Published on Nov 12, 2020 Commentaries 0 Hours ago

कोरोनोत्तर भारतात इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इतर अनेक आव्हाने असल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ अव्यवहार्य आहे. त्यावर ‘फ्लेक्झिबल वर्क स्पेस’ हे उत्तर असू शकते.

तुम्ही म्हणाल तेथे तुमचे ऑफिस!

यंदाचे वर्ष आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. गेल्या आठ-दहा महिन्यांच्या कॅलेंडरवर लक्ष टाकल्यावर जाणवते की, २४ मार्चच्या आगोदरचे आणि नंतरचे जीवन यात बराच फरक पडला आहे. फक्त कोरोना आणि त्यातून उद्भवलेली भीती या पहिल्या टप्प्याबद्दलच जास्त बोलले गेले आहे. पण त्यानंतर बदललेल्या जीवनाकडे आणि आपण स्वीकारलेल्या नव्या मुल्यांकडे डोळसपणे पाहायला हवे. विशेषकरून पोट भरण्यासाठी करावे लागलेल्या कामाच्या संदर्भात गेल्या काही महिन्यात आमुलाग्र बदल झाले आहेत.

२४ मार्च रोजी संपूर्ण देशात टाळेबंदी जाहीर झाली आणि अनेकांचे जीवन बदलून गेले. घरून काम करण्यास मिळत असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. काहींनी तक्रारी केल्या. पण हळूहळू वास्तव स्वीकारून, बहुसंख्यांनी घरातच कार्यालय थाटले. सुरुवातीला हे काही फार काळ चालणार नाही, महिना-दोन महिन्यांनी पुन्हा कार्यालयात जाऊन काम करावे लागेल, अशी मानसिकता होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव जसजसा वाढत गेला तसतसा टाळेबंदीचा आणि त्याबरोबरच घरून काम करण्याचा कालावधीही लांबत गेला. आताशा तर घरून काम करणे, लोकांच्या अंगवळणी पडल्यासारखे झाले आहे.

या सर्व परिस्थितीत २०१९ हे अगदी आत्ता आत्ता सरलेले वर्षही खूप लांब गेल्यासारखे वाटू लागले आहे. त्या काळात, म्हणजे गेल्याच वर्षी व्यावसायिक मालमत्ता क्षेत्रातील ‘लवचिक कार्यक्षेत्र’ (फ्लेक्झिबल वर्क स्पेस) ही संकल्पना जगभर लोकप्रिय होऊ लागली होती. या अत्यंत लहान पण आकर्षक संकल्पना व्यावसायिक मालमत्ता निर्मिती उद्योगाला चालना देणारी ठरली. आपल्या कर्मचाऱ्यांकरिता वाजवी, कार्यक्षम पण अत्याधुनिक ‘फ्लेक्झिबल वर्क स्पेस’कडे उद्योजक देखील एक पर्यायी व्यवस्था म्हणून बघत नव्हते.

वास्तव्याच्या ठिकाणापासून अगदी जवळ फ्लेक्झिबल वर्क स्पेस किंवा सहकार्यक्षेत्रांची मागणी जगातील इतर कुठल्याही परिसरापेक्षा आशिया-पॅसिफिक प्रांतात झपाट्याने वाढली. या क्षेत्रात भारत दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून विकसित होत आहे. २०२० हे वर्षही फ्लेक्झिबल वर्क स्पेसकरिता वाढीचे वर्ष ठरण्याची शक्यता होती. सातत्याने नकारघंटा वाजवणारे टीकाकारही हे मान्य करू लागले होते. मात्र, पुढे काय घडले हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कोविडने सर्व चित्रच पालटून टाकले.

कुठलाही पर्याय किंवा मार्ग दृष्टिपथात नसताना जगभरातील उद्योगांनी एक विराम घेतला. कामातील आणि व्यावसायिक जीवनातील व्यत्यय किंवा या अडथळ्याचा लवचिक कार्यक्षेत्र उद्योगाला दुर्बल केले. चैतन्य, उर्जा आणि वैविध्यपूर्ण कल्पनांनी नटलेल्याया लवचिक कार्यक्षेत्रांचे आता कोणी नाव काढेनासे झाले. घरून काम किंवा वर्क फ्रॉम होम सुरू होताच प्रसारमाध्यमांमधून फ्लेक्झिबल वर्क स्पेसविरोधात बातम्या येऊ लागल्या. दिवस, आठवडे, महिने उलटल्यानंतर टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून पुन्हा फ्लेक्झिबल वर्क स्पेसच्या विरोधात निर्माण झालेला विरोध काही प्रमाणात क्षमला. कोरोना महासाथीनंतर पुन्हा एकदा हे क्षेत्र फिनिक्स पक्षा प्रमाणे भरारी घेऊन अधिक चैतन्य निर्माण करेल. कोविडमुळे वाजवी, कार्यक्षम आणि चीरकाल चालणाऱ्या व्यवसायांची आवश्यकता निर्माण झाली असल्यानेया आशावादाला वाट मोकळी झाली आहे. .

कोरोनाथीचा फ्लेक्झिबल वर्क स्पेस उद्योगावर झालेला परिणाम

देशव्यापी टाळेबंदीमुळे उद्योग-व्यवसायाची कामे पूर्णपणे बंद झाल्यामुळे मार्च महिन्याच्या उत्तरार्धात आणि पूर्ण एप्रिल महिन्यात त्याचा सर्वच क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम पाहायला मिळाला. कंपन्यानी व्यवसायाचे सातत्य राखण्याकरिता आखलेल्या धोरणामुळे मनुष्यबळावर गदा आली आणि कार्यालय आणि घर यांच्यातील वेगळेपणनाहीसे झाले. टाळेबंदीदरम्यान अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांची ऑनसाइट कामेही पूर्णतः बंद करत आपल्या कर्मचा-यांना घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याचे आदेश देत उत्पादकता कायम राखण्याचा प्रयत्न केला.

टाळेबंदीनंतरच्या काही महिन्यांत फ्लेक्झिबल वर्क स्पेसचे कार्यपालन करणाऱ्या संस्थांनी मनुष्य बळाच्या आकारात निम्म्याने घट अनुभवली. परंतु या संकटकाळातच याउद्योगातील जन्मजात लवचिकता स्पष्ट झाली आणि हळूहळू, उद्योगाने परत भरारीघेण्याची चिन्हे दर्शविली आहेत. खरे सांगायचे झाले तर याला ऐतिहासिक संदर्भही आहेत. ब्रेक्झिटच्या कालावधीदरम्यान ब्रिटनमधील कंपन्या युरोपमध्ये स्थलांतरित होऊ पाहत होत्या. याच वेळी फ्लेक्झिबल वर्क स्पेस हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर आला आणि बर्लिन (जर्मनी) आणि पॅरिस (फ्रान्स) या दोन्ही ठिकाणी अशी अधुनिक कार्यक्षेत्रे असल्याने दोन्ही शहरांना बराच लाभ झाला. शिवाय, सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळातही ऑस्ट्रेलियामध्ये विविध सेवांसहित सज्ज असलेल्या कार्यक्षेत्रांच्या मागणीत पन्नास टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

कोरोना महासाथीने संपूर्ण जग आपल्या कवेत घेतले असताना आपल्या दैनंदिन जीवनात एका नव्या शब्दाची भर पडली आणि तो म्हणजे “सामाजिक अंतर राखणे”. या सामाजिक भानाचे अनुपालन करताना दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर राखणे बंधनकारक झाले आहे. परिणामी जगभरातील कंपन्यांना आपापल्या कार्यालयांची पुनर्रचना करणे भाग पडले किंवा त्यावर विचार करण्यास प्रवृत्त केले. शिवाय, बर्‍याच कंपन्यांनी नावीन्यपूर्ण कामाच्या योजना अवलंबल्या आणि जुनी ‘रोस्टर’कार्यप्रणाली अमलात आणली.

मोठ्या प्रमाणावर व्यवसायात ‘लवचिक कार्यप्रणाली’ स्वीकारली गेल्याने “वुई वर्क” सारख्या व्यवसाय प्रारूपावरील (बिझनेस मॉडेल) विश्वासार्हता अधिक बळावली आहे. महासाथीनंतरच्या काळात आम्हाला व्यवसायांचे पुनर्निर्माण आणि वृद्धीमध्ये दीर्घकालीन धोरणात्मक भागीदार म्हणून पाहिले जाईल, असे आता या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणू लागले आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या खर्चाच्या बाबतीत आपला हात आखडता घेतस्थावर मालमत्तेत गुंतवणूककरण्यासंबंधी पुनर्विचार करीत आहेत. वाजवी खर्च आणि वित्तीय कार्यकुशलता राखण्यात फ्लेक्झिबल वर्क स्पेसच्या संकल्पना महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

परंतु प्रश्न असा आहे की, घरच्या सुरक्षित वातावरणात राहून काम करणाऱ्यांचे काय? येथे देखील, कोरोना महासाथीचा प्रभाव दिसून येईल आणि ‘वर्क फ्रॉम होम’ ऐवजी कुठल्याही दुर्गम स्थानावरून (वर्क फ्रॉम रिमोट) काम करा, असा बदल पहायला मिळेल. कोरोना महासाथीदरम्यान कार्यालय हे प्रशिक्षण, सहकार्य आणि सहयोगाच्या दृष्टीने उत्तम ठिकाण असल्याचे दिसून आले आहे. तसेच अनेक कर्मचाऱ्यांच्या बोलण्यातून कार्यालयाच्या उणिवेची भावनादेखील उघड झाली आहे.

व्यवसायाच्या वाढीकरिता प्रत्यक्ष संपर्क महत्वाचा आहे, असे मत ‘गूगल’चे प्रमुख सुंदर पिचाई आणि ‘ऍक्सेंचर’च्या ज्युली स्वीट यांनी व्यक्त केले आहे. एकत्रितपणे काम करणाऱ्या गटांमध्ये विश्वासार्हता निर्माण होणे, सहज शक्य होते असे २०२० मध्ये तयार करण्यात आलेल्या ‘मॅकेन्झी’च्या एका अहवालात म्हटले आहे.  तसेच या अहवालात घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संपर्क आणि समन्वयातील अभावांचाही उल्लेख केला आहे. त्याचप्रमाणे गुंतागुंतीचे प्रश्न थेट समोरासमोर बसून सोडवणे सोपे जाते असे ‘ब्रुकिंग्ज’ संस्थेच्या अहवालातही म्हटले आहे. या अशा समस्यांमुळे सुमारे ९० टक्के कर्मचाऱ्यांनी किमान एक दिवस तरी कार्यालयात य़ेऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या आकडेवारीमुळे लोक प्रत्यक्ष कार्यालयाला किती महत्व देतात हे स्पष्ट होते.

कोविड-१९ मुळे सुनीसुनी पडलेली कार्यालये पुन्हा पूर्वीसारखी गजबजतील का? हा प्रश्न मनात घर करतो. अशा वेळीही ‘फ्लेक्झिबल वर्क स्पेस’ हा सर्वोत्तम पर्याय ठरेल, असे वाटू लागले आहे. कार्यालयाच्या जागेचे आऊटसोर्सिंग फ्लेक्झिबल वर्क स्पेस व्यावसायिकांना केल्यास कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची ठरावीक संख्या राखण्याचे बंधन कंपन्यांवर राहणार नाही. तसेचसामाजिक अंतर, स्वच्छता राखणे या बाबी काटेकोरपणे पाळल्या जातील, याकडेही बारीक लक्ष ठेवता येईल.

“कोरोनाच्या महासाथीमुळे फ्लेक्झिबल वर्क स्पेसमध्ये स्थलांतरित होण्याचा वेग वाढला आहे. कंपनी, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांना त्यांच्या कार्यालयातील गर्दी कमी करण्यास मदत करू शकते. कॉर्पोरेट ग्राहकांचे सुमारे ६५ ते ७० टक्के व्यवसायात योगदान आहे आणि ते पुढेही राहील.” असेवुई वर्क, इंडिया मुख्य कार्यकारी अधिकारी करण विरवानी म्हणाले. कोरोनोत्तर काळात भारतात इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इतर काही आव्हाने असल्याने वर्क फ्रॉम होमच्या व्यवहार्यतेची मर्यादा लक्षात घेत, फ्लेक्झिबल वर्क स्पेस कर्मचार्‍यांना लवचिकता प्रदान करणारा आणि व्यवसायांसाठी वाजवी दरात समस्यांचे निराकरण करणारा उपाय आहे.

अनेक लघु आणि मध्यम उद्योग फ्लेक्झिबल वर्क स्पेसचा वापर करत आहेत. तसेच कोरोना महासाथीपूर्वी झालेल्या सर्वेक्षणातून २०२० मध्ये सुमारे १३ दशलक्षांहून अधिक लोक फ्लेक्झिबल वर्क स्पेस कार्यक्षेत्राचा वापर करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. याव्यतिरिक्त, लवचिक कार्यक्षेत्र भारतीय ‘गिग’ अर्थव्यवस्थेच्या प्रगतीस पूरक ठरेल. ‘गिग’ अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर १७ टक्के आहे. येत्या काळात ही अर्थव्यवस्था झपाट्याने वाढून यामध्ये उच्चभ्रू सेवांचाही समावेश होईल असे म्हटले जात आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.