटीआय मानकांशी बांधिलकीचा भाग म्हणून २०१६ पासून सर्व खाण करारांचे तपशील सार्वजनिकरीत्या उपलब्ध करून दिले आहेत.
4) न्याय्य भरपाईसाठी पाठपुरावा करणे- गिनीतील सिमांडौ लोहखनिज प्रकल्पामध्ये याचा प्रत्यय आला आहे. २०२० मध्ये, गिनीने उच्च रॉयल्टी आणि रेल्वे आणि बंदरे इ. स्थानिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अधिक अनुकूल अटी सुरक्षित करण्यासाठी परदेशी खाण कंपन्यांशी पुन्हा करार केला आहे.
5) कच्च्या मालाचा काही भाग स्वदेशी बनावटीच्या सेमीकंडक्टर उत्पादनासाठी वाटप करणे - युरेनियमसारख्या धोरणात्मक खनिजांबाबत, निर्यातीपूर्वी स्थानिक मूल्यवर्धन आणि प्रक्रियेला प्राधान्य देणारे ‘खनिज धोरण’ नामिबियाने स्वीकारले आहे.
डिझाइन आणि उत्पादन टप्पा –
या टप्प्यावर, स्थानिक आफ्रिकन सरकारांनी ऊर्जा आणि तंत्रज्ञान गुंतवणुकीशी संबंधित पायाभूत सुविधा आणि धोरणे वाढवणे आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिकेने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेत (काऊंसिल फॉर साइंटिफीक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च - सीएसआयआर) मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी सेंटरची स्थापना करणे यासारखे काही छोटे परंतु आशादायक उपक्रम हाती घेतले आहेत. भारताच्या संरक्षण उद्योगातील ऑफसेट क्लॉज नुसार परदेशी कंपन्यांना त्यांच्या नफ्यातील काही भाग स्थानिक उद्योगात पुन्हा गुंतवावा लागतो. अशाप्रकारचे कलम आफ्रिकन कच्चा माल पुरवठादारही लावू शकतात. या कलमाद्वारे आफ्रिकेतून कच्चा माल खरेदी करणाऱ्यांवर कराराद्वारे बंधन घालता येऊ शकते. तसेच, आफ्रिकन सेमीकंडक्टर उद्योगाच्या स्वदेशी क्षमता निर्माण करण्यासाठी त्यांच्या नफ्यातील काही टक्के गुंतवणूक करणे त्याच्यावर बंधनकारक करता येऊ शकते.
एटीपी टप्पा–
सेमीकंडक्टर व्हॅल्यू चेन जसजशी पुढे जात आहे तसतसे विशेष कौशल्याची मागणी वाढत आहे. हे अंतर कमी करण्यासाठी, आफ्रिकेला आर अँड डीमध्ये अधिक गुंतवणूक करावी लागणार आहे. तसेच उद्योगाच्या गरजांनुसार शिक्षण संरेखित करावे लागणार आहे व स्थानिक मूल्य शृंखला मजबूत करण्यासाठी अधिक स्टेम पदवीधर तयार करावे लागणार आहेत. आफ्रिकेतील सिलिकॉन सवाना म्हणून प्रसिद्ध असलेले केनियाचे कोन्झा टेक्नोपोलिस आणि रवांडाचे किगाली इनोव्हेशन स्मार्ट सिटी प्रकल्प यांसारखे उपक्रम कुशल आफ्रिकन नोकरी शोधणाऱ्यांना पूर्व आशिया किंवा अमेरिकेत स्थलांतरित होण्याऐवजी स्थानिक संधी शोधण्यासाठी आशादायक व्यासपीठ देऊ शकतील. उदाहरणार्थ, कोन्झा टेक्नोपोलिसने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला चालना देण्यासाठी २०२३ मध्ये दक्षिण कोरियाच्या कंपन्यांसोबत १.४ दशलक्ष डॉलरचा करार केला आहे.
आफ्रिकन राष्ट्रांनीही या वाढीला पाठिंबा देण्यासाठी कायदे करणे जरूरीचे आहे. दक्षिण आफ्रिकेचा इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन्स कायदा आणि नायजेरियाचा राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान विकास एजन्सी कायदा माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी) क्षेत्राच्या विकासासाठी व्यावहारिक आणि प्रभावी फ्रेमवर्क प्रदान करत आहे.
पुढे, आफ्रिकेने त्याच्या स्टेम डायस्पोराचा फायदा घेणे गरजेचे आहे. ३० दशलक्षाहून अधिक आफ्रिकन डायस्पोरा जगाच्या वेगवेगळ्या भागात राहतात, जे त्यांच्या यजमान देशांच्या वैज्ञानिक विकासासाठी काम करतात.
पुढे, आफ्रिकेने त्याच्या स्टेम डायस्पोराचा फायदा घेणे गरजेचे आहे. ३० दशलक्षाहून अधिक आफ्रिकन डायस्पोरा जगाच्या वेगवेगळ्या भागात राहतात, जे त्यांच्या यजमान देशांच्या वैज्ञानिक विकासासाठी काम करतात. आपल्या देशांच्या विकासासाठी योगदान देण्यास उत्सुक असणाऱ्या डायस्पोरापासून आफ्रिकेने फायदे मिळवून देणारी धोरणे आखली पाहिजेत. भारताने आखलेल्या वैश्विक भारतीय वैज्ञानिक (वैभव) फेलोशिप कार्यक्रमामुळे भारताला महत्त्वपूर्ण परिणाम दिसून आले आहेत. आफ्रिकेने अशा कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी भारताकडून प्रेरणा घेणे आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय भागीदारी
आफ्रिकेला सेमीकंडक्टर मूल्य साखळीतील विविध देश आणि संस्थांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय भागीदारीचा फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ, पूर्व आफ्रिकेतील सेमीकंडक्टर उत्पादनाला चालना देण्यासाठी यूएस ट्रेड अँड डेव्हलपमेंट एजन्सी (यूएसटीडीए) आणि सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीज लिमिटेड (एसटीएल) केनिया यांच्यातील व्यवहार्यता तपासण्यासाठीचा करार हा या खंडासाठी एक मॉडेल म्हणून काम करू शकतो. कोविड-१९ साथीच्या आजाराप्रमाणे भविष्यातील पुरवठा साखळीतील व्यत्यय टाळण्यासाठी पूर्व आफ्रिकेत अधिक उत्पादन केंद्रे स्थापन करण्याचे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे. परंतू, मूल्य साखळीच्या विविध स्तरावरील देशांमधील भविष्यातील सौद्यांसाठी हे ब्लूप्रिंट म्हणून काम करेल की नाही हे निश्चित करणे आजच्या घडीला शक्य नाही.
पुढील वाटचाल
जागतिक सेमीकंडक्टर मूल्य शृंखला अत्यंत गुंतागुंतीची, धोरणात्मक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. सध्याची आव्हाने असूनही, कच्चा माल काढण्यापासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञान उत्पादनापर्यंतच्या क्षमतेचे आफ्रिकेचे अद्वितीय संयोजन हे सर्वसमावेशक सेमीकंडक्टर इकोसिस्टमच्या दिशेने महत्त्वपूर्ण जागतिक सहकार्याची संधी सादर करत आहे. शिक्षण, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानामध्ये भरीव गुंतवणुकीसह, नवकल्पना आणि उत्पादन उत्कृष्टतेचे केंद्र बनण्याची क्षमता आफ्रिकेमध्ये आहे. प्रस्थापित बाजारपेठेमध्ये खर्च वाढत असताना, आफ्रिकेची स्पर्धात्मक किंमत आणि अप्रयुक्त नवकल्पना क्षमता ही एक आशादायक बाब आहे.
आफ्रिकेला सेमीकंडक्टर मूल्य साखळीतील विविध देश आणि संस्थांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय भागीदारीचा फायदा होऊ शकतो.
सेमीकंडक्टर इनोव्हेशन आणि मॅन्युफॅक्चरिंगचे केंद्र बनण्यासाठी आफ्रिकेने महत्त्वाच्या खनिजांचा केवळ पुरवठादार होण्यापलीकडे जाऊन विचार करणे आवश्यक आहे. यासोबत, प्रगत अर्थव्यवस्था आणि ग्लोबल साउथमधील इतर देशांशी भागीदारी करणेही आवश्यक आहे. उदाहरणार्थ, यूएस चीप्स आणि सायन्स कायदा हा आफ्रिकेमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्याची एक मौल्यवान संधी सादर करत आहे. त्याचप्रमाणे, जगातील सर्वात मोठ्या सेमीकंडक्टर डिझाइन हबपैकी एक म्हणून अग्रगण्य भूमिकेसह, डिझाईन टप्प्यात महत्त्वपूर्ण समर्थन प्रदान करण्याची क्षमता भारतामध्ये आहे.
२००० मध्ये, इकॉनॉमिस्ट मासिकाने आफ्रिकेला 'डार्क कॉंटिनंट (काळे खंड)' म्हटले होते. १० वर्षांच्या आत, आफ्रिकेची ओळख 'आफ्रिका रायझिंग' अशी झाली आहे. आफ्रिकेच्या प्रगतीमुळे सेमीकंडक्टर डिझाइन आणि चाचणीचे "सिलिकॉन सवाना" मध्ये रूपांतरित होण्याची क्षमता आहे. यासाठी सेमीकंडक्टर उद्योगातील एक महत्त्वपूर्ण व निर्णायक घटक म्हणून त्याचे स्थान मजबूत करण्यासाठी शाश्वत आणि सक्रिय धोरणात्मक प्रयत्नांची आवश्यकता आहे. सरते शेवटी, आफ्रिकेची सेमीकंडक्टर क्षेत्रामधील महत्वाकांक्षा आफ्रिकन नेते दीर्घकालीन दृष्टीकोन, धोरणात्मक गुंतवणुकीला प्राधान्य देऊन आणि स्थानिक धोरणे आंतरराष्ट्रीय उद्दिष्टे आणि गुंतवणुकीसह संरेखित करून कशाप्रकारे करतात यावर अवलंबून असणार आहे.
समीर भट्टाचार्य हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे असोसिएट फेलो आहेत
युवराज सिंग हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये रिसर्च इंटर्न आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.