Published on Sep 28, 2023 Commentaries 0 Hours ago

युक्रेन युद्धात पाश्चात्य देशांचा राग ओढवून न घेता रशियाशी मैत्री करण्याची कसरत चीनकडून सुरू आहे.

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर झाली शी-पुतिन भेट

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी २० ते २२ मार्च दरम्यान केलेल्या रशिया दौऱ्याबद्दल बरेच काही लिहिले-बोलले गेले आहे. चीनच्या सर्वोच्च नेत्याचा हा दौरा जागतिक स्तरावर एक नवी जागतिक व्यवस्था या दृष्टीने पाहिला गेला; तसेच चीनसमोर दुय्यम किंवा कनिष्ठ भागीदाराची भूमिका स्वीकारण्याची रशियाची तयारी असल्याचेही या दौऱ्यातून स्पष्ट झाल्याचे बोलले गेले. रशिया आणि चीनच्या हितसंबंधांतून आलेल्या सहकार्याबद्दल भारताच्या धोरणकर्त्यांनीही चिंता व्यक्त केली आहे. यामुळे ‘भारताचा धोरणात्मक अवकाश सातत्याने आक्रसला जात आहे,’ अशी भावना धोरणकर्त्यांकडून व्यक्त झाली. मात्र भारत आणि त्या पलीकडील धोरणात्मक समुदायाकडून तुलनेने दुर्लक्षित राहिलेली एक गोष्ट आहे. ती म्हणजे, रशिया व युक्रेनमधील संघर्षामुळे चीनमध्ये सुरू असलेली देशांतर्गत चर्चा, विशेषतः त्यामुळे निर्माण झालेली गुंतागुंतीची द्विधा अवस्था, अंतर्गत विरोधाभास व सूक्ष्म बारकावे आणि अलीकडील शी जिनपिंग-पुतिन यांच्या बैठकीवर त्याचा झालेला परिणाम.

चीन-रशिया : आघाडी पण आघाडीही नाही

एकीकडे ‘नव्या युगासाठी रशियाशी समन्वयाची व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याचा’ निर्धार चीनने जाहीररीत्या व्यक्त केला आहे. उभयतांनी काढलेल्या संयुक्त निवेदनात ‘सार्वभौमत्व, प्रादेशिक एकात्मता, सुरक्षा आणि विकास या मुद्द्यांवर आपापल्या प्रमुख हिताच्या घटकांचे रक्षण करण्यासाठी एकमेकांना खंबीर पाठिंबा देण्यासाठी’ दोन्ही देशांमध्ये एकमत असल्याचे अधोरेखित केले आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनीही अधिकृतपणे चीन व रशिया यांचे शेजारसख्य, मैत्री आणि सहकार्य याबद्दल मुक्त कंठाने प्रशंसा केली, शी जिनपिंग व पुतिन यांच्या वैयक्तिक मैत्रीबद्दलही अभिमान व्यक्त केला आणि या मैत्रीमुळे चीनच्या प्रस्तावित नव्या पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर, नव्या पद्धतीच्या प्रमुख देशांमधील संबंधांमध्ये ‘प्रगाढ परस्परविश्वास, सर्वाधिक धोरणात्मक समन्वय आणि उच्च धोरणात्मक मूल्य’ यांचा अंतर्भाव होऊन या संबंधांमध्ये कसे स्थित्यंतर झाले आहे, याकडेही लक्ष वेधले आहे.

चीनच्या सरकारी माध्यमांनीही अधिकृतपणे चीन व रशिया यांचे शेजारसख्य, मैत्री आणि सहकार्य याबद्दल मुक्त कंठाने प्रशंसा केली, शी जिनपिंग व पुतिन यांच्या वैयक्तिक मैत्रीबद्दलही अभिमान व्यक्त केला.

मात्र दुसरीकडे चीनच्या धोरणात्मक समुदायाने जागतिक स्तरावर ‘रशिया व चीनचे गुळपीठ’ जमल्याच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली. भू-राजकीयदृष्ट्या चीन व रशिया यांचे संबंध हे ‘नैसर्गिकरीत्या परिपूर्ण’ मानले जात आहेत आणि त्यांचा अधिक गहिरा होणारा धोरणात्मक समन्वय हा ‘वस्तुतः लष्करी-राजकीय आघाडी’ समजला जात आहे. रशियाशी संबंध प्रस्थापित करणे किंवा युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल रशियाला दोषी मानणे आणि चीन-रशिया ‘दुष्ट शक्तींचा मिलाफ’ किंवा ‘निरंकुश सत्तांची आघाडी’ असे संबोधून बहिष्कार घातला आहे. असे दिसते, की ‘चीन-रशिया मर्यादांच्या चौकटीबाहेरील मैत्री’ असे संबोधणे बंद करून ते म्हणतात तशी, पाश्चात्यांची ‘निंदा अथवा बदनामी मोहीम’ सुरू केली आहे. चीनमधील काही अभ्यासकांनी तर युक्रेनच्या संघर्षास चीन व रशिया दरम्यानच्या संबंधातील वृद्धीपासून वेगळे करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. नवी चीन-रशिया आघाडी ही शीत युद्धाच्या काळातील लष्करी व राजकीय आघाडी नसून त्याचे स्वरूप ‘अलिप्ततावादी, संघर्षरहित आणि अन्य देशाला लक्ष्य करणारे नाही,’ असे उभय देशांनी अलीकडेच सह्या केलेल्या संयुक्त निवेदनात स्पष्ट करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे.

युद्ध लांबवा किंवा शांतता प्रस्थापित करा

शी जिनपिंग यांच्या रशिया दौऱ्यामुळे चीन व अमेरिका यांच्यात कोणाला युद्ध लांबवायचे आहे आणि कोणाला शांतता प्रस्थापित करायची आहे, याबद्दलचा दोषारोपाचा खेळ सुरू झाला आहे. चीन सरकारने शी जिनपिंग यांच्या दौऱ्याला ‘शांततेसाठी दौरा’ असे संबोधले असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘रशियाच्या संरक्षण दलांनी ताब्यात घेतलेला प्रदेश गिळंकृत करून’ चीन व रशियाच्या युक्रेनसाठीच्या शांतता योजनेबद्दल ‘जगाला फसवता येणार नाही,’ असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी दिला आहे. त्या उलट चीनच्या अध्यक्षांनी कोणाचीही बाजू घेतलेली नाही अथवा एकाला दुसऱ्याशी लढण्यासाठी लष्करी मदत दिलेली नाही किंवा चिथावलेलेही नाही, असे सांगत उभयतांमधील तणाव दूर करण्याचा, शांततेसाठी संवादाचा पुरस्कार करण्याचा आणि अलीकडेच सौदी अरेबिया व इराणमध्ये झालेल्या संघर्षात चीनने निभावलेल्या भूमिकेसारखा रशिया-युक्रेन संघर्षावर राजकीय तोडगा काढण्याचा चीनचा हेतू आहे, असा दावा चीनने केला आहे. दरम्यान, अमेरिकेवर युद्ध लांबवल्याचा, संघर्षाची आग भडकाविण्याचा आणि स्वार्थासाठी परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा गुप्त हेतू असल्याचा आरोपही चीनने केला आहे. हा संघर्ष संवाद आणि वाटाघाटींच्या माध्यमातून सोडवण्यासाठी चीनकडून सक्रिय प्रयत्न होत असून अमेरिका मात्र युद्धासाठी प्राणघातक शस्त्रास्त्रांची रसद पुरवत आहे, तणाव वाढवत आहे आणि संघर्ष अजून कसा लांबेल यासाठी प्रयत्न करीत आहे, असा आरोपही चीनने केला आहे.

शांततेसाठी संवादाचा पुरस्कार करण्याचा आणि अलीकडेच सौदी अरेबिया व इराणमध्ये झालेल्या संघर्षात चीनने निभावलेल्या भूमिकेसारखा रशिया-युक्रेन संघर्षावर राजकीय तोडगा काढण्याचा चीनचा हेतू आहे, असा दावा चीनने केला आहे.

मात्र अमेरिकेसमवेत जाहीरपणे शब्दयुद्ध सुरू असतानाच दीर्घ काळ सुरू असलेल्या रशिया व युक्रेन युद्धाबद्दल चीनमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दीर्घ काळ लांबलेल्या युद्धासाठी अमेरिकेसह पाश्चात्य देश तयार आहेत का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. युरोप व अमेरिकेतील आर्थिक परिस्थिती, उर्जा पुरवठा आणि मागणीतील बदल, अमेरिकेतील पक्षा-पक्षांमधील वाद, चीनचा मुद्दा आदी घटकांचा लांबलेल्या युक्रेन युद्धामध्ये अमेरिकेच्या सहभागावर कसा परिणाम होईल, असे प्रश्नही विचारले जात आहेत. दुसरीकडे, रशियाच्या अंतर्गत राजकारणावर आणि सामाजिक स्थैर्यावर परिणाम होण्यास सुरुवात होण्याआधीच युद्ध समाप्त व्हावे, अशी घाई रशियाला झाली आहे, असे संकेत चीनमधील अभ्यासकांनी दिले आहेत. चीनमधील धोरणकर्त्यांना रशियाच्या अंतर्गत राजकारणात होणाऱ्या संभाव्य बदलाबद्दल चिंता वाटते आहे, असे दिसते. रशियात अंतर्गत घडामोडी होऊन सत्तापालट झालाच, तर नवे नेतृत्व हे एकतर कट्टरवादी किंवा पाश्चात्यांच्या जवळचे असू शकते. त्यामुळे असे नेतृत्व रशियातील अंतर्गत व बाह्य अडचणींच्या पार्श्वभूमीवर ‘पाश्चात्यविरोधी’ धोरणात बदल घडवून आणू शकते, अशी चिंता चीनमध्ये व्यक्त होत आहे. काहीही झाले, तरी ते चीनच्या राष्ट्रहिताच्या दृष्टीने हानीकारक होऊ शकते.

एकूणच रशिया-युक्रेन संघर्षात अल्पावधीत वाढ होऊ शकते; परंतु त्याच वेळी सर्वसामान्य जागतिक स्तरावर शांतता निर्माण व्हावी, अशी इच्छा असल्याने युद्धविरामाच्या दृष्टीने परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि संघर्षामध्ये काही मोठे वळण येऊ शकते, असे निरीक्षण चीनमधील अभ्यासकांकडून नोंदवण्यात आले आहे. म्हणूनच पुतिन यांच्या रशियाला उघड किंवा गुप्त मदत करण्यासाठी आणि युद्ध लांबवण्यासाठी (कारण अमेरिका आणि पाश्चात्य देशांना विचलीत करू शकणारा सध्या हाच एकमेव सर्वांत मोठा मुद्दा असल्याने) पाठिंबा असूनही चिंता कायम आहे. अमेरिकेच्या चीनसंबंधातील धोरणाची खिल्ली उडवणारे अनेक विनोद चीनच्या सोशल मीडियावर केले जात आहेत. ‘कृपया, रशियाला ताब्यात ठेवण्यासाठी मला मदत करा, म्हणजे भविष्यात मी तुम्हाला ताब्यात ठेवू शकीन,’ अशाप्रकारचे विनोद वाचायला मिळत आहेत. युरोपमधील संकटामुळे निर्माण झालेल्या विरोधाभासी प्रवाहांकडे दुर्लक्ष करू नका किंवा त्या विरोधात जाऊ नका, असा इशारा रशियातील अनुभवी अभ्यासकांनी दिला आहे.

अमेरिकेच्या चीनसंबंधातील धोरणाची खिल्ली उडवणारे अनेक विनोद चीनच्या सोशल मीडियावर केले जात आहेत. ‘कृपया, रशियाला ताब्यात ठेवण्यासाठी मला मदत करा, म्हणजे भविष्यात मी तुम्हाला ताब्यात ठेवू शकीन,’ अशाप्रकारचे विनोद वाचायला मिळत आहेत.

सध्याच्या परिस्थितीत अलिप्त राहणे किंवा कोणतीही एक बाजू जाहीरपणे घेणे चीनच्या हिताचे नाही, असे मत निरीक्षक मांडतात. कारण परिस्थिती आणखी चिघळून त्याला महाभयंकर युद्धाचे स्वरूप आले किंवा अगदी अणुयुद्धाचे स्वरूप आले, तर प्रत्येक देशासाठी ते आपत्तीजनक ठरेल. परिस्थिती आणखी बिघडत गेल्यास जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वपूर्ण बनलेल्या या भू-राजकीय खेळात मोठी भूमिका बजावण्याची संधी चीनने घ्यायला हवी. चीनने शांततेसाठी मध्यस्थाची भूमिका पार पाडून जगावर विशेषतः युरोपावर आपला प्रभाव निर्माण करायला हवा. एवढेच नव्हे, तर प्रादेशिक वाटाघाटींमध्ये राजकीय शांतता संवादाला प्राधान्य देऊन या गंभीर वळणावर पुतिन प्रशासनाला महत्त्वपूर्ण आधारही चीन देऊ शकतो, असे ते म्हणतात.

एकूण, युक्रेनच्या मुद्द्यावर समतोल साधण्यासाठी चीनची कसरत सुरू आहे. सध्याच्या अमेरिकाप्रणित जागतिक व्यवस्थेला आव्हान देऊन चीनप्रणित जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी चीन रशियामध्ये आपला मित्र शोधत आहे; परंतु रशिया-युक्रेन युद्धात अमेरिका व युरोपला आणखी चिथावण्याची चीनची इच्छा नाही. कारण त्यामुळे पाश्चात्य देशांबरोबर असलेले गुंतवणुकीसंदर्भातील लाभाचे संबंध कायम ठेवून निर्बंधांचा धोकाही राहणार नाही आणि अर्थव्यवस्थेचेही रक्षण होईल, असे चीनला वाटत आहे. येत्या काही दिवसांत ‘सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही,’ ही नीती चीनला जमेल की दुटप्पीपणामुळे चीनला सगळ्यांच्याच टीकेला सामोरे जावे लागेल, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.